दि. ०५ ऑगस्ट १९६५

(श्रीमाताजींनी श्रीअरविंद-आश्रमाच्या सेंटर ऑफ एज्युकेशनमध्ये ‘फ्री प्रोग्रेस एज्युकेशन’ नावाची नवीन शिक्षणपद्धती निर्माण केली. ‘सेंटर ऑफ एज्युकेशन’ची उद्दिष्टं आणि तेथील शिक्षणपद्धती यांचे मूल्यमापन करण्यासाठी आलेल्या भारत सरकारच्या शिक्षण आयोगाच्या शिष्टमंडळाने श्रीमाताजींना पुढील प्रश्न विचारले होते…)

प्रश्न : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सद्यकालीन आणि भावी जीवन विचारात घेता, भारताने शिक्षणामध्ये कोणते उद्दिष्ट ठेवले पाहिजे?
श्रीमाताजी : भारतमातेच्या मुलांना, मिथ्यत्वाला (falsehood) नकार देण्यास आणि सत्याचा आविष्कार करण्यास तयार केले पाहिजे.

प्रश्न : हे उच्चतर उद्दिष्ट गाठण्यासाठी देशाने कोणती पावले उचलावीत? आणि या दिशेने सुरुवात कशी करता येईल?
श्रीमाताजी : चैतन्याचे आविष्करण करण्यासाठी जडद्रव्याला तयार केले पाहिजे.

प्रश्न : भारताची खरी प्रतिभा काय आहे आणि तिचे भवितव्य काय आहे?
श्रीमाताजी : जडभौतिक जोपर्यंत आत्मचैतन्याचे आविष्करण करत नाही तोवर ते मिथ्या आहे, कुचकामी आहे; ही शिकवण जगाला देणे ही भारताची खरी प्रतिभा आहे.

प्रश्न : भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे? मानवामध्ये चैतन्याच्या वाढीसाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची काही मदत होऊ शकेल का?
श्रीमाताजी : चैतन्याच्या आविष्करणासाठी, भौतिकाचा पाया मजबूत, परिपूर्ण आणि अधिक प्रभावी करणे हाच विज्ञान व तंत्रज्ञानाचा एकमेव उपयोग आहे.

प्रश्न : राष्ट्रीय एकात्मतेविषयी भारताला चिंता वाटते. श्रीमाताजींचा या बाबतीतला दृष्टिकोन काय आहे? भारताने स्वत:विषयीचे आणि जगाविषयीचे कर्तव्य कसे पार पाडावे?
श्रीमाताजी : सर्व राष्ट्रांचे ऐक्य हे संपूर्ण जगाचे एक अपरिहार्य भविष्य आहे. परंतु सर्व राष्ट्रांचे ऐक्य घडून येण्यापूर्वी प्रत्येक देशाची अंतर्गत एकात्मता साध्य होणे आवश्यक आहे.

प्रश्न : भारताला भाषाविषयक प्रश्नाने भेडसावले आहे. याबाबतीला आमचा योग्य दृष्टिकोन कसा असावा?
श्रीमाताजी : ऐक्य ही लादलेली गोष्ट असता कामा नये; तर ऐक्य हे जिवंत वास्तव असले पाहिजे. जेव्हा भारत अखंड झालेला असेल तेव्हा भारताकडे स्वाभाविकपणे सर्वांना समजू शकेल अशी एक भाषा असेल.

प्रश्न : शिक्षण हा सर्वसाधारणपणे आज साक्षरतेचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा विषय बनलेला आहे. हे एकप्रकारे हानिकारक नाही का? शिक्षणाला त्याचे आंतरिक मोल आणि त्याची आंतरिक आनंददायकता प्राप्त होण्यासाठी काय करता येईल?
श्रीमाताजी : बुरसटलेल्या विचारसरणीमधून बाहेर पडा आणि आत्म-विकसनावर भर द्या.

प्रश्न : आजची आपली शिक्षणपद्धती कोणत्या आभासामध्ये, भ्रांतिमध्ये अडकली आहे? आणि त्यातून आपण बाहेर कसे पडू शकू?
श्रीमाताजी :
अ) आजच्या शिक्षणपद्धतीमध्ये यश, करिअर आणि पैसा यांना नको तेवढे महत्त्व देण्यात आलेले आहे.
ब) त्यातून बाहेर पडण्यासाठी चैतन्याशी संपर्क प्रस्थापित केला पाहिजे आणि अस्तित्वाचे जे सत्य आहे त्याच्या विकसनास व त्याच्या आविष्करणास सर्वोच्च महत्त्व दिले गेले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 13 : 361-363)

अधिक माहितीसाठी पाहा :
श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन (मराठी विकिपीडिया)
https://mr.wikipedia.org/s/6fyd

 

दि. १६ जुलै १९६५

भारताकडे आत्म्याचे ज्ञान आहे किंवा होते असे म्हणावे लागेल, परंतु भारताने जडभौतिक जीवनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे, त्याला त्रास सहन करावा लागला. तर पाश्चात्त्य देशांकडे भौतिकाचे ज्ञान आहे पण त्यांनी आत्मतत्त्वाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. (देश, काळ, परिस्थितीनुसार) थोडेफार फेरफार करावे लागले तरी, सर्वंकष शिक्षण (integral education) जगातील सर्व राष्ट्रांमध्ये स्वीकारले जाणे शक्य आहे. या शिक्षणाने पूर्ण विकसित आणि उपयोगात आणल्या गेलेल्या जडभौतिकावर, आत्मशक्तीचा यथायोग्य अधिकार पुन्हा प्राप्त करून घेतलाच पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 13 : 361)

 

दि. २९ जुलै १९६४

(श्रीमाताजींच्या भारताच्या नकाशामध्ये पाकिस्तान, नेपाळ, सिक्किम, भूतान, बांग्लादेश, ब्रह्मदेश आणि श्रीलंका यांचा समावेश आहे.)

अखंड भारताच्या त्या नकाशाबद्दल श्रीमाताजी म्हणतात : हा नकाशा भारत-पाकिस्तान फाळणीनंतर बनविण्यात आलेला आहे. वरकरणी कितीही बदल झाले तरी हाच खऱ्याखुऱ्या भारताचा नकाशा आहे. आणि लोकांना काहीही वाटले तरी, खऱ्याखुऱ्या भारताचा हा नकाशा असाच कायम राहणार आहे.

*

इ. स. १९६५

साधक : मला आशा आहे की, काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्या एकीकरणाच्या दिशेने टाकले गेलेले पहिले पाऊल असेल.
श्रीमाताजी : परमप्रज्ञेचे त्याकडे लक्ष आहे.

– श्रीमाताजी (CWM 13 : 360, 366)

 

दि. २६ जानेवारी १९६४

साधक : तुमच्या दिव्य दृष्टीला भारत कसा दिसतो असे जर तुम्हाला एका वाक्यात विचारले तर तुम्ही सारांशरूपाने काय सांगाल?
श्रीमाताजी : जगद्गुरू होणे ही भारताची खरी नियती आहे.

साधक : तुम्हाला आजचे वास्तव कसे दिसते, यावर तुम्ही एका वाक्यात आम्हाला काय सांगाल?
श्रीमाताजी : सद्यस्थितीतील वास्तव हे एक मोठेच मिथ्यत्व (falsehood) आहे; त्याने शाश्वत सत्य दडवले आहे.

साधक : तुमच्या मते, स्वप्न आणि वास्तव यांच्यामध्ये अडथळा बनलेल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या?
श्रीमाताजी : १) अज्ञान २) भीती ३) मिथ्यत्व, खोटेपणा

साधक : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने आजवर जी एकंदर प्रगती केली आहे त्याबाबत तुम्ही समाधानी आहात का?
श्रीमाताजी : नाही.

साधक : अलीकडच्या काळातील सर्वात मोठी लक्षणीय उपलब्धी कोणती? तुम्हाला ती एवढी महत्त्वाची का वाटते?
श्रीमाताजी : सत्याविषयीची आस जागृत झाली. ही बाब महत्त्वाची वाटते कारण सत्याशिवाय वास्तवच नाही.

साधक : सर्वात दु:खदायक अपयश म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टीकडे निर्देश कराल? आणि ती तुम्हाला सर्वात दु:खद का वाटते?
श्रीमाताजी : अप्रामाणिकपणा. कारण तो विध्वंसाकडे नेतो.

– श्रीमाताजी (CWM 13 : 358-359)

 

दि. ०३ फेब्रुवारी १९६३

साधक : सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य काय असले पाहिजे?

श्रीमाताजी : तुमच्या अहंभावात्मक व्यक्तिमत्त्वातून बाहेर पडा आणि भारतमातेचे सुपात्र बालक व्हा. तुमची कर्तव्यं प्रामाणिकपणे व सचोटीने पार पाडा आणि सदोदित दिव्य कृपेवरील स्थिर विश्वासाने आनंदी, आत्मविश्वासयुक्त असे राहा.

– श्रीमाताजी (CWM 13 : 358)

दि. २७ ऑक्टोबर १९६२

देशभक्तीची भावना ही आपल्या योगाशी मिळतीजुळती नाही, असे नाही; उलट, आपल्या मातृभूमीच्या अखंडतेची आणि तिच्या शक्तिसामर्थ्याची आस बाळगणे ही पूर्णपणे न्याय्य भावना आहे. मातृभूमीने प्रगती करावी; मातृभूमीने तिच्या अस्तित्वाचे सत्य, संपूर्ण स्वतंत्रपणे अधिकाधिक आविष्कृत करावे अशी इच्छा बाळगणे ही चांगली व उदात्त इच्छा आहे आणि ती आपल्या योगासाठी हानिकारक असू शकत नाही.

परंतु व्यक्तीने उतावीळ होऊ नये आणि अपरिपक्वपणे घाईघाईने कृती करायला सरसावू नये. व्यक्ती प्रार्थना करू शकते आणि तिने तशी ती करावी. अभीप्सा बाळगावी, सत्याच्या विजयाची आस बाळगावी आणि त्याबरोबरच, स्वत:ची दैनंदिन कर्तव्यं पार पाडणे चालू ठेवावे आणि करायच्या कृतीचा सुस्पष्ट संकेत मिळण्याची शांतपणे प्रतीक्षा करावी.

– श्रीमाताजी (CWM 13 : 356)

 

दि. ०६ मार्च १९६२

साधक : कुरुक्षेत्राच्या महायुद्धाला पाच हजार वर्षं होऊन गेली परंतु श्रीकृष्णाच्या राजनैतिक प्रतिभेचा सौम्य प्रभाव कालपरवाच झांशीची राणी लक्ष्मीबाईच्या अंताबरोबर संपुष्टात आला, असे श्रीअरविंदांनी म्हटले आहे. त्यानंतर, भारताचे आणि नवीन जगताचे संरक्षण करण्यासाठी, आता पूर्णावतार होण्याचीच आवश्यकता आहे. आत्ता सुप्तावस्थेत असलेले ब्राह्मतेज हा अवतार जागृत करेल. श्रीअरविंदांनी असेही म्हटले आहे की, या कलियुगामध्येच ईश्वर पूर्णत्वाने आविष्कृत होणार आहे; कारण या युगामध्ये मनुष्य हा अतिशय बिकट संकटामध्ये सापडला आहे. तो अवतार इथेच आहे. त्यांनी स्वतःच हे महान सत्य उघड केले आहे की, ईश्वर भारतामध्ये पूर्णपणे आविष्कृत झाला आहे. परंतु हे आविष्करण म्हणजे ते स्वतःच आहेत, हे मात्र ते विनम्रतेमुळे सांगत नाहीत.

श्रीमाताजी : जे कार्यसिद्धी करतात त्यांना बढाया मारण्याची सवय नसते. ते त्यांची शक्ती कार्यासाठी राखून ठेवतात आणि कार्यफलाचे वैभव ‘शाश्वत ईश्वरा’वर सोपवितात.

– श्रीमाताजी (CWM 16 : 269-270)

१९५७

सद्यस्थितीत कितीही अंधकार दिसत असला तरीही भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे.

– श्रीमाताजी (CWM 13 : 355)

 

१९५५

साधक : भारताचे भारतीयांपासून रक्षण करावे म्हणून मी आपणास प्रार्थना करत आहे.

श्रीमाताजी : हो, ते आवश्यक आहे, असे दिसते.

*

दि. १५ नोव्हेंबर १९५५

(भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी श्रीअरविंद आश्रमाला भेट दिली होती. तेव्हा श्रीमाताजींनी दिलेला संदेश…)

भारताचे जे जीवितकार्य आहे त्या उंचीप्रत त्याने उन्नत झालेच पाहिजे आणि त्याने जगामध्ये सत्याची उद्घोषणा केली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 13 : 354)

दि.०१ नोव्हेंबर १९५४

(श्रीअरविंदांनी ज्याला ‘एकात्म भारताचा आध्यात्मिक ध्वज’ असे म्हटले होते त्या ध्वजाची मूळ संकल्पना श्रीमाताजींची आहे. निळ्या रंगाच्या चौरसाकृतीच्या मध्यभागी सुवर्णरंगातील श्रीमाताजींचे बोधचिन्ह हे त्या ध्वजाचे स्वरूप आहे.)

श्रीमाताजींनी त्यासंबंधी दिलेला संदेश असा : “आज ०१ नोव्हेंबर, आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा दिवस आहे. आमच्याकडे एक ध्वज आहे ज्याला श्रीअरविंद यांनी ‘एकात्म भारताचा आध्यात्मिक ध्वज’ असे संबोधले आहे. त्याचा चौरस आकार, त्याचा रंग आणि त्यावरील प्रत्येक तपशील यांना एक प्रतीकात्मक अर्थ आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी त्याचे ध्वजारोहण झाले होते. आता या फ्रेंच वसाहती भारताबरोबर एकसंघ झाल्यामुळे, ०१ नोव्हेंबर १९५४ रोजी परत ध्वजारोहण करण्यात येईल. भविष्यात जेव्हा जेव्हा भारत स्वतःचे भूभाग पुनर्प्राप्त करेल तेव्हा तेव्हा असे ध्वजारोहण केले जाईल. या जगामध्ये एकात्म भारताला एक विशेष कामगिरी पूर्ण करायची आहे. श्रीअरविंदांनी स्वत:चे समग्र जीवन त्यासाठी व्यतीत केले आणि तेच करण्यासाठी आम्हीसुद्धा कटिबद्ध आहोत.”

एका प्रसंगी बोलताना श्रीमाताजी म्हणाल्या होत्या, ”आमच्यासाठी हा ध्वज म्हणजे पुनरुज्जीवित, एकात्म आणि विजयी भारताचे प्रतीक आहे. असा भारत, जो गुलामगिरीची सारी बंधने झुगारून, शतकांची निद्रा झटकून जागा होत आहे, पुन्हा एकदा एक महान आणि एकात्म भारत म्हणून तो उदयाला येणार आहे, त्यासाठी नवजन्माच्या साऱ्या यातनाही त्याने सोसल्या आहेत, अशा भारताने आत्म्याच्या सर्वश्रेष्ठ आदर्शाकडे जगाला घेऊन जायचे आहे.”

निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण रंगातील बोधचिन्ह या विषयी बोलताना त्या म्हणाल्या, “भारताच्या आध्यात्मिक जीवनकार्याचा हा ध्वज आहे आणि या जीवनकार्याच्या परिपूर्तीमध्येच भारताची एकात्मता साध्य होणार आहे.”

– श्रीमाताजी (CWM 13 : 354; 12 : 260; 13 : 352)