आपले जीवितकार्य

(कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन यांनी श्रीअरविंद यांना लिहिलेले पत्र आपण काल विचारात घेतले. आज आपण श्रीअरविंद यांनी कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन यांना दिलेले पत्रोत्तर विचारात घेऊ.)
०७ सप्टेंबर १९३६, पाँडिचेरी

वास्तविक, आध्यात्मिक सत्यासाठी आणि आध्यात्मिक जीवनासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे पहिले कारण ईश्वराचा शोध घेणे हेच असते; हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे आणि त्या व्यतिरिक्त इतर सारे शून्यवत् आहे. आणि एकदा का ईश्वराचा शोध लागला की मग त्या ईश्वराचे आविष्करण करायचे. सर्वप्रथम आपल्या मर्यादित चेतनेचे रूपांतर दिव्य चेतनेमध्ये करणे; अनंत शांती, प्रकाश, प्रेम, सामर्थ्य, परमानंद यांमध्ये जीवन जगणे; आपल्या मूलभूत प्रकृतीमध्ये आपण तो ईश्वरच होणे आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या क्रियाशील प्रकृतीने, त्याचे वाहन, त्याचे माध्यम, त्याचे साधन बनणे म्हणजे ईश्वराचे आविष्करण करणे. पण, मानवतेसाठी कार्य करणे किंवा भौतिक स्तरावर एकतेचे तत्त्व प्रत्यक्ष कृतीत आणणे या गोष्टी म्हणजे मनाद्वारे दिव्य सत्याचा चुकीच्या पद्धतीने लावलेला अर्थ आहे; या गोष्टी अध्यात्मसाधनेचे पहिले किंवा खरे उद्दिष्ट असू शकत नाहीत.

आधी आपण आपला आत्मा शोधला पाहिजे, ईश्वर शोधला पाहिजे, तेव्हाच आपल्याला, आपला आत्मा किंवा ईश्वर आपल्याकडून ज्या कार्याची अपेक्षा करत आहे, ते कार्य काय आहे ते समजून येईल. तोपर्यंत आपले जीवन आणि आपल्या कृती या, ईश्वराचा शोध घेण्याची साधने ठरू शकतात किंवा त्या शोधासाठी साहाय्यक ठरू शकतात पण त्यांचे अन्य कोणतेही उद्दिष्ट असता कामा नये. जसजसे आपण आंतरिक चेतनेमध्ये विकसित होऊ लागतो किंवा आपल्यामध्ये ईश्वराचे आध्यात्मिक सत्य जसजसे वृद्धिंगत होऊ लागते, तसतसे आपले जीवन आणि आपल्या कृती, आपली कर्मं ही त्यामधूनच प्रवाहित झाली पाहिजेत, त्याच्याशीच समरस झालेली असली पाहिजेत. पण त्याआधीच (आत्म्याचा किंवा ईश्वराचा शोध लागण्यापूर्वीच) आपले जीवन कसे असले पाहिजे, आपले कार्य काय असले पाहिजे हे आपण आपल्या मर्यादित मानसिक संकल्पनांच्या आधारे ठरविणे म्हणजे आपल्या आंतरिक आध्यात्मिक सत्याच्या विकसनामध्येच खोडा घालण्यासारखे आहे.

आपल्या अंतरंगातील आध्यात्मिक सत्य जसजसे वृद्धिंगत होत जाते तसतसे ईश्वरी प्रकाश व सत्य, ईश्वरी शक्ती आणि ऊर्जा, ईश्वरी विशुद्धता व शांती आपल्यामध्ये कार्य करत आहेत; आपल्या कर्मांवर तसेच आपल्या चेतनेवर त्या कार्य करत आहेत; आपल्यामधील हीणकसपणा काढून, त्या जागी आत्मरूपी विशुद्ध सोन्याची प्रस्थापना करून, ईश्वरी प्रतिमेमध्ये आपली पुनर्रचना घडविण्यासाठी आपल्या कर्मांचा व चेतनेचा उपयोग केला जात आहे, हे आपल्याला जाणवेल. आपल्यामध्ये जेव्हा ईश्वरी उपस्थिती सातत्याने असेल आणि आपली चेतना रूपांतरित झालेली असेल तेव्हाच, या भौतिक स्तरावर ईश्वरी आविष्करण करण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत, असे म्हणण्याचा आपल्याला अधिकार पोहोचतो.

एखादा मानसिक आदर्श किंवा तत्त्व मनाशी दृढ बाळगणे आणि ते आपल्या आंतरिक कार्यावर लादणे यामधून आपण स्वतःला मानसिक अनुभूतीमध्येच मर्यादाबद्ध करण्याचा धोका संभवतो; किंवा ईश्वराशी सायुज्य व एकत्व यांची खरी पूर्ण वाढ होण्याऐवजी, आणि ईश्वराच्या इच्छेचा आपल्या आयुष्यात जीवलग व मुक्त बहर येण्याऐवजी, अर्ध्या-कच्च्या घडणीद्वारे त्याचा आभास निर्माण होण्याचा किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण होण्याचा धोका संभवतो. मनाला लागलेले हे चुकीचे वळण आहे आणि त्या बाजूलाच आजच्या मनाचा विशेष कल आहे. एकमेव आवश्यक असणाऱ्या गोष्टीवरून (म्हणजे ईश्वराचा शोध घेणे या गोष्टीवरून) आपले चित्त विचलित करणाऱ्या अशा किरकोळ गोष्टी जवळ करण्यापेक्षा, ईश्वराच्या साक्षात्कारामधून प्राप्त होऊ शकतात अशा शांती किंवा प्रकाश किंवा आनंद या गोष्टी मिळविण्यासाठी ईश्वराकडे वळणे हे अधिक बरे!

आंतरिक जीवनाप्रमाणे भौतिक जीवनाचेदेखील दिव्यत्वात रूपांतर (divinisation) करणे हा, आम्ही जी ’दिव्य योजना’ पाहत आहोत तिचाच एक भाग आहे, पण आंतरिक साक्षात्काराच्या बहरातूनच तो पूर्णत्वास जाऊ शकतो; (भौतिक जीवनाचे दिव्यत्वात रूपांतर) ही अशी एक गोष्ट आहे की जी मानसिक तत्त्वाच्या कार्यामधून होऊ शकत नाही; तर ती अंतरंगातून बाह्य दिशेने विकसित होत जाते. मानसिक प्रयत्नांचे, जिवंत अशा आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन कसे करायचे, त्यासाठी कोणती साधना करायची? असे तुम्ही विचारले आहे. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 05-06)

श्रीअरविंद
Latest posts by श्रीअरविंद (see all)