उच्चतर चेतनेचे अवतरण
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
तुमच्या अंतरंगामधून ज्या कल्पना आणि जाणिवांचा उदय होत असल्याचे तुम्ही लिहिले आहे, ती अतिशय चांगली गोष्ट आहे. त्या कल्पना आणि जाणिवा नवजात आंतरात्मिक स्वरूपाच्या आहेत. विचार नाहीसे होत असल्याची आणि तुमच्या आतमध्ये काहीतरी ऊर्ध्वमुख होत, डोक्यामधून बाहेर पडून, वर जात असल्याची तुम्हाला जी जाणीव होत होती, ती जाणीव आपल्या साधन-प्रक्रियेचा एक भाग आहे.
तुमच्या वर म्हणजे तुमच्या शरीरात नव्हे, तर तुमच्या मस्तकाच्या वर उच्चतर चेतना असते, तिला आम्ही ‘उच्चतर, आध्यात्मिक किंवा दिव्य चेतना’ असे संबोधतो किंवा तिला ‘श्रीमाताजींची चेतना’ असे आम्ही संबोधतो. जेव्हा तुमचे अस्तित्व खुले होते तेव्हा, तुमच्यामधील सर्व घटक म्हणजे तुमचे मन (मस्तक), तुमचे भावनिक अस्तित्व (हृदय), प्राण, एवढेच नव्हे तर, तुमच्या शारीर-चेतनेमधील काही गोष्टी त्या महत्तर, उच्चतर चेतनेशी जोडल्या जाण्यासाठी म्हणून आरोहण (ascend) करू लागतात. आणि तुम्ही लिहिले आहे त्याप्रमाणे, व्यक्ती डोळे मिटून ध्यानस्थ बसली की मग तिला या आरोहणाचे संवेदन होते. याला ‘कनिष्ठ चेतनेचे आरोहण’ असे म्हटले जाते.
कालांतराने मग वरून शांती, हर्ष, प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान इत्यादी गोष्टींचे अवतरण (descend) व्हायला लागते आणि मग व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये मोठे परिवर्तन घडायला लागते. यालाच आम्ही ‘उच्चतर चेतनेचे अवतरण किंवा ‘श्रीमाताजींच्या चेतनेचे अवतरण ’ असे संबोधतो.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 384-385)
- भक्तीचे विविध प्रकार - September 22, 2026
- वासनात्मा आणि खरा आत्मा - September 21, 2026
- पूर्णयोगासाठी आवश्यक असणारी तयारी - September 16, 2026




