दिव्य शक्तीस आवाहन का?
आपल्यामधील अहंपुरुष (ego person) हा स्वतःच्या ताकदीने किंवा इच्छाशक्तीने किंवा ज्ञानाने स्वतःचे रूपांतरण करू शकत नाही किंवा स्वतःच्या एखाद्या गुणाद्वारेसुद्धा तो स्वतःच्या प्रकृतीचे दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतरण करू शकत नाही. तो एकच गोष्ट करू शकतो आणि ती म्हणजे तो स्वतःला रूपांतरणासाठी सुपात्र बनवू शकतो आणि तो जे बनण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्याप्रत तो स्वतःचे अधिकाधिक समर्पण करू शकतो.
जोपर्यंत आपल्यामध्ये अहं सक्रिय असतो, तोपर्यंत आपली वैयक्तिक कृती ही नेहमीच प्रकृतीच्या दृष्टीने, अस्तित्वाच्या कनिष्ठ पातळीवरील श्रेणीचा एक भाग म्हणूनच राहणार आणि ती कृती नेहमी अंधकारयुक्त किंवा अर्ध-प्रकाशित, तिच्या क्षेत्रापुरतीच सीमित आणि ऊर्जेच्या दृष्टीने फक्त आंशिकरित्याच परिणामकारक ठरणार.
आपल्या प्रकृतीमध्ये फक्त प्रकाशमान सुधारणा नव्हे तर, खरेखुरे आध्यात्मिक रूपांतरण करून घ्यायचे असेल तर, हे अद्भुत कार्य घडून यावे यासाठी आपण दिव्य शक्तीस आवाहन केलेच पाहिजे. कारण रूपांतरणासाठी आवश्यक असणारे निर्णायक, सर्व-प्रज्ञावान आणि असीम असे बल फक्त त्या ‘दिव्य शक्ती’कडेच असते.
– श्रीअरविंद (CWSA 23 : 86)
- उन्मुखता आणि प्रगती - August 19, 2026
- पूर्णयोगाचा समग्र सिद्धान्त - August 18, 2026
- योगाभ्यासामधील प्रमुख गोष्ट - August 17, 2026





