अडचणींचे प्रगतीच्या संधीमध्ये रूपांतर
साधक : ईश्वरी कृपेच्या स्पर्शामुळे अडचणींचे प्रगतीच्या संधीमध्ये रूपांतर कसे होते?
श्रीमाताजी : सोपे आहे हे समजायला. कल्पना करा की, तुम्ही एखादी मोठी चूक केली आहे आणि आता तुम्ही मोठ्या अडचणीमध्ये सापडला आहात. तुमच्यामध्ये जर श्रद्धा असेल, ईश्वरी कृपेवर तुमचा विश्वास असेल आणि तुम्ही जर खरोखरच तिच्यावर विसंबून राहिलात तर, तुम्हाला अचानक असे जाणवेल की, हा एक धडा आहे. म्हणजे, ही अडचण किंवा तुम्ही केलेली चूक म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, तो एक धडा आहे आणि तुमच्यामधील कोणत्या गोष्टीमध्ये बदल करायला हवा हे तुम्ही शोधावे, ते शिकविण्यासाठी ती चूक घडली होती. आणि अशा रितीने, ईश्वरी कृपेच्या साहाय्याने तुमच्यामधील कोणत्या गोष्टीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे, त्याचा तुम्हाला शोध लागतो. आणि मग तुम्ही त्या गोष्टीमध्ये बदल करता. अशा रितीने, आलेल्या त्या अडचणीमधून तुम्ही एक मोठी झेप घेतलेली असते, तुम्ही खूप प्रगती केलेली असते. हे असे सदासर्वकाळ चालू असते.
फक्त त्यासाठी तुम्ही खरोखरच पूर्ण प्रामाणिक असले पाहिजे. म्हणजे तुम्ही ईश्वरी कृपेवर भरवसा ठेवला पाहिजे आणि तिला तुमच्यामध्ये कार्य करू दिले पाहिजे. तुमच्यामधील एखादा घटक साहाय्यासाठी याचना करत आहे आणि त्याचवेळी दुसरा घटक मात्र त्याला प्रतिकार करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे, असे असता कामा नये. त्या दुसऱ्या घटकाला स्वतःमध्ये बदल करण्याची मुळीच इच्छा नसते, आणि त्यामुळे तो प्रतिकार करत राहतो, हीच खरी अडचण असते. म्हणून, तुम्ही हातचे काहीही राखून न ठेवता अगदी पूर्णपणे, समग्रपणे प्रामाणिक राहिले पाहिजे, असे श्रीअरविंद सांगतात. (क्रमश:)
– श्रीमाताजी (CWM 06 : 242)
- खरा प्रामाणिकपणा - April 21, 2026
- प्रामाणिकपणा म्हणजे काय? - April 20, 2026
- सर्वात मोठा अप्रामाणिकपणा - April 19, 2026






