(पूर्वार्ध)

‘सुजाण व्हा’ असे सांगण्यासाठी सर्वसाधारणपणे जी कारणे सुचविली जातात ती नेहमीच अगदी किरकोळ असतात, असे मला नेहमी वाटत आले आहे. उदाहरणार्थ, “असे करू नका, नाहीतर तुम्हाला दुःख सहन करावे लागेल. तसे करू नका, नाहीतर त्यातून तुमच्या मनात भीती निर्माण होईल.” …परंतु यामुळे चेतना अधिकाधिक शुष्क बनत जाते, कठीण बनत जाते कारण ती दुःख-वेदनेला घाबरत असते.

(म्हणून तसे सांगण्याऐवजी) असे सांगितले गेले पाहिजे की, चेतनेची एक अशी स्थिती असते की, ज्या स्थितीमध्ये निर्भेळ आनंद असतो, छायाविरहित प्रकाश असतो, जेथे भीतीच्या सर्व शक्यताच नाहीशा होतात. अशी स्थिती अभीप्सेद्वारे आणि आंतरिक सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साध्य करून घेता येते. ही अशी अवस्था असते की, ज्या अवस्थेमध्ये व्यक्ती स्वत:साठी जगत नाही, तर व्यक्ती जे काही करते, जे काही तिला वाटते, तिच्या सर्व कृती या परमेश्वराला अर्पण या भावातून, परिपूर्ण विश्वासातून, स्वत:विषयीच्या चिंता, काळजी यांपासून विनिर्मुक्त होऊन केल्या जातात. या अवस्थेमध्ये स्वत:वरील सर्व प्रकारचे ओझे की, जे आता ओझे वाटतच नाही, ते सारे त्या परमेश्वरावर सोपविलेले असते. (परमेश्वरावर सारे काही सोपविले असल्यामुळे) स्वत:विषयी कोणतीही काळजी नसणे, (परमेश्वराखेरीज अन्य कशाचाही विशेषत:) स्वत:विषयीचा कोणताही विचार मनात नसणे, हा एक अवर्णनीय आनंद असतो.
(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 03 : 256)

तुम्ही प्रत्येकाने एक गोष्ट करण्याचा प्रयत्न करावा, असे मी तुम्हाला सुचवेन. ती अशी की, ‘दिवसातून फक्त एक तास, अगदी अनिवार्य आवश्यक शब्दांव्यतिरिक्त काहीही बोलायचे नाही. एक शब्द अधिक नाही की उणा नाही. तुमच्या दैनंदिन जीवनातील, तुमच्या सोयीची अशी एक तासाभराची वेळ निवडा आणि त्या तासाभरात स्वतःचे अगदी जवळून निरीक्षण करा आणि अगदी आवश्यक तेवढेच शब्द उच्चारा.’

(असे म्हटल्याबरोबर) पहिली अडचण निर्माण होते ती अशी की, अगदी अनिवार्य, आवश्यक असे शब्द कोणते आहेत आणि कोणते नाहीत हे ओळखायचे कसे? खरंतर, हाच एक स्वयमेव अभ्यासाचा विषय आहे आणि (तुम्ही सातत्याने त्याचा अभ्यास करत राहिलात तर) दर दिवशी तुमच्यामध्ये अधिकाधिक प्रगती होत राहील. नंतर, तुमच्या असे लक्षात येईल की, जोपर्यंत तुम्ही काहीच बोलत नसता तोपर्यंत पूर्णपणे शांत राहणे तितकेसे अवघड नसते. परंतु एकदा का तुम्ही बोलायला सुरुवात केलीत की मग मात्र तुम्ही नेहमीच दोन, तीन, दहा, बारा, वीस निरुपयोगी शब्द बोलत राहता, की जे शब्द उच्चारण्याची (वास्तविक) अजिबात आवश्यकता नसते.

– श्रीमाताजी (CWM 03 : 259)

(उत्तरार्ध)

‘भांडणतंटे न करतासुद्धा व्यक्ती जीवन जगू शकते,’ असे म्हणणे कदाचित काहीसे विचित्र वाटेल. कारण, गोष्टी आज जशा आहेत, तशा पाहिल्या तर हे जीवन जणू काही भांडणतंट्यांनीच बनलेले असावे असे दिसते. म्हणजे असे की, जी माणसं एकत्र राहतात त्यांचा मुख्य उद्योग हा जणू भांडणतंटे करणे हाच असतो, असे दिसते. मग ती भांडणे उघड असोत किंवा छुपी असोत. तुम्ही प्रत्येक वेळी अगदी आरडाओरडाच करता असे नाही किंवा अगदी हमरीतुमरीवर येता असेही नाही; मात्र आतून तुम्ही सतत एकसारख्या चिडचिडलेल्या अवस्थेमध्ये वावरत असता. कारण तुम्हाला स्वतःमध्ये जे परिपूर्णत्व आणण्याची इच्छा असते ते तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसत नाही. खरंतर ती गोष्ट प्रत्यक्षात आणणे तुम्हालासुद्धा अवघड असते; परंतु तुम्हाला असे वाटत असते की, इतरांनी मात्र ती प्रत्यक्षात आणलीच पाहिजे. “ते असे कसे काय वागू शकतात?” असे तुम्ही म्हणता. (त्यांनी ‘जसे’ वागता कामा नये असे तुम्हाला वाटते) ‘तसे‌’ वागणे तुम्हालासुद्धा किती कठीण जाते, हे तेव्हा तुम्ही पूर्णपणे विसरून गेलेले असता.

…प्रत्येक गोष्टीकडे हसतमुखाने पाहा. ज्या गोष्टींमुळे तुमची चिडचिड होते त्या गोष्टींकडे तुम्ही एक धडा या दृष्टीने पाहा. तसे कराल तर तुमचे जीवन अधिक शांतिपूर्ण आणि अधिक परिणामकारक होईल. कारण जे परिपूर्णत्व तुम्ही स्वतः प्रत्यक्षात आणू इच्छित असता, ते तुम्हाला इतरांमध्ये दिसले नाही तर, त्यामुळे तुमची जी चिडचिड होते त्यामध्ये तुमच्यातील पुष्कळशी ऊर्जा तुम्ही निश्चितपणे गमावून बसता. परिपूर्णत्व इतरांनी प्रत्यक्षात उतरवले पाहिजे या मुद्द्यापाशीच तुम्ही थांबता आणि वास्तविक जे उद्दिष्ट तुम्ही साध्य करून घेतले पाहिजे त्याविषयी, तुम्ही क्वचितच जागरूक असता. तुम्ही जर त्याविषयी जागरूक असाल तर, तुम्हाला जे कार्य नेमून देण्यात आलेले आहे ते करायला सुरुवात करा. म्हणजे, तुम्ही स्वतः काय केले पाहिजे ते प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करा आणि इतर काय करतात याची चिंता करणे सोडून द्या. कारण, खरंतर ते तुमचे कामच नाही.

खऱ्याखुऱ्या योग्य दृष्टिकोनाचा मार्ग सांगायचा झाला तर तो हाच आहे की, “जे कोणी तुमच्या अवतीभोवती आहेत, जीवनात जी कोणती परिस्थिती तुमच्या वाट्याला आली आहे, ज्या कोणत्या व्यक्ती तुमच्या जवळ आहेत त्या म्हणजे, तुम्ही कोणती प्रगती केली पाहिजे हे तुम्हाला दाखवून देणारे जणू काही ईश्वरी चेतने‌ने तुमच्यासमोर धरलेले आरसेच असतात. इतरांच्या एखाद्या गोष्टीचा तुम्हाला जर धक्का बसला तर, त्याचा अर्थ हाच की, ‘तुम्ही ते कार्य तुमच्या स्वतःमध्ये करणे आवश्यक आहे.’ व्यक्ती जर स्वतःच्या अंगी खरेखुरे परिपूर्णत्व बाणवेल तर तिला तेच परिपूर्णत्व इतरांमध्येही आढळून येईल.

– श्रीमाताजी (CWM 10 : 22-23)

(पूर्वार्ध)

एखाद्या व्यक्तीमधील एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला अजिबात पटण्यासारखी नसते किंवा ती तुम्हाला अगदी हास्यास्पद वाटते (आणि तुम्ही म्हणता,) “तो असा आहे, तो तसा वागतो, तो असे असे म्हणतो, तो अशा अशा गोष्टी करतो.” अशावेळी तुम्ही स्वतःच्या मनाशी म्हटले पाहिजे, “बरं, ठीक आहे, पण मी देखील कदाचित माझ्या नकळतपणे तशाच गोष्टी करत नसेन कशावरून? टीका करण्यापूर्वी मी स्वतःकडेच नीट लक्षपूर्वक असे पाहिले पाहिजे की, थोड्या वेगळ्या पद्धतीने असेल कदाचित, पण मीसुद्धा तीच गोष्ट तर करत नाहीये ना? याची मला खात्री करून घेतली पाहिजे.’’

प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीच्या वागण्याचा धक्का बसतो तेव्हा तेव्हा, उपरोक्त विचार करण्यासाठी लागणारी चांगली जाणीव आणि बुद्धिमत्ता जर तुमच्यापाशी असेल, तर तुमच्या असे लक्षात येईल की, जीवनामध्ये तुमचे इतरांशी असणारे संबंध हे जणू एखाद्या आरशाप्रमाणे असतात. तुमच्यामध्ये ज्या ज्या अपूर्णता, दुर्बलता आहेत त्या तुम्हाला अगदी सहजतेने आणि अगदी स्पष्टपणे पाहता याव्यात यासाठी, (आरशाच्या माध्यमातून) त्या तुमच्यासमोर मांडण्यात आलेल्या असतात.

सर्वसाधारणपणे आणि जवळजवळ निरपवादपणे सांगायचे झाले तर, तुम्हाला इतरांमधील जी गोष्ट खटकत असते, अगदी नेमकी तीच गोष्ट कमीअधिक झाकलेल्या रूपात, कमीअधिक गुप्त रूपात, कदाचित किंचितशा वेगळ्या वेषात तुम्ही स्वतःमध्ये बाळगून असता. ही तीच गोष्ट असते जिच्यामुळे तुमची फसगत होण्याची शक्यता असते. स्वतःमधील जी गोष्ट तुम्हाला फारशी त्रासदायक वाटत नसते तीच गोष्ट जेव्हा तुम्हाला दुसऱ्यामध्ये दिसते, तेव्हा ती एकदम भयंकर वाटू लागते. याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी तुम्हाला त्याची पुष्कळच मदत होईल. आणि त्यामुळे इतरांबरोबर असणाऱ्या तुमच्या नात्याबाबत तुमच्यामध्ये एक सूर्यप्रकाशवत्‌‍ सहिष्णुता उदयाला येईल; समजूतदारपणातून येणारी सदिच्छा उदयाला येईल आणि मग त्यातून, अगदी निरर्थक असणाऱ्या भांडणतंट्यांचा देखील शेवट होईल.

(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 10 : 21-22)

लोक तुमच्याविषयी द्वेषपूर्ण उद्गार काढतात, तुम्हाला मूर्खात काढतात त्यामुळे तुम्ही जर चिंताग्रस्त झालात, दुःखी झालात किंवा नाउमेद झालात तर तुम्ही (योग)मार्गावर फार प्रगत होऊ शकणार नाही. अशा गोष्टी तुमच्या वाट्याला येतात याचे कारण तुम्ही दुर्दैवी आहात किंवा तुमच्या नशीबातच सुख नाही असे मुळीच नाही; तर उलट दिव्य चेतने‌ने व दिव्य कृपे‌ने तुमचा संकल्प गांभीर्याने घेतला आहे असा त्याचा अर्थ होतो. तुमचा निश्चय किती प्रामाणिक आहे, मार्गातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही खंबीर आहात का, याची पारख करण्यासाठी, तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा कसोटीच्या दगडाप्रमाणे (सोन्याची पारख करण्याचा सोनाराकडे असणारा कसोटीचा दगड) दिव्य चेतनेकडून व दिव्य कृपेकडून वापर केला जात असतो, हे त्यामागचे खरे कारण असते.

म्हणून जर कोणी तुमचा उपहास केला किंवा कोणी तुमच्याविषयी निंदाजनक शब्द उच्चारले तर, तुमच्या खऱ्या गुणांची लोकांना कदरच नाही असे वाटून तुम्ही उदास, संतप्त किंवा उद्विग्नही होता कामा नये. उलट, अशावेळी पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे ती अशी की, तुमच्यातील कोणत्या दुर्बलतेमुळे वा कोणत्या अपूर्णतेमुळे तुमच्याविषयी तसे उद्गार काढले गेले ते तुम्ही अंतर्मुख होऊन पाहिले पाहिजे. एवढेच नव्हे तर, तुमच्यातील कोणता दोष, कोणती दुर्बलता वा कोणती विकृती तुम्ही दुरुस्त केली पाहिजे हे दाखवून दिल्याबद्दल, तुम्ही दिव्य कृपे‌विषयी कृतज्ञ असले पाहिजे. दुःखीकष्टी होण्याऐवजी, तुम्ही पूर्णपणे समाधानी झाले पाहिजे आणि तुमचे अहित व्हावे असा जो तुमच्या निंदकांचा हेतू होता, त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ करून घेतला पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 282)

(उत्तरार्ध)

आपल्या हाती असलेला वेळ मुळातच अगदी कमी असतो आणि तो अधिकच कमी असल्याचे कालांतराने तुमच्या लक्षात येते. जीवनाच्या अखेरीस तुमच्या लक्षात येते की, तुम्हाला मिळालेली संधी तुम्ही तीनचतुर्थांश वेळेला गमावलेली आहे. मग अशा वेळी तुम्ही हाती राहिलेल्या थोड्या वेळातच दुप्पट काम करू पाहता पण त्याचाही काही उपयोग होत नाही. त्यापेक्षा नेमस्तपणे, समतोलपणे, चिकाटीने, शांतपणे कर्म करत राहणे आणि तुम्हाला देण्यात आलेली कोणतीही संधी वाया न दवडणे, म्हणजेच तुम्हाला मिळालेल्या मोकळ्या क्षणाचा वापर खऱ्या उद्दिष्टासाठी व्यतीत करणे हे अधिक उत्तम ठरते.

जेव्हा तुमच्याकडे करण्यासारखे काहीच नसते, तेव्हा तुम्ही अस्वस्थ होता; तुम्ही सैरभैर होता, मित्रमैत्रिणींना भेटता, फिरायला जाता. लक्षात घ्या, मी येथे फक्त त्यातल्या त्यात बऱ्या गोष्टींचाच उल्लेख करत आहे, ज्या गोष्टी करताच कामा नयेत त्यांच्याविषयी तर मी येथे बोलतच नाहीये. अशा गोष्टी करत बसण्यापेक्षा, विस्तीर्ण पसरलेल्या आकाशाखाली वा समुद्रासमोर किंवा झाडांखाली शांतपणे बसा आणि पुढीलपैकी एखादी तरी गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करा – आपण का जगतो हे समजून घ्या, आपण कसे जगायला हवे हे शिका, तुम्हाला जीवनात काय करावेसे वाटते आणि त्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे याचे चिंतन करण्यामध्ये, तसेच ज्यामध्ये तुम्ही जीवन जगत असता त्या गोष्टींपासून म्हणजे अज्ञान, मिथ्यत्व आणि दुःखभोग यांपासून सुटका करून घेण्याचा उत्तम मार्ग कोणता, या साऱ्या गोष्टींचे आकलन करून घेण्यासाठी आणि त्या गोष्टी प्रत्यक्षात उतरविण्यासाठी वेळेचा उपयोग करा.

– श्रीमाताजी (CWM 03 : 250-251)

(पूर्वार्ध)

जीवनामध्ये कित्येक वेळा एक प्रकारचे रिकामपण जाणवते, कधी एखादा रिकामा क्षण किंवा काही मिनिटे किंवा कधीकधी त्याहूनही अधिक वेळ मिळतो. अशा वेळी तुम्ही काय करता? तुम्ही स्वतःचे लक्ष लगेचच दुसरीकडे कोठेतरी वळविण्याचा प्रयत्न करता आणि वेळ जाण्यासाठी मूर्खपणाच्या या नाही तर त्या गोष्टी शोधून काढता. ही गोष्ट सर्वत्र दिसून येते. लहानमोठे सारेच जण कंटाळा येऊ नये म्हणून, काही ना काही तरी करत राहण्यात वेळ घालवितात. कंटाळा या गोष्टीचा त्यांना सर्वात जास्त तिटकारा असतो आणि मूर्खपणाच्या गोष्टी करत राहणे हा त्यांचा, त्या कंटाळ्यापासून सुटका करून घेण्याचा मार्ग असतो.

पण कंटाळ्यापासून सुटका करून घेण्याचा एक अधिक चांगला मार्ग आहे. तो म्हणजे पुढील गोष्टी लक्षात ठेवायच्या – जेव्हा तुम्हाला थोडा रिकामा वेळ मिळतो, एक तास असो किंवा काही मिनिटे असोत, तेव्हा स्वतःला सांगा, “निदान आता तरी मला काही वेळ एकाग्र होण्यासाठी, विखुरलेल्या ‘मी‌’चे एकत्रीकरण करण्यासाठी, जीवनाचे उद्दिष्ट पुनर्जीवित करण्यासाठी, सत्य आणि शाश्वत यांच्याप्रत स्वतःला समर्पित करण्यासाठी मिळाला आहे. (तो वेळ मी व्यर्थ दवडता कामा नये.)’’

तुम्ही जेव्हा बाह्य परिस्थितीने गांजलेले नसता तेव्हा, त्या प्रत्येक वेळी तुम्ही जर मी आत्ता सांगितले त्याप्रमाणे केलेत तर, तुम्ही (योग)मार्गावर वेगाने प्रगती करत आहात, असे तुम्हाला आढळेल. वायफळ गप्पांमध्ये, निरुपयोगी गोष्टींमध्ये किंवा तुमची चेतना ज्यामुळे निम्न पातळीवर उतरते अशा गोष्टींचे वाचन करण्यामध्ये तुमचा वेळ घालविण्यापेक्षा किंवा तुम्हाला विचलित करणाऱ्या इतर सर्व गोष्टींमध्ये वेळ घालविण्यापेक्षा, वर सांगितलेल्या गोष्टींसाठी म्हणजेच योग्य कारणांसाठी वेळ व्यतीत करणे अधिक उत्तम…

(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 03 : 250)

तुम्ही जर सरळ मार्गाचा अवलंब करू पाहात असाल, तुम्ही विनम्र असाल, तुम्ही विशुद्धतेसाठी प्रयत्नशील असाल, तुम्ही जर निरपेक्ष असाल, तुम्हाला एकांतवासाचे जीवन जगायचे असेल, तुम्हाला विवेकपूर्ण जीवन जगायचे असेल तर त्यामुळे तुमचा मार्ग सुकर होईल, गोष्टी सोप्या होतील या भ्रमात तुम्ही राहता कामा नये…

खरेतर परिस्थिती याच्या अगदी उलट असते. जेव्हा तुम्ही आंतरिक व बाह्य पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागता, त्यावेळी एकदम सर्व अडचणी यायला सुरुवात होते. मी अनेकदा लोकांना असे बोलताना ऐकले आहे की, “काय हे? मी आत्ता जरा कुठे चांगले वागायचा प्रयत्न करतो आहे तर, प्रत्येकजण माझ्याशी वाईटच वागतोय.” पण हे असे का घडते? तर, चांगले वागताना तुम्ही कोणताही अंतःस्थ हेतू ठेवू नये, ही शिकवण तुम्हाला देण्यासाठीच ते घडत असते. म्हणजे असे की, इतरांनी तुमच्याशी चांगले वागावे म्हणून केवळ तुम्ही त्यांच्याशी चांगले वागायचे, असे नाही तर, व्यक्तीने चांगल्यासाठीच चांगले वागले पाहिजे. नेहमीसाठी तोच धडा आहे.

व्यक्तीने जितके काही चांगले, उत्तम करता येईल तेवढे करावे, परंतु फळाची अपेक्षा बाळगू नये, परिणाम दिसावेत म्हणून काही करू नये. म्हणजे, कोणत्यातरी बक्षिसाची अपेक्षा बाळगून सत्कृत्य करायचे, जीवन सुखकर व्हावे म्हणून चांगले वागायचे, असे करू नये. कारण या अशा दृष्टिकोनामुळे सत्कार्याचे मोलच नाहीसे होऊन जाते. चांगुलपणाबद्दलच्या प्रेमापोटीच तुम्ही चांगले असले पाहिजे, न्यायाच्या प्रेमापोटीच तुम्ही न्यायी असले पाहिजे; पावित्र्याच्या, शुद्धतेच्या प्रेमापोटीच तुम्ही पवित्र व शुद्ध असले पाहिजे आणि निरपेक्षतेवर असणाऱ्या प्रेमापोटीच तुम्ही निरपेक्ष असले पाहिजे, तरच तुम्ही (योग)मार्गावर प्रगत होण्याची खात्री बाळगू शकता.

– श्रीमाताजी (CWM 03 : 264-265)

आंतरिक आध्यात्मिक प्रगती ही बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते, तर बाह्य परिस्थितीला आपण अंतरंगातून कशी प्रतिक्रिया देतो यावर ती अवलंबून असते. आध्यात्मिक अनुभवाचा तो नेहमीच अंतिम निष्कर्ष राहिलेला आहे. आणि म्हणूनच योग्य दृष्टिकोन बाळगण्यावर आणि त्यात सातत्य राखण्यावर आम्ही इतका भर देत असतो; बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसणाऱ्या आंतरिक स्थितीवर म्हणजे समतेच्या आणि स्थिरतेच्या स्थितीवर आम्ही भर देत असतो. आंतरिक आनंदाची स्थिती एकाएकी येऊ शकणार नाही पण, जीवनातील धक्के व आघात यांच्या नेहमीच अधीन असणाऱ्या पृष्ठवर्ती मनामध्ये राहण्यापेक्षा, अंतरंगात अधिकाधिक प्रवेश करून, तेथून जीवनाकडे पाहण्यावर आमचा भर असतो. या आंतरिक स्थितीमुळेच व्यक्ती जीवन आणि त्याच्या अस्वस्थकारी शक्तींपेक्षा अधिक शक्तिशाली बनू शकते आणि विजय प्राप्त करण्याची थोडीफार तरी आशा बाळगू शकते.

अंतरंगामध्ये अविचल (quiet) राहणे, अडीअडचणी किंवा चढउतार यांमुळे अस्वस्थ किंवा नाउमेद होण्यास नकार देऊन, त्यामधून सहीसलामत पार होण्याचा दृढ संकल्प बाळगणे, या योगमार्गावरील शिकण्यायोग्य गोष्टींपैकी काही प्रारंभिक गोष्टी आहेत.

या व्यतिरिक्त अन्य काही करणे म्हणजे चेतनेच्या अस्थिरतेस प्रोत्साहन देण्यासारखे आहे, परंतु तुम्ही अंतरंगामध्ये स्थिर आणि अविचल राहू शकलात तर मग, अनुभवांचा प्रवाह काहीशा स्थिरपणाने वाहू लागेल. अर्थात या वाटचालीमध्ये व्यत्यय आणि चढउतार येणारच नाहीत, असे नाही. परंतु या गोष्टी योग्य रितीने हाताळल्या गेल्या तर, या कालावधीमध्ये साधनाच झाली नाही, असे होत नाही. तर हाच कालावधी अडचणी संपुष्टात येऊन, आधी आलेले अनुभव पचवण्यासाठीचा कालावधी ठरू शकतो.

बाह्य परिस्थितीपेक्षा आध्यात्मिक वातावरण हे नेहमीच अधिक महत्त्वाचे असते. साधकाला जर ते प्राप्त होऊ शकले आणि तो स्वतः ज्यामध्ये श्वास घेऊ शकेल व ज्यामध्ये जीवन जगू शकेल असे स्वतःचे आध्यात्मिक वातावरण साधक स्वत: तयार करू शकेल तर, ती परिस्थिती प्रगतीसाठी खरी सुयोग्य परिस्थिती असेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 140)

(आज ही मालिका समाप्त होत आहे.)

सर्व प्रकारच्या पसंती-नापसंतीपासून मुक्त असणे आणि ईश्वरी संकल्पाकडून जे काही प्राप्त होईल त्याचा आनंदाने स्वीकार करणे ही गोष्ट कोणत्याही मनुष्याला अगदी सुरुवातीलाच शक्य होत नाही.

त्यासाठी व्यक्तीकडे प्रारंभी कोणती गोष्ट असली पाहिजे? तर, ईश्वर जो संकल्प करेल तो भल्यासाठीच असतो, अशी नित्य धारणा व्यक्तीकडे असली पाहिजे. हे असे कसे काय, हे जरी मनाला उमगले नाही तरीही, व्यक्तीने तशी धारणा बाळगली पाहिजे. तसेच, जी गोष्ट तिला अजूनपर्यंत आनंदाने स्वीकारता येत नाहीये ती गोष्ट तिने सहिष्णू वृत्तीने स्वीकारली पाहिजे. पृष्ठभागावर, बाह्य घटनांबद्दलच्या तात्कालिक प्रतिक्रियांच्या काही तात्पुरत्या गतीविधी कदाचित असू शकतील परंतु तेव्हासुद्धा व्यक्तीने स्थिर समत्वापर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे. एकदा हे समत्व दृढपणे प्रस्थापित झाले की मग बाकी सर्व गोष्टी येऊ शकतील.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 134)