अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १०
(पूर्वार्ध)
बरेचदा असे आढळते की, ध्यानधारणादी करण्यासाठी जे लोक अरण्यामध्ये एकटेच राहतात त्यांची आजूबाजूच्या पशुपक्ष्यांशी, झाडांशी मैत्री होते. म्हणजे केवळ एकटे राहिल्यामुळे, आंतरिक ध्यानामध्ये प्रविष्ट होण्याची आणि परमसत्याशी योगयुक्त होऊन राहण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते, असे अजिबात नाही. जेव्हा तुम्हाला अन्य काहीच करण्यासारखे नसते, अशा परिस्थितीमध्ये कदाचित योगयुक्त राहणे सोपे असेलही पण मला काही ते तितकेसे पटत नाही. कारण व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत काही ना काही उद्योग शोधून काढते. (आणि त्यात गुंतून पडू शकते.) मला माझ्या अनुभवावरून असे वाटते की, सर्व अडीअडचणींच्या धुमश्चक्रीत असतानासुद्धा जी व्यक्ती स्वत:च्या वृत्तीप्रवृत्तींना ताब्यात ठेवण्यात यशस्वी होते; ईश्वरी कृपेने जी बाह्य परिस्थिती प्रदान केली आहे त्या परिस्थितीमध्ये राहूनच जी व्यक्ती आपल्या अंतरंगातील शाश्वत अस्तित्वासोबत एकांतात राहण्याचा प्रयत्न करत असते; अशा वेळी त्या व्यक्तीला जो साक्षात्कार होतो तो अनंतपटीने अधिक खरा, अधिक गहन व अधिक चिरस्थायी असतो.
अडीअडचणींपासून पलायन करणे हा पर्याय आकर्षक असला तरी, तो त्यांच्यावर विजय प्राप्त करण्याचा उपाय होऊ शकत नाही. जे लोक आध्यात्मिक जीवन जगू इच्छितात त्यांच्यामध्ये अशी एक मानसिकता असते आणि त्या मानसिकतेपोटी ते म्हणत असतात, ”झाडाखाली अगदी एकांतात, एकटे बसणे, ध्यानमग्न होऊन राहणे आणि बोलण्याची किंवा काहीतरी करण्याची कोणतीही उर्मी नसणे, हे किती रम्य असेल नाही?” या दिशेने त्यांच्या विचारांची ठाम बैठक तयार झालेली असते पण ती फारच भ्रामक असते. (उत्तरार्ध उद्या…)
– श्रीमाताजी (CWM 03 : 276)
- स्वत:ला न फसविणे अवघड - March 16, 2026
- प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन - March 15, 2026
- द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४ - March 14, 2026







