पूर्णयोगाचे अधिष्ठान – २२
साधनेच्या सुरुवातीच्या काळात प्रयत्न करणे अपरिहार्यच असते. सुरूवातीच्या काळात असे म्हणत असताना, अगदी थोड्या कालावधीसाठी असे मला म्हणायचे नाही; हे लक्षात घ्या. अर्थातच समर्पणसुद्धा आवश्यकच असते, पण समर्पण ही काही एका दिवसात घडून येणारी गोष्ट नाही. मनाच्या स्वतःच्या अशा काही कल्पना असतात आणि मन त्यांना चिकटून बसते. मानवी प्राण समर्पित होण्यास विरोध करतो, कारण सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये तो ज्याला ‘समर्पण’ असे संबोधत असतो ते म्हणजे एक प्रकारचे साशंकपणे केलेले आत्मदान असते आणि त्यासोबत एक मागणीदेखील असते. जडभौतिक चेतना ही जणू काही एखाद्या दगडासारखी असते आणि ती चेतना ज्याला ‘समर्पण’ असे संबोधते ते समर्पण म्हणजे बरेचदा जडत्व असते. समर्पण कसे करायचे हे केवळ चैत्य अस्तित्वालाच (psychic) माहीत असते आणि प्रारंभी हे चैत्य अस्तित्व सहसा बरेचसे झाकलेले असते. जेव्हा साधक चैत्य अस्तित्वाविषयी जागृत होतो तेव्हा ते संपूर्ण अस्तित्वाचे एकाएकी आणि खरेखुरे समर्पण घडवून आणू शकते, कारण उर्वरित भागांच्या अडचणी त्वरेने सोडविल्या जातात आणि त्या नाहीशा होतात. परंतु तोपर्यंत प्रयत्न हे अपरिहार्यच असतात.
अन्यथा, जोपर्यंत व्यक्तीमध्ये ‘दिव्य शक्ती’ (जल) प्रपाताप्रमाणे वरून खाली अवतरित होत नाही आणि त्या शक्तीकडून जोपर्यंत साधना हाती घेतली जात नाही, आणि व्यक्तीच्या व्यक्तिगत प्रयत्नांवर विसंबून न राहता, ती शक्ती जोपर्यंत स्वतःच अधिकाधिक साधना घडवून आणत नाही तोपर्यंत आणि अगदी तेव्हासुद्धा, म्हणजे ‘ईश्वरी शक्ती’कडून मन, इच्छा, प्राण आणि शरीर यांचा पूर्णपणे ताबा घेतला जात नाही तोपर्यंत तरी, अगदी प्रयत्न नाही तरी किमान, अभीप्सा आणि सतकर्ता या गोष्टी आवश्यकच असतात.
दुसऱ्या बाजूला असे काही लोक असतात की, जे संपूर्ण समर्पणाविषयीच्या एका खऱ्याखुऱ्या आणि कृतिशील इच्छेने आरंभ करतात. ज्या व्यक्तींवर चैत्य अस्तित्वाची किंवा सुस्पष्ट, प्रबुद्ध मानसिक इच्छेची सत्ता चालते त्यांनी ‘समर्पण हा साधनेचा नियम आहे’, ही गोष्ट एकदा का स्वीकारली की मग, ते त्याबाबतीत कोणताही उणे-अधिकपणा खपवून घेत नाहीत आणि अस्तित्वाच्या इतर घटकांनीदेखील चैत्य अस्तित्वाने दाखविलेल्या दिशेचेच अनुसरण केले पाहिजे, असा आग्रह ते धरतात. इथेसुद्धा प्रयत्न असतातच पण ते इतके सिद्ध आणि उत्स्फूर्त असतात आणि त्यांना त्यांच्या पाठीशी असणाऱ्या महत्तर शक्तीची इतकी ठाम जाणीव असते की, त्या साधकाला आपण काही सायास करत आहोत, प्रयत्न करत आहोत असे मुळी जाणवतच नाही.
उलट दुसऱ्या एखाद्या उदाहरणामध्ये, व्यक्तीला स्वतःच्या स्वतंत्र गतिविधी सोडून द्यायच्या नसतात आणि जेथे मन किंवा प्राण स्व-इच्छा टिकवून ठेवू इच्छित असतात अशा उदाहरणांबाबत पृष्ठवर्ती साधन आणि त्या साधनाच्या पाठीशी किंवा वर असणारे दिव्यत्व यांच्यामधील भिंत ढासळेपर्यंत संघर्ष आणि प्रयत्न क्रमप्राप्तच असतात. या बाबतीत निरपवादपणे सर्वांनाच लागू पडेल असा एकच एक नियम सांगता येणे अवघड आहे. मानवी प्रकृतीमध्ये इतकी प्रचंड विविधता आहे की, कोणत्याही एकाच परिणामकारक नियमामध्ये सारी मानवी प्रकृती बसविता येत नाही.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 83-84)







