पूर्णयोगाचे अधिष्ठान – २०
पूर्णयोगाचे अधिष्ठान – २०
(आपण समर्पण म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आणि आंतरिक समर्पण हा साधनेचा गाभा कसा असतो, हे अगोदरच्या दोन भागात समजावून घेतले. आता या भागात पूर्णयोगाचा मार्ग व इतर योग यातील फरक स्पष्ट केला आहे.)
समर्पण हाच साधनेचा एकमेव मार्ग आहे आणि अन्य कोणत्या मार्गाने साधना करताच येऊ शकत नाही, असे म्हणण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. व्यक्तीने ईश्वराप्रति पोहोचावे यासाठी अनेकानेक मार्ग उपलब्ध आहेत. मात्र मला ज्ञात असलेली ही अशी एकमेव साधना आहे की जिच्यामध्ये, प्रकृतीची तयारी होण्यापूर्वीच, ईश्वराकडून साधना हाती घेतली जाणे, ही गोष्ट एक संवेद्य (sensible) वास्तविकता बनते. इतर साधनापद्धतींमध्ये ईश्वरी कृती आणि तिचे साहाय्य हे वेळोवेळी जाणवू शकते पण बहुतांश वेळा, म्हणजे जोवर सर्व सिद्धता होत नाही तोपर्यंत ते साहाय्य पडद्याआडूनच मिळत राहते. मात्र काही साधनापद्धतींमध्ये सारे काही तपस्येद्वारेच करावे लागते. त्यामध्ये ईश्वरी कृती ग्राह्य मानली जात नाही. बहुतेक सर्व पद्धतींमध्ये या दोन्हींचे मिश्रण असते, तपस्या अंतिमतः ईश्वराच्या थेट साहाय्यासाठी आणि हस्तक्षेपासाठी आवाहन करते. ‘ईश्वरच सारे काही करत असतो’ ही संकल्पना आणि त्याची अनुभूती या गोष्टी समर्पणावर आधारित योगमार्गांमध्येच आढळतात.
मार्ग कोणताही अनुसरला, तरी एक गोष्ट करणे आवश्यकच असते आणि ती गोष्ट म्हणजे एकनिष्ठ असणे आणि लक्षपूर्तीपर्यंत वाटचाल करणे.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 71)
- प्रामाणिकपणा आणि चिकाटी - April 30, 2026
- ईश्वराच्या निवासाचे दरवाजे - April 29, 2026
- अप्रामाणिकपणाचा अडथळा - April 28, 2026






