पूर्णयोगाचे अधिष्ठान – १८
पूर्णयोगाचे अधिष्ठान – १८
(श्रीअरविंद लिखित पत्रांमधून)
व्यक्तीला जर ‘ईश्वर’ हवा असेल तर, व्यक्तीच्या हृदयाची शुद्धिकरण प्रक्रियासुद्धा ईश्वरानेच हाती घ्यावी आणि त्यानेच साधना विकसित करावी आणि आवश्यक असे अनुभवही ईश्वरानेच त्या व्यक्तीला देऊ करावेत, ही जी तुमची ‘योगा’विषयीची आधीची कल्पना होती, त्याला अनुलक्षून उत्तर देताना, मी मागील पत्रात तसे लिहिले होते. असे होणे शक्य आहे आणि असे घडूनही येते. पण त्यासाठी त्या व्यक्तीचा ईश्वरावर विश्वास असला पाहिजे, भरवसा असला पाहिजे आणि (मुख्य म्हणजे) तिची समर्पणाची इच्छा असली पाहिजे. कारण, ईश्वराने सारे काही हाती घेण्यामध्ये, व्यक्तीने केवळ स्वतःच्या प्रयत्नांवर विसंबून न राहता, स्वतःला ईश्वराच्या हाती सोपविणे अंतर्भूत असते. यामध्ये व्यक्तीची सर्व श्रद्धा व विश्वास ईश्वरावरच असणे आणि तिने उत्तरोत्तर आत्मसमर्पण करत राहणे अभिप्रेत असते.
खरंतर, हेच साधनेचे मूलसूत्र आहे आणि तेच मी स्वतःही अनुसरलेले आहे. माझ्या दृष्टीने तरी, योगसाधनेचा हा गाभा आहे… पण सगळ्यांना हा मार्ग एकदमच अनुसरता येतो असे नाही. इथपर्यंत येऊन पोहोचण्यासाठी त्यांना वेळ लागतो. जेव्हा मन आणि प्राण शांत होतात तेव्हा मग हा मार्ग अधिक विकसित होतो. मी मन आणि प्राण यांच्या ‘आंतरिक समर्पणा’बद्दल सांगितले होते.
अर्थातच ‘बाह्य समर्पण’देखील (outer surrender) असते. व्यक्ती जर ईश्वराकडून थेट मार्गदर्शन प्राप्त करून घेण्याच्या योग्यतेला पोहोचली असेल तर मग, त्या मार्गदर्शनाचे पालन करणे अन्यथा चैत्य पुरूषाच्या किंवा गुरूच्या माध्यमातून व्यक्तीला जे मार्गदर्शन लाभत असेल, त्याचे पालन करणे आणि ज्या ज्या गोष्टी आत्म्याच्या विरोधात किंवा साधनेच्या दृष्टीने आवश्ययक असणाऱ्या गोष्टींच्या विरोधात असतील अशा सर्व गोष्टी सोडून देणे, अर्पण करणे या साऱ्या गोष्टींचा समावेश बाह्य समर्पणामध्ये होतो. (क्रमश:)
– श्रीअरविंद (CWSA 29 : 70)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ - December 7, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ - December 6, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ - December 5, 2025







