पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०२

योगाच्या ध्येयाप्रत पोहोचणे नेहमीच कठीण असते, पण पूर्णयोग हा इतर कोणत्याही योगांपेक्षा अधिक दुस्तर आहे. आणि ज्यांना या योगाची हाक आलेली आहे, ज्यांच्याजवळ प्रत्येक गोष्टीला व प्रत्येक जोखमीला तोंड देण्याची क्षमता, इच्छाशक्ती आहे, अगदी अपयशाचा धोका पत्करण्याचीदेखील ज्यांची तयारी आहे; आणि पूर्णपणे निःस्वार्थीपणा, इच्छाविरहितता व समर्पण यांजकडे प्रगत होण्याचा ज्यांचा संकल्प आहे अशा व्यक्तींसाठीच पूर्णयोग आहे.

*

(योगमार्गासाठी एखाद्या व्यक्तीची) तयारी असणे, याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ ‘क्षमता’ असा नसून ‘इच्छाशक्ती’ असा आहे. सर्व अडचणींना तोंड देऊन, त्यावर मात करण्याची आंतरिक इच्छा जर व्यक्तीकडे असेल, तर या मार्गाचा अवलंब करता येईल; मग त्यासाठी किती काळ लागतो हे तितकेसे महत्त्वाचे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 27)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०१

प्रास्ताविक

“जीवन आणि त्याच्या अग्निपरीक्षा यांना शांत, अविचल मनाने, धीराने आणि ईश्वरी शक्तीवरील संपूर्ण विश्वासाने सामोरे जाता येणे हा पूर्णयोगाच्या साधनेचा पहिला धडा आहे,” हा विचार आपण काल जाणून घेतला. पूर्णयोगाची साधना करायची असेल तर, राग, लोभादी विकारांपासून, तसेच निराशा, मिथ्यत्व इत्यादी गोष्टींपासून साधकाने स्वतःची सुटका करून घेणे अपेक्षित असते.

पूर्णयोगाच्या साधनेमध्ये एका बाजूने उपरोक्त गोष्टींना नकार देणे अपेक्षित असते, तर दुसऱ्या बाजूने काही गुणांचा अंगीकार करणे तितकेच आवश्यक असते. अभीप्सा, श्रद्धा, सहनशीलता, प्रयत्नसातत्य किंवा चिकाटी, प्रामाणिकपणा, व्यापकता, समत्व, खुलेपणा, समर्पण यांसारख्या गोष्टी म्हणजे पूर्णयोगातील परवलीचे शब्द आहेत. आपल्याला हे सर्वच शब्द ऐकून, वाचून माहीत असतात खरे; पण त्या शब्दांचा आवाका किती मोठा आहे, त्या एकेका शब्दामध्ये केवढा गहन अर्थ सामावलेला आहे, याची आपल्याला क्वचितच जाण असते.

श्रीअरविंदांनी साधकांना वेळोवेळी लिहिलेल्या पत्रोत्तरांच्या माध्यमातून त्या शब्दांचा, किंबहुना पूर्णयोगातील या संज्ञांचा गर्भितार्थ अलगदपणे आपल्या हाती येतो. तो अर्थ आपल्यापर्यंत नेमकेपणाने पोहोचविण्यासाठी ‘अभीप्सा मासिका‌’तर्फे उद्यापासून एक नवीन मालिका सुरू करत आहोत. ‘पूर्णयोगाचे अधिष्ठान‌’ असणारे हे सारे गुण कमीअधिक प्रमाणात अंगीकारण्याचा प्रयत्न एक साधक म्हणून आपण करू शकलो तर त्या आधारावर पूर्णयोगाची भलीमोठी इमारत उभारता येणे शक्य होईल.

वाचक नेहमीप्रमाणेच ‘पूर्णयोगाचे अधिष्ठान‌’ या मालिकेचे स्वागत करतील अशी आशा आहे.

धन्यवाद!

संपादक,
‘अभीप्सा’ मराठी मासिक

नैराश्यापासून सुटका – ४०

जीवन आणि त्यातील अडचणींना धीराने आणि खंबीरपणे तोंड देण्याचे धैर्य ज्याच्याकडे नाही, अशा व्यक्तीला साधनेमधील त्याहून अधिक खडतर अशा आंतरिक अडचणींमधून पार होणे शक्य होणार नाही. जीवन आणि त्याच्या अग्निपरीक्षा यांना शांत, अविचल मनाने, धीराने आणि ईश्वरी शक्ती‌वरील संपूर्ण विश्वासाने सामोरे जाता आले पाहिजे; हा पूर्णयोगाच्या साधनेमधील पहिला धडा आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 111)

नैराश्यापासून सुटका – ३९

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

अभीप्सा अधिक एकाग्र असेल तर साहजिकच प्रगती अधिक वेगाने होते. पण त्यामध्ये जर प्राणाचा त्याच्या इच्छावासनांसहित आणि शरीराचा त्याच्या गतकालीन सवयीच्या वृत्तींसहित शिरकाव झाला तर मात्र अडचण येते आणि तसा तो शिरकाव बहुतेक सर्वांमध्येच होतो. असा शिरकाव होतो तेव्हाच, अभीप्सेमध्ये अस्वाभाविकता निर्माण होते आणि साधनेमध्ये एक प्रकारचा कोरडेपणा येतो. असा कोरडेपणा हा साधनेतील सर्वश्रुत अडथळा आहे. परंतु व्यक्तीने निराश होता कामा नये; चिकाटी बाळगली पाहिजे. या कालावधीमध्येही व्यक्तीने जर दृढ इच्छा बाळगली तर (अस्वाभाविकता आणि कोरडेपणा) या गोष्टी निघून जातात आणि त्यानंतर अभीप्सेची एक महत्तर शक्ती व अनुभूती शक्य होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 61)

नैराश्यापासून सुटका – ३८

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

आपल्याला काही किंमतच नाही अशी आत्म-अवमूल्यनाची (self-depreciation) अतिरंजित भावना, हताशपणा, असहाय्यता या भावना म्हणजे विरोधी शक्तींच्या सूचना असतात आणि त्या सूचनांचा व्यक्तीने कधीही स्वतःमध्ये शिरकाव होऊ देता कामा नये. तुम्ही ज्या दोषांबद्दल सांगत आहात ते दोष सर्व मानवी प्रकृतीमध्ये असतातच आणि प्रत्येकच साधकाचे बाह्यवर्ती अस्तित्व हे असे दोषयुक्त असते. त्या दोषांची जाणीव होणे ही गोष्ट रूपांतरणासाठी (transformation) आवश्यक असते, परंतु ते रूपांतरणाचे कार्य चैत्य पुरुषाला (psychic being) स्वाभाविक असे म्हणजे अविचल मनाने, ईश्वरा‌विषयीच्या श्रद्धेने व समर्पणाने आणि उच्चतर चेतनेबद्दलच्या प्रगाढ अभीप्सेने केले गेले पाहिजे.

बाह्यवर्ती अस्तित्वाचे (external being) रूपांतरण ही पूर्णयोगा‌मधील सर्वात कठीण गोष्ट आहे आणि त्यासाठी श्रद्धा, धीर, अविचलता आणि दृढ निश्चयाची आवश्यकता असते. नैराश्य वगैरे सर्व गोष्टी तुम्ही भिरकावून दिल्या पाहिजेत आणि योगमार्गावर स्थिरपणाने वाटचाल केली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 207)

नैराश्यापासून सुटका – ३७

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

जे काही घडत आहे ते घडणे एक प्रकारे आवश्यकच होते आणि तुमच्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे ईश्वराला चांगले माहीत आहे, अशी चढतीवाढती श्रद्धा जर तुमच्यामध्ये असेल तर, ही मुळातच एक खूप मोठी गोष्ट आहे. त्याशिवाय तुम्ही जर कायम ध्येयाभिमुख राहण्याची इच्छा आणि कितीही अडीअडचणी आल्या किंवा वरकरणी कितीही नकार मिळाले तरी त्या सगळ्यातून तुम्हाला त्या ध्येयाच्या दिशेने नेले जात आहे, असा विश्वास यांची भर त्यामध्ये घातलीत तर, साधनेसाठी यापेक्षा अन्य कोणतेच अधिक चांगले मानसिक अधिष्ठान असू शकणार नाही. तसेच फक्त मानसिकच नव्हे तर, प्राणिक व शारीरिक चेतनेमध्येदेखील (vital and physical consciousness) हीच श्रद्धा बाणवता आली तर, निराशा येणेच एकतर शक्य नाही किंवा ती चेतनेचा भाग नसून, ती बाहेरून लादण्यात आलेली एक बाह्य गोष्ट आहे, हे तुम्हाला इतके स्पष्टपणे जाणवेल की, त्यामुळे निराशा तुमचा अजिबात ताबा घेऊ शकणार नाही.

अशा प्रकारची श्रद्धा असणे हे अतिशय उपयुक्त असे पहिले पाऊल असते. चेतनेच्या ज्या प्रतिक्रमणामुळे (reversal of consciousness) व्यक्ती गोष्टींच्या बाह्यवर्ती दृश्यमान वैशिष्ट्यांकडे पाहण्याऐवजी, त्यांच्या आंतरिक सत्याकडे पाहू लागते, त्या प्रतिक्रमणाच्या दिशेने पडलेले हे पहिले पाऊल असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 195)

नैराश्यापासून सुटका – ३६

(योगमार्गाचे अनुसरण करणाऱ्या साधकाने हास्य-विनोद करता कामा नयेत; किंवा त्याने नेहमी गंभीरच असले पाहिजे; असा काही नियम नाही. मात्र त्याने योगमार्गाचे आचरण गांभीर्यानेच केले पाहिजे, अशा आशयाचे काही बोलणे आधी झाले असावे असे दिसते. त्या संदर्भातील एका प्रश्नावर श्रीअरविंद यांनी एका साधकाला दिलेले हे उत्तर…)

हसत-खेळत असणे आणि मजेत राहणे यामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या चुकीचे काहीच नाही; उलट, तसे (प्रसन्नचित्त) असणे ही योग्य गोष्ट आहे. संघर्षांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, ते प्रगतीसाठी अपरिहार्य नसतात; पण अशी अनेक माणसं असतात की, ज्यांना भांडण-तंट्याची इतकी सवय झालेली असते की त्यामुळे, ते सदानकदा झगडाच करत राहतात. मात्र ते काही फारसे इष्ट नाही.

जसा एक अंधारलेला, झाकोळलेला मार्ग असतो तसाच एक ‘सूर्यप्रकाशित’ मार्गसुद्धा असतो आणि दोहोंपैकी (अर्थातच) सूर्यप्रकाशित मार्ग हा अधिक चांगला असतो. सूर्यप्रकाशित मार्गावरून व्यक्ती श्रीमाताजींवरील संपूर्ण विश्वासाने वाटचाल करत असते. अशा वेळी व्यक्तीला ना कशाचे भय असते, ना कशाचे दुःख! येथेही तळमळ, आस आवश्यकच असते पण प्रकाश, श्रद्धा, विश्वास व हर्ष यांनी परिपूर्ण अशी एक सूर्यप्रकाशित अभीप्सादेखील (sunlit aspiration) असू शकते; आणि जर समजा अडचणी आल्याच तर, त्यांना (त्या अभीप्सेच्या आधारे) हसतमुखाने सामोरे जाणे शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 173)

नैराश्यापासून सुटका – ३५

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुम्ही कायम प्रसन्न राहावे, असे आम्हाला अपेक्षित आहे. याचा अर्थ असा की, अंतरात्म्याच्या आनंदाला आता त्याचा स्वतःचा मार्ग सापडला आहे आणि कितीही अडचणी आल्या तरी तो आनंदच (आता तुम्हाला) मार्गप्रवण करेल आणि ध्येयाप्रत घेऊन जाईल, हे निश्चित. एखाद्या साधकामध्ये जेव्हा अशी प्रसन्नता सातत्याने आढळून येते, तेव्हा आम्हाला माहीत असते की, तो साधक त्याच्या अत्यंत कठीण अशा अडचणीमधून बाहेर पडला आहे आणि आता तो सुरक्षित मार्गावरून दृढतापूर्वक वाटचाल करू लागला आहे.

*

चेष्टामस्करी, थट्टा यामधील सुख हे प्राणिक (vital) स्वरूपाचे असते. ते असता कामा नये असे मी म्हणत नाहीये; पण त्यापेक्षाही एक अधिक गभीर अशी प्रसन्नता असते, एक आंतरिक ‘सुखहास्य‌’ असते आणि ते सुखहास्य ही प्रसन्नतेची आध्यात्मिक स्थिती असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 173, 174)

नैराश्यापासून सुटका – ३४

जीव ‘ईश्वर‌’शोधास प्रवृत्त व्हावा यासाठी दुःख आवश्यकच असते, या म्हणण्यामध्ये फारसे काही तथ्य नाही. जीव अंतरंगामधून ईश्वराला जी साद घालत असतो त्यातून तो ईश्वराभिमुख होण्यास प्रवृत्त होतो आणि व्यक्ती अगदी कोणत्याही परिस्थितीमध्ये असताना ही गोष्ट घडू शकते. अगदी पूर्ण समृद्धी व ऐषोआराम उपभोगत असताना किंवा बाह्यवर्ती विजयाच्या अगदी शिखरावर असताना आणि कोणतेही दुःख किंवा अपेक्षाभंग झालेला नसताना देखील, अकस्मात किंवा क्रमाक्रमाने होत गेलेल्या ज्ञानोदयामुळे जीव ईश्वराभिमुख होऊ शकतो; किंवा ऐंद्रिय सुखाच्या परमावधीमध्ये असताना, क्षणकाल चमकून गेलेल्या प्रकाशामुळे तो ईश्वराभिमुख होऊ शकतो; किंवा अहंकार व अज्ञानामध्ये बाह्यवर्ती जीवन जगण्यापेक्षा, अधिक महान असे काहीतरी सत्य अस्तित्वात असले पाहिजे अशी जाणीव झाल्यामुळे, तो ईश्वराभिमुख होऊ शकतो. अशा विविध परिस्थितीमध्ये जीव जेव्हा ईश्वराभिमुख होतो तेव्हा, त्यापैकी कोणत्याच परिस्थितीत, त्याच्या जोडीला दुःख आणि निराशेची आवश्यकता नसते.

“जीवन हे एखाद्या क्रीडेप्रमाणे आहे, ते तितकेच स्वारस्यपूर्ण देखील आहे, परंतु ती फक्त एक क्रीडा आहे; मानसिक आणि ऐंद्रिय जीवनापेक्षा आध्यात्मिक वास्तविकता (spiritual reality) ही कितीतरी अधिक महान आहे,” असे म्हणत बहुधा व्यक्ती ईश्वराकडे वळते. व्यक्ती कोणत्याही कारणाने जरी ईश्वराकडे वळली तरी, ईश्वराकडून आलेली हाक किंवा जिवाने ईश्वराला घातलेली सादच महत्त्वाची असते. सामान्यात: प्रकृतीला भुरळ पाडणाऱ्या गोष्टींपेक्षा ईश्वराबद्दलचे हे आकर्षण कितीतरी अधिक प्रभावी असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 202)

नैराश्यापासून सुटका – ३३

(व्यक्तीमध्ये मनोरचना करण्याचे आणि त्या प्रत्यक्षात उतरविण्याचे सामर्थ्य कसे असते, ते श्रीमाताजींनी सविस्तर सांगितले आहे. परंतु मनोरचना करण्याचे उत्तम सामर्थ्य असणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व जर विखुरलेले असेल, त्यामध्ये परस्परविरोधी इच्छा-आकांक्षा असतील तर कसे नुकसान होते, तसेच कल्पनाशक्तीवर नियंत्रण कसे ठेवता येते, ते त्या इथे सांगत आहेत…)

मला अशी काही लोकं माहीत आहेत की, ज्यांच्या प्रकृतीमध्ये अगदी दोन विरूद्ध बाजू एकाच वेळी विद्यमान असतात. त्यांच्यामधील त्या बाजू इतक्या परस्परविरोधी असतात की, एक दिवस त्या व्यक्ती अतिशय अद्भुत, प्रकाशमान आणि प्रत्यक्षात उतरविण्याच्या दृष्टीने शक्तिशाली अशा मनोरचना (formation) तयार करू शकतात पण लगेच दुसऱ्याच दिवशी पराभूत, काळोख्या, अंधाऱ्या, विषण्णतायुक्त अशा मनोरचना तयार करतात आणि त्या दोन्ही प्रकारच्या मनोरचना वातावरणात बाहेर पडतात. आणि तो सगळा घटनाक्रम मी पाहू शकत असे.

(मला असे दिसले की) त्यातील एक मनोरचना अतिशय मनोहारी होती आणि ती प्रत्यक्षात येऊ पाहत होती. जेव्हा आता ती मनोहारी मनोरचना प्रत्यक्षात उतरणार होती अगदी नेमक्या त्याच वेळी, त्या मनोरचनेला दुसऱ्या अंधकारमय मनोरचनेने उद्ध्वस्त केले. हे जसे या उदाहरणात छोट्या गोष्टीबाबतीत घडले तसेच जीवनामध्ये मोठ्या गोष्टींबाबतीतही घडून येते.

आणि हे असे का होते? तर व्यक्ती विचार करत असताना स्वतःचे निरीक्षण करत नाही. व्यक्तीला असे खात्रीपूर्वक वाटत असते की, अशा परस्परविरोधी घडामोडींची ती गुलाम आहे. ती व्यक्ती म्हणते, “अरे देवा! आज मला बरे वाटत नाहीये. आज सारे काही उदास उदास वाटतंय.” व्यक्ती असे म्हणत असते कारण तिला असे वाटत असते की, जणू काही ती ज्याबाबत काहीच करू शकत नाही असे ते अटळ दैव आहे.

परंतु व्यक्ती जर दोन पावले मागे उभी राहून पाहील किंवा एक पायरी वर चढेल, तर व्यक्ती या साऱ्या गोष्टी पाहू शकते, त्या गोष्टींना त्यांच्या योग्य त्या स्थानी ठेवू शकते. तसेच व्यक्तीला त्यातील ज्या गोष्टी नको आहेत त्या ती नष्ट करू शकते किंवा त्यांपासून स्वत:ची सुटका करून घेऊ शकते. स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या साहाय्याने या सर्व गोष्टी ती करू शकते. याला ‘कल्पनात्मकता’ (imaginative) असे म्हणतात. व्यक्तीला ज्या गोष्टी हव्या आहेत आणि ज्या तिच्या सर्वोच्च अभीप्सेशी सुसंवादी असतात अशाच गोष्टींबाबत ती व्यक्ती कल्पनाशक्ती उपयोगात आणू शकते. यालाच मी व्यक्तीने ‘कल्पनेवर नियंत्रण ठेवणे‌’ असे म्हणते.

– श्रीमाताजी (CWM 09 : 388)