जीवन जगण्याचे शास्त्र – २७

प्रत्येक क्षणाला तुम्ही तुमच्या अभीप्सारूपी संकल्पाची भेट (ईश्वराला) देऊ शकता. “हे प्रभो, सारे काही तुझ्या इच्छेप्रमाणे घडू दे” अशा शब्दांतच ती अभीप्सा शब्दबद्ध होत नाही तर, “जी सर्वोत्तम गोष्ट आहे ती मला शक्य तितक्या चांगल्या रितीने करता येऊ दे,” अशा शब्दात ती अभीप्सा अगदी सहजस्वाभाविक रितीने अभिव्यक्त होते.

सर्वोत्तम गोष्ट कोणती आणि ती कशी करायची हे तुम्हाला प्रत्येक क्षणाला माहीत असतेच असे नाही. परंतु सर्वोत्तम शक्य गोष्ट करण्याच्या दृष्टीने, तुम्ही तुमचा संकल्प ईश्वराच्या हाती सोपवू शकता. त्याचे आश्चर्यकारक परिणाम तुम्हाला दिसून येतील.

ही गोष्ट चेतनेसहित (with consciousness), प्रामाणिकपणाने आणि चिकाटीने करा. तसे केलेत तर एकेका पल्ल्यामध्ये तुम्ही अफाट प्रगती करत आहात, असे तुम्हाला आढळून येईल. तुम्ही सर्व गोष्टी स्वतःच्या संकल्पाच्या पूर्ण ताकदीनिशी अगदी अंतःकरणपूर्वक, तळमळीने केल्या पाहिजेत. प्रत्येक क्षणी जे सर्वोत्तम शक्य आहे, तेच केले पाहिजे. इतर काय करतात हा तुमच्या चिंतेचा विषय असता कामा नये. “तो ‘क्ष’ हे असे करत नाही, तर तो तसे करतो,” “तो ‘य’ असे करतो, पण त्याने तसे करता कामा नये,” हे असे कधीही म्हणू नका. कारण ती गोष्ट तुमच्याशी निगडित नाही.

तुम्हाला या पृथ्वीवर एका विशिष्ट उद्दिष्टानिशी एक देह देऊन पाठविण्यात आले आहे. तो शक्य तेवढा सचेत बनविणे, तो ईश्वराचे सर्वाधिक परिपूर्ण आणि सर्वाधिक सचेत साधन बनविणे या हेतुने तुम्हाला देह देण्यात आला आहे. ईश्वराने तुम्हाला मानसिक, प्राणिक, शारीरिक या सर्व क्षेत्रांमध्ये विशिष्ट प्रमाणात काही द्रव्यं देऊ केली आहेत. तो तुमच्याकडून ज्याची अपेक्षा बाळगतो त्या प्रमाणात, ती द्रव्यं तुम्हाला प्रदान करण्यात आलेली असतात. तसेच तो तुमच्याकडून ज्याची अपेक्षा बाळगतो त्या प्रमाणात, तिला साजेशी अशीच परिस्थिती तुम्हाला प्रदान करण्यात आलेली असते. आणि म्हणून “माझे जीवन अगदी असह्य आहे, जगातील सर्वात दुःखी जीवन माझ्या वाट्याला आले आहे,” असे जे कोणी म्हणतात, ते मूढ असतात. प्रत्येकाला त्याच्या विकासासाठी यथायोग्य असे जीवन देण्यात आलेले असते, त्याच्या संपूर्ण विकसनासाठी जे अनुभव त्याला उपयुक्त ठरतात, तेच अनुभव त्याला प्रदान करण्यात आलेले असतात आणि त्याच्या वाट्याला ज्या अडचणी येतात त्या त्याच्या संपूर्ण साक्षात्कारासाठी साहाय्यकारी ठरतील अशाच असतात.

– श्रीमाताजी (CWM 04 : 117-118)

जीवन जगण्याचे शास्त्र – २६

पूर्णयोगाचा मार्ग खूप दीर्घ आहे. स्वतःमधील आणि जगातील ईश्वराला आपली सर्व कर्मे त्यागबुद्धीने, यज्ञबुद्धीने समर्पित करणे हे या मार्गावरील पहिले पाऊल असते. हा मनाचा आणि हृदयाचा भाव असतो, त्याचा आरंभ करणे हे फारसे अवघड नाही, परंतु तो दृष्टिकोन पूर्ण मन:पूर्वकतेने अंगीकारणे आणि तो सर्वसमावेशक करणे फार अवघड असते.

कर्मफलावर असणारी आपली आसक्ती सोडून देणे हे या मार्गावरील दुसरे पाऊल असते. आपल्यामध्ये अनुभवास येणारी ‘ईश्वरी उपस्थिती, दिव्य चेतना आणि दिव्य सामर्थ्य’ हे त्यागाचे खरे, अपरिहार्य, अतिशय इष्ट असे फळ असते. ही एक गोष्ट आवश्यक असते. हे फळ मिळाले की, अन्य सर्व गोष्टींची त्याला जोड मिळेलच. हे दुसरे पाऊल म्हणजे आपल्या प्राणिक अस्तित्वातील, आपल्या वासनात्म्यातील (desire-soul), वासनामय प्रकृतीतील अहंभावप्रधान इच्छेचे रूपांतर असते; आणि ते फारच अवघड असते.

केंद्रस्थ अहंभावाचे उच्चाटन आणि एवढेच नव्हे तर, ईश्वराचे साधन झाल्याच्या अहं जाणिवेचे देखील उच्चाटन हे या मार्गावरील तिसरे पाऊल असते. हे रूपांतरण सर्वाधिक अवघड असते; आणि जोपर्यंत पहिली दोन पावले उचलली जात नाहीत तोपर्यंत हे रुपांतरण पूर्ण होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत तिसऱ्या कळसरूपी पावलाची जोड मिळत नाही म्हणजेच अहंभाव नष्ट करून, वासनेचे मूळच उखडून फेकून दिले जात नाही तोपर्यंत, आधीच्या दोन पावलांचे कार्यसुद्धा पूर्ण होत नाही.

क्षुद्र अहंभाव प्रकृतीतून मुळापासून दूर केला जातो तेव्हाच, साधकाला ऊर्ध्वस्थित असणाऱ्या त्याच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव होऊ शकते; ईश्वराची शक्ती आणि ईश्वराचा एक अंशभाग असे त्याचे स्वरूप असते. साधकाला या खऱ्या अस्तित्वाची ओळख होते तेव्हाच तो ईश्वरी शक्तीच्या संकल्पाव्यतिरिक्त असणाऱ्या इतर सर्व प्रेरक-शक्तींचा त्याग करतो.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 247-248)

जीवन जगण्याचे शास्त्र – २५

धीटपणा, धैर्य आणि चिकाटी हे आवश्यक असे पहिले गुण आहेत. तुम्हाला याची जाणीव असली पाहिजे की, तुम्ही जे जाणले पाहिजे त्याच्या तुलनेत तुम्ही जे जाणता ते म्हणजे काहीच नाही; तुम्ही जे करणे आवश्यक आहे त्याच्या तुलनेत तुम्ही जे करू शकता ते म्हणजे काहीच नाही आणि तुम्ही जे बनले पाहिजे त्याच्या तुलनेत तुम्ही आत्ता जे आहात ते म्हणजे काहीच नाही.

तुमच्या प्रकृतीमध्ये ज्याचा अभाव आहे ते प्राप्त करून घेण्याची, तुम्हाला अजूनपर्यंत जे माहीत नाही ते जाणून घेण्याची आणि तुम्हाला अजूनपर्यंत जे करता आलेले नाही ते करता यावे असा एक दृढ, अविचल संकल्प तुमच्यामध्ये असला पाहिजे. वैयक्तिक इच्छा-वासनारहिततेमधून येणाऱ्या शांतीमध्ये आणि प्रकाशामध्ये तुम्ही सतत प्रगती करत राहिले पाहिजे. “नेहमी अधिक चांगले, प्रगतिपथावर अधिक पुढे!” असा कृतिकार्यक्रमच तुम्ही ठरवून घेऊ शकता. ईश्वराचे आविष्करण करता यावे यासाठी त्याला जाणणे हेच तुमचे एकमेव ध्येय असले पाहिजे. चिकाटी बाळगा म्हणजे मग, तुम्ही आज जे करू शकत नाही ते तुम्हाला उद्या साध्य होऊ शकेल.

– श्रीमाताजी (CWM 16 : 430)

जीवन जगण्याचे शास्त्र – २४

साधक : “सर्व कर्मं म्हणजे अनुभवाची पाठशाळा असते,” असे श्रीअरविंदांनी का म्हटले आहे?

श्रीमाताजी : तुम्ही जर कोणतेही कर्मच केले नाही, तर तुम्हाला कोणताच अनुभव येणार नाही. समग्र जीवन हे अनुभवाचे क्षेत्र आहे. तुम्ही केलेली प्रत्येक हालचाल, तुमच्या मनात उमटलेला प्रत्येक विचारतरंग, तुम्ही केलेले प्रत्येक कर्म हा एक अनुभव असू शकतो आणि तो अनुभव असलाच पाहिजे. आणि विशेषतः तुमचे कार्यक्षेत्र हे तर तुमचे अनुभवाचे क्षेत्र असते; तुम्ही जी प्रगती करण्यासाठी आंतरिकरित्या प्रयत्न करत असता ती सर्व प्रगती, त्या (बाह्य) क्षेत्रामध्येसुद्धा उपयोगात आणली गेली पाहिजे.

तुम्ही कोणतेही काम न करता केवळ ध्यानामध्ये किंवा निदिध्यासनामध्ये राहिलात, तर तुम्ही प्रगती केली आहे किंवा नाही, हे तुम्हाला कळणार नाही. आणि मग तुमची प्रगती झाली आहे अशा भ्रमात तुम्ही राहाल. उलट, जेव्हा तुम्ही एखादे काम करायला सुरुवात करता, तेव्हा तुमच्या कामाच्या ठिकाणची परिस्थिती, तुमचे इतरांशी येणारे संबंध, तुमचा नोकरीव्यवसाय या सर्व गोष्टी म्हणजे अनुभवाचे असे एक क्षेत्र असते की, जेथे तुम्हाला तुम्ही केलेल्या प्रगतीची जाणीव तर होतेच; पण अजून जी कोणती प्रगती करून घ्यायची राहिली आहे, त्याचीही जाणीव तुम्हाला होते.

तुम्ही जर काहीही काम न करता, स्वतःमध्येच बंदिस्त होऊन राहिलात तर, कदाचित पूर्णपणे व्यक्तिगत भ्रमामध्ये तुम्ही तुमचे जीवन व्यतीत कराल, अशी शक्यता असते. परंतु ज्याक्षणी तुम्ही बाह्य जगात कृती करू लागता आणि इतरांच्या संपर्कात येता; विविध प्रकारच्या परिस्थितीच्या आणि जीवनामधील विविध वस्तुंच्या संपर्कात येता, तेव्हा तुम्हाला तुम्ही प्रगती केली आहे किंवा नाही; तुम्ही अधिक स्थिर, शांत झाला आहात की नाही; अधिक सचेत, अधिक सशक्त, अधिक निःस्वार्थी झाला आहात की नाही; तुमच्यामध्ये इच्छावासना शिल्लक आहेत की नाहीत; काही अग्रक्रम, काही दुर्बलता, काही अविश्वासूपणा शिल्लक तर नाही ना, इत्यादी सर्व गोष्टींची कर्म करत असताना तुम्हाला पूर्णतया वस्तुनिष्ठपणे जाणीव होऊ लागते.

परंतु तुम्ही जर फक्त ध्यानामध्येच स्वतःला बंदिस्त करून घेतलेत तर ते पूर्णपणे वैयक्तिक असते, आणि मग तुम्ही पूर्णपणे एका भ्रमामध्ये जाण्याची आणि त्यामधून कधीही बाहेर न पडण्याची शक्यता असते. आणि मग तुम्हाला असे वाटू शकते की, तुम्हाला काही असामान्य गोष्टींचा साक्षात्कार झाला आहे. प्रत्यक्षात मात्र तुम्हाला तशी प्रचिती आली असल्याचा किंवा तुम्ही प्रगती केली असल्याचा एक आभास, एक भ्रम तुमच्यापाशी असतो. श्रीअरविंद येथे हेच सांगू इच्छित आहेत.

– श्रीमाताजी (CWM 07 : 287-288)

जीवन जगण्याचे शास्त्र – २३

आपली (कनिष्ठ) प्रकृती ही गोंधळाच्या, अव्यवस्थेच्या आधारे कार्य करत असते. तिला कृती करणे जणू भागच असते म्हणून ती अस्वस्थपणे कृती करत राहते. पण ईश्वर मात्र अगाध स्थिरतेच्या, शांतीच्या आधारे मुक्तपणे कार्य करत असतो. आपल्या आत्म्यावरील कनिष्ठ प्रकृतीची पकड आपल्याला नाहीशी करायची असेल तर, आपण प्रगाढ शांतीच्या खोल दरीत झेप घेतली पाहिजे आणि आपण त्या ईश्वराप्रमाणेच झाले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 23 : 365)

जीवन जगण्याचे शास्त्र – २२

अविचलता (quietness) म्हणजे तामसिकता नव्हे. वास्तविक अविचल स्थितीमध्येच योग्य गोष्टी केल्या जाऊ शकतात. कोणत्याही गोष्टीमुळे विचलित न होता, प्रत्येक गोष्टीचे अवलोकन करणे आणि कोणत्याही गोष्टीमुळे विचलित न होता, कर्म करणे याला मी ‘अविचलता’ म्हणते.

*

अविचलतेमध्ये एक स्थिरशांत (calm) आणि एकाग्र एकवटलेली अशी ताकद असते, ती इतकी अविचल असते की, तिला कोणीही धक्का लावू शकत नाही. पूर्ण साक्षात्कारासाठीचा हा अनिवार्य पाया आहे.

*

तुम्ही जेव्हा अविचल असाल तेव्हा तुम्हाला अशी जाणीव होईल की, दिव्य शक्ती, तिचे साहाय्य आणि तिचे संरक्षण हे सदोदित तुमच्या सोबत आहे.

*

तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची असते आणि ती म्हणजे शांत, अविचल राहायचे आणि पूर्णतः केवळ ईश्वराभिमुख व्हायचे, मग बाकी सारे ‘त्या’च्या हाती असते.

*

अविचलता, शांती आणि निश्चल-नीरवतेच्या (silence) स्थितीमध्ये आध्यात्मिक शक्ती कार्य करते. व्यक्ती विरोधी शक्तींच्या अंमलाखाली आली की, क्षुब्ध होणे आणि उत्तेजित होणे अशा सर्व गोष्टी होतात.

*

तुम्ही अविचलतेचा शोध बाह्य परिस्थितीमध्ये घेता कामा नये, तर त्याची सुरुवात तुम्ही तुमच्या अंतरंगापासून केली पाहिजे. तुमच्या अंतरंगामध्ये खोलवर शांती असते आणि त्या शांतीमधूनच तुमच्या समग्र अस्तित्वामध्ये एक प्रकारची स्थिरता, अविचलता येते; ती अगदी तुमच्या शरीरापर्यंत जाऊन पोहोचते. अर्थात त्यासाठी तुम्ही तिला वाव दिला पाहिजे. तुम्ही ती शांती मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे; म्हणजे मग तुम्हाला हवी असलेली अविचलता, स्थिरता तुम्हाला लाभेल.

– श्रीमाताजी (CWM 14 : 135, 135, 135, 111, 137, 138)

जीवन जगण्याचे शास्त्र – २१

जो सशक्त असतो तो नेहमीच अविचल, दृढ असतो. दुर्बलतेमुळे अस्वस्थता येते.

*

साधक : शांती (peace), अविचलता (quietness) आणि स्थिरता (calm) ग्रहण करण्यासाठी मी काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : या गोष्टी तुमच्या केवळ एखाद्या भागाला हव्याशा वाटणे पुरेसे नाही तर, त्यांची तुम्हाला अगदी संपूर्णतया आणि प्रामाणिकपणे गरज जाणवली पाहिजे.

*

श्रीमाताजी : तुम्हाला वाटते तेवढी मी तुमच्यापासून दूर नाही. तुम्ही केवळ तुमच्या मनाची आणि प्राणाची खळबळ थोडीशी स्थिरशांत केली पाहिजे; तुम्ही थोडे शांत आणि एकाग्र राहिले पाहिजे; असे केलेत तर तुम्हाला तुमच्या अंतरंगामध्ये आणि तुमच्या सभोवार माझी उपस्थिती लगेचच जाणवेल.

*

साधक : ‘क्ष’ हा सध्या खूप कष्ट सोसत आहे. त्याच्या व्यवसायात त्याच्यावर रोज एक नवीन संकट येऊन आदळत आहे आणि त्या परिस्थितीशी तोंड द्यायला तो असमर्थ आहे. आणि त्याने तुमची विशेष कृपा लाभावी यासाठी तुम्हाला प्रार्थना केली आहे.

श्रीमाताजी : त्याने जर त्याचे मन अविचल आणि हृदय शांत ठेवले तर, तो त्या परिस्थितीला (धीराने) तोंड देऊ शकेल.

– श्रीमाताजी (CWM 16 : 125), (CWM 17 : 60, 68-69, 404-405)

जीवन जगण्याचे शास्त्र – २०

(मानसिक आणि प्राणिक अविचलता म्हणजे काय ते कालच्या भागात आपण समजावून घेतले. आता हा त्याचा पुढील भाग…)

तुम्ही जडता अथवा सुस्त निष्क्रियता या गोष्टींना स्थिरशांती (calm) समजण्याची गल्लत कधीही करू नका. अविचलता (Quietude) ही अत्यंत सकारात्मक स्थिती असते. संघर्ष नाही म्हणजे आता शांती आहे असा येथे अर्थ नसून, ती खऱ्या अर्थाने सकारात्मक शांती असते. ती शांती सक्रिय, संक्रमणशील, शक्तिशाली असते; ती प्रत्येक गोष्ट सुव्यवस्थित करते, संघटित करते, त्यावर नियंत्रण ठेवते आणि स्थिरता आणते. मी नेहमी त्या स्थिरशांतीबद्दल सांगत असते.

मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला सांगते की, “शांत व्हा,” तेव्हा “जा आणि झोप काढा, सुस्त व निष्क्रिय व्हा आणि काहीही न करता नुसते बसून राहा;” असे काही मला सांगायचे नसते. खरंतर, मला याच्या अगदी विरूद्ध सांगायचे असते. खरी स्थिरता, अविचलता ही एक फार मोठी शक्ती असते, ते एक फार मोठे सामर्थ्य असते.

खरंतर या समस्येकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिले तर असे म्हणता येते की, जे खरोखरच खूप बलवान, सशक्त, शक्तिशाली असतात ते नेहमीच स्थिरशांत असतात. जे दुर्बल असतात तेच प्रक्षुब्ध असतात. तुम्ही जेव्हा खरोखरच सुदृढ, सशक्त बनता तेव्हा शांतियुक्त, शांत, स्थिर होता आणि तेव्हा, तुम्हाला अस्वस्थ करण्याच्या इराद्याने बाहेरून तुमच्यावर धावून येणाऱ्या विरोधी लाटांचा सामना करण्यासाठी आवश्यक असणारी तग धरून राहण्याची क्षमता तुमच्यापाशी असते.

खरी अविचलता ही नेहमी शक्तीची खूण असते. बलवान व्यक्तींकडेच स्थिरशांती असते. आणि हे अगदी प्राकृतिक क्षेत्रामध्येसुद्धा (physical field) तितकेच खरे असते. सिंह, वाघ, हत्ती यांसारख्या प्राण्यांचे तुम्ही निरीक्षण केले आहे की नाही मला माहीत नाही, पण जेव्हा ते सक्रिय नसतात, तेव्हा ते नेहमीच पूर्णतया शांत असतात, स्तब्ध असतात. एखादा सिंह जेव्हा स्वस्थ बसून तुमच्याकडे पाहत असतो तेव्हा जणूकाही तो तुम्हाला म्हणत असतो, “किती अस्वस्थ आहात तुम्ही!” तो तुमच्याकडे अशा शहाणीवेच्या प्रशांत वातावरणात पाहत राहतो. आणि तेथे त्याची सारी ताकद, ऊर्जा, शारीरिक सामर्थ्य या गोष्टी एकवटलेल्या, गोळा झालेल्या आणि केंद्रित झालेल्या असतात आणि जेव्हा त्याला आज्ञा दिली जाते तेव्हा कोणत्याही क्षोभाशिवाय कृती करण्यासाठी तो सज्ज असतो.

मी अशी अनेक माणसं पाहिली आहेत की, जी अर्धा तास सुद्धा चुळबूळ न करता शांत बसू शकत नाहीत. ते पाय तरी हलवतील, हात किंवा डोकंतरी हलवतील; त्यांना सातत्याने सर्वकाळ अस्वस्थपणे हालचाली करत राहावे लागते, कारण त्यांच्यापाशी स्थिरशांत बसण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती किंवा सामर्थ्य नसते. आवश्यक असेल तेव्हा स्तब्ध राहायचे, स्वतःच्या सर्व ऊर्जा एकत्रित करायच्या आणि तुमच्या इच्छेनुसार त्या खर्च करायच्या. तुम्हाला जर आवश्यक असेल तर पूर्णपणे; अन्यथा, तुम्हाला अमुक एक कृती करण्यासाठी आवश्यकता असेल त्या प्रमाणात त्या खर्च करायच्या; आणि प्रत्येक कृतीमध्येसुद्धा परिपूर्ण स्थिरशांती बाळगायची, ही नेहमीच सामर्थ्याची खूण असते. ते सामर्थ्य शारीरिक किंवा प्राणिक किंवा मानसिक असू शकते. परंतु तुम्ही थोडेजरी क्षुब्ध, अस्वस्थ असाल तर तुम्ही कोणत्यातरी एखाद्या बाबतीत दुर्बल आहात हे खात्रीने धरून चाला. आणि तुमची अस्वस्थता जर सर्वांगीण असेल तर तुम्ही पूर्णतः दुर्बल आहात असे समजा.

– श्रीमाताजी (CWM 08 : 329-330)

जीवन जगण्याचे शास्त्र – १९

(पूर्वार्ध)

(श्रीमाताजी येथे मनाच्या आणि प्राणाच्या अविचलतेसंबंधी मार्गदर्शन करत आहेत.)

साधक : माताजी, तुम्ही आम्हाला जेव्हा सांगता की, ‘आम्ही शांतस्थिर असलेच पाहिजे,’ तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो?

श्रीमाताजी : मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला ‘शांतस्थिर (calm) राहा,’ असे सांगते, तेव्हा त्याचे व्यक्तिपरत्वे भिन्नभिन्न अर्थ असतात. परंतु पहिली अगदी आवश्यक असणारी स्थिरशांती म्हणजे मानसिक अविचलता (mental quietude). कारण सहसा व्यक्तीमध्ये त्याचाच अभाव असतो. मी जेव्हा ‘शांतस्थिर राहा,’ असे सांगते, तेव्हा मला असे म्हणायचे असते की, तुमचे विचार अस्वस्थ, उत्तेजित, प्रक्षुब्ध असता कामा नयेत. तुम्ही तुमचे मन अविचल (quiet) करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तुमच्या कल्पना, तुमची निरीक्षणे, तुमच्या मानसिक रचना यांच्या भोवती घुटमळणे तुम्ही थांबविले पाहिजे.

आता कोणी मला आणखी एक असा प्रश्न विचारेल की, “तुम्ही आम्हाला शांतस्थिर राहायला सांगता, पण आम्ही त्यासाठी काय केले पाहिजे?” त्याचे उत्तर कमीअधिक प्रमाणात नेहमी एकसारखेच असते. ते म्हणजे, प्रथम तुम्हाला त्याची गरज वाटली पाहिजे आणि तशी गरज भासल्यानंतर, तुम्ही त्यासाठी आस बाळगली पाहिजे आणि मग त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

यासाठी आजवर अनेकांनी अगणित पद्धती सुचविलेल्या आणि अवलंबलेल्या आहेत. बहुधा या पद्धती नेहमीच दीर्घकालीन, कष्टसाध्य आणि कठीण असतात. आणि बहुधा बरेचसे लोक त्यांच्या ध्येयाप्रत पोहोचण्यापूर्वीच नाउमेद होऊन जातात. कारण ते जितका जास्त प्रयत्न करू लागतात तेवढे त्यांच्या डोक्यात अधिकाधिक विचार घोळू लागतात आणि त्या विचारांचे काहूर त्यांच्या मनात उठते.

प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी पद्धत असते; परंतु प्रथम व्यक्तीला शांतस्थिर राहण्याची गरज भासली पाहिजे, मग त्यासाठीचे कारण कोणतेही का असेना. म्हणजे एखादी व्यक्ती थकलेली असेल किंवा एखाद्या व्यक्तीने खूप ताणतणाव सहन केलेला असेल म्हणून तिला अशी आवश्यकता जाणवत असेल; किंवा एखादी व्यक्ती अशीही असू शकेल की, जिला तिच्या सद्यस्थितीतील जीवनाच्या पलीकडे उन्नत होण्याची खरोखरच इच्छा असेल; आणि म्हणून तिला तशी आवश्यकता जाणवत असेल. कारण कोणतेही असले तरीही व्यक्तीला त्या स्थिरशांतीची, त्या मन:शांतीची गरज वाटली पाहिजे. आणि मग, योग्य तो परिणाम साध्य करून घेण्यासाठी, व्यक्ती सर्व रूढ आणि त्याचप्रमाणे नवीन पद्धतींचा एकापाठोपाठ एक अवलंब करू शकते.

असे केल्यावर व्यक्तीला लगेचच असे जाणवते की, आणखी एका अविचलतेची आवश्यकता आहे आणि इतकेच नव्हे तर ती त्वरेने अंमलात आणणे गरजेचे आहे. ही अविचलता म्हणजे ‘प्राणिक अविचलता’ (vital quietude)! म्हणजे येथे इच्छावासनांचा निरास झालेला असणे आवश्यक असते. जेव्हा प्राण पुरेसा विकसित झालेला नसतो, तेव्हा जर त्याला शांत बसण्यास सांगण्यात आले तर तो लगेचच एकतर झोपी जातो किंवा मग तो संप पुकारतो. आणि म्हणतो, “ते काही नाही. असे अजिबात चालणार नाही. मी आता इथून पुढे कामच करणार नाही. तुम्ही मला आवश्यक असणारे पोषण, उत्तेजकता, उत्साह, इच्छा, आवेग या गोष्टी पुरविल्या नाहीत तर मी जागचा हलणार नाही आणि आता इथून पुढे मी काहीच करणार नाही.” आणि त्यामुळे समस्या अधिकच नाजूक आणि कदाचित अधिक अवघड होऊन बसते. कारण, क्षुब्धतेमधून जडत्वामध्ये जाऊन पडणे म्हणजे नक्कीच प्रगतीपासून खूप खूप दूर जाणेच असते. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 08 : 328-329)