भारताचे पुनरुत्थान – ०५

भारताचे पुनरुत्थान – ०५

वंदे मातरम् हा मंत्र जन-मानसात दुमदुमू लागला होता. नव्हे, आता हा मंत्र म्हणजे स्वातंत्र्याकांक्षी देशभक्तांच्या अस्मितेचा मानबिंदू ठरला होता. त्याच सुमारास ‘बंदे मातरम्’ या नियतकालिकाचा क्षितिजावर उदय झाला आणि त्यामध्ये प्रकाशित होणाऱ्या प्राध्यापक श्री. अरविंद घोष यांच्या जहाल लेखनामुळे, वंदे मातरम् हा मंत्रोच्चार भारतीयांच्या हृदयातील मातृभूमीच्या प्रेमाला आवाहन करणारा ठरला.

‘बंदे मातरम्’ हे कलकत्त्याहून प्रकाशित होणारे दैनिक होते. हे दैनिक म्हणजे संपूर्ण स्वराज्याची संकल्पना साकार करू पाहणाऱ्या भारताच्या राजकीय जनजागृती-कार्यक्रमाचा अविभाज्य भाग होता. अल्पावधीतच हे वृत्तपत्र भारताच्या राजकीय चळवळीचे मुखपत्र बनले. त्यातील लेखांमुळे प्राध्यापक अरविंद घोष प्रथमच प्रसिद्धीच्या झोतामध्ये आले.

वंगभंगाच्या पार्श्वभूमीवर श्री. बिपिनचंद्र पाल यांनी ‘बंदे मातरम्’ हे दैनिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. याचा पहिला अंक दि. ०६ ऑगस्ट १९०६ रोजी प्रकाशित झाला. श्री. अरविंद घोषदेखील या दैनिकाच्या कार्यामध्ये सहभागी झाले. लेखक, संपादक, सल्लागार या नात्याने श्री. अरविंद या नियतकालिकाच्या कामकाजात सक्रिय सहभागी होते.

‘बंदे मातरम्’मधून देशप्रेमाचा आणि परकीय सत्तेच्या गुलामीविरूद्धचा संदेश दिला जात असे पण त्याची शब्दयोजनाच अशी असे की, त्यावर कोणताही कायदेशीर आक्षेप घेणे ब्रिटिश सरकारला शक्य होत नसे. वास्तविक बिटिश सरकार श्री. अरविंद घोष यांना अटक करू इच्छित होते परंतु सरकारला त्यांच्यावरील आरोप सिद्ध करता आला नाही. यामुळे एक गोष्ट मात्र घडली की, आजवर पडद्याआड राहून कार्यरत असणारे अरविंद घोष एकाएकी प्रसिद्धीच्या झोतात आले. आणि तेथूनच पुढे ‘स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी’ या नात्याने त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

‘बंदे मातरम्’ने देशासमोर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि निष्क्रिय प्रतिकार ही चतुःसूत्री ठेवली. निष्क्रिय प्रतिकाराचा सिद्धान्त मांडणारी ‘द डॉक्ट्रिन ऑफ पॅसिव्ह रेझिस्टन्स’ नावाची श्री. अरविंद लिखित लेखमाला ‘बंदे मातरम्’मधून प्रकाशित करण्यात आली.

या नियतकालिकाची आर्थिक बाजू नीट सांभाळता यावी या दृष्टीने श्री. अरविंद यांच्या सूचनेनुसार, ‘बंदे मातरम् कंपनी’ची स्थापना करण्यात आली होती. मात्र पुढे अलिपूर बाँबकेसमध्ये त्यांना अटक झाल्यावर, त्यांच्या अनुपस्थितीमुळे ‘बंदे मातरम्’चे प्रकाशन थांबले.

“श्रीअरविंदांच्या लेखणीची धाडसी वृत्ती, ज्वलंत विचारसरणी, सुस्पष्ट कल्पना, शुद्ध आणि शक्तिशाली शब्दरचना, जळजळीत वक्रोक्ती आणि निखळ विनोदबुद्धी यांची बरोबरी देशातील कोणत्याही भारतीय किंवा अँग्लो-इंडियन दैनिकाला करता आली नाही,” असे उद्गार श्री. बिपिनचंद्र पाल यांनी काढले होते.

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

अभीप्सा मराठी मासिक