साधना, योग आणि रूपांतरण – २५६

प्राणाचे रूपांतरण

आंतरात्मिक प्राणशक्ती म्हणजे अशी प्राणशक्ती की जी अंतरंगामधून उदित झालेली असते आणि जी चैत्य पुरुषाशी (psychic being) सुसंवादी असते. ती शुद्ध प्राणमय पुरुषाची (vital being) ऊर्जा असते, परंतु सर्वसामान्य अज्ञानी प्राणामध्ये ती इच्छावासनांच्या रूपात विकारित झालेली असते.

तुम्ही तुमचा प्राण अविचल आणि शुद्ध केला पाहिजे, आणि खरा, शुद्ध प्राण उदयास येऊ दिला पाहिजे. किंवा तुमच्यामधील चैत्य पुरुष अग्रभागी आणला पाहिजे, म्हणजे तो चैत्य पुरुष तुमच्या प्राणाचे शुद्धीकरण करेल आणि त्याचे आंतरात्मिकीकरण (psychicise) करेल आणि मग तुम्हाला शुद्ध प्राणिक ऊर्जा मिळेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 112)

साधना, योग आणि रूपांतरण – २५५

प्राणाचे रूपांतरण

मानवी प्राणाचे स्वरूपच नेहमी असे असते की, तो इच्छावासना आणि स्वैर-कल्पना यांनी भरलेला असतो. मात्र त्यामुळे ती जणू काही एखादी अपरिवर्तनीय गोष्ट आहे असे समजण्याचे काहीच कारण नाही. किंवा त्यामुळे या अस्वस्थ प्राणाला, त्याला वाटेल तसे एखाद्या व्यक्तीला चालविण्याची मुभा देण्याची देखील आवश्यकता नाही.

योगमार्गाव्यतिरिक्तही, अगदी सामान्य जीवनामध्येही, जे या अस्वस्थ प्राणाला हाताशी घेतात, त्याच्यावर एकाग्रता करून, त्याला नियंत्रित करतात आणि त्याला शिस्तीनुसार वागायला लावतात अशा व्यक्तीच त्यांनी हाती घेतलेल्या कार्यामध्ये, त्यांच्या आदर्शांमध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होण्याची शक्यता असते किंवा अशा व्यक्तींकडेच पूर्ण पुरुषार्थ आहे असे समजले जाते. अशा व्यक्ती मानसिक इच्छेद्वारे प्राणाला वळण लावतात. प्राणाला काय वाटते त्यानुसार नव्हे तर, त्यांच्या बुद्धीला किंवा इच्छाशक्तीला काय योग्य वा इष्ट वाटते त्यानुसार वागण्यासाठी ते प्राणाला प्रवृत्त करतात.

योगमार्गामध्ये व्यक्ती आंतरिक इच्छाशक्तीचा उपयोग करते आणि तपस्या करण्यासाठी प्राण राजी व्हावा म्हणून त्या प्राणास प्रवृत्त करते; जेणेकरून तो प्राण शांत, सशक्त आणि आज्ञाधारक होईल. किंवा, प्राणाने इच्छावासनांचा त्याग करावा आणि अविचल व ग्रहणशील व्हावे म्हणून त्याला प्रवृत्त करण्यासाठी व्यक्ती ऊर्ध्वस्थित स्थिरशांतीला अवतरित होण्याचे आवाहन करते.

प्राण हा चांगले साधन असतो, पण तो चांगला स्वामी मात्र होऊ शकत नाही. तुम्ही त्याला जर त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या स्वैरकल्पना, त्याच्या इच्छावासना, त्याच्या वाईट सवयी यांनुसार वागण्यास मुभा दिलीत तर, प्राण तुमच्यावर सत्ता गाजवू लागतो आणि शांती व आनंद या गोष्टी अशक्य होऊन जातात. (अशा वेळी) तो तुमचे किंवा ‘दिव्य शक्ती’चे साधन होत नाही, तर तो अज्ञानाच्या कोणत्याही शक्तीचे किंवा अगदी कोणत्याही विरोधी शक्तीचे साधन होतो आणि मग ती शक्ती त्या प्राणाचा ताबा घेऊन, त्याचा वापर करू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 105-106)

साधना, योग आणि रूपांतरण – २५४

प्राणाचे रूपांतरण

प्राण हे एक अत्यावश्यक साधन आहे. कोणतीच निर्मिती किंवा सामर्थ्यशाली कृती प्राणाशिवाय शक्य नसते. एवढेच की, त्याच्यावर स्वामित्व मिळविण्याची आणि त्याचे शुद्ध प्राणामध्ये परिवर्तन घडविण्याची आवश्यकता असते. हा शुद्ध प्राण सशक्त व स्थिरशांत असतो आणि त्याच वेळी, तो अतिशय तीव्रतेबाबतही सक्षम असतो आणि अहंकारापासून मुक्त असतो.
*
अंध प्राणिक शक्तीपासून सुटका ही प्राणाच्या परिवर्तनाच्या माध्यमातूनच घडून आली पाहिजे. सशक्त, विस्तृत, शांतीयुक्त असणाऱ्या, आणि ‘ईश्वरा’चे व केवळ ‘ईश्वरा’चेच साधन होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शुद्ध प्राणाच्या उदयाद्वारेच ही सुटका झाली पाहिजे.
*
(असमाधान व्यक्त करणे, परिवर्तनाला प्रतिकार करणे) हे पुनरुज्जीवित न झालेल्या, पृष्ठभागी असणाऱ्या प्राणिक भागाचे स्वरूप असते. शुद्ध प्राणाचे स्वरूप भिन्न असते. तो स्थिरशांत आणि सशक्त असतो. आणि तो ‘ईश्वरा’र्पित झालेला असतो, तो ‘ईश्वरा’चे एक शक्तिशाली साधन असतो. परंतु तो अग्रभागी येण्यासाठी, प्रथम मनामध्ये वरच्या स्तरावर असणारी स्थिर अवस्था प्राप्त करून घेणे आवश्यक असते. जेव्हा तेथे चेतना असते आणि मन स्थिरशांत, मुक्त आणि विशाल असते तेव्हा शुद्ध प्राण अग्रभागी येऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 112, 111, 112)

साधना, योग आणि रूपांतरण – २५३

प्राणाचे रूपांतरण

प्राणशक्ती (Vitality) म्हणजे जीवन-शक्ती. जेथे कोठे जीवन असते, मग ते वनस्पतींमध्ये असू दे, प्राण्यांमध्ये असू दे किंवा माणसामध्ये असू दे, तेथे जीवन-शक्ती असते. प्राणाशिवाय जडभौतिकामध्ये जीवन असू शकत नाही, प्राणाशिवाय कोणतीही जिवंत कृती घडू शकत नाही. प्राण ही एक आवश्यक अशी शक्ती असते आणि जर प्राण हा साधनभूत म्हणून तेथे नसेल तर, शारीरिक अस्तित्वामध्ये कोणतीच गोष्ट निर्माण होऊ शकत नाही किंवा केली जाऊ शकत नाही. इतकेच काय पण साधनेसाठीसुद्धा प्राणशक्तीची आवश्यकता असते.

हा प्राण जितका उपयुक्त ठरू शकतो तेवढाच तो घातकदेखील ठरू शकतो. प्राण पुनर्जीवित न होता जर तसाच राहिलेला असेल, आणि तो जर इच्छावासना आणि अहंकाराचा गुलाम झालेला असेल तर, तो घातक ठरू शकतो. अगदी आपल्या सामान्य जीवनातसुद्धा मनाद्वारे आणि मानसिक इच्छाशक्तीद्वारे या प्राणाचे नियंत्रण करावे लागते, अन्यथा तो अव्यवस्था निर्माण करू शकतो किंवा अनर्थ घडवू शकतो. लोकं जेव्हा प्राणप्रधान मनुष्यासंबंधी बोलतात तेव्हा ती, मन किंवा आत्म्याद्वारे नियंत्रित न झालेल्या प्राणशक्तीचे वर्चस्व असलेल्या व्यक्तीविषयी बोलत असतात.

प्राण हा एक चांगले साधन बनू शकतो पण तो अगदी वाईट मालक असतो. या प्राणाला मारायची किंवा त्याला नष्ट करायची आवश्यकता नसते पण त्याला आंतरात्मिक आणि आध्यात्मिक नियमनाने शुद्ध करण्याची आणि त्याचे रूपांतर करण्याची आवश्यकता असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 106)

साधना, योग आणि रूपांतरण – २५२

(कालपर्यंत आपण ‘मनाचे रूपांतरण’ याची तोंडओळख करून घेतली. वास्तविक मन, प्राण व शरीर यांचे स्वरूप आणि त्यांचे कार्य, त्यांच्या मर्यादा, त्यांचे दोष, त्यावर मात करण्याचे विविध मार्ग या सर्व गोष्टींविषयी श्रीअरविंद व श्रीमाताजी यांनी विपुल लेखन केले आहे. आणि तेही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, परंतु विस्तारभयास्तव त्याचा येथे समावेश करता आलेला नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत. मात्र पुन्हा कधीतरी अशाच कोणत्यातरी एखाद्या मालिकेच्या निमित्ताने तो सर्व विषय आपण विचारात घेऊ, असा श्रीमाताजी-स्मरणपूर्वक विश्वास वाटतो. आजपासून ‘प्राणाचे रूपांतरण’ या विभागास आरंभ करत आहोत.
– संपादक, अभीप्सा मराठी मासिक.)

प्राणाचे रूपांतरण

बहुतांशी माणसं त्यांचे प्राणिक जीवन जगत असतात. याचा अर्थ असा की ते त्यांच्या इच्छावासना, संवेदना, भावभावना, प्राणमय कल्पना यांच्यामध्ये जीवन जगत असतात, आणि ते त्या दृष्टिकोनातूनच प्रत्येक गोष्टीकडे पाहत असतात, अनुभव घेत असतात, अंदाज बांधत असतात, निर्णय घेत असतात. त्यांना प्राणच संचालित करत असतो. येथे त्यांच्या मनाचे प्राणावर प्रभुत्व नसते, तर त्यांचे मन हे प्राणाच्या सेवेला जुंपलेले असते. योगमार्गामध्ये देखील बरेच जण प्राणिक पातळीवरून साधना करतात आणि मग त्यांचे अनुभव हे प्राणिक दृष्टान्त, कल्पनाजन्य रचना, सर्व तऱ्हेचे अनुभव यांनी भरलेले असतात. परंतु त्यांमध्ये मानसिक स्पष्टता किंवा सुव्यवस्थेचा अभाव असतो, किंवा ते मनाच्या वर देखील उन्नत होत नाहीत. जी माणसं मानसिक स्तरामध्ये किंवा अंतरात्म्यामध्ये राहून जीवन जगतात किंवा जी आध्यात्मिक स्तरावर जीवन जगण्याचा प्रयत्न करतात अशा माणसांची संख्या अगदीच अल्प असते.

– श्रीअरविंद (CWSA 31: 101)

साधना, योग आणि रूपांतरण – २५१

मानसिक रूपांतरण

वाचन, विविध गोष्टींविषयी जाणून घेणे, संपूर्ण आणि अचूक माहिती मिळविणे, तर्कशुद्ध विचार करण्यासाठी स्वतःला प्रशिक्षण देणे, एखाद्या समस्येच्या सर्व बाजू अनाग्रही पद्धतीने विचारात घेणे, घाईघाईने काढलेल्या किंवा चुकीच्या अनुमानांना वा निष्कर्षांना नकार देणे, सर्व गोष्टींकडे स्पष्टपणे व समग्रपणे पाहायला शिकणे या सर्व गोष्टींचा समावेश ‘मानसिक प्रशिक्षणा’मध्ये होतो.
*
एखाद्या व्यक्तीने पुष्कळ वाचन केलेले असूनही, ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या मात्र अविकसित असू शकते. विचार केल्याने, जाणून घेतल्याने, बौद्धिकदृष्ट्या श्रेष्ठ असणाऱ्यांचे मानसिक प्रभाव ग्रहण केल्याने व्यक्तीचे मन विकसित होत जाते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 69, 70)

साधना, योग आणि रूपांतरण – २५०

मानसिक रूपांतरण

शंकाकुशंकांना नकार देणे म्हणजे स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळविणे, हे (तुमचे) म्हणणे निश्चितच योग्य आहे. योगसाधनेसाठी व्यक्तीने आपल्या शरीराच्या हालचालींवर किंवा स्वतःच्या प्राणिक इच्छावासनांवर, आवडीनिवडींवर नियंत्रण मिळविणे जितके आवश्यक असते, तेवढेच विचारांवर नियंत्रण मिळविणे आवश्यक असते. परंतु, हे नियंत्रण फक्त योगसाधनेसाठीच आवश्यक असते असे मात्र नाही. एखाद्याचे जर स्वतःच्या विचारांवर नियंत्रण नसेल, तो जर त्या विचारांचा साक्षी, अनुमन्ता, ईश्वर नसेल, तर तो मनुष्य पूर्णपणे विकसित झालेला मनोमय पुरुष आहे असे म्हणता येणार नाही.

इच्छावासना आणि आवेगांच्या वादळामधील सुकाणूविना होडी बनणे जसे योग्य नाही किंवा शरीराच्या जडत्वाचे किंवा आवेगांचे गुलाम बनणे जसे योग्य नाही तसेच व्यक्तीच्या मनोमय पुरुषाने बेलगाम आणि अनियंत्रित विचारांचा टेनिसचा चेंडू होणे हे सुद्धा योग्य नाही. मला हे माहीत आहे की, ही गोष्ट अधिक अवघड आहे कारण मनुष्य हा मूलतः मानसिक प्रकृतीचा प्राणी असल्याने तो मनाच्या गतिप्रवृत्तींशी स्वतःला एकरूप करतो आणि त्यामुळे तो स्वतःला एकाएकी त्या मनापासून अलिप्त करू शकत नाही आणि मनरूपी भोवऱ्याच्या गरगर फिरण्यापासून स्वतःला मुक्तही करू शकत नाही. शरीरावर किंवा शरीराच्या हालचालींच्या काही विशिष्ट भागावर नियंत्रण मिळविणे हे मनुष्याला तुलनेने सोपे असते. प्राणाच्या आवेगांवर आणि इच्छावासनांवर मनाद्वारे नियंत्रण मिळविणे हे काहीसे अवघड असले तरीही काहीशा संघर्षानंतर, ते शक्य असते. परंतु एखादा तांत्रिक योगी नदीच्या पाण्यावर (ध्यानस्थ) बसतो त्याप्रमाणे विचाररूपी भोवऱ्यावर आरुढ होणे हे काही तितकेसे सोपे नाही. असे असले तरीही ते करता येणे शक्य असते.

जी माणसं सर्वसामान्य माणसांच्या पुढे गेलेली असतात अशा सर्व विकसित मानसिक स्तरावरील माणसांना या ना त्या प्रकारे किंवा किमान काही विशिष्ट वेळी आणि काही विशिष्ट हेतुंसाठी मनाच्या दोन भागांना विलग करावे लागते; विचारांचा जणू कारखानाच असणारा असा मनाचा सक्रिय भाग आणि त्याच वेळी साक्षी असणारा, संकल्प करणारा, विचारांचे निरीक्षण करणारा, त्यांचे निर्णयन करणारा, त्यांना नकार देणारा, त्यांना वगळणारा, त्यांना स्वीकारणारा, त्यांच्यामध्ये सुधारणा आणि बदल घडवण्याची आज्ञा देणारा असा मनाचा एक (विचारांवर) प्रभुत्व बाळगणारा अविचल भाग असतो. तो मनाच्या निवासस्थानाचा स्वामी असतो, तो साम्राज्य उभारण्यासाठी सक्षम असतो.

योगी याच्याही अजून पुढे जातो. तो फक्त तेथीलच स्वामी असतो असे नव्हे तर तो मनामध्ये असतानाही, एक प्रकारे, मनातून जणू बाहेर पडतो आणि तो त्या मनाच्या वर उभा ठाकतो किंवा त्याच्यापासून मागे हटतो आणि (अशा प्रकारे तो) त्या मनापासून मुक्त होतो. आणि मग अशा योग्याच्या बाबतीत विचारांचा कारखाना ही प्रतिमा पुरेशी योग्य ठरत नाही. कारण विचार बाहेरून, वैश्विक मनाकडून किंवा वैश्विक प्रकृतीकडून आत येत असताना तो पाहतो. कधी ते विचार आकार धारण करून येतात आणि सुस्पष्ट असतात, तर कधीकधी ते विचार आकारविहीन असतात आणि ते आपल्यामध्ये प्रविष्ट झाल्यानंतर मग त्यांना आकार देण्यात येतो. या विचारतरंगांना (त्याचबरोबर प्राणिक लाटांना, सूक्ष्म शारीरिक ऊर्जेच्या लाटांनासुद्धा) नकार देणे किंवा त्यांचा स्वीकार करणे या दोन्हीपैकी कोणतातरी एक प्रतिसाद देणे किंवा परिसरीय ‘प्रकृती’तील विचारद्रव्याला किंवा प्राणिक गतिविधींना वैयक्तिक-मानसिक रूपाकार देणे हा मनाचा मुख्य उद्योग असतो.

हे सारे मला श्री. विष्णू भास्कर लेले यांनी दाखवून दिले आणि म्हणून मी त्यांचा अतिशय ऋणी आहे. ते म्हणाले, “ध्यानाला बसा, परंतु विचार करू नका, नुसते मनाकडे पाहत राहा. तुम्हाला असे दिसेल की विचार आतमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांनी आत प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना हद्दपार करा. तुमचे मन पूर्णपणे निश्चल-नीरव होईपर्यंत हे असे करत राहा.” विचार असे बाहेरून दृश्यरूपात मनामध्ये प्रवेश करतात हे मी त्यापूर्वी कधी ऐकले नव्हते परंतु त्याच्या सत्यतेबद्दल किंवा त्याच्या शक्यतेबद्दल शंका घ्यावी असा विचारही माझ्या मनाला शिवला नाही, मी ध्यानाला बसलो आणि त्यांच्या सांगण्याबरहुकूम तसे केले. उंच गिरीशिखरांवर निर्वात हवा असावी त्याप्रमाणे माझे मन क्षणार्धात निश्चल-नीरव झाले. आणि तेव्हा मला असे दिसले की एका पाठोपाठ एक विचार बाहेरून मनात प्रवेश करण्याच्या प्रयत्नांत आहेत. मात्र त्यांनी आत प्रवेश करून, माझ्या मेंदूचा ताबा घेण्यापूर्वीच मी त्यांना बाहेरच्या बाहेरच घालवून देत होतो आणि अशा रीतीने मी तीन दिवसातच विचारमुक्त झालो.

आणि तत्त्वतः त्या क्षणापासून माझ्यामधील मनोमय पुरुष जणू मुक्त बुद्धीच झाला होता, तो म्हणजे जणू एक वैश्विक मनच झाले होते. तो आता विचारांच्या कारख्यानात काम करणाऱ्या कामगारासारखा स्वतःच्या संकुचित वर्तुळापुरताच मर्यादित राहिला नव्हता तर, आता तो व्यक्तित्वाच्या शेकडो प्रांतांमधून ज्ञान ग्रहण करणारा झाला होता. दृश्याच्या आणि विचाराच्या साम्राज्यामधून त्याला वाटेल त्याची निवड करण्यास आता तो मुक्त झाला होता. मनोमय पुरुषाच्या संभाव्यता या मर्यादित नसतात आणि तो स्वतःच्या घराचा स्वामी आणि मुक्त साक्षी होऊ शकतो, हे सुस्पष्टपणे सांगण्यासाठीच मी याचा उल्लेख केला आहे.

मी या निर्णायक गतिविधींबाबतीत जी त्वरा केली त्याच त्वरेने, आणि ज्या पद्धतीचा अवलंब केला त्याच मार्गाचा अवलंब सर्वजण करू शकतात, असे मला म्हणायचे नाही. (अर्थात, या नवीन बंधनमुक्त अशा मानसिक शक्तीचा संपूर्ण विकास होण्यासाठी मला काही वर्षे लागली.) ज्या व्यक्तीपाशी श्रद्धा असते आणि प्रयत्न करण्याची इच्छा असते, अशा व्यक्तीला मनावर स्वामित्व मिळविणे आणि प्रगमनशील स्वातंत्र्य मिळविणे या गोष्टी शक्य असतात.

– श्रीअरविंद (CWSA 24 : 1257-1258)

साधना, योग आणि रूपांतरण – २४९

मानसिक रूपांतरण

व्यक्तीकडे श्रद्धा आणि खुलेपणा, उन्मुखता (openness) असणे पुरेसे असते. याशिवाय, दोन प्रकारचे आकलन असते. एक प्रकार म्हणजे बुद्धीद्वारे होणारे आकलन आणि दुसरा प्रकार म्हणजे चेतनेद्वारे होणारे आकलन. बुद्धीद्वारे होणारे आकलन जर अचूक असेल तर ते आकलन असणे चांगले, परंतु असे आकलन अनिवार्यच असते, असे मात्र नाही. श्रद्धा आणि खुलेपणा असेल तर चेतनेमधून आकलन होऊ लागते. अर्थात, असे आकलन क्रमशः आणि अनुभवांच्या पायऱ्या ओलांडल्यानंतरच होण्याची शक्यता असते. मी काही अशा व्यक्ती पाहिलेल्या आहेत की, ज्या फारशा शिकलेल्या नव्हत्या किंवा ज्यांच्यापाशी फारशी बौद्धिकता नव्हती मात्र तरीही त्यांनी चेतनेच्या साहाय्याने, योगमार्गाचे परिपूर्ण आकलन करून घेतले होते. पण बुद्धिवादी माणसं मात्र मोठ्या चुका करतात. उदाहरणार्थ, अशी माणसं विरक्त मानसिक अविचलतेलाच (quietude) आध्यात्मिक शांती समजतात आणि मार्गावर अजून प्रगत होण्यासाठी, त्या अविचल अवस्थेतून बाहेर पडण्यास नकार देतात.
*
मनाद्वारे मिळालेली माहिती (जी नेहमीच अनुभवविरहित असते त्यामुळे तिचे योग्य रीतीने आकलन होत नाही.) ही साहाय्यक ठरण्याऐवजी अपायकारक ठरण्याची शक्यता असते. वास्तविक, या गोष्टींबाबत कोणतेही निश्चित असे मानसिक ज्ञान नसते, त्यामध्ये अगणित प्रकारचे वैविध्य असते. मानसिक माहितीच्या उत्कंठेच्या पलीकडे जायला आणि ज्ञानाच्या खऱ्या मार्गाप्रत खुले व्हायला तुम्ही शिकलेच पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 53, 10)

साधना, योग आणि रूपांतरण – २४८

मानसिक रूपांतरण

आपल्याला आपल्या बुद्धीकडून योग्य विचार, योग्य निष्कर्ष, वस्तु व व्यक्ती यांच्याबद्दलचे योग्य दृष्टिकोन, त्यांच्या वर्तणुकीबद्दलचे किंवा घटनाक्रमाबद्दलचे योग्य संकेत मिळत आहेत किंवा नाहीत हे पाहण्याची तसदी लोक घेत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या अशा काही कल्पना असतात आणि त्या कल्पनाच सत्य आहेत असे मानून ते त्यांचा स्वीकार करतात. किंवा मग, त्या कल्पना त्यांच्या स्वतःच्या असल्यामुळे त्या कल्पनांचे अशा व्यक्ती अनुसरण करतात. आपल्या मनाची चूक झाली आहे हे लक्षात आले तरीही, ते त्या गोष्टीला फारसे महत्त्व देत नाहीत किंवा आधीपेक्षा मानसिकदृष्ट्या अधिक काळजीपूर्वक वागण्याचा प्रयत्नही ते करत नाहीत.

प्राणिक क्षेत्रामध्ये लोकांना हे माहीत असते की, नियंत्रणाविना स्वतःच्या इच्छावासना किंवा आवेग यांच्या मागे धावता कामा नये. ते काय करू शकतात आणि त्यांनी काय करावे किंवा त्यांना काय करता येणे शक्य नाही किंवा त्यांनी काय करू नये यामध्ये फरक करण्यासाठी आवश्यक असणारा विवेक किंवा नैतिक दृष्टिकोन त्यांच्यापाशी असला पाहिजे हे त्यांना माहीत असते. परंतु बुद्धीच्या प्रांतामध्ये मात्र अशा प्रकारची कोणतीही खबरदारी घेतली जात नाही.

माणसांनी आपल्या बुद्धिमत्तेचे अनुसरण करावे असे म्हटले जाते. त्यामुळे माणसं त्यांच्या कल्पना, मग त्या योग्य असू देत वा अयोग्य असू देत त्या बाळगत राहतात, त्या ठासून सांगत राहतात. असे म्हटले जाते की, बुद्धी ही मनुष्याचे सर्वोच्च साधन आहे आणि त्यामुळे त्याने विचार केलाच पाहिजे आणि त्यानुसार त्याने आचरण केले पाहिजे, (असे अपेक्षित असते.) परंतु हे तितकेसे खरे नाही. प्राणाला मार्गदर्शन करण्यासाठी, त्याला रोखण्यासाठी आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जशी आंतरिक प्रकाशाची आवश्यकता असते तशीच आवश्यकता बुद्धीलादेखील असते.

बुद्धीच्याही वर असणारी अशी जी गोष्ट आहे तिचा व्यक्तीने शोध घेतला पाहिजे आणि खऱ्या ‘ज्ञाना’च्या त्या स्रोताच्या कार्यासाठी बुद्धी ही फक्त मध्यस्थ झाली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 13)

साधना, योग आणि रूपांतरण – २४७

मनाचे रूपांतरण

शारीर-मन (physical mind) सर्व तऱ्हेचे प्रश्न उपस्थित करत राहते आणि त्याला योग्य उत्तर समजू शकत नाही किंवा ते योग्य उत्तर देऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या या छोट्याशा शारीर-मनाच्या आधारे शंका-कुशंका घेणे, प्रश्न उपस्थित करणे बंद केलेत आणि तुमच्या अंतरंगामध्ये असलेल्या सखोल व व्यापक चेतनेला बाहेर येण्यास आणि तिचा विकास करण्यास वाव दिलात तरच तुम्हाला खरे ज्ञान मिळू शकेल आणि योग्य आकलन होऊ शकेल. त्यानंतर तुम्हाला आपोआपच खरे उत्तर आणि खरे मार्गदर्शन मिळेल. या आंतरिक चेतनेच्या विकसनाकडे लक्ष पुरविण्याऐवजी तुम्ही तुमच्या बाह्यवर्ती मनाला आणि त्याच्या कल्पनांना, त्याच्या आकलनाला अवाजवी महत्त्व देत आहात, तुमच्याकडून ही चूक होत आहे.
*
शारीर-मनाचे स्वरूपच असे असते की ते अतिभौतिक (supraphysical) गोष्टींवर विश्वास ठेवत नाही किंवा तशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करत नाही. शारीर-मन जोपर्यंत (उच्चतर ज्ञान-प्रकाशाने) उजळून निघत नाही आणि तो प्रकाशच त्याला अतिभौतिक गोष्टींवर विश्वास ठेवण्यास भाग पाडत नाही तोपर्यंत ते विश्वास ठेवत नाही. या शारीर-मनाशी तुम्ही स्वतःला एकरूप करू नका किंवा हे शारीर-मन म्हणजेच तुम्ही आहात असेही समजू नका, तर ते मन म्हणजे ‘प्रकृती’च्या अंधकारमय कार्यप्रणालीचा एक भाग आहे असे समजा. आणि या मनाला त्या अतिभौतिक गोष्टींवर विश्वास ठेवणे भाग पाडले जात नाही तोपर्यंत शारीर-मनामध्ये प्रकाश अवतरित व्हावा यासाठी आवाहन करत राहा.
*
शारीर-मनाला अंतरात्म्याकडून (psychic) गोष्टींकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन व योग्य मार्ग मिळाल्यामुळे, शारीर-मनावर अंतरात्म्याचा प्रचंड प्रभाव पडू शकतो. आणि त्यामुळे शारीर-मन भावनिक अस्तित्वाला त्याच्या अभीप्सेमध्ये, प्रेमामध्ये आणि समर्पणामध्ये आधार पुरवते. गोष्टींच्या फक्त बाह्य पैलूंकडे बघण्याऐवजी, आणि त्यांच्या मिथ्या अनुमानांवर आणि वरकरणी दृश्यांवर विसंबून राहण्याऐवजी आता शारीर-मनाला स्वतःलाच गोष्टींच्या आंतरिक सत्यामध्ये स्वारस्य वाटू लागते, त्या आंतरिक सत्यामधून त्याला त्याविषयीची अंतर्दृष्टी प्राप्त होते आणि त्याची श्रद्धा वाढीस लागते. संकुचितपणा आणि शंका हे शारीर-मनाचे जे मुख्य दोष असतात, त्यांच्यापासून सोडवणूक करण्यासाठीसुद्धा शारीर-मनाला अंतरात्म्याचे साहाय्य लाभते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 52, 35, 38)