साधना, योग आणि रूपांतरण – २६६
प्राणाचे रूपांतरण
संपूर्ण प्राणिक प्रकृतीचे शुद्धीकरण व्हावे आणि सर्व अहंभावात्मक इच्छावासना व आवेग नाहीसे होऊन, ‘ईश्वरी संकल्पा’शी सुसंगत असतील तेवढ्याच शुद्ध, सात्त्विक वृत्तीप्रवृत्ती शिल्लक राहाव्यात यासाठी, संपूर्ण प्राणिक प्रकृती आणि तिच्या वृत्तीप्रवृत्ती ‘ईश्वरा’ला अर्पण करणे म्हणजे प्राणाचे स्वाहाकरण (vital consecration) होय.
*
साधक : ‘प्राणाचे स्वाहाकरण’ म्हणजे काय ?
श्रीअरविंद : समग्र प्राणिक प्रकृती ही कनिष्ठ प्रकृतीशी नव्हे तर, श्रीमाताजींशी संबंधित व्हावी यासाठी, समग्र प्राणिक प्रकृती श्रीमाताजींना समर्पित करणे आणि ती शुद्ध बनविणे, म्हणजे ‘प्राणाचे स्वाहाकरण’.
*
तुम्हाला ज्या मुक्तीची आस लागली आहे ती साधकासाठी खरोखरच अत्यंत आवश्यक असते. आणि याचा अर्थ, प्रकृतीच्या समग्र प्राणिक भागाच्या मुक्तीची आस असा आहे. मात्र ही गोष्ट एकाएकी किंवा इतक्या सहजतेने करता येणे शक्य नसते. तुमची तळमळ ही सातत्यपूर्ण, धीरयुक्त आणि चिकाटीची असली पाहिजे, (ती तशी असेल तरच) अंतिमतः तिचा विजय होईल. वरून उच्चतर स्थिरता आणि शांती आपल्या प्रणालीमध्ये (system) खाली अवतरावी म्हणून तिला आवाहन करणे ही मुख्य गोष्ट असते; ती अवतरित होत आहे अशी जाणीव जर तुम्हाला होत असेल तर तो मुक्तीचा आरंभ असतो.
*
खरी चेतना तुमच्या प्राणामध्ये अवतरित होत होती, परंतु तुमच्या शरीरामध्ये पुन्हा एकदा जुनीच अडचण उफाळून आली आहे, पुन्हा एकदा प्राणिक हल्ला झालेला आहे. जेव्हा तुमचा प्राण अशांत, विचलित न होता, किंवा आक्रंदन न करता, सदोदित या हल्ल्याला सामोरा जाऊ शकेल आणि तुमच्या अंतरंगात स्थिरशांत असणारी प्रतिकार व अस्वीकार करणारी शक्ती जेव्हा दूर लोटून तिचा प्रतिबंध करेल, तेव्हा ती संपूर्ण मुक्तीची खूण असेल.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 113, 313), (CWSA 31 : 111, 111 )
- श्रीमाताजी आणि समीपता – १५ - May 10, 2025
- श्रीमाताजी आणि समीपता – १४ - May 9, 2025
- श्रीमाताजी आणि समीपता – १३ - May 8, 2025