ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – २३५

साधना, योग आणि रूपांतरण – २३५

व्यक्ती आणि तिचे घटक यांच्या व्यवस्थेमध्ये एकाचवेळी दोन प्रणाली कार्यरत असतात. त्यातील एक केंद्रानुगामी असते. या प्रणालीमध्ये वर्तुळांची किंवा कोशांची एक मालिका असते, आणि तिच्या केंद्रस्थानी अंतरात्मा असतो. दुसरी प्रणाली ऊर्ध्व-अधर (vertical) अशी असते. म्हणजे यामध्ये आरोहण आणि अवरोहण असते, पायऱ्या-पायऱ्यांची एक शिडी असावी तशी ती असते. मनुष्याकडून ‘ईश्वरा’कडे होत जाणाऱ्या संक्रमणामध्ये, एकावर एक रचलेल्या स्तरांची जणू ही मालिकाच असते आणि त्यामध्ये अधिमानस (Overmind) व अतिमानस (Supermind) हे महत्त्वाचे टप्पे असतात.

हे संक्रमण घडून यायचे असेल तर आणि त्याच वेळी ते रूपांतरण देखील ठरावे असेही अपेक्षित असेल तर त्यासाठी, केवळ एकच मार्ग असतो. प्रथम, अंतर्मुखी परिवर्तन झाले पाहिजे, व्यक्तीने आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाचा (psychic being) शोध घेण्यासाठी अंतरंगात शिरले पाहिजे आणि त्यास अग्रस्थानी आणले पाहिजे. आणि त्याचवेळी प्रकृतीचे आंतरिक मन, आंतरिक प्राण व आंतरिक शरीराचे घटक उघड केले पाहिजेत. नंतर, आरोहणाची प्रक्रिया केली पाहिजे. म्हणजे ऊर्ध्वगामी परिवर्तनाची एक मालिकाच तेथे असली पाहिजे आणि निम्न स्तरावरील घटकांचे परिवर्तन करण्यासाठी चेतनेने पुन्हा खाली उतरून आले पाहिजे. व्यक्तीने जेव्हा अंतर्मुखी परिवर्तन घडवून आणलेले असते तेव्हा समग्र कनिष्ठ प्रकृती दिव्य परिवर्तनासाठी सुसज्ज व्हावी यासाठी व्यक्ती त्या प्रकृतीचे आंतरात्मिकीकरण घडवते. ऊर्ध्वगामी होत असताना, व्यक्ती मानवी मनाच्या अतीत जाते आणि आरोहणाच्या प्रत्येक टप्प्यावर व्यक्तीचे एका नवीन चेतनेमध्ये परिवर्तन होते आणि त्याचवेळी या नवीन चेतनेचा व्यक्तीच्या समग्र प्रकृतीमध्ये संचार होतो.

अशा रीतीने जेव्हा आपण बुद्धीच्या पलीकडे आरोहण करत, प्रकाशित उच्च मनाच्या (illuminated higher mind) माध्यमातून अंतःस्फूर्त (intuitive) चेतनेमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण सर्व गोष्टींकडे बौद्धिक श्रेणीतून नाही किंवा बुद्धी या साधनाच्या माध्यमाद्वारे नाही तर अधिक महान अशा अंतःस्फूर्त उंचीवरून आणि अंतःस्फूर्तिमय झालेल्या इच्छा, भावभावना, संवेदना आणि शारीरिक संपर्काच्या माध्यमाद्वारे पाहू लागतो. म्हणून, अंतःस्फूर्त मनाकडून त्यापेक्षाही महान असलेल्या अधिमानसिक उंचीवर जाताना, एक नवीन परिवर्तन होते आणि आपण प्रत्येक गोष्ट अधिमानसिक चेतनेमधून आणि अधिमानसिक विचार, दृष्टी, इच्छा, भावना, संवेदना, शक्तीक्रीडा आणि संपर्काने प्रभावित झालेल्या मन, हृदय, प्राण आणि शरीर यांच्याद्वारे पाहू लागतो, अनुभवू लागतो. परंतु अंतिम परिवर्तन हे अतिमानसिक असते, कारण एकदा का आपण तेथे पोहोचलो, एकदा का प्रकृतीचे अतिमानसिकीकरण झाले की मग आपण ‘अज्ञान’दशेच्या पलीकडे जाऊन पोहोचलेलो असतो आणि मग चेतनेचे परिवर्तन गरजेचे राहत नाही. अर्थात त्यापुढेही दिव्य प्रगती, किंबहुना अनंत विकसन होणे अजूनही शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 84-85)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

2 hours ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago