साधना, योग आणि रूपांतरण – २२९
इच्छा, राजसिकता आणि अहंकार यांना दिलेल्या नकारामुळे व्यक्तीला अशी अचंचलता आणि शुद्धता प्राप्त होते की, ज्यामध्ये अनिर्वचनीय ‘शांती’ अवतरू शकते. व्यक्तीने स्वतःची इच्छा ‘ईश्वरा’प्रत अर्पण केली, तिने स्वतःची इच्छा ही ‘ईश्वरी ‘संकल्पा’मध्ये मेळविली (merging) तर व्यक्तीच्या अहंकाराचा अंत होतो आणि व्यक्तीला वैश्विक चेतनेमध्ये व्यापकता प्राप्त होते किंवा विश्वातीत असलेल्या गोष्टीमध्ये तिचे उन्नयन होते. व्यक्तीला ‘प्रकृती’पासून ‘पुरुषा’चे विलगीकरण अनुभवास येते आणि बाह्य प्रकृतीच्या बेड्यांपासून व्यक्तीची सुटका होते. व्यक्तीला तिच्या आंतरिक अस्तित्वाची जाणीव होते आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे साधन असल्याचे जाणवते; ‘विश्वशक्ती’च व्यक्तीचे कार्य करत असल्याची आणि ‘आत्मा’ किंवा ‘पुरुष’ त्याकडे पाहात असल्याची किंवा तो साक्षी असून, मुक्त असल्याचे व्यक्तीला जाणवते. आपले कर्म हाती घेऊन, विश्व‘माता’ किंवा परम‘माता’च ते करत असल्याचे, किंवा हृदयापाठीमागून एक ‘दिव्य शक्ती’ त्या कर्माचे नियंत्रण करत आहे, किंवा ते कर्म करत आहे, असे व्यक्तीला जाणवते.
व्यक्तीने स्वतःची इच्छा आणि कर्म अशा रीतीने सतत ‘ईश्वरा’प्रत निवेदित केली तर, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होते, चैत्य पुरुष पुढे येतो. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘शक्ती’प्रत निवेदन केल्यामुळे, ती शक्ती आपल्या ऊर्ध्वस्थित असल्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि तिच्या अवतरणाची आणि उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या चेतनेप्रत व ज्ञानाप्रत आपण उन्मुख होत आहोत अशी जाणीव आपल्याला होऊ शकते.
सरतेशेवटी कर्म, भक्ती आणि ज्ञान एकत्रित येतात आणि आत्मपरिपूर्णत्व शक्य होते; त्यालाच आम्ही ‘प्रकृतीचे रूपांतरण’ असे संबोधतो. अर्थातच हे परिणाम काही एकाएकी होत नाहीत, व्यक्तीची परिस्थिती आणि तिचा विकास यांनुसार, ते कमीअधिक धीमेपणाने, कमीअधिक समग्रतेने दिसून येतात.
ईश्वरी साक्षात्कारासाठी कोणताही सोपा राजमार्ग नाही. सर्वंकष आध्यात्मिक जीवनासाठी ‘गीता’प्रणीत ‘कर्मयोग’ मी अशा रीतीने विकसित केला आहे. तो कोणत्याही अनुमानावर आणि तर्कावर आधारलेला नाही तर, तो अनुभूतीवर आधारलेला आहे. त्यामधून ध्यान वगळण्यात आलेले नाही आणि त्यातून भक्तीदेखील नक्कीच वगळण्यात आलेली नाही. कारण ‘ईश्वरा’प्रत आत्मार्पण, ‘ईश्वरा’प्रत स्वतःच्या सर्वस्वाचे निवेदन हा जो ‘कर्मयोगा’चा गाभा आहे, तोच मूलतः भक्तीचा देखील एक मार्ग आहे.
एवढेच की, जीवनापासून पलायन करू पाहणाऱ्या एकांतिक अशा ध्यानाला तसेच, स्वतःच्याच आंतरिक स्वप्नामध्ये बंदिस्त होऊन राहणाऱ्या भावनाप्रधान भक्तीला मात्र पूर्णयोगाची समग्र प्रक्रिया म्हणून स्वीकारण्यात आलेले नाही. एखादी व्यक्ती तास न् तास ध्यानामध्ये पूर्णपणे गढून जात असेल किंवा आंतरिक अविचल आराधना आणि परमानंदामध्ये तास न् तास निमग्न होत असेल, तरीसुद्धा या गोष्टी म्हणजे समग्र पूर्णयोग नव्हे.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 216-218)