साधना, योग आणि रूपांतरण – १६९

पूर्णयोगांतर्गत भक्ती

आपल्या सर्व संकल्पांचा कर्मांचा उगम जेथून होतो आणि जेथून त्यासाठी ऊर्जा पुरवली जाते आणि त्या उर्जेची परिपूर्ती पुन्हा जेथे होते त्या सर्वान्तर्यामी असणाऱ्या ईश्वराशी आपण आपल्या संकल्पाने व कर्माने एकरूप होऊ शकतो. आणि या ऐक्याचा कळस म्हणजे प्रेम, भक्ती होय. कारण ज्या ‘ईश्वरा’च्या उदरामध्ये आपण राहतो, कर्म करतो, हालचाल करतो; ज्याच्या आश्रयाने आपण अस्तित्वात आहोत; केवळ त्या ‘ईश्वरा’साठीच कर्म करावे, केवळ ‘ईश्वरा’साठीच जगावे हे आपण अंतिमत: शिकतो. अशा ‘ईश्वरा’शी जाणीवपुर:सर एकरूप होण्याचा आनंद हेच प्रेमाचे, भक्तीचे स्वरूप आहे. असे असल्याने या प्रेमाला, भक्तीला ईश्वराशी घडणाऱ्या ऐक्याचा मुकुटमणी असे म्हटले जाते.

*

उच्चतर आध्यात्मिक स्तरावर, भक्ती आणि समर्पण या गोष्टी असू शकतात पण या गोष्टी अंतरात्म्यामध्ये जशा अपरिहार्य असतात तशा त्या उच्चतर आध्यात्मिक स्तरावर अपरिहार्य असत नाहीत. उच्चतर मनामध्ये व्यक्ती ‘ब्रह्मन्’बरोबरील एकत्वाबाबत इतकी सचेत असू शकते की तिच्या ठायी, भक्ती अथवा समर्पण असे वेगळे काही शिल्लकच उरलेले नसते.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 545) (CWSA 29 : 78)

साधना, योग आणि रूपांतरण – १६८

पूर्णयोगांतर्गत भक्ती

भक्तिपूर्ण मनाच्या द्वारा ईश्वरप्राप्तीसाठी जी साधना केली जाते, तिच्या तीन अवस्था असतात, असे भक्तिमार्गाची व्यवस्था लावू पाहणारे मानतात. पहिली अवस्था म्हणजे श्रवण. ईश्वराच्या नावाचे, त्याच्या गुणांचे आणि या गुणांशी संबंधित असणाऱ्या अशा गोष्टींचे नित्य श्रवण. दुसरी अवस्था म्हणजे ईश्वराच्या गुणांचा, त्याच्या व्यक्तिरूपाचा, ईश्वराचा नित्य विचार. तिसरी अवस्था म्हणजे ईश्वरावर मन एकाग्र करून स्थिरचित्त करणे. त्यांतून ईश्वराचा पूर्ण साक्षात्कार होतो.

उपरोक्त तिन्ही गोष्टी असतील आणि त्याबरोबरच मनोभाव उत्कट असेल, एकाग्रता तीव्र असेल तर, समाधीचाही अनुभव येतो. अशा वेळी मग बाह्य विषयांपासून जाणीव दूर निघून गेलेली असते. परंतु या सर्व गोष्टीदेखील वस्तुतः प्रासंगिक आहेत; मनातील विचार हे आराध्याकडे (object of adoration) उत्कट भक्तीने वळले पाहिजेत, हीच एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.

*

निष्ठा, भक्ती, आत्मदान, निःस्वार्थीपणाने केलेले कर्म व सेवा, सातत्यपूर्ण अभीप्सा ही सारी जीवाची सिद्धता करून घेण्याची आणि ‘ईश्वरा’च्या सन्निध राहण्याची पात्रता अंगी बाणवण्याची साधीसोपी आणि सर्वाधिक प्रभावी माध्यमं आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 574), (CWSA 35 : 841)

साधना, योग आणि रूपांतरण – १६७

पूर्णयोगांतर्गत भक्ती

समर्पण आणि प्रेम-भक्ती या काही परस्परविरोधी गोष्टी नाहीत, त्या एकमेकींसोबत वाटचाल करतात. हे खरे आहे की, प्रथमतः मनाद्वारे ज्ञानाच्या माध्यमातून समर्पण करणे शक्य असते परंतु त्यामध्ये मानसिक भक्ती अंतर्भूत असते आणि ज्या क्षणी समर्पण हृदयापर्यंत जाऊन पोहोचते, त्या क्षणापासून भक्ती ही भावना बनून आविष्कृत होते आणि भक्तिभावनेबरोबर प्रेम येतेच.
*
प्रारंभी आत्म-समर्पण आत्मज्ञानापेक्षा अधिक प्रेम आणि भक्ती यांच्या माध्यमातून घडून येते. परंतु आत्मज्ञानामुळे संपूर्ण समर्पण करणे अधिक शक्य होते, हे देखील खरे आहे.
*
पूर्ण प्रेम आणि भक्ती यांद्वारे निःशेष समर्पण सर्वोत्तमरित्या घडून येऊ शकते. भक्तीचा प्रारंभ समर्पणाविना होऊ शकतो; मात्र ती स्वत:ला घडवत, स्वाभाविकपणे समर्पणाच्या दिशेनेच जाते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 78, 78), (CWSA 30 : 57)

साधना, योग आणि रूपांतरण – १६६

पूर्णयोगांतर्गत भक्ती

‘ईश्वरी प्रेम’ हे असे प्रेम असते की, ज्यामध्ये ‘ईश्वरी एकत्व’ आणि त्याच्या ‘आनंदा’तून, ‘ईश्वरा’च्या प्रेमाचा व्यक्तीवर वर्षाव होतो. मानवी चेतनेच्या आवश्यकतेनुसार आणि संभाव्यतांनुसार, दिव्य प्रेम जेव्हा मानवी व्यक्तिरूप धारण करून, मूर्त रूपात येते तेव्हा ते ‘आंतरात्मिक प्रेम’ (psychic love) असते.
*
आध्यात्मिक (spiritual planes) स्तरांवरील प्रेम हे एक वेगळ्या प्रकारचे प्रेम असते; हे उच्चतर किंवा आध्यात्मिक मनामधील प्रेम अधिक वैश्विक आणि अ-वैयक्तिक असते. तर, अंतरात्म्यापाशी (psychic) स्वतःचे असे एक अधिक वैयक्तिक समर्पण, भक्ती, प्रेम असते. सर्वोच्च दिव्य प्रेमासाठी (आध्यात्मिक स्तरावरील प्रेम व आंतरात्मिक प्रेम) प्रेमाचे हे दोन्ही प्रकार एकत्रित येण्याची आवश्यकता असते.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 336 & 337)

साधना, योग आणि रूपांतरण – १६५

पूर्णयोगांतर्गत भक्ती

(एका साधकाने श्रीअरविंद यांना दिव्य प्रेमासंबंधी काही प्रश्न विचारला असावा असे दिसते. त्या साधकाला श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

‘दिव्य प्रेम’ हे मानवी प्रेमाप्रमाणे नसते, तर ते गहन, व्यापक आणि प्रशांत असते. त्याची जाणीव होण्यासाठी आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी व्यक्तीने अविचल आणि विशाल झाले पाहिजे. जे गरजेचे आहे (असे त्या व्यक्तीला वाटते) त्याची पूर्ती करायची किंवा नाही हा निर्णय व्यक्तीने ‘दिव्य प्रज्ञे’वर आणि ‘दिव्य प्रेमा’वर सोपविला पाहिजे. आणि ‘दिव्य प्रेमा’प्रत समर्पित होणे हेच व्यक्तीचे समग्र उद्दिष्ट असले पाहिजे; जेणेकरून ती व्यक्ती धारकपात्र आणि साधन बनू शकेल.

“अमुक एका कालावधीमध्येच माझी प्रगती झाली पाहिजे, माझा विकास झाला पाहिजे आणि मला साक्षात्कार झाला पाहिजे,” अशा गोष्टींचा व्यक्तीने आग्रह धरता कामा नये, या गोष्टीची तिने मनामध्ये पक्की खूणगाठ बांधली पाहिजे. या सर्व गोष्टींसाठी कितीही कालावधी लागला तरी, त्यासाठी थांबण्याची आणि चिकाटीने प्रयत्न करत राहण्याची व्यक्तीची तयारी असली पाहिजे. तिने तिचे संपूर्ण जीवन हे त्या एकमेव गोष्टीप्रत म्हणजे ‘ईश्वरा’प्रत असलेली उन्मुखता आणि अभीप्सा, यांसाठी वाहून घेतले पाहिजे.

कशाची तरी मागणी करणे आणि काहीतरी संपादन करणे हे नव्हे तर, स्वतःला अर्पण करणे हे साधनेचे रहस्य असते. व्यक्ती जेवढे आत्मदान करते तेवढ्या प्रमाणात तिची ग्रहणक्षमता वृद्धिंगत होते. परंतु त्यासाठी (तिच्या स्वभावातील) अधीरता आणि बंडखोर वृत्ती नाहीशी झाली पाहिजे. “मला काही साध्यच होत नाहीये, मला कोणाचे साहाय्य मिळत नाहीये, माझ्यावर कोणाचे प्रेमच नाहीये, आता मी निघून जातो, आता मी अध्यात्मसाधनेचा किंवा या जीवनाचाच त्याग करतो,” (आतून उमटणाऱ्या) अशा प्रकारच्या सर्व सूचनांना त्या व्यक्तीने धुडकावून दिले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 345)

साधना, योग आणि रूपांतरण – १६४

पूर्णयोगांतर्गत भक्ती

‘दिव्य प्रेम’ दोन प्रकारचे असते. ‘ईश्वरा’ला या सृष्टीबद्दल, आणि स्वतःचाच एक भाग असणाऱ्या जिवांबद्दल असणारे ‘प्रेम’ हा झाला या प्रेमाचा एक प्रकार आणि दुसरा प्रकार म्हणजे साधकाचे प्रेम, ‘दिव्य प्रियकरा’वर (‘ईश्वरा’वर) असणारे प्रेम. या प्रेमामध्ये वैयक्तिक आणि अ-वैयक्तिक अशी दोन्ही तत्त्वं असतात. परंतु येथे वैयक्तिक प्रेम हे प्राणिक व शारीरिक उपजत प्रेरणांच्या बंधनांपासून आणि सर्व प्रकारच्या कनिष्ठ घटकांपासून मुक्त असते.
*
एक प्रेम असे असते की, ज्या प्रेमामध्ये भावना चढत्यावाढत्या ग्रहणशीलतेनिशी आणि वाढत्या एकात्मतेनिशी ‘ईश्वराभिमुख’ झालेल्या असतात. हे प्रेम ‘ईश्वरा’कडून जे काही प्राप्त होत असते त्याचा इतरांवर वर्षाव करत असते, पण तो वर्षाव कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता, अगदी मुक्तपणे करत असते. तुम्ही तसे करण्यास सक्षम झालात तर, तो (तुमच्या) प्रेमाचा सर्वोच्च आणि सर्वाधिक समाधान देणारा मार्ग असेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 346), (CWSA 31 : 291)

साधना, योग आणि रूपांतरण – १६३

पूर्णयोगांतर्गत भक्ती

पूर्णयोगांतर्गत भक्तिमार्ग सात अवस्थांमधून प्रगत होत राहतो. आधीच्या अवस्थेतून पुढच्या अवस्थेत अशा रीतीने तो प्रगत होतो.

त्या सात अवस्था पुढीलप्रमाणे – अभीप्सा आणि आत्म-निवेदन ही पहिली अवस्था. दुसरी अवस्था म्हणजे भक्ती. पूजाअर्चा व आराधना ही तिसरी अवस्था. प्रेम ही चौथी अवस्था. ‘ईश्वरा’कडून व्यक्तीच्या समग्र अस्तित्वाचा आणि जीवनाचा ताबा घेतला जाणे ही पाचवी अवस्था. ‘ईश्वरी प्रेमा’चा हर्ष आणि ‘ईश्वरा’चे सौंदर्य व माधुर्य ही सहावी पायरी आणि ‘परमेश्वरा’चा ‘परम आनंद’ ही सातवी अवस्था.

श्रद्धा ही आपली पहिली गरज असते. कारण ‘ईश्वरा’वरील श्रद्धेविना, जीवनावरील श्रद्धेविना आणि ‘ईश्वरी अस्तित्वा’च्या सर्व-महत्तेवरील श्रद्धेविना, अभीप्सा बाळगणे किंवा समर्पित होणे याला कारणच उरत नाही. श्रद्धा नसेल तर त्या अभीप्सेमध्ये कोणतीही ताकद किंवा समर्पणाच्या पाठीशी कोणतीही शक्ती असू शकणार नाही. व्यक्तीकडे जर मध्यवर्ती आणि मूलभूत स्वरूपाची दृढ श्रद्धा असेल तर तिच्या मनात शंका असल्या तरी त्याने फारसा फरक पडत नाही. शंका येऊ शकतात पण अस्तित्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या श्रद्धारूपी शिळेपुढे त्यांचा टिकाव लागू शकत नाही. श्रद्धारूपी ही शिळा कदाचित शंकारूपी आणि निराशारूपी कल्लोळांमुळे, लाटांमुळे काही काळासाठी झाकल्यासारखी होईल पण (त्या लाटा ओसरल्या की मग) ती शिळा जशीच्या तशी अचल आणि अभेद्य रूपात उभी असल्याचे आढळून येईल.

हृदयामध्ये, जेथे चैत्य पुरुषाचा निवास असतो तेथे म्हणजे आंतरिक हृदयामध्ये ही श्रद्धा असते. बाह्य हृदय हे प्राणिक अस्तित्वाचे, जीवनामधील व्यक्तिमत्त्वाचे स्थान असते. शंका या मनामधून, प्राणामधून आणि शारीरिक चेतनेमधून निर्माण होतात. मनाप्रमाणेच प्राणिक अस्तित्वाचादेखील ‘ईश्वरा’वर विश्वास बसू शकतो किंवा उडू शकतो. आंतरात्मिक अग्नी जितका प्रखर असेल तेवढ्या प्रमाणात मन, प्राण आणि शारीर-चेतनेला मलीन आणि अंधकारमय करून टाकण्याऱ्या शंकेची तीव्रता कमी असेल.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 347-348)

साधना, योग आणि रूपांतरण – १६२

पूर्णयोगांतर्गत भक्ती

पूजाअर्चा करणे हे भक्तिमार्गावरील केवळ पहिले पाऊल आहे. जेव्हा बाह्य पूजाअर्चा ही आंतरिक आराधनेमध्ये परिवर्तित होते तेव्हा खऱ्या भक्तीचा आरंभ होतो. ती अधिक सखोल होते आणि दिव्य प्रेमाच्या उत्कटतेमध्ये तिचे परिवर्तन होते. त्या प्रेमामधून आपल्याला ‘ईश्वरा’शी असलेल्या आपल्या जिव्हाळ्याच्या नात्यातील हर्षाचा अनुभव येऊ लागतो आणि हा समीपतेचा हर्ष नंतर एकत्वाच्या आनंदामध्ये रूपांतरित होतो.
*
भक्तिमार्गाची पहिली अवस्था सारांशरूपाने सांगायची झाली तर तीन शब्दांत तिचे वर्णन करता येईल. श्रद्धा, पूजाअर्चा, आज्ञापालन.
आराधना, आनंद, आत्मदान या तीन शब्दांत भक्तिमार्गाच्या दुसऱ्या अवस्थेचे वर्णन सारांशरूपाने करता येईल.
प्रेम, परमानंद, समर्पण या तीन शब्दांत भक्तिमार्गाच्या तिसऱ्या अवस्थेचे वर्णन सारांशरूपाने करता येईल.

– श्रीअरविंद (CWSA 24 : 549) & (CWSA 12 : 348)

साधना, योग आणि रूपांतरण – १६१

पूर्णयोगांतर्गत भक्ती

कार्यासाठी प्राणिक ऊर्जा आवश्यक असते. अर्थात योगासाठी तिचा पूर्णत: उपयोग करून घेण्यासाठी आणि तिच्या शक्तीचा कृतीसाठी उपयोग करून घेण्यासाठी, अहंकार हळूहळू नाहीसा झाला पाहिजे आणि प्राणिक आसक्ती व आवेग यांची जागा आध्यात्मिक प्रेरणांनी घेतली गेली पाहिजे. या परिवर्तनास कारणीभूत ठरणाऱ्या साधनांपैकी भक्ती, ईश्वराची आराधना आणि ईश्वराबद्दलचा सेवाभाव या साधनांची गणना सर्वाधिक प्रभावी साधनांमध्ये होते.
*
अहंकारापासून मुक्ती ही आध्यात्मिकदृष्ट्या मौलिक गोष्ट आहे. कारण त्यामुळे व्यक्ती स्वतःच्या वैयक्तिक ‘स्व’मध्येच केंद्रित न होता, ‘ईश्वरा’मध्ये केंद्रित होते आणि भक्तीसाठी ही आवश्यक अशी स्थिती असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 245–246 & 95)

साधना, योग आणि रूपांतरण – १६०

पूर्णयोगांतर्गत भक्ती

(एखाद्या समस्येवर अंतरंगातून उत्तर कसे मिळवावे हा प्रश्न श्रीअरविंदांना विचारला आहे, असे दिसते. त्याला श्रीअरविंदांनी दिलेले उत्तर…)

आंतरिक जाणिवेबद्दल सांगायचे तर, व्यक्ती अंतरंगामध्ये किती खोलवर शिरू शकते यावर ती जाणीव अवलंबून असते. कधीकधी भक्तीमुळे किंवा अन्य काही कारणामुळे चेतना जसजशी सखोल, गभीर होत जाते तसतशी आंतरिक जाणीव स्वतःहून निर्माण होते. कधीकधी ती सरावाने वा अभ्यासाने निर्माण होते. म्हणजे, प्रत्येक गोष्ट अंतरंगामध्ये निवेदित करायची आणि त्याला मिळणारे उत्तर ऐकायची सवय करायची. अशी सवय केल्यामुळे, अशा प्रकारच्या सरावामुळेसुद्धा कधीकधी आंतरिक जाणीव निर्माण होते. ‘ऐकायचे’ असे मी म्हणालो, पण अर्थातच हे एक रूपक आहे; पण अन्यथा त्याविना हे शब्दांत व्यक्त करणे अवघड आहे. म्हणजे अंतरंगातून येणारे उत्तर हे शब्दरूपात किंवा ध्वनीरूपातच मिळेल असे नाही. अर्थात, काहींच्या बाबतीत आणि कधीकधी ते शब्दरूपातही मिळू शकते, ती जाणीव कोणतेही रूप घेऊ शकते.

योग्य उत्तर कोणते याची निश्चिती कशी करायची ही अनेकांच्या बाबतीत मुख्य अडचण असते. यासाठी सद्गुरूच्या चेतनेशी आंतरिक संपर्क साधता आला पाहिजे आणि ही गोष्ट भक्तीद्वारे उत्तम रीतीने साध्य होते. अन्यथा, अभ्यासाद्वारे अंतरंगामधून योग्य उत्तराची जाणीव करून घेण्याचा प्रयत्न करणे ही एक अतिशय नाजूक व कठीण बाब होऊन बसते. त्यामध्ये पुढील अडथळे येऊ शकतात.

१) प्रत्येक गोष्टीसाठी केवळ बाह्य साधनांवर विसंबून राहण्याची (व्यक्तीची) सामान्य सवय.
२) अहंकार! हा अहंकार योग्य उत्तराच्या ऐवजी स्वतःचे (स्वतःस अनुकूल असे) पर्याय सुचवितो.
३) मानसिक कृती.
४) (आपल्यामध्ये) शिरू पाहणाऱ्या अनिष्ट गोष्टी.

मला वाटते याबाबतीत तुम्ही अधीर होण्याची गरज नाही. आंतरिक चेतनेच्या प्रगतीवर विश्वास ठेवा.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 261)