साधना, योग आणि रूपांतरण – १७७
साधना, योग आणि रूपांतरण – १७७
(श्रीअरविंद यांनी पत्राद्वारे एका साधकाला पूर्णयोग म्हणजे काय ते समजावून सांगितले आहे.)
(०१) ‘ईश्वरा’कडे फक्त मनाच्या माध्यमातून (ज्ञानयोग) किंवा फक्त हृदयाच्या माध्यमातून (भक्तियोग) किंवा फक्त इच्छा व कर्म यांच्या माध्यमातून (कर्मयोग) जाण्याऐवजी, पूर्णयोगामध्ये व्यक्ती चेतनेच्या आणि अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी आणि शक्तींनिशी ‘ईश्वर’प्राप्तीसाठी प्रयत्न करते. तो प्रयत्न करत असताना व्यक्ती उपरोक्त तिन्ही मार्गांचे आणि अन्य अनेक मार्गांचे एकाच योगमार्गामध्ये (ईश्वराशी ऐक्य साधण्याची पद्धत) एकीकरण करते आणि ‘ईश्वरा’चे, ‘त्या’च्या उपस्थितीसहित, चेतना, शक्ती, प्रकाश आणि आनंद यांसहित सर्वकाही, आपल्या स्वतःच्या चेतनेमध्ये आणि व्यक्तित्वामध्ये ग्रहण करते.
(०२) पूर्णयोगामध्ये व्यक्ती आपल्या ‘स्व’मध्ये आणि ‘जिवा’मध्येच ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेण्यासाठी नव्हे, तर आपल्या संपूर्ण प्रकृतीमध्येच ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेण्यासाठी प्रयत्नशील असते. (म्हणजे या कनिष्ठ मानवी प्रकृतीचे ईश्वरी आध्यात्मिक प्रकृतीमध्ये रूपांतर करण्यासाठी व्यक्ती प्रयत्नशील असते.)
(०३) पूर्णयोगामध्ये जन्म-प्रक्रियेला विराम देऊन, व्यक्ती फक्त पारलौकिकात ‘ईश्वर’प्राप्ती व्हावी यासाठी प्रयत्नशील नसते तर, ती या जीवनामध्येच त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी प्रयत्नशील असते; जेणेकरून जीवन हे देखील ‘ईश्वरा’चा साक्षात्कार आणि ‘दिव्य’ प्रकृतीचे आविष्करण व्हावे.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 373)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ - December 7, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ - December 6, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ - December 5, 2025







