साधना, योग आणि रूपांतरण – १४९
पूर्णयोगांतर्गत भक्ती
आपल्यापेक्षा जे महान आहे त्याची केलेली पूजा, आराधना, त्याच्याप्रति केलेले आत्मार्पण हे ‘भक्ती’चे स्वरूप असते. तर त्याच्या सान्निध्याची आणि ऐक्याची आस बाळगणे किंवा तशी भावना असणे हे ‘प्रेमा’चे स्वरूप असते. आत्मदान हे दोन्हीचे लक्षण असते. भक्ती आणि प्रेम या दोन्ही गोष्टी योगमार्गामध्ये आवश्यक असतात आणि दोन्ही गोष्टींना पूर्ण शक्ती तेव्हाच प्राप्त होते जेव्हा एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीला आधार असतो.
*
मला वाटते, ‘प्रेमभक्ती’ म्हणजे अशी भक्ती की जिचा प्रेम हा आधार असतो. पूजाअर्चना, शरणागती, आदरभाव, आज्ञापालन इत्यादी प्रकारची पण प्रेमविरहित अशी भक्ती देखील असू शकते.
*
निःस्वार्थीपणा, आत्मदान, संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास, कोणत्याही मागणीचा व इच्छेचा अभाव, ‘ईश्वरी संकल्पा’प्रति समर्पण, ‘ईश्वरा’वर एकवटलेले प्रेम ही खऱ्या प्रेमाची आणि भक्तीची काही लक्षणं आहेत.
*
भक्ती हा काही अनुभव नाही तर, ती हृदयाची आणि आत्म्याची एक अवस्था आहे. चैत्य पुरुष जागृत आणि अग्रेसर असताना ही अवस्था येते.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 356, 356, 356, 95)
- साधना, योग आणि रूपांतरण – २५५ - February 17, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २५४ - February 16, 2025
- प्राणाचे रूपांतरण – प्रास्ताविक - February 14, 2025