साधना, योग आणि रूपांतरण – १३९
(ईश्वरी कार्याचे साधन झालेल्या साधकामध्ये ‘दिव्य शक्ती’ अवतरित होऊ लागते, त्याला स्वतःमध्ये एक प्रकारची विशेष ऊर्जा जाणवू लागते. त्या ऊर्जेचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी श्रीअरविंद येथे मार्गदर्शन करत आहेत.)
एक ‘दिव्य शक्ती’ येते आणि ती तुम्हाला कार्यप्रवृत्त करते आणि ही गोष्टदेखील आध्यात्मिक जीवनाच्या इतर सर्व गोष्टींइतकीच अस्सल असते. ती विशेष ‘ऊर्जाशक्ती’ व्यक्तीमधील कर्म-कर्त्याचा (worker) ताबा घेते आणि ती त्या व्यक्तीच्या माध्यमातून स्वतःची परिपूर्ती करते. एखाद्या व्यक्तीमध्ये अशा रीतीने त्या शक्तीने पूर्णतः कार्य करणे ही गोष्ट खरोखर कल्याणकारी असते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, व्यक्तीने त्याचा अतिरेक करता कामा नये. म्हणजे (त्याचा परिणाम म्हणून,) शरीरातील सगळी ऊर्जाच संपुष्टात आल्यासारखे होणे किंवा शारीरिक जडत्व येण्याइतपत शीण येणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत.
समर्पणाच्या बाबतीत सांगायचे तर, (हातून घडलेले प्रत्येक कर्म) ईश्वराला नित्य अर्पण करण्याचा संकल्प केला पाहिजे. जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही प्रार्थना केली पाहिजे, ईश्वराचे स्मरण केले पाहिजे. (कर्माच्या संदर्भात मला असे म्हणायचे आहे.) एक विशिष्ट दृष्टिकोन सुनिश्चित होण्यासाठी मी हे करायला सांगत आहे. कालांतराने, तुमच्या अंतरंगामधील अधिक खोलवरचे समर्पण खुले करण्यासाठी, या गोष्टीचा एखाद्या किल्लीसारखा उपयोग ती शक्ती करून घेऊ शकेल.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 270-271)
- प्राणाचे रूपांतरण – प्रास्ताविक - February 14, 2025
- मानसिक प्रशिक्षण - February 13, 2025
- विचारमुक्त होण्याचा मार्ग - February 12, 2025