साधना, योग आणि रूपांतरण – १३०
तुम्ही जेव्हा ‘दिव्य माते’शी पूर्णतः एकात्म व्हाल; तुम्हाला आपण कर्ते आहोत, सेवक आहोत, किंवा साधन आहोत, अशी स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव न राहता, आपण त्या दिव्य मातेच्या चेतनेचा आणि तिच्या शक्तीचा एक शाश्वत अंशभाग आहोत आणि तिचे खरेखुरे बालक आहोत अशी जाणीव होईल, तेव्हा परिपूर्णत्वाची अंतिम अवस्था येईल. (त्यानंतर) ती दिव्य माता नेहमीच तुमच्या अंतरंगामध्ये असेल आणि तुम्ही तिच्यामध्ये (निवास करत) असाल. तुमचे सारे विचार, तुमची दृष्टी, तुमच्या कृती, तुमचा अगदी श्वासोच्छ्वास आणि तुमचे सारे जीवनव्यवहार तिच्यापासून निर्माण होत आहेत आणि ते तिचेच आहेत असा तुमचा सततचा, सहज-स्वाभाविक अनुभव असेल. तुम्ही म्हणजे तिने तिच्यामधूनच घडविलेली एक व्यक्ती आणि एक शक्ती आहात, लीलेसाठी तिने स्वतःमधून तुम्हाला वेगळे केले आहे आणि तरीही तुम्ही तिच्यामध्ये नेहमीच सुरक्षित आहात, तुम्ही तिच्या अस्तित्वाचेच एक अंग आहात, तिच्या चेतनेचीच एक चेतना आहात, तिच्या शक्तीचीच एक शक्ती आहात आणि तिच्या ‘आनंदा’चाच एक आनंद आहात, असे तुम्हाला जाणवेल, दिसेल आणि तसा अनुभव देखील तुम्हाला येईल. जेव्हा अशी नि:शेष स्थिती असेल आणि दिव्य मातेच्या अतिमानसिक ऊर्जा तुम्हाला मुक्तपणे संचालित करतील तेव्हा तुम्ही ईश्वरी कार्यामध्ये परिपूर्ण झालेले असाल. तेव्हा ज्ञान, इच्छा, कृती या गोष्टी खात्रीशीर, सहजसाध्या, तेजोमय, उत्स्फूर्त, निर्दोष झालेल्या असतील; त्या सर्व गोष्टी ‘परमेश्वरा’पासून प्रवाहित झालेल्या असतील; आणि अशी परिस्थिती म्हणजे ‘शाश्वता’चा दिव्य संचार असेल.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 13)
- श्रीमाताजी आणि समीपता – ३३ - June 22, 2025
- श्रीमाताजी आणि समीपता – ३२ - June 21, 2025
- श्रीमाताजी आणि समीपता – ३१ - June 20, 2025