साधना, योग आणि रूपांतरण – १२१

एक गोष्ट तुम्ही जाणून घेतली पाहिजे, ती अशी की, तुमचे यश किंवा अपयश हे प्रथम आणि नेहमीच, योग्य दृष्टिकोन आणि खरे आंतरात्मिक व आध्यात्मिक वातावरण बाळगण्यावर, तसेच श्रीमाताजींच्या शक्तीला तुमच्या माध्यमातून कार्य करण्यास सहमती देण्यावर अवलंबून असते.

मला तुमच्या पत्रांवरून असे लक्षात आले की, तुम्ही त्या शक्तीचा आधार फारच गृहीत धरत आहात आणि पहिला भर स्वतःच्या कल्पना, योजना आणि कामासंबंधीच्या चर्चांवर देता. परंतु या साऱ्या गोष्टी चांगल्या असू देत किंवा वाईट, त्या योग्य असू देत किंवा चुकीच्या, त्या जर ‘सत् – शक्ती’ची साधने नसतील तर त्या असफलच होणार. तुम्ही नेहमी एकाग्र असले पाहिजे, तुमच्या सर्व अडचणींच्या निराकरणासाठी तुम्ही येथून (पाँडिचेरीहून) पाठविल्या जाणाऱ्या शक्तीवर विसंबून राहिले पाहिजे, तुम्ही त्या शक्तीला कार्य करण्यासाठी वाव दिला पाहिजे, म्हणजे त्या शक्तीची जागा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला आणि स्वतंत्र प्राणिक इच्छा किंवा आवेगाला घेऊ देता कामा नये.

यशाची ही जी अट आहे ती कधीही न विसरता, तुम्ही तुमचे कार्य करत रहा. स्वतःला त्या कार्यामध्ये किंवा तुमच्या कल्पनांमध्ये किंवा त्यासंबंधीच्या योजनांमध्ये हरवून बसू नका आणि स्वतःस खऱ्या उगमाच्या नित्य संपर्कात ठेवण्यास विसरू नका. अन्य कोणाचाही मानसिक किंवा प्राणिक प्रभाव किंवा सभोवतालच्या वातावरणाचा प्रभाव किंवा सामान्य मानवी मानसिकता यांना तुमच्या आणि श्रीमाताजींच्या शक्तीच्या व उपस्थितीच्या आड येऊ देऊ नका.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 242-243)

श्रीअरविंद