साधना, योग आणि रूपांतरण – १४९

पूर्णयोगांतर्गत भक्ती

आपल्यापेक्षा जे महान आहे त्याची केलेली पूजा, आराधना, त्याच्याप्रति केलेले आत्मार्पण हे ‘भक्ती’चे स्वरूप असते. तर त्याच्या सान्निध्याची आणि ऐक्याची आस बाळगणे किंवा तशी भावना असणे हे ‘प्रेमा’चे स्वरूप असते. आत्मदान हे दोन्हीचे लक्षण असते. भक्ती आणि प्रेम या दोन्ही गोष्टी योगमार्गामध्ये आवश्यक असतात आणि दोन्ही गोष्टींना पूर्ण शक्ती तेव्हाच प्राप्त होते जेव्हा एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीला आधार असतो.
*
मला वाटते, ‘प्रेमभक्ती’ म्हणजे अशी भक्ती की जिचा प्रेम हा आधार असतो. पूजाअर्चना, शरणागती, आदरभाव, आज्ञापालन इत्यादी प्रकारची पण प्रेमविरहित अशी भक्ती देखील असू शकते.
*
निःस्वार्थीपणा, आत्मदान, संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास, कोणत्याही मागणीचा व इच्छेचा अभाव, ‘ईश्वरी संकल्पा’प्रति समर्पण, ‘ईश्वरा’वर एकवटलेले प्रेम ही खऱ्या प्रेमाची आणि भक्तीची काही लक्षणं आहेत.
*
भक्ती हा काही अनुभव नाही तर, ती हृदयाची आणि आत्म्याची एक अवस्था आहे. चैत्य पुरुष जागृत आणि अग्रेसर असताना ही अवस्था येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 356, 356, 356, 95)

साधना, योग आणि रूपांतरण – १४८

पूर्णयोगांतर्गत भक्ती

साधक : नामजपाबद्दलची माझी जुनीच ऊर्मी पुन्हा एकदा उफाळून आली आहे, त्याबद्दल मला वाईट वाटत आहे. नामजपाचे परिणाम दिसून यावेत म्हणून कदाचित माझे मन त्याचा अतिरेक करत असावे.

श्रीअरविंद : व्यक्तीने जपाचा अर्थ समजून घेतला, आणि त्या अर्थानिशी नामजप केला, तसेच त्या नामजपामधून ज्या ‘देवते’चा बोध होतो त्याविषयीचे एक आकर्षण, तिचे सौंदर्य, तिची शक्ती किंवा तिचे स्वरूप मनामध्ये साठवून जर नामजप केला आणि या गोष्टी चेतनेमध्ये उतरविल्या तर नामजप यशस्वी होतो. हा नामजपाचा ‘मानसिक मार्ग’ झाला. किंवा जर तो नामजप हृदयामधून उदित होत असेल किंवा तो नामजप ज्यामुळे चैतन्यमय होईल अशी भक्तीची भावना किंवा तशी विशिष्ट जाणीव जर व्यक्तीमध्ये निनादत राहिली तर मग तो नामजप यशस्वी होतो, हा नामजपाचा ‘भावनिक मार्ग’ आहे. जप हा सहसा वरील दोनपैकी कोणत्या तरी एका परिस्थितीमध्ये यशस्वी होतो.

जप यशस्वी होण्यासाठी त्याला मनाचा किंवा प्राणाचा आधार द्यावा लागतो किंवा त्याचे पोषण करावे लागते. परंतु जर जपामुळे मन रूक्ष होत असेल आणि प्राण अस्वस्थ होत असेल तर त्यामध्ये या आधाराचा किंवा पोषणाचा अभाव असतो हे निश्चित समजावे.

अर्थात आणखी एक तिसरा मार्गसुद्धा असतो. आणि तो म्हणजे त्या नामाच्या किंवा मंत्राच्या शक्तीवरच विसंबून राहायचे. परंतु जोवर ती शक्ती व्यक्तीच्या आंतरिक अस्तित्वावर त्या जपाच्या स्पंदनांचा प्रभाव उमटवीत नाही तोवर व्यक्तीने नामजप चालूच ठेवणे आवश्यक असते; असा प्रभाव पडल्यावर, मग कधीतरी अवचित एखाद्या क्षणी व्यक्ती ईश्वरी ‘अस्तित्वा’प्रत किंवा त्याच्या ‘स्पर्शा’प्रत खुली होते. परंतु हे घडून यावे म्हणून जर अट्टहास किंवा धडपड केली जात असेल तर, ज्या प्रभावाला मनाच्या अविचल ग्रहणशीलतेची आवश्यकता असते त्यामध्ये बाधा निर्माण होते. आणि म्हणूनच मनावर अधिक ताण न देता किंवा अतिरिक्त प्रयत्न न करता, मनाच्या अविचलतेवर अधिक भर देण्यास मी सांगत होतो. ग्रहणशीलतेची आवश्यक परिस्थिती मनामध्ये आणि अंतरात्म्यामध्ये विकसित व्हावी म्हणून त्यांना अवधी देणे आवश्यक असते. व्यक्तीला काव्याची किंवा संगीताची जशी स्फूर्ती येते त्याचप्रमाणे ही ग्रहणशीलतादेखील अगदी स्वाभाविक असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 328-329)

साधना, योग आणि रूपांतरण – १४७

पूर्णयोगांतर्गत भक्ती

नामोच्चारणामध्ये शक्ती असते पण ते जर हृदयातून आणि अंतःकरणातून आलेले असेल तरच! केवळ मनाद्वारे केलेली पुनरावृत्ती पुरेशी नसते.
*
कोणत्याही देवदेवतेचे नामस्मरण केले तरी त्या नामस्मरणाला प्रतिसाद देणारी ‘शक्ती’ म्हणजे (स्वयं) श्रीमाताजीच असतात. प्रत्येक नामाद्वारे ईश्वराच्या एका विशिष्ट पैलूचा निर्देश होतो आणि ते नाम त्या पैलूपुरतेच मर्यादित असते; श्रीमाताजींची शक्ती मात्र वैश्विक आहे.
*
साहजिकच आहे की, व्यक्ती जाग्रतावस्थेमध्ये ज्या कोणत्या नामावर लक्ष केंद्रित करते, ते नाम निद्रावस्थेमध्येसुद्धा आपोआप पुनरावृत्त होत राहते. परंतु निद्रावस्थेमध्ये श्रीमाताजींच्या नामाचा धावा करणे हे नामस्मरणच असेल असे नाही. बरेचदा असे होते की, आंतरिक पुरुष अडचणीमध्ये असताना किंवा त्याला तशी निकड जाणवत असेल तर तो श्रीमाताजींना आवाहन करत असतो.
*
श्वासाबरोबर नामस्मरण करण्यास मी फारसे प्रोत्साहन देत नाही कारण मग ते प्राणायामासारखे होते. प्राणायाम ही अत्यंत शक्तिशाली गोष्ट आहे, परंतु प्राणायाम जर घाईगडबडीने केला गेला तर त्यातून अडथळे निर्माण होऊ शकतात आणि अतिशय टोकाच्या परिस्थितीमध्ये तर त्यामुळे शरीराला आजारपण येऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 327)

साधना, योग आणि रूपांतरण – १४६

पूर्णयोगांतर्गत भक्ती

‘ईश्वरा’चे नामस्मरण हे सहसा संरक्षणासाठी, आराधनेसाठी, भक्तीमध्ये वृद्धी व्हावी यासाठी, आंतरिक चेतना खुली व्हावी यासाठी आणि भक्तिमार्गाद्वारे ‘ईश्वरा’चा साक्षात्कार व्हावा यासाठी केले जाते.

*

पूर्णयोगाच्या साधनेचे सूत्र म्हणून केवळ एकच मंत्र उपयोगात आणला जातो, तो म्हणजे ‘श्रीमाताजीं’चे नाम किंवा ‘श्रीअरविंदां’चे व ‘श्रीमाताजीं’चे नाम!

हृदयकेंद्रामध्ये एकाग्रता आणि मस्तकामध्ये एकाग्रता या दोन्ही पद्धती या योगामध्ये अवलंबल्या जातात; त्या प्रत्येक पद्धतीचे स्वतःचे असे परिणाम असतात.

हृदयकेंद्रावर एकाग्रता साधली असता चैत्य पुरुष (psychic being) खुला होतो आणि तो भक्ती, प्रेम आणि श्रीमाताजींशी एकत्व घडवून आणतो; हृदयकेंद्रावर एकाग्रता साधली असता हृदयामध्ये श्रीमाताजींची उपस्थिती जाणवू लागते आणि प्रकृतीमध्ये, स्वभावामध्ये त्यांच्या शक्तीचे कार्य घडू लागते.

मस्तककेंद्रावर एकाग्रता साधली असता, मन हे आत्मसाक्षात्काराप्रत खुले होते; मनाच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या चेतनेप्रत, देहाच्या बाहेर असणाऱ्या चेतनेच्या आरोहणाप्रत आणि उच्चतर चेतनेच्या देहामधील अवतरणाप्रत मन खुले होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 326 & 327)

साधना, योग आणि रूपांतरण – १४५

पूर्णयोगांतर्गत भक्ती

श्रीअरविंद : प्रेम आणि भक्ती ही चैत्य पुरुषाच्या खुले होण्यावर अवलंबून असते आणि त्यासाठी इच्छावासना नाहीशा होणे आवश्यकच असते. बऱ्याच जणांकडून श्रीमाताजींप्रति आंतरात्मिक प्रेमाऐवजी प्राणिक प्रेम अर्पण करण्यात येते; इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा या प्राणिक प्रेमामुळे अधिकच अडथळे निर्माण होतात कारण त्यामध्ये इच्छावासना मिसळलेल्या असतात.

साधक : श्रीमाताजींविषयीची आंतरात्मिक भक्ती, मानसिक भक्ती आणि प्राणिक भक्ती यांचे स्वरूप कसे असते? ते कसे ओळखावे?

श्रीअरविंद : कोणतीही अपेक्षा न बाळगता केलेले आत्मदान आणि प्रेम हे ‘आंतरात्मिक भक्ती’चे स्वरूप असते, तर श्रीमाताजींनी मला त्यांचे अंकित करावे आणि मी त्यांची सेवा करावी ही इच्छा हे ‘प्राणिक भक्ती’चे स्वरूप असते. आणि ‘श्रीमाताजी’ जशा आहेत, त्या जे सांगतात आणि त्या जे करतात त्याचा, कोणताही किंतुपरंतु न बाळगता केलेला स्वीकार आणि श्रद्धा हे ‘मानसिक भक्ती’ चे स्वरूप असते. वस्तुतः ही भक्तीची बाह्य लक्षणे आहेत. त्यांचे आंतरिक स्वरूप ओळखता येण्याइतके सुस्पष्ट असते पण त्यांतील भेद शब्दांत मांडायची आवश्यकता नाही.

साधक : ‘पूर्णयोगा’मध्ये मानसिक आणि प्राणिक भक्तीला काही स्थान नाहीये का?

श्रीअरविंद : ती जर खरी भक्ती असेल तर त्या प्रत्येक भक्तीला येथे स्थान आहे.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 475-477)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

साधना, योग आणि रूपांतरण – १४४

पूर्णयोगांतर्गत भक्ती

साधक : आज संध्याकाळी श्रीमाताजींच्या दर्शनाच्या वेळी त्यांची दृष्टी माझ्यावर पडली आणि मला माझ्यामध्ये भक्तीचा एक उमाळा दाटून आलेला आढळला. आणि आजवर मी यासाठीच आसुसलेलो होतो असे मला वाटले. जोपर्यंत अशी भक्ती माझ्या हृदयामध्ये जिवंत आहे तोपर्यंत मला अन्य कोणतीच इच्छा नाही, असे मला वाटले. मला ‘अहैतुकी भक्ती’ लाभावी, असे आपण वरदान द्यावे. श्रीरामकृष्ण परमहंस असे म्हणत की, ‘भक्तीची इच्छा ही काही इच्छा-वासना म्हणता यायची नाही.’ त्यामुळे मला असा विश्वास वाटतो की, मीही अशाच भक्तीची इच्छा बाळगत आहे म्हणजेच, मी काही कोणताही व्यवहार करत नाहीये, कारण भक्ती हा ‘दिव्यत्वा’चा गाभा आहे, त्यामुळे भक्तीसाठी मी केलेली मागणी रास्त आहे ना?

श्रीअरविंद : ‘ईश्वरा’विषयी इच्छा किंवा ‘ईश्वरा’विषयी भक्ती ही एक अशी इच्छा असते की, जी इच्छा व्यक्तीला अन्य सर्व इच्छांपासून मुक्त करते. त्या इच्छेच्या अगदी गाभ्यात शिरून जर आपण पाहिले तर असे आढळते की, ती इच्छा नसते तर ती ‘अभीप्सा’ असते, ती ‘आत्म्याची निकड’ असते, आपल्या अंतरात्म्याच्या अस्तित्वाचा ती श्वास असते आणि त्यामुळेच तिची गणना इच्छा-वासना यांच्यामध्ये होत नाही.

साधक : श्रीमाताजींविषयी माझ्या मनामध्ये शुद्ध भक्तीचा उदय कसा होईल?

श्रीअरविंद : विशुद्ध उपासना, आराधना, कोणताही दावा किंवा मागणी न बाळगता ‘ईश्वरा’विषयी प्रेम बाळगणे याला म्हणतात ‘शुद्ध भक्ती’.

साधक : ती आपल्यामध्ये कोठून आविष्कृत होते?

श्रीअरविंद : अंतरात्म्यामधून.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 476)

साधना, योग आणि रूपांतरण – १४३

‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये आपण सध्या ‘साधना’ या मुद्द्याचा विचार करत आहोत. पूर्णयोगांतर्गत साधनेमध्ये ज्ञान, कर्म आणि भक्ती या त्रिमार्गाचा समन्वय अपेक्षित असतो. एवढेच नव्हे तर, पारंपरिक त्रिमार्गापेक्षाही अधिकचे असे काही त्यामध्ये समाविष्ट असते. पुन्हा त्यामध्येही म्हणजे, त्रिमार्गाच्या संदर्भातही, पारंपरिक ज्ञानमार्ग व पूर्णयोगांतर्गत ज्ञानमार्ग, पारंपरिक कर्ममार्ग व पूर्णयोगांतर्गत कर्ममार्ग यांमध्ये काहीशी भिन्नता आढळते. ‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये, आजवर आपण पूर्णयोगांतर्गत ज्ञानमार्ग व कर्ममार्ग यांचा विचार केला. आत्तापर्यंत ज्ञान आणि कर्ममार्गाचा आवश्यक तेवढा विचार झाल्यानंतर आपण उद्यापासून ‘भक्तिमार्गा’कडे वळणार आहोत.

महाराष्ट्रामध्ये या तिन्ही विचारधारांचा समन्वय एकप्रकारे संत वाङ्मयात झालेला आढळतो. त्यामध्ये भक्तीचा उत्कर्ष झालेला असतो. आणि त्यामुळेच महाराष्ट्राची भूमी संतांच्या अमृत मधुर सिंचनाने, भक्तीच्या ओलाव्याने मार्दवयुक्त झालेली पाहायला मिळते. पूर्णयोगांतर्गत भक्तीसाठी आवश्यक असणारी आधारभूमी महाराष्ट्रामध्ये आपल्या संतमंडळींनी तयार करून ठेवली आहे असे आपल्याला दिसते. आता आवश्यकता आहे ती त्या मार्गावरून वाटचाल करून पुढे जाण्याची!

श्री अरविंद आणि श्रीमाताजी यांच्या माध्यमातून आपण भक्ती म्हणजे काय, त्याचे स्वरूप कसे असते, भक्तिमार्गाची गुणवैशिष्ट्ये कोणती, भक्ताच्या आंतरिक जीवनाचे बारकावे या साऱ्याचा विचार येथून पुढे करणार आहोत. गतकाळाच्या आधारभूमीवर ठामपणे पावले रोवून, पण त्याचे कोणतेही ओझे मनावर न बाळगता, एका स्वच्छ भावनेने आपण या विषयाकडे वळू या आणि श्रीअरविंद व श्रीमाताजी या संदर्भात काय सांगतात ते जाणून घेऊ या.

वाचकांना ‘पूर्णयोगांतर्गत भक्ती’ हा भाग समजावून घेण्यामध्ये स्वारस्य वाटेल अशी आशा वाटते.

संपादक,
‘अभीप्सा’ मराठी मासिक

साधना, योग आणि रूपांतरण – १४२

मानवी प्रकृतीत आणि मानवी जीवनात संकल्पशक्ती, ज्ञानशक्ती आणि प्रेमशक्ती या तीन दिव्यशक्ती आहेत. मानवाचा आत्मा ईश्वराप्रत ज्या तीन मार्गांनी उन्नत होत जातो त्या मार्गांचा निर्देश वरील तीन शक्ती करतात. म्हणून या तीन मार्गांचा समुच्चय, तीनही मार्गांनी मनुष्याचे ईश्वराशी सायुज्य होणे, एकत्व पावणे हाच ‘पूर्णयोगाचा आधार’ असणे आवश्यक असते.

कर्म ही जीवनातील पहिली शक्ती आहे. प्रकृती ही या कर्मशक्तीपासून आणि तिच्या कार्यापासून सुरुवात करते; आणि जेव्हा ही शक्ती आणि तिची कार्यं मनुष्यामध्ये सचेत (conscious) होतात, तेव्हा त्यांना संकल्पशक्ती व संकल्पशक्तीची उपलब्धी हे स्वरूप येते. म्हणून मनुष्याने आपले कर्म ईश्वरोन्मुख केले, की त्याचे जीवन उत्तम प्रकारे आणि निश्चितपणे दिव्य होऊ लागते. कर्म ईश्वरोन्मुख करणे हे दिव्य जीवनाचे पहिले प्रवेशद्वार आहे; तो आरंभ-बिंदू आहे.

मनुष्यातील संकल्पशक्ती जेव्हा ईश्वरी संकल्पशक्तीशी मेळविली जाते आणि जिवाची समग्र कर्मं एका ‘ईश्वरा’तूनच उदित होऊ लागतात, तसेच ती ‘ईश्वरा’भिमुख झालेली असतात तेव्हा, ‘कर्मातून एकत्व’ पूर्णतया साध्य होते. परंतु, कर्माची परिपूर्ती ज्ञानामध्ये होते. भगवद्गीता सांगते त्याप्रमाणे, सर्व कर्मांची समग्रता ही, चक्राकार फिरून ज्ञानामध्ये परिसमाप्त होते. ‘सर्वं कर्माखिलं ज्ञाने परिसमाप्यते.’

आपल्या कर्मामध्ये आणि संकल्पामध्ये आपण ‘ईश्वरा’शी ऐक्य पावलो की, आपण त्या सर्वान्तर्यामी वसणाऱ्या आत्म्याशी एकत्व पावतो. ज्याच्यापासून आपली सर्व कर्म व संकल्प उदयास आलेले असतात; आणि जेथून ते स्वत: शक्ती घेत असतात आणि ज्यांच्या उर्जेची परिसमाप्ती परत त्याच्यामध्येच होत असते अशा सर्वान्तर्यामी वसणाऱ्या आत्म्याशी आपण एकत्व पावतो. या ऐक्याचा कळस म्हणजे प्रेम व भक्ती होय. ज्या ‘ईश्वरा’च्या उदरात आपण राहतो, जीवनव्यवहार करतो, हिंडतोफिरतो, त्या ‘ईश्वरा’शी असलेल्या जाणीवयुक्त ऐक्याचा आनंद हे त्या प्रेमाचे स्वरूप असते. त्या ‘ईश्वरा’मुळे आपले अस्तित्व आहे, आणि त्याच्यासाठीच केवळ आपण कर्म करायची असतात, त्याच्यासाठीच जगायचे असते हे सरतेशेवटी आपल्याला उमगते.

आपल्या शक्तींची त्रिमूर्ती ती हीच. ईश्वराप्रत पोहोचण्याचा प्रवेशमार्ग म्हणून आणि त्याच्याशी असलेल्या आपल्या संपर्काची दिशा म्हणून जेव्हा आपण कर्मापासून प्रारंभ करतो तेव्हा, आपण या तीन दैवतांच्या ऐक्यापाशीच येऊन पोहोचतो.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 545)

साधना, योग आणि रूपांतरण – १४१

(कर्मव्यवहार करत असताना, वेगवेगळ्या स्वभावाच्या, वेगवेगळ्या वृत्तीप्रवृत्तीच्या व्यक्ती आपल्या संपर्कात येतात. तेव्हा कर्मामधील सुसंवादपूर्ण वातावरणासाठी आणि पर्यायाने कार्यसिद्धीसाठी कधीकधी स्वतःच्या स्वभावालाही मुरड घालावी लागते, त्याला वळण लावावे लागते हे श्रीअरविंद येथे सांगत आहेत.)

नेहमीच दोन्हीही बाजूंनी काही ना काही दोष असतात आणि मग त्याचे पर्यवसान हे विसंवादामध्ये होत असते.

तुमच्या बाजूचा विचार करता… इतरांचे अतिशय कठोर मूल्यमापन करण्याची तुमची प्रवृत्ती आहे. तुम्ही इतरांचे दोष, उणिवा, त्यांची दुबळी बाजू पाहण्यात जेवढे तत्पर असता, तेवढ्या त्यांच्या चांगल्या बाजू पाहण्याबाबत तत्पर नसता आणि त्यांच्या दोषांवर मात्र जास्त भर देता. तुमची ही प्रवृत्ती कर्मव्यवहार करताना, इतरांबद्दल जो एक सहृदयतेचा दृष्टिकोन असणे आवश्यक असतो तो बाळगण्यापासून तुम्हाला अटकाव करते आणि त्यामुळे तुम्ही कठोर आणि छिद्रान्वेषी दृष्टीचे आहात असे मत तुमच्याविषयी तयार होते. आणि त्यामुळे, तुम्हाला विरोध करण्याची आणि तुमच्या विरोधात बंड करण्याची वृत्ती इतरांमध्ये निर्माण होते. वास्तविक तसे त्यांच्या मनातदेखील नसते पण त्यांच्या अवचेतनेच्या (subconscient) माध्यमातून तशी कृती घडून येते आणि मग सर्व प्रकारची विसंवादी स्पंदनं निर्माण होत राहतात.

इतरांमध्ये काय चांगले आहे त्यावरच नेहमी आपले लक्ष केंद्रित करून, त्याचा (कार्यासाठी) उपयोग करून घ्यायचा आणि त्यांच्या चुका, त्यांचे दोष आणि त्यांच्या उणिवा कौशल्याने हाताळायच्या हा उत्तम मार्ग असतो. यासाठी ठामपणा आणि शिस्तीच्या पालनात कसूर करण्याची गरज नसते. तसेच जेथे आवश्यक आहे तेथे कठोरपणानेही वागता आले पाहिजे. परंतु हा कठोरपणा क्वचितच असला पाहिजे आणि तो तुमचा स्थायी भाव आहे असा इतरांचा समज होता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 279-280)

साधना, योग आणि रूपांतरण – १४०

मी तुम्हाला ही गोष्ट यापूर्वीदेखील सांगितलेली आहे की, कोणतेही काम असो, अभ्यास असो किंवा योगामधील आंतरिक प्रगती असो, या सर्व बाबतीत, तुम्हाला जर परिपूर्णत्व हवे असेल तर त्यासाठी एकच समान गोष्ट आवश्यक असते आणि ती म्हणजे, मनाची अविचलता (quietude), ‘दिव्य शक्ती’विषयी जागरुकता, तिच्याप्रति उन्मुखता आणि तिला तुमच्यामध्ये कार्य करण्यास दिलेला वाव.

परिपूर्णत्वाचे ध्येय बाळगणे हे योग्य आहे, मात्र (ते प्राप्त व्हावे म्हणून) मन अस्वस्थ राहणे हा काही ते ध्येय प्राप्त करण्याचा मार्ग असू शकत नाही. सतत तुमच्या अपूर्णतेचा विचार करत राहणे आणि काय करू, कसे करू हा विचार सतत करत बसणे हा देखील त्याचा मार्ग नाही. अविचल, स्वस्थ राहा, स्वतःला खुले करा, आणि चेतनेच्या विकसनाला वाव द्या, ‘दिव्य शक्ती’ने तुमच्यामध्ये कार्य करावे यासाठी तिला आवाहन करा. जसजशी ही प्रक्रिया वाढत राहील आणि ती ‘दिव्य शक्ती’ तुमच्यामध्ये कार्य करू लागेल, तेव्हा तुम्हाला केवळ तुमच्या अपूर्णतेचीच जाणीव होईल असे नाही तर, त्या अपूर्णतेमधून बाहेर काढणाऱ्या प्रक्रियेची जाणीव देखील तुम्हाला होईल. तसे झाले की मग, तुम्ही फक्त त्या प्रक्रियेचे अनुसरण करायचे आहे. (अर्थात हे सारे एका झटक्यात होईल असे नव्हे, तर हे टप्प्याटप्प्याने घडून येईल.)

तुम्ही जर अति-दीर्घकाळ किंवा अस्वस्थपणे एखादे काम करून, स्वतःला शिणवलेत तर त्यामुळे तुमची मज्जातंतूगत प्रणाली विचलित होते आणि दुर्बल होते. त्याचबरोबर तुमची प्राणिक-शारीरिक प्रणालीसुद्धा दुर्बल होते आणि मग ती स्वतःला चुकीच्या शक्तींच्या कृतीच्या हाती सोपविते. स्थिर-सातत्यपूर्ण प्रगती करायची असेल तर शांतपणे कार्यरत रहाणे हा योग्य मार्ग आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 143)