साधना, योग आणि रूपांतरण – ८७

(बाह्यवर्ती चेतना आणि आंतरिक अस्तित्व यांच्यामधील अडथळा भेदला गेला की काय होते याचा काहीसा विचार आपण कालच्या भागात केला.)

कोणत्या न् कोणत्या पद्धतीने एकदा का तो अडथळा मोडून पडला की मग तुम्हाला असे आढळू लागते की, योगासाठी आवश्यक असणाऱ्या प्रक्रिया आणि गतिविधी या गोष्टी तुमच्या बाह्य मनाला जितक्या कठीण किंवा अशक्यप्राय वाटत होत्या तेवढ्या त्या कठीण नाहीत. त्या तुमच्या आवाक्यातील आहेत. तुमच्या आंतरतम चैत्य पुरुषामध्ये अगोदरपासूनच एक योगी आणि एक भक्त अस्तित्वात आहे आणि तो जर पूर्णपणे उदयाला आला आणि त्याने पुढाकार घेतला तर, तुमच्या बाह्य जीवनाला आध्यात्मिक वळण लागणे हे पूर्वनियोजित आणि अपरिहार्य आहे.

प्रारंभापासूनच जे साधक यशस्वी होतात त्यांच्याबाबतीत योगमय आणि आध्यात्मिक अशा सखोल आंतरिक जीवनाची घडण आधीपासूनच झालेली असते. एवढेच की, त्यांच्या विचारी मनाला आणि कनिष्ठ प्राणिक भागांना शिक्षण आणि गतकालीन कृतींमुळे बलशाली बाह्य वळण दिले गेलेले असते आणि त्यामुळे त्यांचे आंतरिक जीवन पडद्याआड गेलेले असते. मनाला लागलेल्या बाह्यवर्ती वळणामध्ये सुधारणा घडविणे आणि तो पडदा भेदणे यासाठीच त्या साधकाला परिश्रमपूर्वक योगसाधना करण्याची आवश्यकता असते.

एकदा हा आंतरिक पुरुष प्रभावीपणे आविष्कृत झाला, भले मग तो अंतराभिमुख जाण्याने असेल किंवा बाह्याभिमुख येण्याने असेल, त्याचा दबाव पुन्हा प्रस्थापित होणार आणि मार्ग मोकळा होऊन तो त्याचे साम्राज्य पुन्हा प्रस्थापित करणार हे निश्चित! आत्ता जे घडते आहे ते, येथून पुढे मोठ्या प्रमाणावर जे घडणार आहे त्याची नांदी आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 218-219)

श्रीअरविंद