साधना, योग आणि रूपांतरण – ७९

साधक : बाह्यवर्ती घटकांमध्ये (मन, प्राण आणि शरीर) परिवर्तन होण्यासाठी आंतरिक साक्षात्कार आणि अनुभव यांचे साहाय्य होते का ?

श्रीमाताजी : साहाय्य झालेच पाहिजे असे काही आवश्यक नाही. त्यांचे साहाय्य व्हावे अशी तुमची इच्छा असेल तरच साहाय्य होईल. अन्यथा, व्यक्ती बाह्यवर्ती प्रकृतीपासून स्वतःला अधिकाधिक अलिप्त करत नेते. मुमुक्षू (मुक्तीची आस असलेल्या) लोकांबाबत नेहमीच असे घडत असते. बाह्य प्रकृती, तिचे स्वरूप आणि तिच्या सवयी या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्यामध्ये व्यक्तीने गुंतून पडता कामा नये अशा काहीतरी पूर्णपणे तिरस्करणीय गोष्टी आहेत, असे समजून ते त्या गोष्टी नाकारतात. त्यांच्या सर्व ऊर्जा, चेतनेच्या सर्व शक्ती (बाह्यवर्ती प्रकृतीमधून) काढून घेतात आणि उच्चतेप्रत वळवितात. आणि त्यांना हे जर पुरेशा पूर्णत्वाने साध्य करता आले तर सहसा ते कायमसाठी स्वतःच्या देहाचा त्याग करतात.

परंतु अशा उदाहरणांमध्ये, पुष्कळ वेळा असे आढळते की, ही गोष्ट ते आंशिकरितीनेच करतात आणि जेव्हा ते त्यांच्या ध्यानामधून, त्यांच्या निदिध्यासनामधून किंवा त्यांच्या समाधी अवस्थेमधून बाहेर येतात तेव्हा ते बहुधा इतरांपेक्षाही अधिक वाईट ठरतात कारण त्यांनी त्यांच्या बाह्यवर्ती प्रकृतीवर (परिवर्तनाचे) कोणतेही परिश्रम न घेता तिला आहे त्याच परिस्थितीत बाजूला सारलेले असते.

अगदी सामान्य माणसांच्या बाबतीत सुद्धा असे आढळते की, जर त्यांच्यातील दोष, दुर्गुण अगदी ठळकपणे नजरेत भरत असतील तर, जीवनामध्ये त्यामुळे फार त्रास होऊ नये म्हणून, ती माणसं त्या दोषांमध्ये सुधारणा करण्याचा किंवा त्यांच्यावर थोडे का होईना पण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. (आणि या मुमुक्षू मंडळींच्या बाबतीत काय परिस्थिती असते?) व्यक्तीने आपले शरीर आणि आपली बाह्यवर्ती चेतना ही पूर्णपणे सोडली पाहिजे आणि संपूर्णपणे ”आध्यात्मिक उंची”प्रत स्वतःला नेले पाहिजे, हाच योग्य दृष्टिकोन आहे, अशी ज्यांची समजूत असते अशी माणसं शरीराला आणि बाह्यवर्ती प्रकृतीला एखादा जुना कपडा असावा त्याप्रमाणे टाकून देतात आणि त्यामध्ये सुधारणा करत नाहीत आणि मग जेव्हा तो कपडा पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो वापरण्याजोगा राहिलेला नसतो. त्याचा काहीही उपयोग होत नाही. परंतु परिवर्तन घडवावे अशी तुमच्यापाशी जर प्रामाणिक इच्छा असेल तरच आंतरिक अनुभव आणि साक्षात्कार यांचे साहाय्य होते.

तुमच्यापाशी परिवर्तन करण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर मग मात्र त्याचे खूप साहाय्य होते कारण परिवर्तन घडवून आणण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती त्यातून तुम्हाला मिळते, परिवर्तनासाठी आवश्यक असा आधार त्यातून तुम्हाला मिळतो. परंतु तुम्हाला परिवर्तन करण्याची खरोखरच प्रामाणिक इच्छा असली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 04 : 348-349)

श्रीमाताजी