साधना, योग आणि रूपांतरण – ६४

भौतिक मनाच्या (physical mind) गोंगाटाला, तुम्ही अस्वस्थ न होता, अविचलपणे नकार दिला पाहिजे. इथपर्यंत नकार दिला पाहिजे की तो (गोंगाट) नाउमेद होऊन जाईल आणि मान हलवत निघून जाईल आणि म्हणेल, “छे! हा माणूस फारच शांतचित्त आणि कणखर आहे.”

नेहमीच अशा दोन गोष्टी असतात की ज्या वर उफाळून येतात आणि तुमच्या शांत अवस्थेवर हल्ला चढवितात. प्राणाकडून आलेल्या सूचना आणि भौतिक मनाची यांत्रिक पुनरावृत्ती या त्या दोन्ही गोष्टी असतात. दोन्ही बाबतीत शांतपणे नकार देत राहणे हाच उपाय असतो.

अंतरंगात असणारा पुरुष हा प्रकृतीला आदेश देऊ शकतो आणि तिने काय स्वीकारावे किंवा काय नाकारावे हे तिला सांगू शकतो. मात्र त्याची इच्छा ही शक्तिशाली, अविचल इच्छा असते; तुम्ही जर अडचणींमुळे अस्वस्थ झालात किंवा क्षुब्ध झालात तर एरवी त्या ‘पुरुषा’ची इच्छा जितकी परिणामकारक रीतीने कार्य करू शकली असती तितकी परिणामकारक रीतीने (तुम्ही अस्वस्थ किंवा क्षुब्ध असताना) ती कार्य करू शकत नाही.

उच्चतर चेतना ही प्राणामध्ये पूर्णपणे उतरली असताना कदाचित सक्रिय साक्षात्कार (dynamic realisation) होऊ शकेल. उच्चतर चेतना जेव्हा मनामध्ये उतरते तेव्हा ती आपल्याबरोबर ‘पुरुषा’ची शांती आणि मुक्ती तसेच ज्ञानसुद्धा घेऊन येते. ती जेव्हा प्राणामध्ये उतरते तेव्हा सक्रिय साक्षात्कार वर्तमानात प्रत्यक्षात होऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 304-305)

श्रीअरविंद