साधना, योग आणि रूपांतरण – ५६
ध्यानाला बसल्यावर मनामध्ये सर्व प्रकारचे विचार येऊन गर्दी करतात, ही जर तुमची अडचण असेल तर ती अडचण विरोधी शक्तींमुळे येत नाही, तर मानवी मनाच्या सर्वसाधारण प्रकृतीमुळे ती अडचण येते. सर्वच साधकांना ही अडचण येते आणि काहींच्या बाबतीत तर ती खूप दीर्घ काळपर्यंत टिकून राहते. त्यापासून सुटका करून घेण्याचे अनेक मार्ग आहेत. मनात जे विचार येतात त्यांच्याकडे पाहायचे, ते मानवी मनाच्या प्रकृतीचे जे दर्शन घडवीत असतात ते काय आहे याचे निरीक्षण करायचे पण त्या विचारांना कोणतीही अनुमती द्यायची नाही आणि ते अगदी निःस्तब्ध होत नाहीत तोवर त्यांना तसेच प्रवाहित होत राहू द्यायचे, हा एक मार्ग आहे. विवेकानंदांनी त्यांच्या ‘राजयोगा’मध्ये याच मार्गाची शिफारस केली आहे.
दुसरा मार्ग असा की, विचारांकडे ते आपले विचार आहेत असे समजून पाहायचे नाही, तर साक्षी पुरुषाप्रमाणे त्यांच्याकडे अलिप्त राहून पाहायचे आणि त्यांना अनुमती द्यायची नाही. हे विचार म्हणजे जणू काही बाहेरून, प्रकृतीकडून येणाऱ्या गोष्टी आहेत असे समजून त्यांच्याकडे पाहायचे. मनाचा प्रदेश ओलांडून पलीकडे जाणाऱ्या वाटसरूंप्रमाणे ते विचार आहेत अशी जाणीव मात्र तुम्हाला अवश्य झाली पाहिजे. ज्यांच्याशी तुमचा कोणताही संबंध असत नाही आणि ज्यांच्यामध्ये तुम्ही स्वारस्यही दाखवीत नाही अशा वाटसरुंप्रमाणे ते आहेत अशा रीतीने तुम्ही त्यांच्याकडे पाहिले पाहिजे.
अशा प्रकारे या मार्गाचा अवलंब केला असता, सहसा असे घडते की, कालांतराने मन दोन गोष्टींमध्ये विभागले जाते. मनाचा एक भाग म्हणजे प्रकृतीचा जो भाग असतो आणि जो निरीक्षणाचा विषय असतो, त्यामध्ये विचार इतस्ततः ये-जा करत असतात, भरकटत असतात. आणि दुसरा भाग, मनोमय साक्षी होऊन पाहत राहतो आणि तो पूर्णपणे अविचल व शांत असतो. कालांतराने मग तुम्ही निश्चल-नीरवतेकडे (silence) प्रगत होऊ शकता किंवा प्रकृतीच्या त्या भागालासुद्धा अविचल (quiet) करू शकता.
आणखी एक तिसरी पद्धतदेखील आहे. ती सक्रिय पद्धत आहे. यामध्ये विचार कोठून येत आहेत ते तुम्ही पाहायला सुरुवात करता आणि तुम्हाला असे आढळते की, ते विचार तुमच्यामधून येत नाहीयेत तर, ते विचार बाहेरून तुमच्या मस्तकामध्ये प्रवेश करत आहेत. अशा वेळी, म्हणजे तुम्हाला ते विचार आत येत असल्याचे लक्षात आले तर, त्यांनी आत प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना पूर्णपणे बाजूला फेकून दिले पाहिजे.
कदाचित हा सर्वात कठीण मार्ग आहे आणि सर्वच त्याचा अवलंब करू शकतील असे नाही. पण जर या मार्गाचा अवलंब करता आला तर निश्चल-नीरवतेकडे घेऊन जाणारा तो सर्वात नजीकचा आणि परिणामकारक मार्ग आहे.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 301-302)
साधना, योग आणि रूपांतरण – २२६ व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन…
साधना, योग आणि रूपांतरण – २२५ साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२४ अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२३ (‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला…
साधना, योग आणि रूपांतरण – २२२ आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व…
साधना, योग आणि रूपांतरण – २२१ उत्तरार्ध चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला…