साधना, योग आणि रूपांतरण – २४

साधक : मी प्रार्थना आणि ध्यान करायला अगदी तळमळीने सुरुवात करतो; सुरुवातीला माझी आस उत्कट असते; माझी प्रार्थना भावपूर्ण असते आणि नंतर, काही काळानंतर मात्र ती आस यांत्रिक बनते आणि प्रार्थना नुसती शाब्दिक होते; अशा वेळी मी काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : हे काही तुमच्याच बाबतीत घडते असे नाही; हे अगदी स्वाभाविक आहे. मी तुम्हाला अनेकदा सांगितले आहे, पण आता ओघात आलेच आहे तर, परत एकदा सांगते, जे लोक असा दावा करतात की, ते दररोज काही तास ध्यान करतात आणि त्यांचा सर्व दिवस ते प्रार्थनेमध्ये व्यतीत करतात, माझ्या मते, त्यांचा त्यातील तीन-चतुर्थांश वेळ हा पूर्णत: यांत्रिकपणे जात असणार म्हणजे त्यावेळी त्यामधील सर्व मन:पूर्वकता गमावलेली असते…

…एकाग्रता आणि ध्यान करण्यासाठी, ज्याला मी एकाग्रतेसाठी ‘मानसिक स्नायुंची घडण’ असे म्हणते तो व्यायाम तुम्ही केला पाहिजे. ज्याप्रमाणे व्यक्ती वजन उचलण्यासाठी स्नायुंचे व्यायाम करते तसेच प्रयत्न तुम्ही एकाग्रतेसाठी केले पाहिजेत. एकाग्रता अगदी मन:पूर्वक व्हावी, ती कृत्रिम असू नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही त्यासाठी खरोखरीचा प्रयत्न केला पाहिजे.

…हे उघडच आहे की, ज्याला एकाग्रता करण्याची अजिबात सवय नाही, त्याच्यापेक्षा ज्या व्यक्तीला त्याची सवय आहे ती व्यक्ती जास्त काळ एकाग्रता साधू शकेल.

…ध्यानाच्या कालावधीला तितकेसे काही महत्त्व नाही; त्याच्या कालावधीवरून तुम्ही ध्यानाला किती रुळलेला आहात एवढेच काय ते लक्षात येते. अर्थातच, हा कालावधी खूप वाढवता देखील येऊ शकतो पण त्यालाही काही मर्यादा असते आणि व्यक्ती जेव्हा त्या मर्यादेपर्यंत जाऊन पोहोचते तेव्हा तिने थांबले पाहिजे, इतकेच. ती अप्रामाणिकता नसते तर, ती अक्षमता असते.

…(मात्र जेव्हा) तुम्ही ध्यान करत नसता पण ध्यान करत आहात असे भासवता तेव्हा, ती अप्रामाणिकता ठरते. तेव्हा मग ते ध्यान असत नाही, तर तो केवळ एक उपचार असतो.

– श्रीमाताजी (CWM 08 : 227-228)

साधना, योग आणि रूपांतरण – २३ (उत्तरार्ध)

(श्रीमाताजी ध्यानाचे काही प्रकार येथे सांगत आहेत. काल त्यातील अंशभाग आपण पाहिला.)

काही जण त्यांच्या डोक्यातील सर्व मानसिक आंदोलने, कल्पना, प्रतिक्षिप्त क्रिया, प्रतिक्रिया हटविण्यासाठी व एका खरोखर शांत प्रशांत स्थितीप्रत पोहोचण्यासाठी धडपडत असतात. हे अतिशय कठीण असते. अशाही काही व्यक्ती आहेत की ज्यांनी पंचवीस-पंचवीस वर्षे प्रयत्न केले होते पण त्यांना यश आले नाही, कारण असे करू पाहणे म्हणजे बैलाची शिंगे पकडून त्याच्या आधारे बैलाला पकडण्यासारखे आहे.

आणखी एक अशा प्रकारचे ध्यान असते, ज्या ध्यानामध्ये व्यक्ती कोणत्याही विचारांना थांबविण्याचा प्रयत्न करत नाही, पण शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करते. कारण जे विचार निव्वळ यांत्रिक स्वरूपाचे असतात, ते तुम्ही थांबविण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला अनेक वर्षे लागतील, आणि तरीसुद्धा तुम्हाला परिणामाची खात्री देता येणार नाही. म्हणून विचार थांबविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, (अशा प्रकारच्या ध्यानामध्ये) तुम्ही तुमची सर्व चेतना एकवटून, शक्य तितके शांत स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला बाह्य गोष्टींमध्ये आता स्वारस्य उरलेले नसल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला अलिप्त करा, आणि मग अचानक, तुमच्यामध्ये अभीप्सेची ज्योत प्रज्वलित होईल. (ध्यानामध्ये) तुमच्यापाशी जे जे काही येते ते ते सारे तुम्ही या अभीप्सारूपी अग्नीमध्ये हवन करा, ज्यामुळे ती ज्वाला अधिकाधिक उच्च, उच्चतर होत जाईल. तुम्ही त्या अभीप्सारूपी ज्वालेशी एकात्म व्हा आणि उर्ध्वगामी होत, तुम्ही तुमच्या चेतनेच्या आणि अभीप्सेच्या सर्वोच्च बिंदुपाशी जाऊन पोहोचा. अन्य कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका. ही अभीप्सा वर वर उसळत राहते, ऊर्ध्वगामी होत राहते, ती परिणामाचा किंचितही विचार करत नाही, परिणाम काय होईल किंवा विशेषतः काय होणार नाही याचा क्षणमात्रदेखील ती विचार करत नाही. एवढेच नव्हे तर, वरून काही अवतरित व्हावे अशी इच्छादेखील ती बाळगत नाही तर इथे केवळ, ऊर्ध्वगामी होत राहणाऱ्या अभीप्सेचा आनंद तेवढा असतो…

सातत्याने केलेल्या एकाग्रतेमुळे ती अभीप्सा अधिकाधिक उत्कट होत राहते. आणि अशा वेळी मी तुम्हाला खात्री देऊ शकते की जे काही घडेल ते, सर्वोत्तम शक्य असेल तेच घडेल. म्हणजे असे की, तुम्ही जेव्हा हे सारे करता तेव्हा, तुमच्या क्षमता साकार होण्याची ती परम सीमा असते. या क्षमता प्रत्येक व्यक्तिगणिक भिन्नभिन्न असू शकतात.

पण तुम्ही असे केलेत म्हणजे मग, शांत राहण्याचा प्रयत्न करणे, दृश्य रूपांच्या मागे जाण्याचा प्रयास करणे, प्रतिसाद देणाऱ्या शक्तीला आवाहन करणे, तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळावे म्हणून खोळंबून राहणे, या साऱ्या गोष्टींबाबतच्या चिंता, आभासी असणाऱ्या वाफेप्रमाणे नाहीशा होऊन जातात. तुम्ही या अभीप्सारूपी ज्वालेमध्ये, या ऊर्ध्वगामी झालेल्या अभीप्सेच्या स्तंभामध्ये, जाणीवपूर्वक, सचेतरीतीने जीवन जगण्यात यशस्वी झालात तर याचा परिणाम – अगदी त्वरित जरी आढळून आला नाही तरी, – कालांतराने नक्कीच घडून येणार आहे, हे तुमच्या लक्षात येईल.

– श्रीमाताजी (CWM 04 : 104-105)

साधना, योग आणि रूपांतरण – २२ (पूर्वार्ध)

एका कोपऱ्यात बसून ध्यान करण्याची क्षमता असणे ही आध्यात्मिक जीवनाची खूण आहे, असे काही जणांना वाटते. ही अगदी सार्वत्रिक कल्पना आहे. मला टिका करायची नाहीये पण, जे लोक त्यांच्या ध्यान करण्याच्या क्षमतेचे मोठे अवडंबर माजवतात त्यांच्यापैकी बहुतांश जण, तासभराच्या ध्यानाच्या बैठकीमध्ये एक मिनिटसुद्धा खऱ्या अर्थाने ध्यानस्थ होत नाहीत.

जे खऱ्या अर्थाने ध्यान करत असतात ते त्याची कधीही वाच्यता करत नाहीत, कारण त्यांच्यासाठी ती अगदी स्वाभाविक गोष्ट असते. तुम्हाला जेव्हा ध्यानाची मातब्बरी वाटत नाही आणि तुमच्यासाठी ती एक अतिशय स्वाभाविक अशी गोष्ट होते, तेव्हा तुम्ही प्रगती करत आहात, असे तुम्ही स्वत:ला सांगू शकता. जे लोक ध्यानाविषयी बोलत राहतात आणि ते ध्यान करतात म्हणून स्वतःला इतरांपेक्षा अधिक श्रेष्ठ समजू लागतात, तेव्हा तुम्ही निश्चित समजा की, ते (ध्यानाच्या वेळी) बहुतांश वेळा पूर्णपणे जडतेच्या स्थितीमध्ये असतात.

ध्यान करणे अतिशय कठीण असते. ध्यानाचे अनेक प्रकार असतात… तुम्ही एक कल्पना करू शकता आणि त्या कल्पनेचा मागोवा घेतघेत एका निष्कर्षाप्रत येऊन पोहोचता, हे ‘सक्रिय ध्यान’ असते; ज्यांना एखादी समस्या सोडवायची असते किंवा ज्यांना काही लिखाण करायचे असते, तेव्हा त्यांच्या नकळतपणे ते अशा प्रकारचे ध्यान करत असतात.

काहीजण ध्यानाला बसतात आणि एखाद्या कल्पनेचा मागोवा घेण्याऐवजी ते कोणत्यातरी एखाद्या गोष्टीवर लक्ष एकाग्र करतात — स्वतःची एकाग्रताशक्ती अधिक तीव्र करण्यासाठी एखाद्या बिंदुवर लक्ष केंद्रित करतात. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या बिंदुवर लक्ष एकाग्र करता तेव्हा सहसा पुढील गोष्टी घडून येतात : एखाद्या बिंदुवर – मग तो बिंदू मानसिक असो, प्राणिक असो किंवा भौतिक असो – जर तुम्ही तुमची एकाग्रतेची क्षमता पुरेशी एकवटण्यामध्ये यशस्वी झालात तर, तुम्ही एका विशिष्ट क्षणी त्या बिंदुतून आरपार जाता आणि एका वेगळ्या चेतनेमध्ये प्रवेश करता. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 04 : 103-104)

साधना, योग आणि रूपांतरण – २१ (भाग ०५)

(‘ध्यान’ आणि ‘कर्म’ या दोन्ही गोष्टींसंबंधीचे विचार आपण कालच्या भागामध्ये लक्षात घेतले. परिणामकारकतेच्या दृष्टीने, ‘ध्याना’पेक्षा ‘योग्य रीतीने केलेले कर्म’ हे अधिक सरस असते, असा श्रीमाताजींचा अभिप्राय असल्याचे येथे साधकाच्या लक्षात आले. तेव्हा त्याच्या मनात ध्यानाच्या उपयुक्ततेविषयीच साशंकता निर्माण झाली. ती त्याने श्रीमाताजींपाशी मोकळेपणाने व्यक्त केली आहे.)

साधक : तर मग ध्यानाचा काहीच उपयोग नाही का?

श्रीमाताजी : नाही, तसे नाही, पण जोपर्यंत ते आवश्यक असेल तोवर ते अगदी उत्स्फूर्तपणे, सहजपणे होत राहील. अचानकपणे, एखाद्या गोष्टीकडून (उच्चतर दिव्य शक्तीकडून) तुमचा ताबा घेतला जाईल आणि त्यामुळे तुम्ही अगदी निश्चल होऊन जाल, तेव्हा तुम्हाला एखाद्या संकल्पनेच्या दर्शनावर किंवा एखाद्या मानसिक अवस्थेवर लक्ष एकाग्र करायला प्रवृत्त केले जाईल. ती गोष्ट तुमचा ताबा घेईल, तेव्हा मात्र तुम्ही तिला विरोध करता कामा नये. मग तुम्ही आवश्यक ती प्रगती साध्य करून घ्याल. आणि अशा एखाद्या अवचित क्षणी तुम्हाला असे आढळते की, तुम्हाला काहीतरी उमगले आहे आणि तुम्हाला जे आंतरिकरित्या काहीतरी गवसले आहे त्यानिशी पुन्हा अगदी पुढच्या क्षणीच तुम्ही तुमचे काम करू लागाल, परंतु त्यामध्ये कोणताही आविर्भाव, कोणतेही ढोंग नसेल.

जे ध्यानाला बसतात आणि आपण कोणीतरी असामान्य व्यक्ती आहोत असा स्वतःविषयी ग्रह करून घेतात त्यांची मला सर्वात जास्त चिंता वाटते. सर्व गोष्टींमध्ये ही गोष्ट सर्वात जास्त धोकादायक असते कारण ते लोक आत्मसंतुष्टीने इतके भरून जातात आणि विफल बनतात की, ते अशा प्रकारे प्रगतीचे सर्व मार्गच बंद करून टाकतात.

– श्रीमाताजी (CWM 05 : 44)

साधना, योग आणि रूपांतरण – २० (भाग ०४)

माझ्या दृष्टीने, माझ्या अनुभवाच्या आधारे सांगायचे तर (आणि माझा अनुभव पुरेसा दीर्घ आहे, कारण गेली सुमारे तेहतीस वर्षे मी विविध लोकांच्या संपर्कात आहे; त्यांचे प्रश्न, त्यांची योगसाधना, त्यांचे आंतरिक प्रयत्न मला माहीत आहेत; मी येथेही आणि इतरत्र, जगभरामध्ये सर्वत्र ते प्रश्न हाताळले आहेत.) मला असे वाटते की, ध्यानाद्वारे तुम्ही स्वतःमध्ये रूपांतर घडवून आणू शकत नाही… उलटपक्षी, (कर्माबाबत) मात्र मला अगदी खात्रीच आहे.

तुम्हाला जे कर्म करणेच भाग आहे, मग ते कर्म कोणतेही असो, ते जर तुम्ही केलेत आणि ते करत असताना ‘ईश्वरा’चे विस्मरण होऊ नये म्हणून काळजी घेतलीत, सतर्क राहिलात; तुम्ही जे काही कर्म केले असेल ते ‘ईश्वरा’र्पण केलेत आणि ‘ईश्वरा’ने तुमच्या प्रतिक्रियांमध्ये परिवर्तन घडवून आणावे म्हणून तुम्ही स्वतःचे आत्मदान केलेत; तुमच्या प्रतिक्रिया स्वार्थी, क्षुल्लक, मूर्ख आणि अज्ञ असण्याऐवजी तुम्ही त्या तेजोमय, उदार अशा बनविल्यात तर, (तुम्ही जर अशा रीतीने वागलात तर) तुम्ही प्रगती कराल. याप्रकारे, तुम्ही केवळ स्वतःचीच प्रगती केलेली असते असे नाही, तर तुम्ही सार्वत्रिक प्रगतीला देखील हातभार लावलेला असतो.

कमीअधिक प्रमाणात रिक्त, पोकळ ध्यान करण्यासाठी ज्यांनी सर्वसंगपरित्याग केला आहे, ध्यान करत बसले आहेत आणि त्यांनी बरीच प्रगती केली आहे, असे मला आढळले नाही; किंवा त्यांनी काही प्रगती केली असेलच तर ती अगदीच किरकोळ होती.

उलट, मी अशीही काही माणसं बघितली आहेत की, आपण योगसाधना करत आहोत असा त्यांच्यामध्ये कोणताही आविर्भाव नव्हता, परंतु ते, या पृथ्वीचे रूपांतरण करण्याच्या उत्साहाने आणि ‘ईश्वरा’चे या जगामध्ये अवतरण होणार या संकल्पनेमुळे उत्साहाने भारलेले होते आणि त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेले जे काही छोटेमोठे कार्य होते ते हृदयापासून, उत्साहाने, स्वतःमध्ये जे काही आहे ते, हातचे काहीही राखून न ठेवता, संपूर्णपणे झोकून देऊन केले होते. त्या पाठीमागे वैयक्तिक मुक्तीची कोणतीही स्वार्थी संकल्पना नव्हती, अशा लोकांनी उत्कृष्ट प्रगती, खरोखरच उत्कृष्ट प्रगती केलेली मी पाहिली आहे. आणि कधीकधी खरोखरच अशी माणसं अद्भुत असतात.

मी संन्यासी पाहिले आहेत, मठांमध्ये राहणारे लोक पाहिले आहेत, जे स्वतःला योगी म्हणवून घेतात अशी माणसंही मी पाहिली आहेत. पण अशी बारा माणसं आणि (वर सांगितल्याप्रमाणे,) उत्कृष्ट कार्य करणारी एक व्यक्ती यांची बरोबरीच होऊ शकत नाही. (म्हणजे मी हे, पृथ्वीच्या रूपांतरणाच्या आणि जगाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून बोलत आहे. म्हणजे आपण जे करू इच्छित आहोत, हे जग जसे आत्ता आहे ते तसेच राहू नये आणि ते खऱ्या अर्थाने, दिव्य चेतनेनिशी ‘ईश्वरी’ संकल्पाचे साधन बनावे या दृष्टिकोनातून मी हे म्हणत आहे.) या जगापासून दूर पलायन करून तुम्ही या जगामध्ये परिवर्तन घडवू शकणार नाही. तर इथेच राहून, विनम्रपणे, विनयाने परंतु हृदयामध्ये अर्पण भाव जागता ठेवून ते शक्य होईल. (क्रमशः)

– श्रीमाताजी (CWM 05 : 43-44)

साधना, योग आणि रूपांतरण – १९ (भाग ०३)

ध्यान कसे करायचे असते हे ज्यांना माहीत असते अशी माणसं थोडी असतात. आणि आपण असे मानूया की, पुष्कळशी साधना आणि अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर तुम्ही ध्यानधारणेमध्ये ‘ईश्वराच्या अस्तित्वा’शी सजगपणे संबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी झाला आहात. …आणि त्याचा तुमच्या चारित्र्यावर आणि तुमच्या जीवनावर अनिवार्यपणे प्रभाव पडला आहे, असेही आपण मानूया. परंतु हा प्रभाव व्यक्तिगणिक अगदी भिन्नभिन्न असतो.

अशीही काही उदाहरणं असतात की ज्यामध्ये व्यक्ती ही जणू दोन भागांमध्ये विभागल्यासारखी होते. ही अशी स्थिती असते की जेव्हा अशा प्रकारची माणसं ध्यानावस्थेमध्ये ‘ईश्वरा’च्या संपर्कामध्ये येतात आणि त्यांना सायुज्याचा परमानंद अनुभवास येतो परंतु एकदा का ती माणसं ध्यानामधून बाहेर आली आणि पुन्हा सामान्य जीवन जगू लागली, जीवनव्यवहार करू लागली की तीच माणसं अगदी अतिसामान्य बनून जातात आणि कधीकधी तर त्यांच्या प्रतिक्रिया या अत्यंत असभ्य असतात.

खरोखरच, मला अशी माणसं माहीत आहेत की जी अगदी अतिसामान्य होऊन जायची आणि मग करू नये त्या गोष्टी करत राहायची. उदाहरणार्थ, त्यांचा वेळ ते इतरांविषयी कुचाळक्या (gossiping) करण्यात घालवयाचे, फक्त स्वतःचाच स्वार्थीपणाने विचार करायचे, त्यांच्या सर्व प्रतिक्रिया स्वार्थमूलक असायच्या आणि त्यांच्या क्षुल्लक व्यक्तिगत स्वार्थासाठी ते त्यांच्या जीवनाचे व्यवस्थापन करू इच्छित असत. ते कधीच कुणाचाही विचार करायचे नाहीत किंवा ते कधीही कोणासाठी काहीही करायचे नाहीत, कोणती एखादी मोठी कल्पना त्यांच्या मनाला शिवतही नसे. आणि असे असून, ध्यानामध्ये मात्र त्यांचा ‘ईश्वरा’शी संपर्क झालेला असायचा!

आणि म्हणून ही सामान्य बाह्यवर्ती प्रकृती, की जी व्यक्तीने स्वतःच्या शरीरासोबतच अंगीकृत केलेली असते, तिच्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे किती कठीण आहे, स्वतःच्या अतीत जाणे किती अवघड आहे, स्वतःच्या प्रवृत्तीमध्ये रूपांतरण घडविणे किती अवघड आहे याचा शोध ज्यांना लागलेला असतो ते म्हणतात, “हे (असे परिवर्तन घडविणे) शक्यच नाही; तेव्हा त्यासाठी उगीच प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही. या जगामध्ये येताना आपण एक धूळमाखले शरीर धारण केले आहे, ते आपण झटकून टाकले पाहिजे आणि त्यापासून दूर जाण्यासाठी तयार झाले पाहिजे. हे जग आहे तसेच सोडून दिले पाहिजे, आणि करण्यासारखी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे शक्य तितक्या लवकर आपण पलायन केले पाहिजे आणि जर प्रत्येकजणच अशा रीतीने पळून गेला तर मग हे जगच शिल्लक राहणार नाही आणि त्यामुळे कोणते दुःखही राहणार नाही.” तर्कसंगत आहे त्यांचे हे विधान!

परंतु त्यांना जर असे सांगण्यात आले की, “इतरांना तसेच चाचपडत ठेवून स्वतः निघून जायचे? तुम्ही ही जी संकल्पना मांडली आहे ती तर अगदीच स्वार्थी आहे,” तर त्यावर त्यांचे असे उत्तर असते की, “मी जे करत आहे तेच इतरांनी केले पाहिजे. मी जे करत आहे तसेच जर प्रत्येकाने केले तर ते यातून बाहेर पडू शकतील आणि मग जगच शिल्लक उरणार नाही आणि पर्यायाने कोणतीही दुःखविवंचना राहणार नाही.”

जणूकाही हे सारे, त्या व्यक्तींच्या म्हणजे या जगाच्या निर्मितीमध्ये ज्यांचा काडीमात्र सहभाग नाही, अशा व्यक्तींच्या इच्छेवरच अवलंबून आहे! हे सारे थांबविण्याची आशा ते कशी बाळगू शकतात? किमान जर त्यांनी हे जग निर्माण केले असते, तर हे कसे निर्माण करायचे हे तरी त्यांना ज्ञात होऊ शकले असते आणि मग हे जग होत्याचे नव्हते करण्यासाठी अशा व्यक्ती प्रयत्न करू शकल्या असत्या. (अर्थात तुम्ही जे केलेले असते ते नाहीसे करणे नेहमीच सोपे असते असे नाही.) परंतु हे जग काही त्यांनी निर्माण केलेले नाही, हे जग निर्माण कसे झाले हेदेखील त्यांना ठाऊक नाही आणि ते पुन्हा पूर्ववत करायचे अशी त्यांची इच्छा आहे, कारण त्यांना असे वाटते की, ते स्वतः या जगापासून पळून दूर जाऊ शकतात…. परंतु हे शक्य आहे, असे मला तरी वाटत नाही. तुम्ही या जगापासून दूर पळायचा कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही पलायन करू शकत नाही. (क्रमशः)

– श्रीमाताजी (CWM 05 : 42-43)

साधना, योग आणि रूपांतरण – १८ (भाग ०२)

ध्यान करणाऱ्या काही लोकांपैकी काही जण असे असतात की ज्यांना खरोखर ध्यान कसे करायचे हे माहीत असते आणि ते कोणत्या एखाद्या संकल्पनेवर नाही तर, शांतीमध्ये, आंतरिक ध्यानामध्ये मन एकाग्र करत असत आणि त्याद्वारे ‘ईश्वरा’शी सायुज्य पावण्याच्या स्थितीपर्यंतसुद्धा ते जाऊन पोहोचत असत, असे त्यांचे म्हणणे असायचे आणि हे अगदी बरोबर आहे.

आणखीही काही जण असे असतात, अगदी थोडे जण, पण ते कोणत्यातरी एखाद्या संकल्पनेचे अगदी तंतोतंत अनुसरण करू शकतात आणि त्या संकल्पनेचा अर्थ काय तो नेमकेपणाने जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, हे सुद्धा योग्य आहे.

(पण) बऱ्याचवेळा लोक जेव्हा एकाग्रता साधायचा प्रयत्न करत असतात तेव्हा ते एक प्रकारच्या अर्धवट निद्रेमध्ये शिरतात आणि ती अत्यंत तामसिक स्थिती असते. ते जणूकाही एक प्रकारची जड, सुस्त गोष्ट बनून जातात, त्यांचे मन निष्क्रिय झालेले असते, भावना सुस्त झालेल्या असतात आणि शरीर अचल झालेले असते. अशा स्थितीत ते तास न् तास बसून राहू शकतात कारण आळशीपणा, जडता यांच्यापेक्षा अधिक टिकाऊ दुसरे काहीच नसते! मी हे आत्ता तुम्हाला जे काही सांगत आहे, ते अनुभवाच्या आधारे सांगत आहे; मी ज्यांना ज्यांना भेटले आहे अशा लोकांचे हे अनुभव आहेत. आणि अशी लोकं जेव्हा त्यांच्या ध्यानामधून बाहेर यायची, तेव्हा त्यांना खरोखरच प्रामाणिकपणे असे वाटायचे की त्यांनी काहीतरी फार मोठी गोष्ट केली आहे. परंतु ते फक्त जडत्व आणि अचेतनेमध्ये गेलेले असायचे. (क्रमशः)

– श्रीमाताजी (CWM 05 : 41-42)

साधना, योग आणि रूपांतरण – १७ (भाग ०१)

(श्रीअरविंद आश्रमामध्ये श्रीमाताजी साधकांसमवेत ध्यानाला बसत असत. त्यांचा हा उपक्रम अनेक वर्षे चालू होता. तेथे आणि इतरत्र जो अनुभव त्यांनी घेतलेला होता, त्या अनुभवाच्या आधारे श्रीमाताजी येथे काही निरीक्षणे नोंदवत आहेत. श्रीमाताजींची ही निरीक्षणे पाच भागांमध्ये देत आहोत.)

साधक : “असे काही जण असतात की, जे ध्यानाला बसले असता, त्यांना जी स्थिती अतिशय उत्तम आणि आनंदी वाटते अशा एका स्थितीमध्ये जातात,” असे तुम्ही मागे एकदा सांगितले होते. ही स्थिती नेमकी कशी असते?

श्रीमाताजी : ती स्थिती कोणती का असेना, त्यांची ती स्थिती त्यांना आनंदमय आणि विलक्षण वाटते. आपण कोणीतरी विशेष आहोत असे त्यांचे स्वतःविषयी मत असते. ते स्वतःला असामान्य समजत असतात कारण ते अजिबात हालचाल न करता, शांतपणे एका जागी स्थिर बसू शकतात आणि त्यातून जर एकही विचार त्यांच्या मनात आला नाही तर, मग ते त्यांना फारच विलक्षण वाटते. परंतु सहसा त्यांच्या डोक्यामध्ये एक प्रकारच्या शोभादर्शक यंत्रासारखी (kaleidoscope) स्थिती असते (त्यांच्या डोक्यात अगदी क्षणाक्षणाला वेगवेगळे विचार येत राहतात), पण त्यांना त्याची जाणीवदेखील नसते. असो. तर जे क्षणभरासाठी अगदी अविचल, काहीही न बोलता, विचार न करता राहू शकतात, त्यांचे स्वतःविषयीचे मत निश्चितपणे खूप चांगले असते.

फक्त एवढेच की, मी म्हटले त्याप्रमाणे, जर त्यांना त्या ध्यानावस्थेतून कोणी बाहेर काढले, — कोणीतरी आले आणि त्यांनी दारावर थाप दिली आणि म्हटले की, “अमुक एक जण तुमची वाट पाहत आहे,” किंवा “अहो ताई, तुमचे बाळ रडत आहे,” तर मग ते ताबडतोब संतप्त होतात आणि म्हणतात, “काय हे! तुम्ही माझे ध्यान बिघडवलेत, पूर्णपणे बिघडवलेत.” अशा ज्या गोष्टी मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्याच मी तुम्हाला सांगत आहे. हे लोक त्यांच्या ध्यानाबाबत अतिशय काटेकोर असायचे आणि त्यांच्या ध्यानामध्ये कोणी अडथळा आणला की ते प्रचंड क्रोधित व्हायचे. …अर्थातच हे काही महान आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण नाही. मग ते आल्यागेल्या प्रत्येकावरच चिडचिड करत राहायचे कारण कोणीतरी त्यांना त्यांच्या अतिशय आनंदमय अशा ध्यानमग्न स्थितीमधून बाहेर काढलेले असायचे. (क्रमशः)

– श्रीमाताजी (CWM 05 : 41)

साधना, योग आणि रूपांतरण – १६

साधक : ध्यानाला बसणे ही एक अत्यावश्यक साधना नाही का? आणि त्यातून ‘ईश्वरा’शी अधिक उत्कट आणि सघन ऐक्य प्राप्त होत नाही का?

श्रीमाताजी : तसे होऊ शकते. परंतु आपण काही साधनेसाठी साधना करत नाही. तर, आपण जे काही करत असू त्यामध्ये, सदा सर्वकाळ, आपल्या प्रत्येक कृतीमध्ये, प्रत्येक हालचालीमध्ये ‘ईश्वरा’वर एकाग्र असणे ही गोष्ट साध्य करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. इथे (श्रीअरविंद आश्रमात) असे काही जण आहेत की ज्यांना ध्यान करायला सांगण्यात आले आहे. पण असेही काही जण आहेत की ज्यांना ध्यान करण्यास अजिबात सांगण्यात आलेले नाही. परंतु ते प्रगती करत नाहीयेत असा विचार मात्र करता कामा नये. तेही साधनाच करत आहेत पण ती वेगळ्या स्वरूपाची साधना आहे. कर्म करणे, भक्तिभावाने कर्म करणे आणि आंतरिक निवेदन (conscecration) करणे ही देखील एक प्रकारची आध्यात्मिक साधनाच असते. केवळ ध्यानाच्या वेळीच नव्हे तर सर्व परिस्थितीमध्ये, जीवनातील प्रत्येक क्रियाकलापांमध्ये ‘ईश्वरा’शी नित्य तादात्म पावून राहणे हे अंतिम ध्येय आहे.

असे काही जण आहेत की, जे ध्यानाला बसले असताना, त्यांना जी स्थिती अतिशय छान, आनंदी वाटते अशा स्थितीत ते जातात. ते त्यामध्ये आत्मसंतुष्ट होऊन राहतात आणि जगाला विसरतात. पण जर त्यांच्या त्या ध्यानामध्ये कोणी अडथळा आणला तर, ते त्यातून अगदी रागारागाने आणि अस्वस्थ होऊन बाहेर पडतात कारण त्यांच्या ध्यानामध्ये कोणीतरी बाधा आणलेली असते. ही काही आध्यात्मिक प्रगतीची किंवा साधनेची खूण नव्हे. काही जण असेही असतात की, जे ध्यान करणे म्हणजे ‘ईश्वरा’चे ऋण चुकते करणे आहे असे समजतात. आठवड्यातून एकदा चर्चला गेलो की आपले ‘देवा’विषयी जे कर्तव्य होते ते आपण पार पाडले असे समजणाऱ्या माणसांसारखी ही माणसं असतात.

तुम्हाला ध्यानात शिरण्यासाठी जर प्रयत्न करावे लागत असतील तर तुम्ही आध्यात्मिक जीवन जगण्यापासून अजून खूप दूर आहात. परंतु तुम्हाला जर ध्यानातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावे लागत असतील तर मग मात्र तुमचे ध्यान हे तुम्ही आध्यात्मिक जीवन जगत असल्याचे द्योतक आहे, असे म्हणता येईल.

– श्रीमाताजी (CWM 03 : 20-21)

साधना, योग आणि रूपांतरण – १५

प्रश्न : एखादी व्यक्ती जितके अधिक तास ध्यान करेल, तेवढ्या प्रमाणात तिची प्रगती अधिक होईल, हे खरे आहे ना?

श्रीमाताजी : ध्यानामध्ये व्यतीत केलेले तास हा काही आध्यात्मिक प्रगतीचा पुरावा होऊ शकत नाही. परंतु ध्यान करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागत नसेल तर ती मात्र तुमच्या आध्यात्मिक प्रगतीची खूण असते.

(खरी प्रगती होते तेव्हा,) खरंतर तुम्हाला ध्यान थांबविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात; ध्यान थांबविणे अवघड असते; ‘ईश्वरा’संबंधीचे विचार थांबविणेही अवघड असते; सामान्य चेतनेमध्ये उतरणेदेखील अवघड असते. आणि असे तुमच्याबाबतीत घडत असेल तर तेव्हा तुम्ही प्रगतीची खात्री बाळगू शकता.

‘ईश्वरा’वर एकाग्रता करणे ही जेव्हा तुमच्यासाठी जीवनावश्यक गोष्ट झालेली असेल, आणि तुम्ही त्याशिवाय जगू शकणार नाही (अशी तुमची अवस्था झाली असेल तर आणि), तुम्ही कशामध्येही गुंतलेले असाल तरीही जर ती अवस्था रात्रंदिन सातत्याने टिकून राहत असेल तर, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रगती केली आहे, असे म्हणता येईल. तुम्ही ध्यान करत असाल किंवा इकडेतिकडे फिरत असाल, काही करत असाल, काही काम करत असाल, तेव्हा तुम्हाला आवश्यकता असते ती ‘चेतने’ची. ‘ईश्वरा’ची सातत्याने जाणीव असणे हीच एकमेव आवश्यक गोष्ट असते.

– श्रीमाताजी (CWM 03 : 19-20)