साधना, योग आणि रूपांतरण – २५
साधक : माताजी, जेव्हा तुम्ही आम्हाला एखाद्या विषयावर ध्यान करायला सांगता तेव्हा, आम्ही अनेक तरतऱ्हेच्या गोष्टींच्या कल्पना करायला लागतो. उदाहरणार्थ, आम्ही प्रकाशाप्रत खुले होत आहोत, एखादे प्रवेशद्वार खुले होत आहे, इत्यादी. पण या सर्व गोष्टी नेहमीच एक मानसिक रूप धारण करतात.
श्रीमाताजी : ते व्यक्ती-व्यक्तीवर अवलंबून असते. प्रत्येकाची ध्यानाची स्वतःची अशी विशिष्ट प्रक्रिया असते. ती प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. काही जणांना या प्रतिमा (images) साहाय्यक ठरतात. तर इतर काही जणांचे मन हे अधिक अमूर्त (abstract) असते आणि त्यांना केवळ संकल्पना दिसतात; तर ज्या व्यक्ती भावभावना, संवेदना यांच्यामध्ये अधिककरून जीवन व्यतीत करत असतात, त्यांच्याबाबतीत मानसिक आंदोलने, आंतरिक भावभावना, किंवा संवेदना यांच्या गतिविधी आढळून येतात. हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते.
ज्यांच्यापाशी रचनात्मक मानसिक शक्ती, सक्रिय शारीर-मन असते त्यांना अशा प्रतिमा दिसतात. परंतु प्रत्येकाला तसा अनुभव येतोच असे नाही. (ज्या व्यक्तीला अशा प्रतिमा दिसतात) ती व्यक्ती स्वतःच्या मानसिक चेतनेबाबत सक्रिय आहे याचे ते द्योतक असते.
साधक : पण हे बरोबर आहे का?
श्रीमाताजी : ज्यातून परिणाम साध्य होतो अशी कोणतीही गोष्ट बरोबरच असते. कोणतेही माध्यम हे चांगलेच असते. ते बरोबर नाही, असे तुम्हाला का वाटते?
अशा प्रतिमा या हास्यास्पदच असतात, असे काही नाही. त्या हास्यास्पद नसतात, तर त्या मानसिक प्रतिमा असतात. त्यातून जर काही परिणाम साध्य होत असेल तर त्या नक्कीच योग्य असतात. त्यातून तुम्हाला जर काही अनुभूती प्राप्त होत असेल तर त्या योग्य असतात.
उदाहरणार्थ, मी जेव्हा तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर जायला सांगते तेव्हा तुमच्यापैकी काही जण एक प्रकारच्या संवेदनेवर लक्ष केंद्रित करत असतील, पण इतर काही जणांना मात्र आपण एका खोल विहिरीमध्ये आत उतरत आहोत अशी भावना होऊ शकते. आणि त्यांना खरोखर अगदी स्पष्टपणे, एका काळोख्या, खोल विहिरीमध्ये आत उतरत जाणाऱ्या पायऱ्यांची प्रतिमा दिसते आणि ते त्या पायऱ्यांवरून खाली खाली, खोल खोल उतरत जातात आणि काही वेळाने ते एका विशिष्ट प्रवेशद्वारापाशी जाऊन पोहोचतात. दरवाजा उघडून आत जाण्याचा संकल्प करून त्याच्यासमोर ते बसून राहतात आणि कधीकधी मग तो दरवाजा उघडतो आणि ते आत प्रवेश करतात आणि आतमध्ये त्यांना एक प्रकारचे दालन किंवा एखादी खोली किंवा एखादी गुहा अशा प्रकारचे काहीतरी दिसते आणि त्यामधूनही जर जे पुढे पुढे जाऊ लागले तर ते पुन्हा आणखी एका प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतात आणि पुन्हा तेथे थांबतात आणि काहीशा प्रयत्नांनी पुन्हा तोही दरवाजा उघडतो आणि ते आणखी पुढे जातात.
आणि हे जर पुरेशा चिकाटीने ते करत राहिले आणि व्यक्तीने हा अनुभव सुरूच ठेवला, तर एक वेळ अशी येते जेव्हा त्या व्यक्तीला असे आढळते की ती आता पुन्हा एका प्रवेशद्वारासमोर आहे… त्या दरवाज्याला एक प्रकारची घनता असते आणि भारदस्तपणा असतो आणि एकाग्रतेच्या महाप्रयासानंतर तो दरवाजा उघडतो आणि अचानकपणे त्या व्यक्तीचा निर्मळतेच्या आणि प्रकाशाच्या दालनात प्रवेश होतो. आणि मग, त्या व्यक्तीला तिच्या आत्म्याशी संपर्क झाल्याची अनुभूती येते.
– श्रीमाताजी (CWM 09 : 378-379)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…