भारत – एक दर्शन २५
आपल्या जीवनाच्या पाठीमागे असणाऱ्या प्रचंड शक्तींविषयीचे भान रामायणाचा कवी आपल्या मनात जागे करतो आणि एका भव्य महाकाव्यात्मक पार्श्वभूमीवर तो त्याची काव्यकृती घडवितो, त्यामध्ये एक विशाल साम्राज्यनगरी आहे, पर्वतराजी आहेत, समुद्र आहेत, जंगले आहेत आणि माळरानं आहेत. या साऱ्या गोष्टी रामायणामध्ये इतक्या विशालरूपात चित्रित करण्यात आल्या आहेत की, त्यामुळे आख्खे जगच या काव्याची पार्श्वभूमी झाले आहे आणि काही महान व राक्षसी देहाकृतीमध्ये मूर्त झालेल्या, मानवाच्या दैवी आणि आसुरी अशा क्षमता याच जणू काही या काव्याचा विषय आहेत, असे आपल्याला वाटू लागते.
भारतीय नीतिप्रवण मन आणि सौंदर्यप्रिय मन यांनी एकमेकांना सुसंवादी एकात्मतेमध्ये मिसळून टाकले आहे आणि ते एका अनुपम अशा विशुद्ध व्यापकतेपर्यंत आणि आत्माभिव्यक्तीच्या सौंदर्यापर्यंत पोहोचलेले आहे. रामायणाने भारतीय कल्पनाशक्तीपुढे मानवी चारित्र्याचे उच्चतम व सुकुमार असे आदर्श मूर्तिमंत केले आहेत; रामायणाने सामर्थ्य आणि धैर्य, सौम्यता आणि शुद्धता, निष्ठा आणि आत्मत्याग यांना मनोरम आणि सर्वाधिक सुसंवादी रूप देऊन सुपरिचित केले, भावना आणि सौंदर्यवादी दृष्टी आकर्षित व्हावी असा रंग त्यांना दिला.
रामायणाने एकीकडे नीतिनियमांचे तिरस्करणीय कठोर तपस्याचरण काढून टाकले आहे तर दुसरीकडे त्यातील निव्वळ सर्वसामान्यपणाही काढून टाकला आहे आणि जीवनातील अगदी सर्वसामान्य गोष्टींना, वैवाहिक भावनांना, मातृप्रेमाला किंवा पिता-पुत्राच्या प्रेमभावनेला, बंधुप्रेमाला, राजपुत्राच्या आणि नेत्याच्या कर्तव्यभावनेला, अनुयायांच्या आणि प्रजाजनांच्या निष्ठेला, थोरांच्या थोरवीला, सामान्यांच्या सत्यप्रेमाला आणि त्यांच्या पात्रतेला, एक विशिष्ट प्रकारचे उच्च दिव्यत्व प्रदान केले आहे; आदर्श रंगांच्या तजेल्याने, नैतिक गोष्टींना अधिकच्या आंतरात्मिक अर्थाच्या छटेद्वारे सौंदर्य प्रदान केले आहे.
वाल्मिकींचे रामायण हे भारताच्या सांस्कृतिक मनाची जडणघडण करण्याच्या कामात एक अगदी अतुलनीय शक्तीचे साधन बनले आहे. रामायणाने या (भारतीय) मनाला राम आणि सीतेच्या रूपाने प्रिय आणि अनुकरणीय अशा व्यक्ती दिल्या आहेत; इतक्या दिव्यत्वाने आणि सत्यत्वाच्या प्रकटीकरणाद्वारे त्यांचे चित्रण अशा प्रकारे करण्यात आले आहे, की राम-सीता हे कायमस्वरुपीच भक्तीचा आणि पूजेचा विषय बनले आहेत. किंवा हनुमान, लक्ष्मण, भरत यांच्या नैतिक आदर्शांनाच जणू जिवंत मानवी रूप देण्यात आले आहे.
भारताच्या राष्ट्रीय चारित्र्यामध्ये जे जे काही सर्वोत्तम आणि मधुरतम आहे त्यातील बहुतांशी गोष्टींची घडण रामायणाने केली आहे, आणि रामायणाने सूक्ष्मतर आणि उत्कृष्ट पण दृढ अशा आत्मिक स्वरांना आणि अधिक सुकुमार मानवी स्वभावाला जागे करून, त्यांना राष्ट्रीय चारित्र्यामध्ये दृढमूल केले आहे, आणि या गोष्टी सद्गुण व आचरणाच्या कोणत्याही बाह्य औपचारिक गोष्टींपेक्षा अधिक मौल्यवान आहेत.
– श्रीअरविंद [CWSA 20 : 350-351]
साधना, योग आणि रूपांतरण – २२६ व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन…
साधना, योग आणि रूपांतरण – २२५ साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२४ अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२३ (‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला…
साधना, योग आणि रूपांतरण – २२२ आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व…
साधना, योग आणि रूपांतरण – २२१ उत्तरार्ध चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला…