ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

भारतीय धर्माची चार तत्त्वं

भारत – एक दर्शन १८

 

भारतीय धर्माने मानवी जीवनासमोर चार आवश्यक गोष्टी मांडल्या. प्रथमतः त्याने, ज्या सर्वोच्च चेतनेमधूनच सारे काही उदयाला येत असते, ज्या चेतनेचा परिचय न होताच, ज्या चेतनेमध्ये सारे जीवनकार्य चालू असते; ज्या परिपूर्ण, शाश्वत आणि अनंत चेतनेविषयी एक ना एक दिवस सर्वांनी जागृत होणे आणि जिच्याकडे परत येणे गरजेचेच आहे, त्या सर्वोच्च चेतनेविषयीचा किंवा विश्वात्मक आणि विश्वातीत अस्तित्वाच्या प्रांताविषयीचा विश्वास मानवी मनावर बिंबवला.

नंतर, भारतीय धर्माने या महत्तर अस्तित्वाच्या सत्यामध्ये विकसित होण्याचे जाणिवपूर्वक प्रयत्न करण्यासाठी जोपर्यंत मनुष्याची तयारी होत नाही तोपर्यंत व्यक्तिगत जीवनामध्ये, अनुभव आणि विकास यांच्याद्वारे होणाऱ्या स्वतःच्या तयारीची आवश्यकता मनुष्यामध्ये ठसवली.

तिसरी गोष्ट म्हणजे, या धर्माने मनुष्याला सुस्थापित, सु-अन्वेषित, बहुशाखीय, नित्य विस्तारत जाणारे ज्ञानाचे मार्ग आणि धार्मिक व आध्यात्मिक साधनापद्धती प्रदान केल्या.

आणि सरतेशेवटी चौथी गोष्ट म्हणजे, या उच्चतर पायऱ्यांसाठी ज्यांची अजून पुरेशी तयारी झालेली नाही अशांसाठी त्याने व्यक्तिगत आणि सामूहिक जीवनासाठी एक संरचना प्रदान केली, वैयक्तिक आणि समाजाच्या आचरणाची आणि शिस्तीची, मानसिक व नैतिक आणि प्राणिक विकसनाची एक चौकट पुरविली. ही अशी चौकट होती की जिच्यामध्ये व्यक्ती स्वतःच्या मर्यादांमध्ये राहून, स्वतःच्या प्रकृतीनुसार वागू शकत होती आणि हे सारे अशा रीतीने घडत असे की त्यामुळे अखेरीस, त्या व्यक्तीची त्या उच्चतर जीवनासाठी तयारी होत असे.

यातील पहिली तीन तत्त्व ही कोणत्याही धर्मासाठी अगदी अनिवार्य अशी तत्त्वं असतात, परंतु हिंदुधर्माने या चौथ्या तत्त्वालासुद्धा खूप महत्त्व दिले; त्याने जीवनातील कोणताही घटक हा निव्वळ ऐहिक आहे, अ-धार्मिक आहे आणि धार्मिक व आध्यात्मिक जीवनासाठी परका आहे असे समजून, त्यामधून त्याला कधीही वगळले नाही.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 181]

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४५

अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…

12 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…

5 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४०

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…

6 days ago