विचारशलाका ३२

 

मूलत: सर्व प्रकारचे योग म्हणजे आपली चेतना उन्नत करणे किंवा अधिक सखोल करणे होय. असे केल्याने आपली चेतना ही, आपल्या सामान्य चेतनेच्या आणि आपल्या सामान्य ‘प्रकृती’च्या अतीत असणाऱ्या गोष्टींसाठी सक्षम होऊ शकेल.

आपल्या आंतरिक सखोलतेशी, आपल्या वर असणाऱ्या उत्तुंगतेशी, आपल्या अतीत असणाऱ्या व्यापकतेशी ‘संपर्क साधणे’ म्हणजे योग. त्यांच्या महान प्रभावाप्रत, महान अस्तित्वांप्रत, त्यांच्या हालचालीबाबत ‘खुले असणे’ किंवा आपल्या पृष्ठवर्ती चेतनेमध्ये आणि आपल्या अस्तित्वामध्ये त्यांचा ‘स्वीकार करणे’ म्हणजे योग; किंवा योग म्हणजे उत्तुंगतेप्रत आरोहण असते, आणि आपल्या कक्षांच्या अतीत असणाऱ्या व्यापकतेमध्ये, आंतरिक सखोलतेमध्ये ‘प्रवेश करणे’ असते. ज्यामुळे आपल्या बाह्य अस्तित्वाचे परिवर्तन होईल, आपल्या अस्तित्वाला तो आत्मा कवळून घेईल आणि त्या आत्म्याचे सुशासन आपल्या बाह्य अस्तित्वावरदेखील चालू लागेल.

आपण ज्या ‘सद्वस्तु’चा शोध घेऊ इच्छितो ती आपल्या पृष्ठभागावर नसते किंवा जर ती ‘सद्वस्तू’ तिथे असलीच तर ती अवगुंठित (Concealed) असते. आपल्या आवाक्यात असलेल्या चेतनेपेक्षा अधिक गहनतर, उच्चतर किंवा व्यापकतर चेतनाच तेथे पोहोचू शकते, त्या ‘सद्वस्तु’ला स्पर्श करू शकते, त्या ‘सद्वस्तु’चे ज्ञान करून घेऊ शकते आणि त्या ‘सद्वस्तु’ला प्राप्त करून घेऊ शकते. आपण आपल्या सामान्य चेतनेच्या आतमध्ये, तेथे काय आहे हे शोधण्यासाठी, बुडी मारली तरी त्या ‘सद्वस्तु’च्या केवळ अंशभागामध्येच आपला प्रवेश होतो.

– श्रीअरविंद [CWSA 12 : 327-328]

विचारशलाका ३१

 

साधक : व्यक्ती जेव्हा झोपलेली असते तेव्हा तिची चेतना ही जागेपणी असलेल्या चेतनेपेक्षा कशा प्रकारे वेगळी असते?

श्रीमाताजी : ती भिन्न असल्याचे तुमच्या कधी लक्षात आले नाही का? तुमची शारीर चेतना (physical consciousness) किंवा तुमची सूक्ष्म शारीर चेतना (subtle physical consciousness), तुमची प्राणिक चेतना (vital consciousness) किंवा तुमच्यामधील कनिष्ठ किंवा उच्चतर प्राणिक चेतना, तुमची आंतरात्मिक चेतना (psychic consciousness), तुमची मानसिक चेतना (mental consciousness), या सगळ्या एकमेकींपासून पूर्णत: भिन्न असतात.

म्हणून जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा तुमच्यात एक चेतना असते आणि जेव्हा तुम्ही जागे असता तेव्हा वेगळीच चेतना तुमच्यात असते. तुम्ही जागे असता तेव्हा गोष्टी तुमच्या बाहेर प्रक्षेपित झालेल्या तुम्ही पाहता, तर निद्रावस्थेत त्याच गोष्टी तुम्ही अंतरंगात पाहता. म्हणजे जागे असताना, तुम्हाला जणू बाहेर धाडण्यात आलेले असते आणि तुम्ही त्याकडे समोरून पाहता आणि निद्रावस्थेत तुम्ही स्वत:कडेच आंतरिक आरशामध्ये पाहता. व्यक्तीने चेतनांच्या स्थितीमध्ये फरक करायला शिकले पाहिजे अन्यथा व्यक्ती कायमच गोंधळलेली राहील.

वास्तविक, ही योगमार्गावरील पहिली पायरी आहे, ही धाग्याची सुरुवात आहे. जर व्यक्तीने हा धागा शेवटपर्यंत पकडून ठेवला नाही तर, व्यक्ती वाट चुकण्याची शक्यता असते. तेव्हा तो धागा शेवटपर्यंत पकडून ठेवणे अत्यंत आवश्यक असते.

– श्रीमाताजी [CWM 07 : 131]

विचारशलाका ३०

 

चेतना आणि ज्या माध्यमांमधून चेतना व्यक्त होते ती साधने या दोन गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.

त्या साधनांचा विचार करुया : मानसिक अस्तित्वामधून ‘विचार’ निर्माण होतात, भावनिक अस्तित्वामधून ‘भावना’ निर्माण होतात, प्राणिक अस्तित्वामधून ‘कार्यकारी शक्ती’ निर्माण होते आणि शारीरिक अस्तित्व ‘प्रत्यक्ष कृती’ करते.

प्रतिभावान माणसाला काहीही दिले तरी, त्यापासून तो काहीतरी सुंदर असे बनवून दाखवेल कारण तो प्रतिभाशाली असतो. पण त्याच प्रतिभावंताला तुम्ही एक परिपूर्ण असे साधन द्या, तो त्यापासून काहीतरी अद्भुत असे करून दाखवेल. एखादा महान पियानोवादक अगदी खराब झालेल्या पियानोमधूनसुद्धा काहीतरी उत्तम संगीत निर्माण करेल पण त्याला जुळवलेला, उत्तम असा पियानो द्या, तो त्यापासून अधिकच सुंदर असे काही संगीत निर्माण करेल. या दोन्ही बाबतीत चेतना एकसारखीच असते पण तिच्या अभिव्यक्तीसाठी चांगल्या साधनाची आवश्यकता असते. – अगदी त्याचप्रमाणे मानसिक, प्राणिक, आंतरात्मिक आणि शारीरिक क्षमता असलेल्या देहाची साधन म्हणून आवश्यकता असते.

– श्रीमाताजी [CWM 04 : 40]

विचारशलाका २९

 

धम्मपद : ज्याप्रमाणे रणक्षेत्रातील हत्ती धनुष्यातून सुटलेले बाण सहन करतो त्याप्रमाणे मी अपमान सहन करेन कारण या जगात अनेक दुष्ट मनाची माणसे आहेत.

पाळीव हत्ती हा रणक्षेत्रामध्ये नेला जातो, त्यावर राजा आरुढ होतो. जो शांतपणे अपमान, निंदा सहन करतो तो माणसांमध्ये उत्तम मनुष्य होय.

श्रीमाताजी : येथे मोठा चांगला सल्ला दिला आहे : रणक्षेत्रातील हत्ती, ज्याला चांगले प्रशिक्षण देण्यात आले असते तो बाणांच्या भडिमाराने इतस्तत: पळायला सुरुवात करत नाही. तो वेदना सहन करतो, एखाद्या वीराने प्रतिकार करावा त्याप्रमाणे वृत्ती राखत तो पुढे पुढे चालतच राहतो. ज्याला योगमार्गाचे अनुसरण करायचे असते, साहजिकपणेच त्याला सर्व प्रकारच्या वाईट इच्छांच्या हल्ल्यांना सामोरे जावेच लागते. कारण इतर जण त्याला केवळ समजून घेऊ शकत नाहीत असे नाही, तर त्यांना जे समजत नाही त्याचा ते द्वेष करू लागतात.

सामान्य माणसे तुमच्याविषयी जे द्वेषपूर्ण उद्गार काढतात त्यामुळे, जर तुम्ही चिंताग्रस्त झालात, दुःखी झालात किंवा नाउमेद झालात तर तुम्ही मार्गावर फार पुढे जाऊ शकणार नाही. अशा गोष्टी तुमच्यापर्यंत येतात कारण तुम्ही दुर्दैवी आहात किंवा तुमच्या नशीबातच सुख नाही असे नसून, उलट दिव्य ‘चेतने’ने व दिव्य ‘कृपे’ने तुमचा संकल्प गांभीर्याने घेतला आहे आणि तुमचा निश्चय किती प्रामाणिक आहे, मार्गातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही किती खंबीर आहात हे पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिस्थितीचा तिने एखाद्या (सोन्याचा) कस पाहणाऱ्या दगडाप्रमाणे (कसोटीचा दगड) म्हणून उपयोग केलेला असतो.

त्यामुळे जर का कोणी तुमचा उपहास केला किंवा कोणी तुमच्याविषयी निंदनीय शब्द उच्चारले तर पहिली गोष्ट तुम्ही ही केली पाहिजे की, अंतर्मुख होऊन, आपल्यातील कोणत्या दुर्बलतेमुळे वा कोणत्या अपूर्णतेमुळे असे घडले ते पाहिले पाहिजे. तसेच तुम्ही उदास, संतप्त किंवा उद्विग्न होता कामा नये, कारण तुमची खरी किंमत काय त्याची लोकांना कदर नसते. त्यापेक्षा तुमचा कोणता दोष, कोणती दुर्बलता वा कोणती विकृती दुरुस्त करायला हवी हे दाखवून दिल्याबद्दल तुम्ही दिव्य ‘कृपे’चे ऋणी असले पाहिजे.

आणि दुःखी होण्याऐवजी, तुम्ही पूर्णपणे संतुष्ट होऊ शकता आणि तुमच्या विरोधात, तुमचे अहित व्हावे म्हणून जो घाट घातला गेला होता त्याचा तुम्ही खूप फायदा करून घेऊ शकता.

तुम्हाला जर खरोखर या योगमार्गाचे अनुसरण करायचे असेल आणि योगसाधना करायची असेल, तर ती तुम्ही कोणत्याही कौतुकासाठी वा सन्मानासाठी करता कामा नये. ती तुमच्या जिवाची अनिवार्य अशी निकड असली पाहिजे, कारण तुम्ही त्याव्यतिरिक्त कोणत्याही इतर मार्गाने आनंदीच होऊ शकणार नाही, त्यासाठी तुम्ही ती केलीच पाहिजे. लोकांनी तुमची प्रशंसा केली काय किंवा नाही केली काय, ती गोष्ट अजिबात महत्त्वाची नाही. तुम्ही आधीच स्वत:ला हे समजावले पाहिजे की, तुम्ही सामान्य माणसांपेक्षा जेवढे अधिक प्रगत व्हाल, आणि जसजसे तुम्ही सामान्य जीवनपद्धतीला परके व्हाल, तेवढे लोकं तुमची प्रशंसा कमी करू लागतील; कारण साहजिकच आहे की, तुम्हाला ते नीट समजून घेऊ शकणार नाहीत. आणि मी पुन्हा एकवार सांगते की, हे अजिबात महत्त्वाचे नाही.

तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहूच शकत नाही म्हणून, मार्गावर प्रगत होत राहण्यामध्येच खरी प्रामाणिकता सामावलेली आहे. तुम्ही दिव्य जीवनासाठी स्वत:ला समर्पित करता कारण त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही; तुम्ही स्वत:चे रूपांतरण करण्यासाठी धडपडता, प्रकाशाला उन्मुख होता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही, कारण तेच तुमच्या जीवनाचे प्रयोजन असते. जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.

– श्रीमाताजी [CWM 03 : 282-284]

विचारशलाका २८

 

आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश म्हणजे जणू समुद्रात उडी मारल्याप्रमाणे ‘दिव्यत्वा’मध्ये उडी घेणे. आणि तरीदेखील तो शेवट नसतो तर तो प्रारंभ असतो. कारण एकदा का तुम्ही त्यामध्ये उडी घेतली की, त्यानंतर तुम्हाला ‘दिव्यत्वा’मध्ये जीवन जगता आले पाहिजे. “मी कोठे पडणार तर नाही नां? मला काही होणार तर नाही नां?” असा कोणताही विचार न करता तुम्हाला सरळ उडी मारायची असते. तुमच्या मनामध्ये असणारी चलबिचल तुम्हाला रोखू पाहत असते. पण तुम्ही स्वत:ला झोकून दिले पाहिजे. तुम्हाला समुद्रात उडी मारायची असेल आणि तुम्ही जर सगळा वेळ असा विचार करीत बसलात की, ”अरे बापरे, पण इथे किंवा तिथे एखादा खडक असला तर…” तर मग, तुम्ही कधीच उडी मारू शकणार नाही.

अर्थातच समुद्रात उडी मारण्यापूर्वी ज्याप्रमाणे तुम्ही समुद्र पाहिलेला असला पाहिजे आणि ज्याप्रमाणे तुम्हाला त्याविषयी काही माहिती असली पाहिजे त्याप्रमाणेच, तुम्हाला ‘दिव्य सद्वस्तू’चे (Divine Reality) आधी थोडी तरी झलक दिसलेली असली पाहिजे. ती झलक म्हणजे सहसा आंतरात्मिक चेतनेची (psychic consciousness) जागृती असते. भले तो संपर्क अगदी सखोल आंतरात्मिक किंवा समग्रतया प्रस्थापित झालेला नसला तरीदेखील, तुम्हाला किमान एक सुस्पष्ट अशी मानसिक वा प्राणिक प्रचिती (mental or vital realisation) तरी आलेली असली पाहिजे. तुम्हाला तुमच्या अंतरंगामध्ये किंवा बाहेर सुस्पष्टपणे ‘ईश्वरी उपस्थिती’ची जाणीव झालेली असली पाहिजे, तुम्हाला ‘दिव्य-जगता’चा श्वास जाणवलेला असला पाहिजे. आणि त्याचवेळी त्याविरुद्ध असणाऱ्या सामान्य जगताचा घुसमटवून टाकणारा दबाव तुम्हाला जाणवलेला असला पाहिजे की जो, तुम्हाला या दडपून टाकणाऱ्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करण्यास भाग पाडतो. तुम्हाला जर तसा अनुभव आलेला असेल तर तुम्ही केवळ त्या ‘दिव्य सद्वस्तू’मध्ये नि:शेषतया आश्रय घेणे आणि त्याच्या आधाराने, त्याच्या सुरक्षेमध्ये, केवळ त्यामध्येच राहणे एवढेच करायचे असते. तुम्ही तुमच्या सामान्य जीवनामध्ये कधीतरी हे अंशत: किंवा तुमच्या अस्तित्वाच्या काही भागांनिशी वा कधीतरी, नैमित्तिकरित्या असे केले असेल तर ते आता तुम्ही पूर्णांशाने आणि सदासर्वदासाठी केले पाहिजे. ही उडी तुम्हाला मारायची आहे आणि जर तुम्ही हे केले नाहीत, तर तुम्ही वर्षानुवर्षे ‘योगसाधना’ करत राहिलात तरीही खऱ्या आध्यात्मिक जीवनाविषयी तुम्हाला काहीही माहीत होणार नाही, अशी शक्यता असते. संपूर्णतया आणि नि:शेषतया उडी मारा; तेव्हा तुम्ही या बाह्य गोंधळापासून पूर्णत: मुक्त व्हाल आणि तुम्ही आध्यात्मिक जीवनाची खरीखुरी अनुभूती प्राप्त करून घ्याल.

– श्रीमाताजी [CWM 03 : 21-22]

विचारशलाका २७

मनुष्यामध्ये नेहमीच दोन प्रकारच्या प्रकृती असतात; एक आंतरिक प्रकृती म्हणजे आत्मिक व आध्यात्मिक, जी ‘ईश्वरा’च्या संपर्कामध्ये असते; आणि दुसरी बाह्य प्रकृती म्हणजे मानसिक, प्राणिक आणि शारीरिक. या बाह्य प्रकृतीचे भरणपोषण ‘अज्ञाना’मध्ये झालेले असते आणि ही प्रकृती दोष, अपूर्णता, अशुद्धता यांनी भरलेली असते. आणि त्यामुळेच साधनेमध्ये गोष्टी अचानक एका क्षणात बदलू शकत नाहीत.

आंतरिक अनुभूती वाढत जाते, विस्तारत जाते आणि बाह्य प्रकृतीला ती अधिकाधिक व्यापत जाते. पण जोवर ती अनुभूती बाह्य प्रकृतीला पूर्णतया व्यापत नाही तोवर कोठेतरी अपूर्णता शिल्लक राहतेच.

– श्रीअरविंद [CWSA 28 : 89-90]

विचारशलाका २६

 

कधीकधी असे होते की, व्यक्ती तत्त्वज्ञानाचे एक आख्खे पुस्तक वाचून काढते पण, एका पाऊलदेखील तिची प्रगती होत नाही. कधी असेही घडते की, एखादी व्यक्ती अतिशय धर्मनिष्ठ असूनही, तिची अजिबात प्रगती होत नाही. अशीही काही माणसं आहेत की, ज्यांनी त्यांचे आख्खे आयुष्य हे ध्यानधारणेमध्ये व्यतीत केले आहे आणि तरीदेखील त्यांना काहीच प्राप्त झालेले नाही. (आणि दुसरीकडे) जुन्या चप्पलबूट शिवण्यासारखी अगदी साधी कामे करणारीसुद्धा काही माणसं आहेत की ज्यांना आध्यात्मिक अनुभव आलेला आहे. व्यक्ती काय विचार करते, काय बोलते यापेक्षा असे अनुभव या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. ती एक देणगी असते. आणि यासाठी काय आवश्यक असेल तर ते म्हणजे – त्या ‘ईश्वरा’शी एकत्व पावण्यामध्ये यशस्वी होणे आणि ‘ईश्वरा’मध्ये जीवन जगणे. कधीकधी तुम्ही पुस्तकातील एखादे वाक्य वाचता आणि तुम्हाला ते वाक्य तेथे घेऊन जाते. तर कधी तुम्ही धर्मग्रंथ किंवा तत्त्वज्ञानाची पुस्तकेच्या पुस्तके वाचूनही काही उपयोग होत नाही. हो, पण अशीही काही माणसं असतात की, तत्त्वज्ञानाची पुस्तके वाचल्यामुळे त्यांना प्रगती करण्यासाठी काही मदत झालेली असते. पण या सर्व गोष्टी दुय्यम आहेत.

एकच गोष्ट अतिशय महत्त्वाची असते : प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण इच्छा, संकल्प; कारण (प्रगती, अनुभव इत्यादी) गोष्टी निमिषार्धात होत नाहीत. त्यामुळे व्यक्तीने चिकाटी ठेवली पाहिजे.

एखाद्याला जेव्हा असे वाटते की, त्याची प्रगती होत नाहीये, अशावेळी त्याने नाउमेद होता कामा नये. त्याच्या प्रकृतीमध्ये असे काय आहे की, जे या गोष्टींना विरोध करत आहे ते त्याने शोधून काढले पाहिजे; आणि मग त्याने आवश्यक ती प्रगती केली पाहिजे. त्यामुळे व्यक्ती एकाएकी पुढे जाते. आणि जेव्हा तुम्ही शेवटापर्यंत जाता तेव्हा तुम्हाला अनुभव येतो.

आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, ज्या माणसांनी परस्परांहून अगदी विभिन्न असे मार्ग अनुसरलेले असतात, ज्यांच्या विभिन्न अशा मनोवृत्ती असतात, त्यांच्यापैकी काहीजण खूप भाविक असतात तर काही अगदी नास्तिक असतात, काही जण तर अगदी जडवादी असतात पण ते सारे एकाच प्रकारच्या अनुभवापाशी येऊन पोहोचतात; तो अनुभव सर्वांना सारखाच येतो. कारण तो ‘सत्य’ असतो – तो खरा असतो, कारण ते एकमेव वास्तव असते. एखादा त्याबद्दल काय बोलतो ते महत्त्वाचे नाही, तर महत्त्वाचे आहे ते तुम्ही तुमच्या मार्गाचे अनुसरण करणे, भले मग तो मार्ग कोणताही असो, त्याचे अनुसरण करणे हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे.

– श्रीमाताजी [CWM 06 : 26-27]

विचारशलाका २५

 

पूर्णयोगामध्ये चक्रं ही संकल्पपूर्वक, प्रयत्नपूर्वक खुली केली जात नाहीत, तर ‘शक्ती’च्या अवतरणामुळे ती आपलीआपणच स्वत:हून खुली होतात. तांत्रिक साधनेमध्ये ती खालून वर, ऊर्ध्वगामी दिशेने खुली होत जातात, म्हणजे मूलाधार चक्र प्रथम खुले होते तर आपल्या पूर्णयोगामध्ये, चक्रं वरून खाली खुली होत जातात. तरीसुद्धा मूलाधारातून शक्तीचे आरोहण घडून येतेच.

*

‘पूर्णयोगा’मध्ये मज्जारज्जूमध्ये (कुंडलिनीच्या) प्रवाहाची कधीतरी जाणीव होते, जशी ती इतर नाडी-प्रवाहमार्गांमध्ये किंवा शरीराच्या विविध भागांमध्येही होते. परंतु ‘पूर्णयोगा’मध्ये बलपूर्वक किंवा हटातटाने कुंडलिनी जागृती केली जात नाही. या योगामध्ये, उच्च स्तरीय आध्यात्मिक चेतनेला जाऊन मिळण्यासाठी, कनिष्ठ चक्रांमधून चेतना शांतपणे वर चढत जाते आणि ‘ईश्वरी शक्ती’चे वरून अवतरण होते आणि ती ‘ईश्वरी शक्ती’ मन आणि शरीरावर तिचे कार्य करते. त्या कार्याची पद्धत व त्याच्या पायऱ्या प्रत्येक साधकामध्ये वेगवेगळ्या असतात. ‘दिव्य माते’वर पूर्ण ‘विश्वास’ आणि येणाऱ्या सर्व चुकीच्या सूचनांना व प्रभावांना दूर सारण्यासाठी आवश्यक असणारी ‘सतर्कता’ या गोष्टी म्हणजे ‘पूर्णयोगा’चा मुख्य नियम आहे.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 460, 462]

विचारशलाका २४

 

साधक : आध्यात्मिक अनुभव म्हणजे काय…?

श्रीमाताजी : आध्यात्मिक अनुभव ही एक अशी गोष्ट असते की, ज्यामुळे तुम्ही नेहमी ज्या चेतनेमध्ये (consciousness) वावरत असता त्यापेक्षा अधिक उच्च अशा चेतनेशी तुमचा संपर्क येतो. तुमची स्वत:विषयी काहीतरी एक भावना असते, भले मग कदाचित तुम्हाला त्याची जाणीवही नसेल, पण ती तुमची सामान्य स्थिती असते. पण तुम्हाला जर एकाएकी तुमच्या अंतरंगातील काही वेगळ्या आणि अधिक उच्च अशा चेतनेची जाणीव झाली तर – भले मग ती काही का असेना – तो एक ‘आध्यात्मिक अनुभव’ असेल. (अशा वेळी) तुम्ही मानसिक कल्पनेद्वारे त्याची मांडणी कराल किंवा करणारही नाही; तुम्ही ते स्वत:लाच स्पष्ट करून सांगाल किंवा सांगणारही नाही, ती जाणीव टिकून राहील किंवा राहणारही नाही; ती उत्स्फूर्त असू शकते. पण जेव्हा चेतनेमधील हा मूलभूत फरक तुम्हाला जाणवतो तेव्हा, त्याचा परिणाम म्हणून, अधिक उच्च, अधिक सुस्पष्ट, अधिक विशुद्ध असे काहीतरी तुम्हाला जाणवते तेव्हा त्याला ‘आध्यात्मिक अनुभव’ असे म्हणता येते.

– श्रीमाताजी [CWM 06 : 432]