विचार शलाका – १६
तुम्हाला असे वाटते की, तुम्ही खूप चांगले आहात, दयाळू आहात, विरक्त आहात आणि नेहमीच सद्भावना बाळगता. तुम्ही कधीच कोणाचे अकल्याण चिंतत नाही, तुम्ही नेहमी त्यांच्या भल्याचाच विचार करता, या आणि अशासारख्या गोष्टी तुम्ही स्वत:लाच आत्मसंतुष्टीने सांगत राहता. पण तुम्ही विचार करत असताना, जर स्वत:कडे प्रामाणिकपणे बघितलेत तर, तुमच्या असे लक्षात येईल की, तुमच्या डोक्यामध्ये असंख्य विचारांचा कल्लोळ असतो आणि कधीकधी त्यामध्ये अत्यंत भयावह असे विचारही असतात आणि त्याची तुम्हाला अजिबात जाणीवदेखील नसते.
उदाहरणार्थ, कधीतरी जेव्हा तुमच्या मनासारखे घडत नाही, तेव्हाच्या तुमच्या प्रतिक्रिया पाहा : तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, परिचितांना, किंवा कोणालाही सैतानाकडे पाठविण्यासाठी किती उतावीळ झालेले असता! तुम्ही त्यांच्याबद्दल किती नको नको ते विचार करता ते आठवून पाहा, आणि त्याची तुम्हाला जाणीवदेखील नसते. तेव्हा तुम्ही म्हणता, “यामुळे त्याला चांगलाच धडा मिळेल.” आणि जेव्हा तुम्ही टिका करता तेव्हा तुम्ही म्हणता, ”त्याला त्याच्या चुकांची जाणीव व्हायलाच हवी.” आणि जेव्हा कोणी तुमच्या कल्पनेनुसार वागत नाही तेव्हा तुम्ही म्हणता, ”त्याला त्याची फळे भोगावीच लागतील.” आणि असे बरेच काही…. तुम्हाला हे माहीत नसते, कारण विचार चालू असताना, तुम्ही स्वत:कडे पाहत नाही. जेव्हा तो विचार किंचितसा अधिक प्रबळ झालेला असतो तेव्हा तुम्हाला त्याची कधीतरी जाणीव होते देखील; पण जेव्हा तो विचार येऊन निघून जातो, तेव्हा तुम्हाला त्याचे अस्तित्वही जाणवत नाही – तो विचार येतो, तुमच्यामध्ये प्रवेश करतो आणि निघून जातो.
आणि मग केव्हातरी तुम्हाला उमगते की, आपल्याला खरोखर शुद्ध आणि पूर्णत: सत्याच्या बाजूचे बनायचे असेल तर, त्यासाठी जागरुकता, प्रामाणिकपणा, आत्मनिरीक्षण, आणि स्व-नियंत्रण या गोष्टी आवश्यक असतात, ज्या सहसा आढळत नाहीत. तुम्हाला तेव्हा जाणवायला लागते की, खरोखरीच प्रामाणिक असणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे.
– श्रीमाताजी [CWM 03 : 231]
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८ - January 30, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७ - January 29, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६ - January 28, 2026





