प्रतिक्रिया आणि साधना
कर्म आराधना – १८
(भगवद्गीता ही प्राणिक इच्छांवर मानसिक नियंत्रणाचा नियम सांगून थांबत नाही, तर ती अमर्त्य आत्म्याची अचलता प्रतिपादित करते.)
सर्व परिणामांबाबत, सर्व प्रतिक्रियांबाबत, सर्व घटनांबाबत ‘मनाची आणि हृदयाची संपूर्ण समता’ ही कसोटी असल्याचे भगवद्गीता सांगते. सद्भाग्य असो वा दुर्भाग्य, सन्मान असो वा अपमान, कीर्ती असो वा दुष्कीर्ती, जय असो वा पराभव, सुखद असोत किंवा दुःखद घटना, या गोष्टी आपल्याला हादरवून टाकत नसतील, इतकेच नव्हे तर त्याचा स्पर्शही जर आपल्याला होत नसेल, भावभावनांपासून आपण मुक्त असू, मज्जागत प्रतिक्रियांपासून आपण मुक्त असू, मानसिक दृष्ट्या आपण मुक्त असू, अस्वस्थ न होता वा आपल्या प्रकृतीमध्ये कोणतेही स्पंदन उत्पन्न होऊ न देता जर आपण त्याला प्रतिसाद देत असू, तर मग ‘गीता’ आपल्याला जिचा निर्देश करते ती संपूर्ण मुक्ती आपल्याला लाभलेली आहे, असा त्याचा अर्थ होतो, अन्यथा नाही. (आपली) अगदी बारीकशीही प्रतिक्रिया ही साधना अपूर्ण असल्याचे द्योतक आहे आणि आपल्यामधील काही भाग अज्ञान आणि बंध हा त्यांचा धर्म आहे असे मानत असल्याचे तसेच, तो भाग अजूनही जुन्या प्रकृतीलाच चिकटून असल्याचे द्योतक आहे. आपला आत्म-जय हा अजूनही आंशिक रीतीनेच साध्य झाला आहे आणि आपल्या प्रकृतीच्या भूमीमधील एखादा अल्पसा कण, किंवा एखादा भाग किंवा काही प्रदेश हा अजूनही अपूर्ण आहे वा अ-वास्तव आहे, याचे ते निदर्शक आहे. आणि अपूर्णतेचा तो छोटासा कण आपल्या ‘योगा’ची सारी सिद्धी मातीमोल करू शकतो.
– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 103)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ - December 7, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ - December 6, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ - December 5, 2025







