ईश्वरात राहावे, अहंभावात राहू नये
कर्म आराधना – १७
आपल्या प्रयत्नासाठी काही अटी आहेत आणि त्या अटी एका आदर्शाकडे निर्देश करतात. हा आदर्श पुढील सूत्रांत व्यक्त करता येईल.
‘ईश्वरा’त राहावे, अहंभावात राहू नये; लहानशा, अहंभावी जाणिवेत राहून नव्हे; तर ‘सर्वात्मक व सर्वातीत’ पुरुषाच्या चेतनेत राहून, विशाल पायावर ठामपणे सुस्थिर होऊन जीवन जगावे.
सर्व प्रसंगी व सर्व जिवांशी पूर्ण समत्वबुद्धीने वागावे; आपले स्वत:बरोबर आणि आपले ‘ईश्वरा’बरोबर जसे वर्तन असते त्याप्रमाणे, आपण इतरांकडे पाहावे व त्यांना जाणून घ्यावे. आपल्या स्वत:मध्ये इतर सर्वांना पाहावे व सर्वांना ‘ईश्वरा’मध्ये पाहावे; आणि ‘ईश्वर’ सर्वांमध्ये आहे, आपणही इतर सर्वांमध्ये आहोत, ही जाणीव बाळगावी.
अहंभावात राहून नव्हे; तर ‘ईश्वरा’त निमग्न राहून कर्म करावे. आणि या ठिकाणी पहिली गोष्ट ही ध्यानात ठेवावी ती अशी की, वैयक्तिक गरजा वा वैयक्तिक आदर्शाकडे लक्ष ठेवून कृतीची निवड करायची नाही; तर आपल्या ऊर्ध्वस्थित असणारे असे जे जिवंत सर्वोच्च ‘सत्य’ आहे त्याची आज्ञा असेल त्यानुसार कृतीची निवड करायची. दुसरी गोष्ट, आपल्या आध्यात्मिक चेतनेची बैठक पुरेशी तयार झाली म्हणजे मग, आपल्या स्वत:च्या स्वतंत्र इच्छेने वा विचाराने, कृती करायची नाही; तर आपल्या पलीकडे असलेल्या ईश्वरी ‘इच्छे’चे मार्गदर्शन आणि प्रेरणा यांच्या प्रभावाने जी कृती आपल्या हातून घडेल, वाढेल अशा पद्धतीने ती अधिकाधिक प्रमाणात घडू द्यायची, वाढू द्यायची. आणि शेवटी या साधनेचा श्रेष्ठ परिणाम : आपण स्वतःला उन्नत करून ‘ईश्वरी शक्ती’शी एकरूप व्हायचे; ज्ञान, शक्ती, जाणीव, कृती आणि अस्तित्वाचा आनंद या सर्व बाबतीत आपण ईश्वरी शक्तीशी एकरूप व्हावयाचे; आपली क्रियाशीलता मृत्युवश मानवी वासनेने, प्राणिक प्रेरणेने, भ्रामक मानसिक ‘स्वतंत्र’ इच्छेने प्रेरित व शासित होत नसून, ती अमृत आत्मानंद आणि अनंत आत्मज्ञान यांच्या प्रेरणेने, स्वच्छ ज्ञानाच्या प्रकाशात योजली जात आहे आणि विकसित होत आहे, ही जाणीव व भावना आपल्या ठिकाणी स्थिर करायची. कारण ही अशी कृती असते की जी, प्राकृतिक मनुष्य हा दिव्य ‘आत्म्या’च्या आणि शाश्वत ‘चैतन्या’च्या जाणीवपूर्वकपणे आधीन झाल्याने आणि दिव्य ‘आत्म्या’मध्ये आणि शाश्वत ‘चैतन्या’मध्ये विलीन झाल्याने घडून येते; हेच ‘चैतन्य’ विश्व-‘प्रकृती’ला मार्गदर्शन करत असते आणि ते कायमच तिच्या अतीत असते.
– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 101)
- प्रामाणिकपणा आणि चिकाटी - April 30, 2026
- ईश्वराच्या निवासाचे दरवाजे - April 29, 2026
- अप्रामाणिकपणाचा अडथळा - April 28, 2026






