‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष पाँडिचेरीला गेल्यानंतर चार वर्षे पूर्णपणे योगसाधनेमध्ये निमग्न होते. ते म्हणतात – ”मला ईश्वरी साहाय्य सातत्याने उपलब्ध होते, तरी खरा मार्ग सापडण्यासाठी मला चार वर्षे आंतरिक धडपड करावी लागली, आणि त्यानंतर सुद्धा मला तो मार्ग योगायोगानेच सापडला असे म्हणावे लागेल. आणि पुढेही खरा मार्ग सापडण्यासाठी त्या परमोच्च आंतरिक मार्गदर्शनानुसार तीव्रतेने केलेली आणखी दहा वर्षाची साधना मला आवश्यक ठरली.”

त्याच सुमारास पॅरिसमधील बॅरिस्टर पॉल रिचर्ड्स निवडणुकीसाठी फ्रान्सवरून पाँडिचेरीस आले होते. भारतातील योगी, ऋषी, मुनी यांना भेटणे हा देखील त्यांच्या भारतभेटीचा एक प्रधान हेतू होता. पॉल यांचा पौर्वात्य आणि पाश्चिमात्य देशांतील धर्म व तत्त्वज्ञान यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांना अरविंद घोषांविषयी व त्यांच्या योगाविषयी काही माहिती मिळाली होती. पॉल व अरविंद यांच्यात झालेल्या दोन भेटींमध्ये राजकारणापासून मानवतेच्या भवितव्यापर्यंत अनेक गोष्टींवर चर्चा झाल्या. या भेटीच्या शेवटी निघताना पॉल म्हणाले, “माझी पत्नी माझ्यापेक्षाही अध्यात्मात अधिक प्रगत आहे. पुढच्या वेळी भारतात येईन तेव्हा तिला बरोबर घेऊन येईन.” याच भेटीत अरविंदांना पॉल यांच्या पत्नीबद्दल म्हणजे मीरा अल्फासा (ज्यांना आज श्रीमाताजी म्हणून ओळखले जाते) यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या गूढविद्येच्या अभ्यासाबद्दल माहिती मिळाली.

अरविंद घोष यांच्याशी झालेल्या या भेटीचा पॉल रिचर्ड्स यांच्या मनावर खूप परिणाम झाला. पुढे जपानमध्ये श्रोत्यांसमोर पॉल रिचर्ड्स जे बोलले त्यातून अरविंद यांच्या प्रभावाविषयी काहीएक अंदाज आपल्याला बांधता येतो. ते म्हणतात, “महान गोष्टींची, महान घटनांची, महान व्यक्तींची, आशिया खंडातील दैवी व्यक्तींची सुवर्णघटिका आता आली आहे. आयुष्यभर मी अशा व्यक्तींचा शोध घेत होतो. मला वाटत होते, अशी माणसे या जगात नसतील तर जग नष्ट होईल. कारण अशा व्यक्ती म्हणजे या जगाचा प्रकाश आहे, उर्जा आहे, जीवन आहे. मला आशिया खंडात अशा प्रकारचे महनीय व्यक्तिमत्त्व भेटले आहे, त्यांचे नाव अरविंद घोष आहे.” हा प्रभाव मनात बाळगतच पॉल रिचर्ड्स जपान येथून फ्रान्सला परतले. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

ईश्वरी आदेशानुसार श्री. अरविंद घोष चंद्रनगर येथे पोहोचले होते. एक-दीड महिन्याच्या वास्तव्यानंतर, तशाच आणखी एका ‘आदेशा’नुसार, त्यांनी चंद्रनगर सोडले आणि S.S. Dupleix नावाच्या जहाजाने दि. ०१ एप्रिल रोजी ते द्वितीय श्रेणीमधून प्रवासास निघाले. ब्रिटिशांना त्यांच्या प्रयाणाचा सुगावा लागू नये, म्हणून त्यांचे वेगळ्याच नावाने तिकीट काढण्यात आले होते. प्रवासासाठी खासगी कक्षाची तिकिटे काढण्यात आली. गंतव्य ठिकाणही पाँडिचेरी न सांगता कोलोम्बो सांगितले, ते दिशाभूल करण्याच्या हेतूनेच! अशा रीतीने दि. ४ एप्रिल १९१० रोजी श्री. अरविंद घोष पाँडिचेरीला येऊन पोहोचले. या आदेशांविषयी खुलासा करताना ते एके ठिकाणी म्हणतात – ”….मी केवळ माझ्या आंतरिक मार्गदर्शकाचेच आदेश मानत आलो आणि ईश्वराच्या मार्गदर्शनानेच वाटचाल करत आलो. कारावासात असताना माझी जी आध्यात्मिक प्रगती झाली होती त्यानंतर तर तो माझ्या अस्तित्वाचा एक निरपवाद नियमच बनून गेला. मला जो आदेश प्राप्त झाला त्यानुसार आज्ञापालन करून, त्वरित कृती करणे मला आवश्यकच होते.”

पाँडिचेरीला आल्यानंतरही, ‘कर्मयोगिन्’मधील To my countrymen या त्यांच्या लेखाबद्दल त्यांना अटक करण्याचे वॉरंट निघाले पण ते लिखाण राष्ट्रद्रोही नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आणि वॉरंट मागे घेण्यात आले. ब्रिटिशव्याप्त इंडियाच्या हद्दीतून त्यांच्या निघून जाण्याने बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते. आणि म्हणून, आपण कोठे आहोत, कोणत्या कारणासाठी पाँडिचेरीला आलो आहोत आणि आता राजकारणाशी आपला संबंध कसा नाही याचे कथन करणारे जाहीर निवेदन त्यांनी सुप्रसिद्ध ‘द हिंदू’ (मद्रास) या वृत्तपत्रातून दि. ०८ नोव्हेंबर १९१० रोजी प्रकाशित केले.

पुढे अनेक वर्षानंतर अरविंद घोष यांनी आपल्या पाँडिचेरीला येण्याचे कारण स्वत: एका पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. त्यात ते लिहितात – “एका निश्चित उद्दिष्टासाठी मला मोकळीक आणि स्थिरचित्तता हवी होती म्हणून मी पाँडिचेरीला आलो, त्या उद्दिष्टाचा वर्तमान राजकारणाशी काही संबंध नाही – माझ्या येथे येण्यानंतर मी राजकारणामध्ये थेट सहभागी झालेलो नाही, आणि असे असूनसुद्धा मला माझ्या पद्धतीने या देशासाठी जे करता येणे शक्य होते ते मी कायमच करत आलो आहे – माझे ते उद्दिष्ट (योगसाधना) पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत कोणत्याही सार्वजनिक कृतिकार्यक्रमात पुन्हा सहभागी होणे मला शक्य होणार नाही. पाँडिचेरी ही माझ्या तपस्येची गुहा आहे; हे माझ्या आश्रमाचे स्थान आहे, हा आश्रम संन्यासमार्गी प्रकारचा नाही तर, माझ्या स्वतःच्या शोधामुळे त्याचा स्वतःचाच असा एक वेगळा ठसा निर्माण झाला आहे. मी (पाँडिचेरी सोडून) परत निघण्यापूर्वी मला माझे ते कार्य पूर्ण केलेच पाहिजे, आणि त्या दृष्टीने मी स्वत:ला आंतरिकरित्या सक्षम आणि सुसज्ज केलेच पाहिजे.” (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

(चंद्रनगरला केलेल्या प्रस्थानाची अरविंद घोष यांनी स्वत: सांगितलेली हकिकत…)

पोलिस खात्यातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून मला अशी माहिती मिळाली की, दुसऱ्या दिवशी माझ्या कार्यालयावर छापा घातला जाणार आहे आणि मला अटक करण्यात येणार आहे; ही माहिती मिळाली तेव्हा मी ‘कर्मयोगिन’च्या कार्यालयात होतो. (नंतर खरोखरच कार्यालयावर छापा घालण्यात आला पण माझ्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले नव्हते; तत्पूर्वीच पाँडिचेरीला जाण्यासाठी मी चंद्रनगर सोडले होते.) ही घटना घडण्यापूर्वी, मी माझ्या आजूबाजूला यासंबंधी काही तावातावाने चर्चा, शेरेबाजी चाललेली ऐकत होतो तेव्हाच आकस्मिकपणे मला वरून एक आदेश आला; तो आवाज माझ्या परिचयाचा होता, तीन शब्दांमध्ये तो आदेश देण्यात आला होता, “चंद्रनगरला जा.” अवघ्या दहापंधरा मिनिटांमध्ये चंद्रनगरला जाणाऱ्या बोटीत मी बसलो होतो. बागबजार किंवा इतरत्र कुठेही न जाता, मी तडक माझा नातेवाईक बिरेन घोष आणि मणी (सुरेशचंद्र चक्रवर्ती) यांच्यासमवेत चंद्रनगरला जाण्यासाठी बोटीवर चढलो, रामचंद्र मुजुमदार यांनी घाटाकडे जाण्याचा मार्ग दाखविला आणि तेथूनच त्यांनी आम्हाला निरोप दिला.

आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा अजून अंधारच होता; ते लगेचच सकाळी कलकत्त्याला परतले. मी तेथे गुप्तपणे माझ्या साधनेमध्ये निमग्न राहिलो आणि दोन वृत्तपत्रांबरोबर (कर्मयोगिन् आणि धर्म ही दोन साप्ताहिके) असलेला माझा सक्रिय संपर्क त्या क्षणापासून संपुष्टात आला.

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्री. अरविंद घोष यांची अलीपूरच्या कारावासातून सुटका झाली तो दिवस होता दि. ६ मे १९०९. आणि लगेचच म्हणजे दि. १९ जून रोजी त्यांनी ‘कर्मयोगिन्’ हे साप्ताहिक सुरु केले. राष्ट्रीय धर्म, साहित्य, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यावर भाष्य करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे साप्ताहिक सुरु केले होते. त्यामागची भूमिका त्यांच्याच शब्दांत जाणून घेणे उचित ठरेल…

ते लिहितात, “भारतीयत्व ही केवळ एक भावना आहे, अजूनही त्या विषयीचे ज्ञान नाहीये. काही निश्चित अशी धारणा वा सखोल मर्मदृष्टी नाहीये. अजून आपण आपल्या स्वत:ला जाणून घ्यावयाचे आहे, आपण कोण होतो, कोण आहोत आणि कोण असणार आहोत; आपण भूतकाळात काय केले आहे आणि आपण भविष्यामध्ये काय करण्याची क्षमता बाळगतो, आपला इतिहास काय, आपले कार्य काय याविषयी आपण अनभिज्ञ आहोत. ‘कर्मयोगिन्’ने हे ज्ञान प्रचलित करण्याचे पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे कार्य हाती घेतले आहे. वेदान्त असो वा सूफिवाद असो, मंदिर असो वा मशीद असो, नानक, कबीर, रामदास, चैतन्य किंवा गुरु गोविंद असोत, ब्राह्मण, कायस्थ आणि नामशूद्र असोत, कोणतीही राष्ट्रीय संपदा असो, मग ती अस्सल भारतीय असो किंवा आपण ती आपल्याप्रमाणे अनुकूल करून घेतलेली असो, ती ज्ञात करून घेणे आणि तिला तिचे योग्य स्थान देणे, तिची योग्यता ओळखणे हे ‘कर्मयोगिन्’ने आपले कार्य मानले आहे.

राष्ट्रीय जीवन आणि त्याचे भविष्य घडविण्यासाठी या राष्ट्रीय संपदेचा कसा उपयोग करून घेता येईल हे पाहणे हे आमचे दुसरे कार्य होय. त्यांचे भूतकाळाच्या तुलनेत यथार्थ मूल्यमापन करणे सोपे आहे पण भविष्यात त्यांना त्यांचे योग्य स्थान देऊ करणे हे अधिक कठीण आहे.

बाहेरचे जग आणि त्याचे आपल्याबरोबर असलेले नाते आणि त्यांच्याबरोबर आपण कसा व्यवहार ठेवावा हे जाणणे ही तिसरी गोष्ट आहे. आत्ताच्या घडीला आम्हाला हाच प्रश्न अधिक अवघड आणि प्रकर्षाने पुढे आलेला दिसतो परंतु त्यावरील उपाय हा इतर सर्वांच्या उपायांवर अवलंबून आहे.”

पुढे लवकरच म्हणजे दि ३१ जुलै रोजी त्यांनी “An Open Letter to My Countrymen” या नावाचा लेख ‘कर्मयोगिन्’मध्ये प्रकाशित केला, त्यानंतर पुन्हा एकदा अरविंदांच्या मागे ब्रिटिशांचा ससेमिरा लागला. आपल्याला पुन्हा केव्हाही अटक होऊ शकते, याची जाणीव असल्यानेच त्यांनी हा लेख लिहिलेला होता. मी पुन्हा परतून येऊ शकलो नाही तर हे माझे राजकीय इच्छापत्र आहे असे समजावे, असे त्यांनी या लेखामध्ये म्हटले होते. या लेखाच्या शेवटी सारांशरूपाने त्यांनी राजकीय कृतिकार्यक्रम काय असावा याची रूपरेषा मांडली होती.

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

कैदी म्हणून अलिपूर तुरुंगातील एका वर्षाच्या कारावासानंतर इ. स. १९०९ च्या मे महिन्यामध्ये जेव्हा अरविंद घोष निर्दोष सुटून बाहेर आले तेव्हा त्यांना आढळले की, संघटना विखुरली आहे; तिचे पुढारी तुरुंगावासामुळे, हद्दपार केल्यामुळे किंवा स्वत:हून अज्ञातवासात गेल्यामुळे विखुरले गेले आहेत तरीही पक्ष अजून तग धरून आहे पण तोदेखील मूक व चैतन्यहीन झाला आहे आणि कोणत्याही कठोर कृतीसाठी तो सक्षम राहिलेला नाही. भारतातील राष्ट्रवादी नेत्यांपैकी ते एकमेव नेते शिल्लक उरले होते त्यामुळे त्यांना राष्ट्रीयत्वाच्या पुनरुज्जीवनासाठी जवळजवळ एक वर्ष अगदी एकाकीपणे झगडावे लागले. त्यांच्या या प्रयत्नांना साहाय्य लाभावे म्हणून ते या कालावधीत ‘कर्मयोगिन्’ हे इंग्रजी साप्ताहिक तर ‘धर्म’ हे बंगाली साप्ताहिक प्रकाशित करत असत.

सरतेशेवटी अरविंदांच्या लक्षात आले की, त्यांची ध्येयधोरणे आणि त्यांचा कार्यक्रम प्रत्यक्षात आणण्याइतपत राष्ट्राची तयारी झालेली नाही. अलीपूर कारावासातील १२ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी जी पूर्णवेळ योगसाधना केली होती त्याचा परिणाम म्हणून, त्यांचे आंतरिक आध्यात्मिक जीवन, त्यांच्याकडून निरपवाद एकाग्रतेची मागणी करत होते. त्यामुळे त्यांनी निदान, काही काळासाठी तरी राजकीय क्षेत्रामधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

*

ब्रिटिश सरकार अरविंद घोषांना अटक करण्याच्या प्रयत्नात आहे, याची खबर भगिनी निवेदितांनी त्यांना दिली. आणि आता त्यांनी ब्रिटिश भारतामध्ये राहू नये, असा सल्लाही दिला होता, पण अरविंदांनी तो सल्ला मानला नाही.

पुढे ईश्वरी आदेशानुसार अरविंद फ्रेंच वसाहतीमध्ये असलेल्या चंद्रनगरला निघून गेले, तेव्हा ते संपादन करत असलेल्या ‘कर्मयोगिन्’ या इंग्रजी साप्ताहिकाची जबाबदारी आपल्या पश्चात निवेदितांनी घ्यावी, असा संदेश त्यांनी निवेदितांना पाठविला (आणि निवेदितांनीही ती जबाबदारी या प्रकाशनाच्या अखेरपर्यंत सांभाळली होती.) येथे अरविंदांच्या राजकीय जीवनाची परिसमाप्ती झाली होती. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

(अलीपूर बॉम्बकेस मधून अरविंद घोष यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली, त्यानंतर कलकत्त्यामधील उत्तरपारा येथे, धर्मरक्षिणी सभेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दि ३० मे १९०९ रोजी श्रीअरविंद यांनी जे भाषण केले, ते ‘उत्तरपाराचे भाषण’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्या भाषणात ते आपल्या कारावासातील दिवसांविषयी सांगत आहेत…)

”मी सुटून येणार हे मला माहीत होते. अटकेचे एक वर्ष एकांतवास व अभ्यास यासाठीच होते जणू. ‘ईश्वरा’च्या हेतुनुरुप जितका वेळपर्यंत राहणे आवश्यक होते त्यापेक्षा अधिक वेळपर्यंत मला कोण तुरुंगात ठेवू शकणार होते? ईश्वराने मला एक संदेश सांगण्यासाठी म्हणून दिला होता आणि माझ्यावर एक कार्य सोपविले होते; आणि जोपर्यंत मी तो संदेश पोहोचवीत नाही तोपर्यंत कोणतीही मानवी शक्ती मला गप्प बसवू शकणार नाही, हे मला माहीत होते. तसेच जोपर्यंत ते कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत ईश्वराच्या माध्यमाला कोणीही अडवू शकणार नाही, मग ते माध्यम कितीही दुर्बल असो वा लहान असो, हेही मला माहीत होते.

…ज्यावेळी मला पकडून लालबझार पोलीस ठाण्यावर नेण्यात आले तेव्हा क्षणभर माझी श्रद्धा डळमळीत झाली होती कारण, त्याच्या प्रयोजनाचा गाभा काय आहे ते मला समजेना. त्यामुळे क्षणभर मी स्तंभित झालो होतो आणि मी हृदयापासून ईश्वराप्रत टाहो फोडला आणि म्हणालो, ‘‘माझ्या बाबतीत हे काय घडले आहे? माझ्या देशातील लोकांकरता कार्य करण्यात जीवन व्यतीत करावे असे मी म्हणत होतो व ते कार्य पुरे होईपर्यंत तू माझे रक्षण करशील असा माझा विश्वास होता. तर मग मी येथे का? आणि असला आरोप माझ्यावर का करण्यात आला आहे?’’ एक दिवस गेला, दोन दिवस गेले, तीन दिवस गेले, नंतर माझ्या अंत:करणातून एक आवाज आला, ‘‘स्वस्थ रहा आणि पाहा.’’ तेव्हा मग मी शांत होऊन स्वस्थपणे वाट पाहू लागलो.

मला लालबझारहून अलीपूरला नेण्यात आले व एक महिन्याकरता लोकांपासून दूर अशा एकांत कोठडीत ठेवण्यात आले. तेथे मी माझ्या अंतरीच्या ईश्वराच्या आदेशाची अहोरात्र वाट पाहिली. ईश्वर मला काय सांगणार आहे, मला काय कार्य करायचे आहे हे समजावे म्हणून वाट पाहिली. या एकांतवासामध्ये मला अगदी सुरुवातीलाच ईश्वराचा साक्षात्कार झाला आणि पहिला पाठ मला मिळाला. त्या वेळेस मला आठवण झाली की, माझ्या अटकेच्या सुमारे एक महिन्यापूर्वी सर्व कार्य बाजूला ठेवून मी एकांतवासात जावे आणि ईश्वराशी अधिक सान्निध्य घडावे म्हणून, स्वत:मध्ये डोकावून पाहावे अशी मला आज्ञा झाली होती, पण मी दुर्बल ठरलो आणि ती आज्ञा स्वीकारू शकलो नाही. माझे तेव्हा चालू असलेले कार्यच मला जास्त प्रिय होते आणि हृदयातील अभिमानामुळे मला वाटले की, मी इथे नसेन तर कार्याचे नुकसान होईल, इतकेच नव्हे तर, त्यात अपयश येईल किंवा ते थांबेल; त्यामुळे मी ते कार्य सोडणार नाही. मला असे वाटते आहे, ईश्वर पुन्हा एकदा माझ्याशी बोलला आणि म्हणाला की, ‘‘जी बंधने तोडण्याचे सामर्थ्य तुझ्याकडे नव्हते ती तुझ्याकरता मी तोडली आहेत. कारण तू करत आहेस ते कार्य तसेच चालू रहावे, अशी माझी इच्छा नाही आणि तसा माझा कधीच हेतूदेखील नव्हता. मला तुझ्याकडून दुसरीच गोष्ट करून घ्यायची आहे. ती गोष्ट तुला स्वत:ची स्वत:ला शिकता येणार नाही म्हणून ती शिकवण्यासाठी मी तुला येथे आणले आहे. माझ्या कार्यासाठी तुला प्रशिक्षित करण्यासाठी म्हणून मी तुला येथे आणून ठेवले आहे.’’

… तुरुंगावरील अधिकाऱ्यांची मने त्याने माझ्याकडे वळविली आणि त्यांनी प्रमुख इंग्रजी तुरुंगाधिकाऱ्याला सांगितले, ‘‘या बंदिवासात त्याचे हाल होत आहेत; सकाळ संध्याकाळ निदान अर्धा तास तरी त्याला कोठडीबाहेर फिरू द्यावे.’’ त्याप्रमाणे व्यवस्था केली गेली आणि अशाप्रकारे एकदा बाहेर फिरत असताना ‘ईश्वरी’ शक्ती पुन्हा एकदा माझ्यात प्रविष्ट झाली. लोकांपासून मला दूर करणाऱ्या तुरुंगाकडे मी पाहिले, तेव्हा मला बंदिवान करणाऱ्या त्या तुरुंगाच्या उंच उंच भिंती नव्हत्या, तर ‘वासुदेवा’नेच मला वेढले होते. माझ्या बराकीसमोर असलेल्या वृक्षांच्या फांद्याखालून मी फिरत असे तेव्हा, तेथे तो वृक्ष नसून, तो साक्षात वासुदेवच आहे, माझ्यावर श्रीकृष्णच त्याची छाया धरून उभा आहे, असे मला जाणवत असे. मी माझ्या कोठडीच्या लोखंडी दरवाजांच्या गजांकडे पाहिले आणि तेथेही मला पुन्हा वासुदेवच दिसू लागला. तो नारायण पहारेकरी म्हणून उभा होता आणि माझे रक्षण करत होता. मला बिछाना म्हणून दिलेल्या खरबरीत कांबळ्यावर मी झोपलो तेव्हा श्रीकृष्णाच्या – माझ्या सख्याच्या, माझ्या प्रेमिकाच्या – बाहुंमध्ये मी पहुडलो असल्याचे मला जाणवले. ईश्वराने मला जी सखोल दृष्टी दिली त्याचा हा पहिला उपयोग होता. मी तुरुंगातील कैद्यांकडे, चोर-दरोडेखोरांकडे, खुनी माणसांकडे, ठग लोकांकडे पाहिले आणि पाहतो तर काय, मला वासुदेवाचे दर्शन झाले. मला त्या तमोमय जिवांमध्ये व दुर्वर्तनी शरीरांमध्येदेखील नारायणच दिसला.’’

खालच्या कोर्टात खटला सुरु होऊन, जेव्हा आम्हाला मॅजिस्ट्रेटसमोर उभे केले गेले तेव्हाही माझी ती अंतर्दृष्टी टिकून होती. तो मला म्हणाला, ‘‘जेव्हा तुला तुरुंगात टाकण्यात आले होते तेव्हा तू उद्विग्न होऊन, माझा धावा करत होतास आणि मला म्हणालास ना की ‘कुठे आहे तुझे संरक्षण?’ तर पाहा आता या मॅजिस्ट्रेटकडे, पाहा त्या फिर्यादी वकिलाकडे.’’ मी मॅजिस्ट्रेटकडे पाहिले आणि मला मॅजिस्ट्रेट न दिसता, त्यांच्याजागी वासुदेवच दिसू लागला. न्यायासनावर साक्षात नारायणच बसला आहे असे मला दिसू लागले. मी फिर्यादी वकिलाकडे पाहिले, तर तेथे मला खटल्याचे कामकाज चालविणारा वकील दिसले नाहीत तर त्यांच्याऐवजी श्रीकृष्णच तेथे बसलेला दिसला. माझा प्रेमी आणि माझा सखा तेथे बसला होता आणि माझ्याकडे पाहून स्मित हास्य करत होता. तो मला विचारू लागला, ‘‘अजूनही तुला भीती वाटते? अरे, सर्व माणसांच्या हृदयात मीच वसत आहे आणि त्यांचे आचार-विचार, त्यांची वाणी यांवर माझीच सत्ता चालते. मी तुझा पाठीराखा आहे, त्यामुळे तुला आता घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुझ्या विरुद्ध लावलेला हा खटला माझ्या हाती सोपवून दे. हा खटला तुझ्यासाठी नाही. या खटल्यासाठी मी तुला येथे आणलेले नाही, तुला येथे मी अन्य काही कारणासाठी आणले आहे. माझ्या कार्यासाठी हा खटला हे केवळ एक निमित्त आहे. त्याहून अधिक काही नाही.’’

आणि पुढे यथावकाश अरविंद घोष यांची निर्दोष सुटका झाली. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अलिपूरच्या कारावासात असताना अरविंद घोष यांनी ‘गीता’प्रणीत योगमार्गाची साधना केली आणि उपनिषदांच्या साहाय्याने ध्यान केले. केवळ याच ग्रंथांमधून त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांना कोणता एखादा प्रश्न पडला वा अडचण भेडसावली तर ते गीतेकडे वळत असत आणि बहुतेक वेळा त्यांना त्यातून उत्तर वा साहाय्य मिळत असे.

कारावासामध्ये असताना, एकांतात त्यांची जी ध्यानसाधना चालत असे त्या दरम्यान एक पंधरवडा त्यांना सातत्याने विवेकानंदांची वाणी ऐकू येत असे, त्यांची उपस्थिती जाणवत असे. आध्यात्मिक अनुभवाच्या एका विशिष्ट, मर्यादित परंतु अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्राबद्दल ती वाणी त्यांच्याशी बोलत असे आणि त्या विषयासंदर्भात जे काही सागंण्यासारखे होते ते सांगून पूर्ण झाल्याबरोबर ती वाणी लुप्त झाली होती.

विवेकानंदांनी आपल्याला अंतर्ज्ञानात्मक स्तर दाखवून दिला आणि त्यासंबंधी प्रशिक्षण दिले असे श्रीअरविंद यांनी पुढे एकदा शिष्यवर्गाशी बोलताना सांगितले होते. (क्रमश:)