‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

‘श्रीअरविंद आश्रमा’तर्फे फेब्रुवारी १९४९ मध्ये दोन नियतकालिके प्रकाशित होऊ लागली. एक म्हणजे Bulletin of Physical Education (शारीरिक शिक्षण विभागाचे वार्तापत्र), हे त्रैमासिक आणि दुसरे पाक्षिक मदर इंडिया. ‘बुलेटिन’ हा श्रीअरविंद आश्रमाच्या क्रीडा विभागाचा एक अविभाज्य भाग आहे. या क्रीडा विभागात आश्रमातील आबालवृद्ध सहभागी होतात. त्याची स्थापना श्रीमाताजींनी केली होती आणि त्या स्वतः या विभागाच्या उपक्रमांमध्ये, स्पर्धांमध्ये सहभागी होत असत. श्रीमाताजी इ. स. १९४० ते इ. स. १९५० या दशकामध्ये आश्रमाच्या मैदानावर आणि टेनिसकोर्टवर पुष्कळ वेळ व्यतीत करत असत. त्या उत्तम टेनिसपटू होत्या. त्या कालावधीमध्ये ‘बुलेटिन’साठी श्रीअरविंद यांनी आठ लेख लिहून दिले होते आणि ते त्यांचे अखेरचे गद्यलेखन होते. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंदांचा एकांतवासाचा काळ हा त्यांच्या भरघोस साहित्यनिर्मितीचा कालखंड होता. श्रीअरविंद १९३० सालच्या सुमारास, साधकांना उद्देशून प्रचंड मोठ्या प्रमाणात पत्रलेखन करत होते पण त्याचबरोबर ते विपुल प्रमाणात काव्यनिर्मिती आणि गद्यलेखनसुद्धा करत होते. या कालखंडामध्ये त्यांनी अनेक कविता, विशेषतः सुनीतं लिहिली आहेत, आणि पाँडिचेरीला प्रारंभीच्या दिवसांपासून ज्या ‘सावित्री’ महाकाव्याच्या लेखनाची सुरूवात झाली होती, त्या लेखनाने आता वेग घेतला होता.

श्रीअरविंदांच्या जीवनाच्या उत्तरार्धातील बराचसा काळ श्रीअरविंद ‘सावित्री’ या महाकाव्याचे लिखाण करत होते. ‘सावित्री’चे पहिले हस्तलिखित उपलब्ध आहे ते इ. स. १९१६ मधील. सुरुवातीच्या काळात एक वर्णनात्मक कविता असे त्याचे रूप होते. पण नंतर त्यावर अनेकदा संस्करणे करण्यात आली. श्रीअरविंदांनी त्याला व्यापक आणि अधिक गहन अर्थ प्रदान करत, त्या काव्याचे महाकाव्यात रूपांतर करण्याचे कार्य १९३० च्या सुमारास पुन्हा एकदा हाती घेतले. ‘सावित्री – एक आख्यायिका आणि एक प्रतीक’, हे महाकाव्य म्हणजे त्यांची सर्वाधिक महत्त्वाची साहित्यकृती ठरली. या महाकाव्याच्या परिष्करणाचे काम ते त्यांच्या अखेरच्या दिवसांपर्यंत करत होते. इ. स. १९४० च्या सुमारास जेव्हा त्यांची शारीरिक दृष्टी साथ देईनाशी झाली तेव्हा, निरोदबरन या त्यांच्या निकटवर्ती साधकाच्या मदतीने त्यांनी हे लिखाण पूर्ण केले. १९४६ सालापासून त्यातील काही भाग प्रथमतः प्रकाशित होऊ लागले. ‘सावित्री’ या महाकाव्याच्या पहिल्या भागाची पहिली आवृत्ती १९५० साली प्रकाशित झाली. श्रीअरविंदांच्या हयातीमध्ये हा संपूर्ण ग्रंथ प्रकाशित होऊ शकला नाही. त्यांच्या महासमाधीच्या पुढल्या वर्षभरात दुसऱ्या खंडाच्या रूपाने तो समग्रपणे प्रकाशित करण्यात आला.

श्रीअरविंदांनी निरोदबरन यांना लिहिलेल्या एका पत्रामध्ये नमूद केले आहे की, “आरोहणाचे (ascension) एक माध्यम या दृष्टीने मी ‘सावित्री’चे लेखन केले. एका विशिष्ट अशा मानसिक स्तरावरून मी त्याच्या लेखनास सुरुवात केली होती आणि प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी एका नव्या उंचीवर जाऊन पोहोचत असे तेव्हा तेव्हा त्या स्तरावरून मी त्याचे पुनर्लेखन करत असे… खरं सांगायचे तर, ‘सावित्री’ हे माझ्या दृष्टीने लिहून हातावेगळे करायचे काव्य नव्हे, तर व्यक्ती स्वतःच्या योगिक चेतनेमधून कोणत्या स्तरावरील काव्यनिर्मिती करू शकते आणि अशा प्रकारचे काव्य हे कसे सर्जक ठरू शकते, हा प्रयोग करण्याचे ते क्षेत्र आहे.”

…’सावित्री’चे सुमारे बारा वेळा पुनर्लेखन करण्यात आले. आणि या पुनर्लेखनाची दिशा डोक्याच्या वरील स्तरांकडे जाणारी होती. ‘अधिमानसिक’ (Overmind) काव्याच्या दिशेने चाललेला हा प्रवास होता.

१९३८ नोव्हेंबरमध्ये झालेल्या अपघातामधून श्रीअरविंद सावरू लागले होते, त्या कालावधीमध्ये ‘Life Divine’ (दिव्य जीवन) या ग्रंथाचे लिखाण करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली होती. १९३९ आणि १९४० सालांमध्ये दोन भागांमध्ये त्याच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले होते. त्यानंतर, Collected Poems and Plays, Vedic hymns to Agni, The Human Cycle and The Ideal of Human Unity, Sri Aurobindo’s Letters on yoga या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. परंतु एवढे प्रचंड लिखाण प्रकाशित होत असूनही, १९४० ते १९५० या दरम्यान त्यांच्या साहित्यनिर्मितीचा केंद्रबिंदू ‘सावित्री’ हाच होता. श्रीअरविंदांनी देह ठेवल्यानंतर चार वर्षांनी, म्हणजे दि. १५ ऑगस्ट १९५४ रोजी, ‘Savitri, a Legend and a symbol’ या ग्रंथाचे श्रीअरविंद आश्रमातर्फे प्रकाशन करण्यात आले. या महाकाव्यामध्ये २३८१३ पंक्ती (lines) असून, हे इंग्रजी भाषेतील सर्वांत मोठे दीर्घ-काव्य आहे.

श्रीअरविंद लिखित साहित्य आजवर ३६ खंडांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. त्याची पृष्ठसंख्या २१५०० च्या आसपास आहे, त्यावरून त्यांच्या लेखनाचा आवाका लक्षात येईल. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

भारतामध्ये स्वातंत्र्यासाठी संघर्ष चालूच राहिला. फेब्रुवारी १९४६ साली, बंगाल आणि इतर प्रांतांमध्ये उसळलेल्या हिंदु-मुस्लीम दंग्यांमुळे ज्याची जटिलता अधिकच वाढली होती. भारताच्या स्वातंत्र्याविषयीच्या वाढत्या मागणीला दिलेला प्रतिसाद म्हणून, हा देश सोडून जाण्याचा इरादा असल्याचे ब्रिटिश सरकारने जाहीर केले. दि. ०१ जुलै १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याचे विधेयक संसदेमध्ये पारित करण्यात आले; त्या विधेयकानुसार, सत्तासूत्रे भारतीयांच्या हाती देण्याची तारीख दि. १५ ऑगस्ट १९४७ असेल, असे ठरले.

दि. १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस श्रीअरविंद यांचा ७५ वा वाढदिवस होता. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला संदेश तिरूचिरापल्लीच्या ‘ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला. त्यातील हा अंशभाग…

१५ ऑगस्ट हा स्वतंत्र भारताचा जन्मदिवस. हा भारतासाठी जुन्या युगाचा अंत आणि नव्या युगाचा प्रारंभ असणार आहे. ही गोष्ट केवळ आपल्यापुरतीच महत्त्वाची आहे असे नाही, तर ती आशिया आणि अखिल विश्वासाठी देखील महत्त्वाची आहे. मानवतेचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भवितव्य निर्धारित करण्यामध्ये ज्या शक्तीचा मोठा वाटा असणार आहे, अशा एका नव्या शक्तीचा, अकथित अशी क्षमता असलेल्या एका नव्या शक्तीचा, राष्ट्रसमूहांमध्ये प्रवेश होत असल्याचे हे द्योतक आहे.

…या निमित्ताने, माझ्या बालपणी आणि तरुणपणी, माझ्यामध्ये ज्या ध्येयांची, आदर्शाची रुजवण झाली होती, त्या ध्येयांचा, आदर्शाच्या सार्थकतेचा प्रारंभ झालेला मला दिसत आहे, अशी व्यक्तीश: मी उद्घोषणा करू शकतो; कारण ही ध्येयधोरणं भारताच्या स्वातंत्र्याशी निगडित आहेत. ही ध्येयधोरणं म्हणजे माझ्या दृष्टीने भारताचे भावी कार्य आहे, हे असे कार्य आहे की, जेथे भारताने नेतृत्व स्वीकारणे आवश्यकच आहे. कारण मला नेहमीच असे वाटत आले आहे आणि तसे मी सांगत आलो आहे की, भारताचा उदय होतो आहे तो केवळ त्याचे स्वत:चे भौतिक हेतू म्हणजे त्याचा विस्तार व्हावा; महानता, शक्तिसामर्थ्य, समृद्धी ह्या गोष्टी त्याला साध्य व्हाव्यात म्हणून नाही, अर्थात त्याकडेही भारताने दुर्लक्ष करता कामा नये किंवा इतरांप्रमाणे इतरेजनांवर प्रभुत्व संपादन करावे म्हणूनही भारताचा उदय होत नाहीये तर ‘ईश्वरा’साठी, या जगतासाठी, अखिल मानव-वंशाला साहाय्य करण्यासाठी, त्यांचे नेतृत्व करण्यासाठी भारताचा उदय होतो आहे. ही ध्येयं आणि आदर्श त्यांच्या स्वाभाविक क्रमाने अशी होती :

१) भारताचे स्वातंत्र्य आणि भारताची एकात्मता ज्यातून साध्य होईल अशी क्रांती.
२) आशिया खंडाची मुक्ती आणि त्याचे पुनरुत्थान, मानवी सभ्यतेच्या प्रगतीमध्ये आशिया खंडाने आजवर जी थोर भूमिका निभावली होती त्याकडे त्याचे परतून येणे.
३) मानवजातीसाठी एका नूतन, अधिक महान, अधिक तेजस्वी आणि उदात्त अशा जीवनाचा उदय की, जे जीवन परिपूर्णतया साकारण्यासाठी बाह्यत: ते पृथगात्म अस्तित्व असणाऱ्या लोकसमूहांच्या आंतरराष्ट्रीय एकीकरणावर आधारित असेल; ते समूह त्यांचे त्यांचे राष्ट्रीय जीवन जतन करतील, त्याचे संरक्षणही करतील पण ते जीवन त्या सर्वांना एकत्रितपणे एका नियंत्रित आणि परम एकात्मतेकडे घेऊन जाणारे असेल.
४) भारताकडे असलेले आध्यात्मिक ज्ञान आणि जीवनाच्या आध्यात्मिकीकरणासाठी वापरण्यात येणारी साधने ही भारताची संपूर्ण मानवजातीला देणगी असेल.
५) सरतेशेवटी, उत्क्रांतीची एक नवीन पायरी, जी चेतनेचे उच्चतर पातळीवर उन्नयन करून, त्याद्वारे ती – मानवांनी जेव्हापासून विचार करायला आणि व्यक्तिगत परिपूर्णतेची व एका परिपूर्ण समाजरचनेची स्वप्न पाहायला सुरुवात केली तेव्हापासून मानवजातीला अस्तित्वविषयक ज्या अनेकानेक समस्यांनी गोंधळात टाकले होते, अस्वस्थ केले होते – अशा समस्यांचे निराकरण करायला सुरूवात करेल. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

१९४२ साली जेव्हा दुसरे महायुद्ध भारताच्या दिशेने अधिकाधिक सरकू लागले तेव्हा आश्रमापासून लांब राहत असलेले साधकही, श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या थेट संरक्षणाच्या छत्रछायेखाली पाँडिचेरीला येऊ इच्छित होते. अनेक साधकांना तशी परवानगीही देण्यात आली होती. काही साधकांनी तर येताना आपल्याबरोबर स्वतःच्या सर्व कुटुंबीयांनाच आश्रमात आणले. तोपर्यंत आश्रमातील लहान मुलांची संख्या अगदीच मर्यादित होती, त्याकाळी अगदी फार लहान वयाचे असे आश्रमात कोणीच नव्हते, परंतु आता मात्र त्यांची संख्या बऱ्यापैकी झाली होती आणि ती दिवसेंदिवस वाढत चालली होती. काही काळानंतर, त्यांच्या शिक्षणाची काही ना काहीतरी व्यवस्था लावणे आता आवश्यक होऊन बसले होते. त्यानुसार दि. ०२ डिसेंबर १९४३ रोजी श्रीमाताजींनी साधारणपणे वीस विद्यार्थ्यांसाठी एक शाळा सुरू केली.

तेव्हापासून, आजपर्यंत या शाळेमध्ये विविध शैक्षणिक प्रयोग करण्यात येत आहेत. येथे मुक्त प्रगती-शिक्षण प्रणाली (Free Progress Education System) अस्तित्वात आहे. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी प्रतिपादित केलेल्या समग्र शिक्षण (Integral Education) या शैक्षणिक तत्त्वज्ञानानुसार येथे शिक्षण दिले जाते. या शिक्षणाचे शारीरिक शिक्षण, प्राणिक शिक्षण, मानसिक शिक्षण, आंतरात्मिक शिक्षण, आध्यात्मिक शिक्षण हे पाच पैलू आहेत.

पुढे १९५१ मध्ये, पाँडिचेरी येथे एक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये श्रीअरविंद यांचे उचित स्मारक व्हावे या हेतूने ‘आंतरराष्ट्रीय विद्यापीठ केंद्र’ स्थापन करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार, दि. ०६ जानेवारी १९५२ रोजी श्रीमाताजींच्या हस्ते ‘श्रीअरबिंदो इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सेंटर’चे उद्घाटन करण्यात आले. १९५९ साली, त्याचे नाव बदलून ‘श्रीअरबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन’ असे करण्यात आले. येथे बालवाडीपासून महाविद्यालयीन स्तरापर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे.

शिक्षणाचे आंतरराष्ट्रीय केंद्र असल्याने जगभरातील विविध प्रांतांमधील विविध संस्कृतीचे प्रतिबिंब येथे दिसावे तसेच वैश्विक सांस्कृतिक समन्वयामध्ये प्रत्येक राष्ट्राने परस्पर सामंजस्य आणि मानवी एकात्मतेला चालना देण्यासाठी अद्वितीय योगदान द्यावे अशी येथे अपेक्षा आहे. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंद यांनी क्रिप्स यांच्या प्रस्तावाला संमती दिली होती कारण तो प्रस्ताव स्वीकारल्याने भारत आणि ब्रिटन यांना आसुरी शक्तींच्या विरोधात एकत्रितपणे उभे राहणे शक्य झाले असते आणि क्रिप्स यांची योजना स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणून उपयोगात आणता आली असती.

दि. ३१ मार्च १९४२ रोजी श्रीअरविंदांनी ब्रिटिश मुत्सद्याला पुढील संदेश पाठविला : मी तुमचे निवेदन ऐकले आहे. जरी मी आता राजकीय क्षेत्रात कार्यरत नसून आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलो, तरीसुद्धा, हा प्रस्ताव मांडण्यासाठी तुम्ही जे काही केले आहे त्याबद्दल एके काळचा एक राष्ट्रीय नेता आणि भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतला एक कार्यकर्ता या नात्याने, मी आपले अभिनंदन करू इच्छितो. भारताला त्याच्या स्वातंत्र्याबाबत आणि एकात्मतेबाबत, स्वतःसाठी काही ठरविण्याची आणि त्याला जे निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे त्याची सर्वार्थाने व्यवस्था लावण्याची आणि जगातील स्वतंत्र राष्ट्रांमध्ये स्वतःचे एक प्रभावशाली स्थान निर्माण करण्याची जी संधी देण्यात आली आहे तिचे मी स्वागत करतो. सारे मतभेद, सारे कलह बाजूला सारून, या योजनेचे स्वागत केले जाईल आणि त्याचा यथायोग्य उपयोग केला जाईल अशी मला आशा आहे. भारत आणि ब्रिटन यांमधील पूर्वीच्या संघर्षाची जागा मैत्रीपूर्ण संबंधांनी घेतली जाईल आणि ती एका महत्तर वैश्विक एकतेची पायरी असेल, ज्यामध्ये, भारत एक स्वतंत्र राष्ट्र या नात्याने, आपल्या आध्यात्मिक शक्ती साहाय्याने, समस्त मानवसमूहासाठी एक अधिक चांगले आणि आनंदी जीवन निर्माण करण्यासाठी योगदान देईल, अशीही मला आशा आहे. या भूमिकेतून, तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये काही मदत होणार असेल तर, मी जाहीरपणे माझा पाठिंबा देत आहे.

‘क्रिप्स’ योजना स्वीकारावी म्हणून श्रीअरविंद यांनी तत्कालीन काँग्रेस नेत्यांना तार पाठविली होती आणि त्यांच्यापर्यंत आपला संदेश पोहोचविण्यासाठी, वैयक्तिकरित्या एक दूत देखील पाठविला होता. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

क्रिप्स योजना नाकारली गेली आणि श्रीअरविंदांनी त्यांच्या परीने निष्काम कर्म करूनदेखील, आध्यात्मिक शक्तीचा उपयोग करून घेण्याच्या त्यांच्या मार्गाकडेच त्यांना पुन्हा वळणे आवश्यक ठरले होते. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंदांनी सुरुवातीला स्वतःला (दुसऱ्या) महायुद्धाशी सक्रियपणे जोडून घेतलेले नव्हते. पण हिटलर जेव्हा त्याच्या विरोधात असणाऱ्या सर्व शक्तींना चिरडून टाकणार आणि या जगावर नाझींचे वर्चस्व प्रस्थापित होणार, असे दिसू लागले तेव्हा मग, त्यांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली.

त्यांनी जाहीरपणे मित्रराष्ट्रांची (चीन, रशिया, इंग्लंड व अमेरिका) (Allies) बाजू घेतली, निधी गोळा करण्यासाठी जे आवाहन करण्यात आले होते त्याला प्रतिसाद म्हणून त्यांनी काही आर्थिक साहाय्यही देऊ केले होते तसेच सैन्यामध्ये प्रवेश करण्यासंबंधी किंवा युद्धासाठी जे प्रयत्न केले जात होते त्यामध्ये सहभागी होण्यासंबंधी त्यांचा सल्ला मागायला जी मंडळी त्यांच्याकडे येत असत त्यांना ते प्रोत्साहन देत असत.

येथे ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, श्रीअरविंदांनी जेव्हा जाहीरपणे मित्रराष्ट्रांची बाजू घेतली तेव्हा संपूर्ण भारत हा अगदी ठळकपणे विरोधी पक्षाला म्हणजे अक्ष (Axis) शक्तींना (जर्मनी, इटली, जपान) साहाय्य पुरविण्याच्या पक्षाचा होता. त्या काळी भारतीयांची ब्रिटिशविरोधी राष्ट्रीय भावना एवढी कडवी होती की, हिटलरचा प्रत्येक विजय हा आपला विजय आहे, असे त्यांना वाटत असे.

‘वंदे मातरम्’च्या दिवसांमध्ये भारताच्या स्वातंत्र्याविषयी जी धारणा श्रीअरविंदांच्या मनात होती ती १९४२ सालीसुद्धा तशीच कायम होती; परंतु त्यामुळे नाझी आक्रमणाच्या खऱ्या स्वरूपाकडे कानाडोळा करण्याइतके ते अंध झाले नव्हते.

हिटलर आणि नाझी यांच्या पाठीशी काळोख्या आसुरी शक्ती आहेत हे त्यांना दिसले आणि त्यांचा विजय म्हणजे अनिष्ट शक्तींच्या सत्तेची मानववंशाला करावी लागणारी गुलामी आणि परिणामतः उत्क्रांतिक्रमाची परागती, विशेषतः मानववंशाच्या आध्यात्मिक उत्क्रांतीला बसणारी खीळ! यातून केवळ युरोपच नाही तर आशियासुद्धा गुलामगिरीकडे ओढला गेला असता आणि भारताबाबत तर ही गुलामगिरी अधिकच भयावह ठरली असती, भारताने या पूर्वी कधीच अशी गुलामी अनुभवली नसेल अशी ती गुलामगिरी ठरली असती आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी आजवर जे प्रयत्न झाले होते ते सगळे विफल ठरले असते.

श्रीअरविंदांच्या सेवेमध्ये असणारे श्री. ए. बी. पुराणी यांनी लिहून ठेवले आहे की, ”नाझीवादाच्या धोकादायक राजवटीपासून मानवतेला वाचविण्याच्या कार्यासाठी श्रीअरविंद स्वतःची ऊर्जा कशी पणाला लावत होते, हे पाहणे हा एक अनमोल अनुभव होता. कोणत्याही फलाच्या किंवा बक्षिसाच्या अपेक्षेविना, किंबहुना आपण काय करत आहोत याची यत्किंचितही कल्पना दुसऱ्यांना येऊ न देता, मानवतेसाठी ठोस कार्य कसे करता येते, याचा तो एक आदर्श वस्तुपाठ होता. श्रीअरविंद जणू ईश्वरच बनून, ईश्वर या जगाची काळजी कशी घेतो, आणि तो खाली उतरून, मानवासाठी कसे कार्य करतो, हे स्वतःच्या उदाहरणाने प्रत्यक्ष दाखवून देत होते.

श्रीअरविंदांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर, – जे एकेकाळी, “केवळ अ-सहकार पुकारणारेच नव्हते तर ते ब्रिटिश साम्राज्यवादाचे कट्टर शत्रू होते,” असे – श्रीअरविंद आता, विन्स्टन चर्चिल यांच्या प्रकृतीसंबंधीचे वार्तापत्र कसे काळजीपूर्वक ऐकत असत आणि चर्चिल यांच्या तब्येतीची काळजी ते कसे वाहत असत, ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. ते ईश्वरी कार्य होते, ईश्वराने या जगासाठी केलेले ते कार्य होते.

युद्धाच्या बातम्या सातत्याने ऐकणे किंवा काही आर्थिक हातभार लावणे किंवा काही जाहीर विधाने करणे एवढ्यापुरताच श्रीअरविंदांचा सहभाग मर्यादित नव्हता. जेव्हा प्रत्येकजण इंग्लंडच्या तत्काळ पराभवाची आणि हिटलरच्या निश्चित विजयाची अपेक्षा बाळगून होते अशा वेळी, डंकर्कच्या क्षणापासून (मे १९४०) श्रीअरविंदांनी आपली आध्यात्मिक शक्ती आंतरिक रीतीने युद्धामध्ये लावली होती आणि तेव्हा त्यांना जर्मनीच्या वेगाने चाललेल्या विजयवारूला रोख लागल्याचे दिसून आले आणि युद्धाची लाट ही विरोधी दिशेने वळायला लागली असल्याचे दिसल्यावर त्यांना समाधान लाभले होते.

श्रीअरविंद त्यांची शक्ती त्यांच्या साधकांसाठी, त्यांचे आजारपण दूर करण्यासाठी, किंवा त्यांच्या साधनेमध्ये त्यांना साहाय्य करण्यासाठी बऱ्याच काळापासून उपयोगात आणत असत, हे आम्ही पाहिले आहे. परंतु आध्यात्मिक शक्तीची श्रेणी ही भौतिक अंतरावरून ठरविता येत नाही. श्रीअरविंद यांनी एकदा एका पत्रामध्ये लिहिले होते, ‘निश्चितच, माझी शक्ती ही केवळ आश्रम आणि आश्रमातील परिस्थिती एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. युद्धाची योग्य प्रगती होण्यासाठी आणि मानवी जगतामध्ये बदल घडून येण्यासाठी साहाय्य व्हावे यासाठी ती शक्ती मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली जात आहे, हे तुम्हाला माहीत आहे.’ योगसाधनेव्यतिरिक्त आश्रमाच्या कक्षाच्या पलीकडे ती वैयक्तिक कारणासाठीसुद्धा उपयोगात येत असे पण अर्थातच हे सारे कार्य शांतपणे आणि आध्यात्मिक कृतीच्या द्वारे केले जात असे.” (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

आता येथील आश्रमीय जीवन म्हणजे साधकांची साधना, त्यांचे कर्म, आणि त्याहून अधिक म्हणजे श्रीअरविंद आणि श्रीमाताजींची साधना या साऱ्या गोष्टी एका लयीमध्ये सुरू होत्या… अगदी २४ नोव्हेंबर १९३८ च्या दर्शनदिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत सारे काही सुरळीत चालू होते.

श्री. ए. बी. पुराणी (श्रीअरविंद यांचे निकटवर्ती अनुयायी) यांच्या शब्दांत सांगायचे तर, “दि. २४ च्या पहाटे, २.२० ते २.३० च्या दरम्यान श्रीमाताजींनी बेल वाजवली. मी जिन्यावरून धावतपळत वर जाऊन पोहोचलो तेव्हा मला सांगण्यात आले की, श्रीअरविंदांच्या पायाला अपघात झाला आहे आणि मी डॉक्टरांना बोलवावे. या अपघातामुळे त्यांच्या एकांतवासामध्ये बदल घडून आला आणि आता त्यांची देखभाल करणाऱ्या लोकांशी ते बोलू-भेटू लागले. येथे बारा वर्षांचा एक दीर्घ कालावधी सुरु झाला, ज्यामध्ये आंतरिक व बाह्य परिस्थितीनुसार कमीअधिक फरक करण्यात आला, आणि त्यामुळे त्यांना बाहेरच्या जगाशी सुद्धा थेट भौतिक संपर्क साधणे शक्य झाले.”

झालेल्या अपघातामुळे, २४ नोव्हेंबर आणि २१ फेब्रुवारी १९३९ ला त्यांचे दर्शन होऊ शकले नाही. साधकांच्या विनंतीला मान देत श्रीअरविंदांनी दि. २४ एप्रिल १९३९ ला विशेष दर्शन दिले, श्रीमाताजी १९२० साली जेव्हा पाँडिचेरीला कायमच्या वास्तव्यास आल्या तो हा दिवस होता. तेव्हापासून हा दिवस ‘दर्शनदिन’ म्हणून संबोधण्यात येऊ लागला.

अपघाताचा परिणाम म्हणून आता श्रीअरविंद यांनी साधकांबरोबरचा पत्रव्यवहार थांबविला होता. परंतु त्यांच्या बरोबरच्या संपर्काचे एक नवीनच रूप उदयाला आले. तो संपर्क आता अधिक मर्यादित होता पण तो अधिक निकटचा होता. या अपघातानंतर श्रीअरविंदांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईपर्यंत सहासात साधकांवर, (त्यामध्ये बहुतांशी डॉक्टर मंडळी होती) श्रीअरविंदांची देखभाल करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या कालावधीमध्ये या साधकांसमवेत श्रीअरविंद यांची अनेकानेक विषयांवर चर्चा होत असे. या चर्चामधूनच श्री. निरोदबरन लिखित ‘Twelve years with Sri Aurobindo’ या पुस्तकाची निर्मिती झाली. बरेचदा चालू जागतिक घडामोडींवर या चर्चा चालत असत. १९३९ मध्ये जेव्हा युरोपामध्ये युद्धाची घोषणा करण्यात आली तेव्हा श्रीअरविंद वर्तमानपत्र, नियतकालिकं आणि रेडिओच्या माध्यमातून युद्धाची खबरबात घेऊ लागले. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंदांनी डिसेंबर १९३८ मध्ये परत एकदा सांगितले की, ”साधना जेव्हा जडभौतिकामध्ये (physical) आणि अवचेतनेमध्ये (subconscient) खाली उतरली तेव्हा गोष्टी खूपच अवघड झाल्या. मला स्वतःला त्यासाठी दोन वर्षे संघर्ष करावा लागला कारण अवचेतन हे अतिशय जड असते, ते एखाद्या दगडासारखे जड असते. माझे मन ऊर्ध्वदिशेने जागृत असूनसुद्धा ते स्वतःचा कोणताही प्रभाव निम्नस्तरावर टाकू शकले नाही. हे भगीरथ परिश्रम होते, कारण जेव्हा व्यक्ती तेथे प्रवेश करते तेव्हा जणू काही अस्पर्शित प्रदेशामध्ये प्रवेश केल्यासारखे ते असते. पूर्वीचे योगी हे प्राणशक्तीपर्यंत खाली आलेले होते… पण मी माझे कार्य जर तेथेच सोडून दिले असते तर माझे खरे कार्य अपुरेच राहिले असते. जडभौतिकावर एकदा का विजय प्राप्त झाला की, माझ्यानंतर माझ्या मागून जे लोक या मार्गावर वाटचाल करतील त्यांच्यासाठी या गोष्टी सुकर होतील, यालाच ‘सर्वांमध्ये त्या एकमेवाद्वितीयाचा साक्षात्कार’ असे म्हणता येईल.” (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंद १९३४ साली एकदा सांगत होते की, “अतिमानसिक शक्ती (Supramental) अवतरत आहे. पण तिने अजूनपर्यंत शरीराचा किंवा जडद्रव्याचा ताबा घेतलेला नाही – कारण तेथे तिला अजूनही बराच प्रतिरोध आहे. अतिमानसिकीकरण झालेल्या ‘अधिमानसिक’ (Overmind) शक्तीचा जडद्रव्याला स्पर्श झालेला आहे आणि अधिमानसिक शक्तीचे आता कोणत्याही क्षणी अतिमानसामध्ये परिवर्तन होईल किंवा अतिमानसाला त्याच्या स्वतःच्या शक्तीनिशी कार्य करू देण्यासाठी, ही अधिमानसिक शक्ती जागा उपलब्ध करून देईल.’

या काळामध्येच आश्रमाच्या बाह्य जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून येत होते. १९२७ सालापासून १९३३ सालापर्यंत साधकांची संख्या आता चोवीस वरून एकशे पन्नासपर्यंत वाढलेली होती, आणि अजूनही वाढतच चाललेली होती. आलेल्या सर्व नवागतांना आश्रमाच्या विस्तार पावत चाललेल्या सेवांपैकी एखाद्या कामामध्ये सामावून घेतले जात असे – डायनिंग रूममध्ये असो, किंवा एखादे वर्कशॉप असेल, इमारत विभाग असेल, फर्निचरची सेवा असेल किंवा एखाद्या गोदामामध्ये असेल, प्रत्येकाला कोणते ना कोणते काम सोपविले जात असे. कर्माच्या माध्यमातून, तसेच ध्यान व भक्तीच्या माध्यमातून, श्रीमाताजींच्या थेट देखरेखीखाली साधकांची अगदी उत्कट साधना चालत असे. श्रीमाताजींच्या पाठीशी श्रीअरविंदांचा शांत आधार असे.

साधकांना श्रीअरविंदांचे थेट साहाय्य मिळण्याचे दोन मार्ग होते : एक म्हणजे त्यांचे दर्शन आणि दुसरा मार्ग म्हणजे त्यांच्याशी होणारा पत्रव्यवहार. १९२० च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये श्रीअरविंद काही साधकांना थोडी पत्रं लिहीत असत; तरीही १९३० सालापर्यंत साधकांनी त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे हा आश्रमाच्या साधनेचा एक नियमित भाग बनलेला नव्हता. “१९३३ सालापर्यंत श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्यापर्यंत साधकांच्या वह्या, पत्रं ढिगाने येऊन जमा होत असत आणि कित्येक रात्री महिन्यामागून महिने श्रीअरविंद साधक-साधिकांनी विचारलेल्या प्रश्नांना, मग ते प्रश्न अगदी उदात्त असू देत नाहीतर किरकोळ असू देत, उत्तरे देत असत. ही उत्तरे देण्यामध्ये त्यांचा दिवसाचा बराचसा वेळ आणि पूर्ण रात्र व्यतीत होत असे.

तात्काळ उत्तर न मिळाल्याने नाराज झालेल्या एका साधकाला उद्देशून श्रीअरविंद पत्र लिहीत आहेत, १९३३ साली लिहिलेल्या त्या पत्रामध्ये ते नमूद करतात की, ”सामान्य पत्रव्यवहार, असंख्य अहवाल या सगळ्यामध्ये मला बारा बारा तास खर्च करावे लागतात हे तुमच्या लक्षात येत नाही. दुपारी तीन तास आणि सकाळी ६ वाजेपर्यंत आख्खी रात्र मी यामध्ये गुंतलेला असतो.” साधकांबाबत आपल्याला जे कार्य करायचे आहे त्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग या दृष्टिकोनातून श्रीअरविंद या पत्रव्यवहाराकडे पाहत असत.

श्रीअरविंद म्हणतात ‘माझा हा पत्रव्यवहार म्हणजे माझ्या मुख्य हेतूच्या दिशेने नेणारे एक प्रभावी साधन होते आणि म्हणूनच मी त्याला इतके महत्त्व देत असे. प्रत्येकावर या पत्रव्यवहाराचा काही ना काही सकारात्मक परिणाम होत असे, त्याविषयी सांगून झाल्यावर श्रीअरविंद म्हणतात, ”अर्थातच हा केवळ पत्रवव्यहाराचा परिणाम होता असे नाही तर त्या पत्रव्यवहाराच्या पाठीमागे, जडभौतिक प्रकृतीवर ‘शक्तीचा’ जो दाब वाढत चाललेला होता, ती शक्तीच हे सारे करू शकत होती, परंतु तरीही त्यास एक योग्य वळण देणे आवश्यक होते आणि त्या पत्रव्यवहारातून तो हेतू साध्य झाला.”

श्रीअरविंदांच्या प्रकाशित झालेल्या पत्रव्यवहाराची पृष्ठसंख्या पाहिली तर ती संख्या दोन हजार छापील पृष्ठसंख्येपेक्षा जास्त आहे. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

‘अधिमानस’ आणि ‘अतिमानस’ यातील फरक स्पष्ट करताना श्रीमाताजी म्हणतात, पृथ्वी-रूपांतरणाचे एक आगळेवेगळे कार्य हे श्रीअरविंदांचे मुख्य कार्य आहे. मनाच्या वर चेतनायुक्त जिवाचे अनेकानेक स्तर आहेत, त्यामध्येच जे खरे दिव्य विश्व आहे, ज्याला श्रीअरविंदांनी ‘अतिमानस’ (Supermind) असे संबोधले आहे, ते सत्याचे विश्व आहे. परंतु त्या दरम्यान (पृथ्वी आणि अतिमानसिक विश्व यांच्या दरम्यान) ज्याला त्यांनी ‘अधिमानस’ (Overmind) म्हणून ओळखले होते ते वैश्विक देवदेवतांचे जगत आहे. आत्तापर्यंत आपल्या विश्वाचे शासन या ‘अधिमानसा’ने केले होते. स्वतःच्या प्रदीप्त अशा चेतनेमध्ये मनुष्याला अधिमानसाचीच प्राप्ती करून घेता येणे शक्य झाले होते. आणि तेच परमोच्च दिव्य आहे असे समजण्यात येत होते आणि आजवर जे कोणी तेथवर जाऊन पोहोचले होते त्यांच्या मनात, त्यांनी सत्य-चैतन्याला स्पर्श केला आहे, याविषयी तीळमात्रही शंका नव्हती. कारण सामान्य मानवी चेतनेच्या दृष्टीने याचे (अधिमानसाचे) वैभव एवढे महान असते, ते एवढे चमकदार असते की, त्यामुळे आपण अंतिमतः शिखरस्थानी असणाऱ्या सत्याप्रत पोहोचलो आहोत असे मानण्यास ते मनुष्याला प्रवृत्त करते. तथापि वास्तव हे आहे की ‘अधिमानस’ हे अस्सल ‘दिव्यत्वा’च्या पुष्कळ खाली आहे. ते सत्याचे खरेखुरे धाम नाही. तर इतिहासाच्या आरंभापासून माणसं ज्यांच्यापुढे नतमस्तक होत आली आहेत अशा पूर्वसुरींचे, सर्व सर्जक शक्तींचे आणि सर्व देवदेवतांचे ते क्षेत्र आहे. पण अस्सल दिव्यत्व आजवर आविष्कृत झालेले नाही आणि त्याने या पृथ्वी-प्रकृतीमध्ये रूपांतरण घडविलेले नाही. याचे कारण हेच की, आजवर ‘अधिमानसा’लाच ‘अतिमानस’ म्हणून समजण्याची चूक झाली. वैश्विक देवदेवता सत्य-चेतनेमध्ये पूर्णतः वसती करत नाहीत : तर त्या केवळ त्या ‘सत्य-चेतने’च्या संपर्कात असतात आणि त्या देवदेवता त्या वैभवाच्या प्रत्येकी एकेका पैलूचे प्रतिनिधित्व करत असतात.

….’अधिमानसा’मध्ये मानवतेचे दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतर करण्याची क्षमता नसते आणि ती त्याच्याकडे असूही शकत नाही. त्यासाठी, ‘अतिमानस’ हेच एकमेव प्रभावी मध्यस्थ आहे. आणि येथेच आमचा योग (पूर्णयोग) हा जीवनाचे आध्यात्मिकीकरण करू पाहणाऱ्या भूतकाळातील इतर प्रयत्नांपेक्षा वेगळा ठरतो. कारण ‘अधिमानसा’चे वैभव हे सर्वोच्च वास्तव नाही तर, मन आणि अस्सल ‘दिव्यत्व’ या दोहोंच्या दरम्यानची ती केवळ एक पायरी आहे, हे आमचा योग (पूर्णयोग) जाणतो. (क्रमश:)