(दिनांक : १९ जून १९०९)
आमच्या दृष्टीने हिंदुधर्म, सर्वात शंकेखोर आणि सर्वाधिक विश्वासार्ह आहे; तो शंकेखोर आहे असे म्हणण्याचे कारण की त्याने सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याने सर्वाधिक प्रयोग केले आहेत. तो सर्वाधिक विश्वासार्ह आहे असे म्हणण्याचे कारण की, त्याच्याकडे वैविध्यपूर्ण व सकारात्मक आध्यात्मिक ज्ञान आणि सखोल अशी अनुभूती आहे. असा हा विशाल ‘हिंदुधर्म’ म्हणजे केवळ एक मतप्रणाली वा मतप्रणालींचा समुच्चय नव्हे तर तो जीवन जगण्याची प्रणाली आहे. ‘हिंदुधर्म’ ही केवळ सामाजिक चौकट नव्हे तर तो भूतकालीन आणि भावी सामाजिक उत्क्रांतीचा आत्मा आहे. तो कशालाही नकार देत नाही, तर प्रत्येक गोष्टीच्या अनुभवावर व प्रयोग करण्यावर भर देतो; आणि अशा रीतीने एकदा का अनुभवांती व प्रयोगांती ह्या गोष्टींची पारख झाली की तो त्या साऱ्याची आत्मोद्धारासाठी योजना करतो. अशा या ‘हिंदुधर्मा’मध्येच भविष्यकालीन विश्वधर्माचा पाया आम्हास आढळतो. भारताच्या शाश्वत धर्मामध्ये वेद, वेदान्त, गीता, उपनिषदे, दर्शने, पुराणे, तंत्र असे अनेक धर्मग्रंथ येतात; हा धर्म ‘बायबल’ वा ‘कुराण’ यांचाही अव्हेर करीत नाही; पण त्याचा खराखुरा अधिकृत धर्मग्रंथ हा त्याच्या हृदयांत असतो की जेथे ‘ईश्वरा’चा निवास असतो. आमच्या स्वत:च्या आंतरिक आध्यात्मिक अनुभूतीमध्येच आम्ही जगातील ‘धर्मग्रंथां’चा स्रोत आणि त्याचा पुरावा शोधला पाहिजे; तेथेच आम्ही ज्ञानमार्ग, प्रेम व आचार आणि कर्मयोगाची प्रेरणा व पाया या गोष्टी शोधल्या पाहिजेत.
– श्रीअरविंद
(CWSA 08 : 26)
(दिनांक : १९ जून १९०९)
प्रत्येक व्यक्तीला, विशेषत: भारताचे, जगाचे, ‘ईश्वरा’चे कार्य करण्यास पुढे सरसावणाऱ्या तरुण पिढीला आमचे असे सांगणे आहे की, “जर तुमची मने युरोपियन कल्पनांनी भारलेली असतील, जर तुम्ही आपल्या जीवनाकडे केवळ भौतिक दृष्टीने पाहत असाल, तर वरील ध्येये तुम्ही स्वत:पुढे ठेवू शकणार नाही; ती साध्य करून घेणे तर दूरच. भौतिक दृष्टीने पाहिले असता तुम्ही कोणीच नाही परंतु, आध्यात्मिक दृष्टीने पाहता तुम्ही सर्वकाही आहात. भारतीय मनुष्यच केवळ सर्व गोष्टींवर खरा विश्वास ठेवू शकतो, कोणतेही कार्य करावयास धजतो, सर्वस्वाचा त्याग करू शकतो. पण त्याकरता प्रथम भारतीय व्हा. आपल्या पूर्वजांचा वारसा परत मिळवा. ‘आर्य’ विचार, ‘आर्य’ प्रणाली, ‘आर्य’ शील व ‘आर्य’ जीवन पुन्हा संपादन करा. ‘वेदान्त’, ‘गीता’, ‘योग’ ह्या गोष्टी पुनश्च प्राप्त करून घ्या. केवळ बुद्धीने अथवा भावनेने नव्हे, तर तुमच्या प्रत्यक्ष जीवनात त्या आत्मसात करा, त्यांचे आचरण करा. म्हणजे तुम्ही थोर, समर्थ, बलाढ्य, अजिंक्य आणि निर्भय व्हाल. जगण्याची किंवा मरणाची भीती तुम्हाला वाटणार नाही. अडचण आणि अशक्य हे शब्द तुमच्या शब्दकोषात राहणार नाहीत. कारण आपल्या आत्म्याच्या ठिकाणी जे सामर्थ्य असते ते शाश्वत असते. बाह्य साम्राज्य मिळविण्यापूर्वी हे तुमचे आत्मसाम्राज्य, आंतरिक ‘स्व-राज्य’ तुम्ही प्रथम परत मिळवा. तुमचे अंतरंग हे ‘मातृदेवते’चे निवासस्थान आहे. तिने तुम्हाला सामर्थ्य प्रदान करावे म्हणून तुम्ही ‘तिची’ प्रार्थना करावी यासाठी ती वाट पाहत आहे. ‘तिच्या’वर निष्ठा ठेवा, ‘तिची’ सेवा करा, तुमच्या सर्व इच्छा ‘तिच्या’ इच्छेशी एकरूप करा. तुमचा वेगळा असलेला अहं राष्ट्राच्या अहंमध्ये विसर्जित करून टाका. तुमचा विभक्त स्वार्थ मानवजातीच्या सेवेत विलीन होऊ द्या. तुमच्या अंत:करणातील सर्व सामर्थ्याचा मूळ स्रोतच हस्तगत करून घ्या. म्हणजे मग सामाजिक दृढता, बौद्धिक श्रेष्ठत्व, राजकीय स्वातंत्र्य, मानवी विचारांचे स्वामित्व, जगाचे नेतृत्व – सर्वकाही तुम्हाला दिले जाईल.”
– श्रीअरविंद
(CWSA 08 : 27-28)
(दिनांक : १९ जून १९०९)
मानवतेसाठी भारताच्या उभारणीमध्ये साहाय्यभूत होणे हे आमचे ध्येय आहे. हाच आमच्या राष्ट्रीयतेचा आत्मा असून, त्याला आम्ही मानतो आणि त्याचे अनुसरण करतो. आमचे मानवतेला असे सांगणे आहे की, “आता अशी वेळ आली आहे जेव्हा तुम्ही एक मोठे पाऊल उचलले पाहिजे आणि या भौतिक अस्तित्वाच्या वर उठून, ज्याकडे आता मानवता वळत आहे अशा अधिक उच्च, अधिक खोल व अधिक विशाल अशा जीवनाकडे वाटचाल केली पाहिजे. मानवजातीला भेडसावणाऱ्या समस्या ह्या आंतरिक साम्राज्यावर विजय प्राप्त करून घेऊनच सोडविता येतील; केवळ निसर्गाच्या शक्ती आरामदायक अशा सुखसोयींच्या सेवेत जुंपून ह्या समस्या सुटणार नाहीत; तर बाह्य प्रकृतीवर आंतरिक रीतीने विजय मिळवीत, माणसाचे बाह्य व आंतरिक स्वातंत्र्य सिद्ध करत, बुद्धी व आत्म्याच्या शक्तींवर प्रभुत्व मिळवूनच ह्या समस्या सोडविता येतील. या कार्यासाठी आशिया खंडाचे पुनरुत्थान गरजेचे असल्यामुळेच आशिया खंडाचा उत्कर्ष होत आहे. या कार्यासाठी भारताचे स्वातंत्र्य व त्याची महानता यांची आवश्यकता आहे आणि म्हणूनच भारत त्याच्या नियत अशा स्वातंत्र्याचा व महानतेचा दावा करीत आहे. आणि हा दावा मानवतेच्या भल्यासाठी आहे, यात इंग्लडला सुद्धा वगळलेले नाही, अशा या मानवतेच्या भल्यासाठी भारताने हा दावा प्रस्थापित केलाच पाहिजे.”
– श्रीअरविंद
(CWSA 08 : 27)
(दिनांक : १९ जून १९०९)
भारतामध्ये राष्ट्रनिर्माणाचे जे कार्य सुरु झाले आहे, ते इतक्या वेगाने, इतक्या सुस्पष्टपणे जगासमोर येत आहे की, त्यामुळे सर्वांनाच ही प्रक्रिया दिसू शकत आहे. आणि ज्यांच्यापाशी थोडी सहानुभूती आहे, अंतर्दृष्टी आहे ते ह्या दैवी रचनेची दिशा, त्यामध्ये कार्यकारी असणाऱ्या शक्ती, आणि त्यामध्ये उपयोगात आणले गेलेले साहित्य यामधील वेगळेपण पाहू शकत आहेत.
हे राष्ट्र म्हणजे प्रकृतीच्या कार्यशाळेमध्ये कच्च्या मालातून तयार झालेला नवीन वंश नव्हे किंवा हे राष्ट्र आधुनिक परिस्थितीमुळे निर्माण झाले आहे, असेही नव्हे. तर येथील संस्कृती ही, या पृथ्वीवरील महान संस्कृतींपैकी, प्राचीन वंशांपैकी एक आहे; दुर्दम्य प्राणशक्ती, महानतेची, सखोलतेची जणू खाणच, अद्भुत क्षमता असणारी, अशी ही संस्कृती; मानवी संस्कृतीच्या इतर प्रकारांपासून तसेच परकीय वंशप्रकारांपासून सामर्थ्याचे अगणित उगमस्त्रोत स्वत:मध्ये सामावून घेत, आता ती कायमसाठी एका सुसंघटित अशा राष्ट्रीय एकात्मतेमध्ये स्वत:चे उन्नयन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
आमच्या पुरातन कालापासून जो प्रयत्न आजवर आमचा वंश करत होता, तो प्रयत्न आता संपूर्णत: नवीन परिस्थितीमध्ये तो करेल. एखादा जाणकार निरीक्षक त्याच्या यशस्वितेचे भाकीत करू शकेल कारण जे काही महत्त्वाचे अडथळे होते ते दूर करण्यात आले आहेत किंवा ते दूर होण्याच्या प्रक्रियेत आहेत. परंतु आम्ही याही पुढे जातो आणि अशी खात्री बाळगतो की, यश मिळण्याची खात्रीच आहे कारण भारताची महानता, भारताची एकात्मता, आणि भारताचे स्वातंत्र्य ही आता संपूर्ण जगाचीच आवश्यकता बनली आहे.
ही अशी श्रद्धा आहे की, जिच्यामध्ये कार्य करण्यासाठी ‘कर्मयोगिन’ने (श्रीअरविंद यांनी सुरु केलेले इंग्रजी साप्ताहिक) हात घातला आहे आणि कितीही प्रचंड आणि वरवर पाहता कितीही दुस्तर संकटे का येईनात, त्यामुळे ‘कर्मयोगिन’ नाउमेद होणार नाही आणि त्या कार्यामध्ये चिकाटीने प्रयत्नशील राहील. ईश्वर आमच्या सोबत आहे आणि या श्रद्धेमुळेच आमचा विजय होईल असा आमचा विश्वास आहे.
आम्हाला अशी खात्री आहे की, मानवतेला आमची गरज आहे आणि मानवतेविषयीचे, आमच्या देशाविषयीचे, वंशाविषयीचे, आमच्या धर्माविषयीचे आमचे प्रेम आणि तिची सेवा, आमची अंत:करणे शुद्ध करेल आणि या लढ्यातील कृतीसाठी ती आम्हाला प्रेरित करेल.
– श्रीअरविंद
(CWSA 08 : 23-24)
(दिनांक : ११ एप्रिल १९०८)
राष्ट्र उभारणीसाठी स्वयंसहाय्यतेच्या तत्त्वाआधारे, आम्ही पुनरुत्थानाच्या ज्या काही योजना आखत आहोत, मग ते औद्योगिक पुनरुत्थान असो, शैक्षणिक पुनरुत्थान असो किंवा ती राजकीय पुनरुत्थानाची योजना असो ह्या सर्व योजना म्हणजे देश स्वतंत्र होण्यापूर्वी घडून यावयासच हवे अशा एका अधिक गहन पुनरुत्थानाची केवळ दुय्यम अंगे आहेत. ‘भारत माता’ आपल्याकडून कोणत्याही योजनांची, नियोजित आराखड्यांची किंवा कोणत्या पद्धतींची मागणी करत नाहीये. आपण तयार करू शकू त्यापेक्षा कितीतरी अधिक चांगल्या योजना, अधिक चांगले आराखडे, अधिक चांगल्या पद्धती ती आम्हाला देऊ करेल. ती आमच्याकडून आमची हृदये, आमची जीवने यांची मागणी करत आहे; याहून काही कमी नाही किंवा काही अधिकही नाही. ‘स्वदेशी’, ‘राष्ट्रीय शिक्षण’, ‘स्वराज्या’च्या उभारणीचा प्रयास ह्या सर्व बाबी म्हणजे तिच्याप्रत स्वत:ला समर्पित करण्याच्या केवळ अनेकानेक संधी आहेत. आपण ‘स्वदेशी’साठी किती प्रयत्न केले, आम्ही किती हुशारीने स्वराज्याची आखणी केली, आम्ही शिक्षणाची पुनर्रचना किती यशस्वितेने केली हे ती पाहणार नाही तर; आम्ही तिच्याप्रत स्वत:ला किती समर्पित केले, आम्ही आमच्यातील मूलद्रव्यं किती देऊ केली, आम्ही आमचे कष्ट, आमच्या सोयीसुविधा, आमची सुरक्षितता, आमची जीवने किती प्रमाणात देऊ केली, हे ती पाहणार आहे. पुनरुत्थान हा अक्षरश: पुनर्जन्मच असतो, आणि हा पुनर्जन्म बुद्धिने नाही, केवळ पैशाच्या मुबलकतेने नाही, केवळ धोरणांमुळे, योजनांमुळे, किंवा यंत्रणेमध्ये परिवर्तन घडविल्यानेही होत नाही तर, आम्ही आज जे काही आहोत ते सारेच्या सारे त्यागरूपी अग्निमध्ये भस्मसात करून, एक नवीन हृदय प्राप्त करून घेण्यामधून आणि ‘माते’च्या कुशीतून पुन्हा जन्माला येण्यातून होतो. स्व-परित्यागाची आमच्याकडून मागणी केली जात आहे. माता आम्हाला विचारत आहे, “तुमच्यापैकी किती जणं माझ्यासाठी जगायला तयार आहात? तुमच्यापैकी किती जणं माझ्यासाठी प्राणार्पण करायला तयार आहात?” आणि ती आमच्या उत्तराची वाट पाहात आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 1032-1033)
(दिनांक : १७ सप्टेंबर १९०६)
आपला इतिहास हा इतर लोकांच्या इतिहासापेक्षा अनेक बाबतीत भिन्न राहिलेला आहे. भारतीय लोकांची जडणघडण ही जगामध्ये एकमेवाद्वितीय अशी आहे. विविध जातीजमातींची लोकं एकत्रित आल्यामुळे, त्यांच्यामध्ये अभिवृद्धी होत होत राष्ट्रांचे विकसन होत गेले, ही आधीची प्रक्रिया होती. परंतु, भारत हा केवळ विविध जातीजमातींच्या एकत्र येण्याचे स्थान नसून, तो अशा विकसित राष्ट्रांच्या एकत्र येण्याचे स्थान आहे, की जी राष्ट्र सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या स्वत:च्या वाटांवरून विकसित होत गेली आहेत; त्यांना त्यांच्या त्यांच्या स्वत:च्या मूळ जाती आहेत आणि त्यांची त्यांची स्वत:ची अशी खास संस्कृती आहे. त्यामुळे, आगामी भारत राष्ट्राचे चारित्र्य आणि त्याची जडणघडण ही युरोपियन राष्ट्रांपेक्षा भौतिकदृष्ट्या पूर्ण वेगळी असेल; कारण तौलनिकदृष्ट्या विकसनाच्या अगदी अस्पष्ट अशा अवस्थेत असतानाच, अगदी सुरुवातीलाच, या राष्ट्रांच्या एकीकरणाची प्रक्रिया घडून आली होती. आपल्या बुरसटलेल्या विचारसरणीच्या राजकारण्यांना आणि सामाजिक सुधारणावादी लोकांना या वास्तवाचा विचार करण्यासाठी अजून पुरेसा अवधी मिळालेला दिसत नाही आणि अगदी आत्तादेखील, की जेव्हा आम्ही त्याकडे निर्देश केलेला आहे, अगदी शक्य तेवढ्या सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये ती गोष्ट मांडली आहे तरीदेखील, आपल्या बाल्यावस्थेतील राष्ट्रीय जीवनाची ही मूलभूत विशिष्टता ओळखण्यासाठी लागणारा धीर त्यांच्याकडे असेल, अशी आशाच आम्हाला वाटत नाही. ज्याला संघराज्य असे म्हणता येईल अशा दिशेने भारताची राष्ट्रीयत्वाची वाटचाल होत राहील, ती त्याद्वारे मूर्त रूप धारण करेल. ते वेगवेगळे राष्ट्रीयत्व असणाऱ्या, आणि संघटना व आदर्श या दोन्ही बाबतीत स्वत:चे वैशिष्ट्यपूर्ण घटक जतन करणाऱ्या राष्ट्रांचे एकीकरण असेल. ती राष्ट्रे इतरांमध्ये ज्या विचाराची वा चारित्र्याची उणीव आहे त्यांबाबत त्यांच्याशी संपर्क साधतील आणि सर्व मिळून एकत्रितपणे नागरिक आणि सामाजिक जीवनाच्या दृष्टीने, एकाच वैश्विक साध्याच्या दिशेने प्रगत होतील; ती राष्ट्रं आपापल्या ऐतिहासिक आणि पारंपरिक दिशेने त्याच साध्याप्रत हळूहळू प्रगत होत राहतील. आणि ती अशा रीतीने अनंतपणे आणि त्याचबरोबर तितक्याच अनंतकाळासाठी, एकमेकांच्या जवळजवळ येत असल्याने, जुन्या असो की नव्या, कोणत्याच एकच एक अशा विशिष्ट जीवनरूपामध्ये ती त्यांचे अस्तित्व पूर्णपणे गमावणार नाहीत. महान आणि महाप्रतापी अशा भारत राष्ट्रामध्ये एकत्रित येण्यासाठी भारतातील मुस्लिम, हिंदु, बौद्धधर्मीय, ख्रिश्चन यांनी त्यांचे त्यांचे ‘मुस्लिम’, ‘हिंदु’, ‘बौद्धधर्म’ किंवा ‘ख्रिस्ती’ धर्म सोडून देण्याची आवश्यकता नाही. स्वत:चे आदर्श आणि स्वत:चा समाज यांबद्दलची निष्ठा, तसेच समाजाच्या इतर घटकांच्या आदर्शाबद्दलची व संस्थांबद्दलची सहिष्णुता आणि आदर आणि सर्वांच्या सामायिक नागरीय जीवन व आदर्शाविषयी उत्कट प्रेम व आस्था ह्या गोष्टीच भारताच्या खऱ्या राष्ट्रउभारणीसाठी आता आपण विकसित केल्या पाहिजेत.
– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 168-169)
(दिनांक : ०६ नोव्हेंबर १९०९)
हिंदुत्वाला एकत्रित आणण्यासाठी केवळ दोनच गोष्टी पुरेशा समर्थ आहेत – एक अशी नवी आध्यात्मिक प्रेरणा की जी, वेदान्तावर आधारलेली असेल, मानवाच्या मूलभूत एकत्वावर भर देणारी असेल, …ती बंधुता, स्वातंत्र्य, समता यांच्या भव्यदिव्य आदर्शावर उभारलेली असेल आणि तिला भारतीय वंश तसेच हिंदु आध्यात्मिक संकल्पना आणि साधना यांच्या थोर कार्याची आणि दमदार भवितव्याची जाण असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, एक पुरेशी जोमदार राजकीय लाट की जी, त्या समाजाच्या रक्षणासाठी आणि त्याच्या उन्नतीसाठी सर्व हिंदूंना संघटित करू शकेल.
– श्रीअरविंद
(CWSA 08 : 302-303)
(दिनांक : ०६ नोव्हेंबर १९०९)
एकेकाळी ‘भारतीय’ एकता आणि सहिष्णुता यांच्याकडे कल असणारी ‘मोगल’ सत्ता पुढे जेव्हा दडपशाही करणारी आणि विघातक अशी बनली तेव्हा ती उलथून टाकणे हे राष्ट्रीय पुनरुज्जीवनाचे उद्दिष्ट होते आणि तेव्हा म्हणजे ‘शिवाजीमहाराज’ आणि ‘समर्थ रामदास’ यांच्या काळात ‘हिंदु’ राष्ट्रीयत्वाला काही एक अर्थ होता. हे त्याकाळी शक्य होते कारण ‘भारत’ तेव्हा स्वत:च एक जग असल्यासारखा होता आणि ‘महाराष्ट्र’ व ‘राजपुताना’, हे दोन भौगोलिक प्रांत पूर्णत: ‘हिंदु’ होते, त्यांनी याला भक्कम पाया पुरविला होता. ते आवश्यकही होते कारण ‘मोगल साम्राज्यवादी’ घटकांनी त्यांच्या सत्तेचा जो गैरवापर केला होता तो ‘भारता’च्या भवितव्यासाठी घातक होता आणि त्यांना दंडित करून, ‘हिंदु’चे पुनरुत्थान आणि वर्चस्व यांच्या आधारे त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकताच होती. आणि ते आवश्यक होते, शक्यही होते त्यामुळे ते अस्तित्वात आले. परंतु आधुनिक काळातील परिस्थिती विचारात घेता, भारत हा एकसंधपणेच अस्तित्वात राहू शकतो. एखाद्या राष्ट्राचे अस्तित्व हे त्याच्या भौगोलिक सीमांवर आणि भौगोलिक सघनतेवर, एक विशिष्ट, स्वतंत्र राष्ट्र असण्यावर अवलंबून असते. वंश, भाषा, धर्म, इतिहास यांमधील भेद अखेरीस भौगोलिक भिन्नत्वाच्या अस्तित्वामुळे निश्चितच विराम पावतील. ग्रेट ब्रिटन, स्वित्झर्लंड आणि जर्मनीमध्ये असेच झालेले आहे. भारतातदेखील तसेच होईल. परंतु भौगोलिक एकसंधतादेखील आवश्यक आहे. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, देश इतका एकसंध असला पाहिजे की परस्परांतील संवाद आणि केंद्रवर्ती शासनाचे संघटन हे सोपे झाले पाहिजे, किमान ते अवघड तरी होता कामा नये.
– श्रीअरविंद
(CWSA 08 : 304)
(सप्टेंबर १९०९)
देशभक्ती आणि राष्ट्रीय चेतना हे दोन विभिन्न गुण आहेत. देशभक्त त्याच्या मातृभूमीच्या सेवेच्या हर्षोन्मादामध्ये जीवन जगत असतो, तो तिचे सर्वत्र दर्शन घेतो, तो तिच्याकडे देवता म्हणून पाहतो. देशाच्या कल्याणासाठी केलेला यज्ञ या दृष्टिकोनातून तो त्याचे सर्व कार्य अर्पण करतो; त्याचे स्वत:चे हित हे देशाच्या हितामध्ये मिसळून गेलेले असते. एकोणिसाव्या शतकातील इंग्लिश लोकांमध्ये अशी भावना नव्हती कारण कोणत्याही पाश्चात्त्य ‘भौतिकतावादी’ राष्ट्रातील व्यक्तीच्या हृदयात कायमस्वरूपी ह्या भावना घर करून राहू शकत नाहीत. ‘इंग्रज’ भारतात आले ते त्यांच्या देशाच्या भल्यासाठी म्हणून नव्हे तर ते व्यापार करायला इथे आले, स्वत:साठी पैसा मिळवायला इथे आले. स्वत:च्या देशाविषयीच्या प्रेमापोटी त्यांनी भारत जिंकून घेतला नाही किंवा त्याची लूट केली नाही तर त्यांनी स्वत:च्या स्वार्थापोटी भारतावर विजय मिळविला. असे असूनदेखील, देशभक्ती नसूनसुद्धा, त्यांच्याजवळ राष्ट्रीय भावना होती; त्यांच्याजवळ एकप्रकारचा अभिमान होता की, “आमचा देश सर्वोत्तम आहे, आमच्या रीतीपरंपरा, आमचा धर्म, आमचे चारित्र्य, नैतिकता, सामर्थ्य, धैर्य, बुद्धिमत्ता, आमची मते आणि आमच्या देशाचे कार्य हे इतरांना ज्याचे अनुकरणही करता येणार नाही इतके परिपूर्ण आहे, इतके ते अप्राप्य आहे,” ते असा विश्वास बाळगत की, “माझ्या देशाच्या हितामध्ये माझे हित सामावलेले आहे, माझ्या देशाचे वैभव हे माझे वैभव आहे, माझ्या देशबांधवांची समृद्धी ही माझी समृद्धी आहे; केवळ माझ्याच वैयक्तिक उद्दिष्टांसाठी धडपडण्याऐवजी, त्याचबरोबर मी माझ्या राष्ट्राच्या हितासाठीदेखील प्रगत होईन; देशाचा सन्मान, त्याचे वैभव, त्याची समृद्धी ह्यासाठी झगडणे हे त्या देशाच्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे; हाच नायकाचा धर्म आहे; आणि गरज पडली तर या लढ्यामध्ये वीरमरण पत्करणे हाच त्याचा धर्म होय.” या कर्तव्य – भावनेमधून राष्ट्रीय चेतनेचे मुख्य वैशिष्ट्य दिसून येते. देशभक्ती ही प्रकृतीने सात्त्विक असते, तर राष्ट्रीय चेतना ही राजसिक असते. जी व्यक्ती स्वत:चा अहं हा देशाच्या ‘अहं’मध्ये विरघळवून टाकते ती आदर्श देशभक्त असते; स्वत:विषयी अहंकार बाळगत असतानादेखील जी व्यक्ती देशाच्या अस्मितेचाही परिपोष करत असते ती व्यक्ती राष्ट्रभान असणारी व्यक्ती असते. त्या काळातील भारतीयांमध्ये अशा राष्ट्रभानाची आवश्यकता होती. आमचे असे म्हणणे नाही की, त्यांना देशहिताची कधीच पर्वा नव्हती; पण जर का त्यांचे व्यक्तिगत हित आणि देशहित यांमध्ये यत्किंचित जरी संघर्ष निर्माण झाला तर ते नेहमी स्वहितासाठी देशहिताचा त्याग करत असत. आमच्या मते, एकात्मतेच्या अभावापेक्षाही अधिक घातक असा जर कोणता दोष असेल तर तो राष्ट्रीय चेतनेचा अभाव हा होय. मात्र संपूर्ण देशभरामध्ये जर सर्वत्र ही राष्ट्रीय चेतना पसरली तर, ही भूमी भेदाभेदांनी पिडीत झालेली असली तरीसुद्धा एकात्मता अनुभवेल.
– श्रीअरविंद
(CWSA 09 : 218-219)
(डिसेंबर १९०९)
‘आपली माता’ ह्या स्वरूपात आम्हाला देशाचे दर्शन घडत नाही, हा आपला मुख्य अडथळा आहे. आमच्यापैकी बहुतांशी राजकारणी ‘भारतमाते’चे पूर्ण आणि जवळून दर्शन घेण्यामध्ये अक्षम ठरले आहेत. रणजितसिंग किंवा गुरु गोविंद सिंग ह्यांना भारतमातेऐवजी ‘पंचनद्यां’च्या ‘भूमाते’चेच दर्शन झाले. शिवाजीमहाराज किंवा बाजीराव पेशवे यांना भारतमातेऐवजी, ‘हिंदूंची माता’ या स्वरूपात तिचे दर्शन झाले. इतर महाराष्ट्रीय मुत्सद्द्यांनी फक्त ‘महाराष्ट्रातील लोकांची माता’ या स्वरूपातच तिच्याकडे पाहिले. वंगभंगाच्या काळामध्ये, आम्हाला ‘बंगाल-माते’च्या स्वरूपात तिचे दर्शन होण्याचे भाग्य लाभले, ते एकात्मतेचे दर्शन होते आणि त्यामुळे बंगालची भावी एकात्मता आणि प्रगती सुनिश्चित आहे. पण ‘भारतमाते’ची एकात्म प्रतिमा अजूनही साकार व्हायची आहे. आम्ही काँग्रेसमध्ये ज्या ‘भारतमाते’चे स्तुतिगान करायचो, आराधना करायचो ती पाश्चात्त्य पेहरावातील, ब्रिटिश राजवटीची उपकारांच्या ओझ्याखाली दबलेली एक दासी होती, एक सखी होती, ती काल्पनिक मूर्ती होती, ती अदैवी (undivine) असा भ्रम होती. खरंच ती आमची माता नव्हती. पण त्याहीवेळी, एका निगूढ, धूसर अशा अंधारात लपून असलेली आमची ‘खरी माता’च आमचा आत्मा व आमचे अंत:करण वेधून घेत होती. ज्या दिवशी आपण भारतमातेची खरीखुरी अखंड प्रतिमा पाहू शकू, जेव्हा तिच्या सौंदर्याने आणि कृपाशीर्वादाने मोहित होऊन, आपण आपली जीवने तिच्या सेवेमध्ये मोठ्या आतुरतेने समर्पित करू, तेव्हा हा अडथळा दूर होईल आणि भारताची एकात्मता, स्वातंत्र्य आणि प्रगती ह्या गोष्टी साध्य करण्यास सोप्या झालेल्या असतील. भाषाभाषांमधील भेद हे तेव्हा आपल्यामध्ये दरी निर्माण करणार नाहीत. हिंदी भाषेचा मध्यस्थ भाषा म्हणून स्वीकार केल्याने, परंतु तरीही आपापल्या प्रादेशिक भाषांचा यथोचित सन्मान केल्याने, आपली अक्षमतेपासून सुटका होईल. ‘हिंदु-मुस्लीम’ संघर्षावरील खराखुरा उपाय शोधण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. ‘माता’ म्हणून देशाचे दर्शन होत नसल्यामुळे, या अडथळ्यांना भेदून जावे ही आस आमच्यामध्ये पुरेशा तीव्रतेने, गांभीर्याने जाणवत नाही. आणि म्हणूनच ते अडथळे भेदण्याचे मार्गही आम्हाला आजवर गवसलेले नाहीत आणि संघर्ष अधिकाधिकच उग्र रूप धारण करत चालला आहे. आम्हाला जर कशाची गरज असेल तर ती ‘भारतमाते’च्या खऱ्याखुऱ्या अखंड प्रतिमेची! पण, खऱ्याखुऱ्या दर्शनाऐवजी त्याच्या आभासालाच भुलून, जर का आपण केवळ हिंदुंची माता, किंवा हिंदु राष्ट्रवाद ही कल्पना जोपासली तर आपण पुन्हा एकदा त्याच जुन्या चुकांच्या भक्ष्यस्थानी पडू आणि ‘राष्ट्रवादा’च्या पूर्ण उन्मीलनापासून स्वत:ला वंचित ठेवू.
– श्रीअरविंद
(CWSA 09 : 225-226)
Categories
Pages
- E-books (for free download)
- HomePage
- अन्य लिंक्स
- अभीप्सा – २०१८
- अभीप्सा – २०१९
- अभीप्सा – २०२०
- अभीप्सा – २०२४ – नवीन
- अभीप्सा – २०२५
- अभीप्सा मासिकाची भूमिका
- तत्त्वज्ञान
- प्रतीक आणि त्याचा अर्थ
- माताजींचा हात सोडू नकोस
- मुख्य-लिंक्स
- व्यावहारिक जीवन
- श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या प्रथम भेटीचा अन्वयार्थ
- श्रीअरविंद यांची ग्रंथसंपदा
- श्रीअरविंदांचा अल्प परिचय
- श्रीमाताजींचा अल्प परिचय
- श्रीमाताजींची ग्रंथसंपदा
- संपर्क
- साधना
Updates साठी संपर्क
दर्शक संख्या







