तुम्ही जे काही किंवा ज्या कोणाला ‘ईश्वरा’वर सोपविता, त्या गोष्टीबाबत किंवा त्या व्यक्तीबाबत तुम्ही आसक्त राहता कामा नये किंवा चिंताग्रस्तदेखील राहता कामा नये, तर त्याबाबतीत सर्वोत्तम असे जे असेल ते करावे म्हणून आपण सारे काही ‘ईश्वरा’वर सोपवून दिले पाहिजे.

*

तुम्हाला या योगाची (पूर्णयोगाची) साधना करायची असेल तर आध्यात्मिक सत्य ग्रहण करणे आणि तुमच्या विचारांद्वारे, भावनांद्वारे, कृतींद्वारे आणि तुमच्या प्रकृतीद्वारे त्या सत्याचे आविष्करण करणे ही तुमची एकच एक इच्छा व अभीप्सा असली पाहिजे. तुम्ही कोणाही बरोबरच्या कोणत्याही नातेसंबंधांबद्दल आसक्ती बाळगता कामा नये. साधकाचे इतरांबरोबर असलेले नातेसंबंध हे साधकासाठी अंतरंगातून आलेले असले पाहिजेत, साधकाला जेव्हा खरी चेतना गवसलेली असेल आणि तो साधक जेव्हा प्रकाशात राहत असेल तेव्हा हे नाते निर्माण झाले पाहिजे. असे नातेसंबंध हे अतिमानसिक (supramental) सत्यानुसार, दिव्य जीवनासाठी आणि दिव्य कार्यासाठी, दिव्य मातेच्या शक्तीने आणि इच्छेने त्या साधकाच्या अंतरंगामधूनच निर्धारित केलेले असतील. हे नातेसंबंध त्याच्या मनाने आणि त्याच्या प्राणिक इच्छांनी निर्धारित केलेले असता कामा नयेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे.

श्रीअरविंद
(CWSA 31 : 320, CWSA 32 : 142)

व्यक्ती जेव्हा आध्यात्मिक जीवनात प्रवेश करते तेव्हा सामान्य प्रकृतीशी संबंधित असणारे कौटुंबिक बंध गळून पडतात – व्यक्ती त्या जुन्या गोष्टींबाबत तटस्थ होऊन जाते. ही तटस्थता म्हणजे एक प्रकारची मुक्तता असते. त्यामध्ये कटुता असण्याची अजिबात आवश्यकता नाही. जुन्या भौतिक जिव्हाळ्याचे बंध तसेच कायम राहणे म्हणजे सामान्य प्रकृतीला धरून राहण्यासारखे असते आणि त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीला अडसर निर्माण होतो.

*

कौटुंबिक बंध परस्परांमध्ये अनावश्यक व्यवहार निर्माण करतात. आणि ईश्वराकडे पूर्णतः वळण्याच्या मार्गात ते आड येतात. योगमार्गाचा अवलंब केल्यावर, शारीरिक चेतनेच्या सवयींवर आधारित किंवा शारीरिक नात्यांवर आधारित नातेसंबंध हे कमीत कमी असले पाहिजेत आणि ते साधनेवर अधिकाधिक आधारित असले पाहिजेत. म्हणजे हे नातेसंबंध जुन्याच दृष्टिकोनाचे किंवा सामान्य पद्धतीचे असता कामा नयेत; तर एका साधकाचे इतर साधकांशी असावेत तसे असले पाहिजेत, एकाच मार्गावरून प्रवास करणारे जीव असावेत त्याप्रमाणे किंवा एकाच मातेची मुले असावीत तसे असले पाहिजेत.

*

सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती हीच की, तुम्ही अंतरंगातून श्रीमाताजींकडे वळले पाहिजे आणि फक्त आणि फक्त त्यांच्याकडेच वळले पाहिजे. यास साहाय्य व्हावे म्हणूनच बरेचसे बाह्य संपर्क टाळणे आवश्यक ठरते. परंतु लोकांबरोबर असलेले सर्वच संपर्क टाळणे, हे अभिप्रेतही नाही किंवा त्याची आवश्यकताही नाही. जर कोणती गोष्ट आवश्यकच असेल तर ती हीच की, त्या संपर्कांमध्ये तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोकून न देता, तुमच्या संपर्कातील व्यक्तींना योग्य आंतरिक चेतनेनुसार भेटले पाहिजे. त्या पृष्ठवर्ती गोष्टी आहेत असे समजून त्यांना वागणूक दिली पाहिजे – त्यांच्याशी खूप सलगीने किंवा त्यांच्यामध्येच मिसळून गेल्याप्रमाणे वागता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 291, 291 & CWSA 32 : 459)

मैत्री किंवा स्नेह या गोष्टी योगामधून वगळण्यात आलेल्या नाहीत. ईश्वराशी असलेले सख्यत्व हे साधनेतील एक मान्यताप्राप्त नाते आहे. (आश्रमातील) साधकांमध्ये मैत्री आहे आणि त्याला श्रीमाताजींकडून प्रोत्साहनही दिले जाते. बहुसंख्य मानवी मैत्री ज्या असुरक्षित पायावर आधारलेली असते त्यापेक्षा अधिक भक्कम पायावर ती आधारलेली असावी, असा आमचा प्रयत्न असतो. हे असे याचसाठी आहे कारण मैत्री, बंधुता, प्रेम या पवित्र गोष्टी आहेत, अशी आमची धारणा आहे. आणि त्यामध्ये आम्हाला तसा बदल अपेक्षित आहे – प्रत्येक क्षणाला अहंकाराच्या क्रियांमुळे त्यांच्यामध्ये वितुष्ट आलेले आम्ही पाहू इच्छित नाही, प्राणाचा ज्या गोष्टींकडे कल असतो अशा आवेग, मत्सर, विश्वासघात या गोष्टींनी मैत्री, बंधुता, प्रेम या गोष्टी बिघडाव्यात, वाया जाव्यात किंवा उद्ध्वस्त व्हाव्यात, हे आम्ही पाहू इच्छित नाही. – त्या गोष्टी खऱ्या अर्थाने पवित्र आणि दृढ व्हाव्यात म्हणून त्यांची पाळेमुळे आत्म्यामध्ये रुजवायची आमची इच्छा आहे, ईश्वरत्वाच्या आधारशिलेवर आम्ही त्यांची उभारणी करू इच्छितो. आमचा योग हा संन्यासी योग नाही; शुद्धता हे त्याचे ध्येय आहे पण कठोर तपस्या हे ध्येय नाही. आम्ही ज्या सुमेळाची आस बाळगतो त्या सुमेळामध्ये मैत्री आणि प्रेम हे अपरिहार्य असे स्वर आहेत. हे काही पोकळ स्वप्न नाही, कारण अगदी अपूर्ण अशा परिस्थितीमध्येसुद्धा, मुळाशी हे अपरिहार्य घटक थोड्या प्रमाणात जरी असतील तरीदेखील ती गोष्ट (सुमेळ) शक्य आहे, हे आमच्या लक्षात आले आहे. ती गोष्ट अवघड आहे आणि जुने अडथळे अजूनही हट्टाने चिकटून आहेत. ध्येयाशी अविचल निष्ठा आणि अविरत प्रयत्न असल्याखेरीज कोणताच विजय प्राप्त होऊ शकत नाही. चिकाटीशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही.

*

योगामध्ये मैत्री टिकून राहू शकते पण आसक्ती किंवा तत्सम सामान्य जीवनाशी आणि चेतनेशी जखडून ठेवणारी, व्यग्र करणारी स्नेहबंधने मात्र गळून पडली पाहिजेत – मानवी नातेसंबंधांनी अगदी अल्प आणि दुय्यम स्थान घेतले पाहिजे आणि त्यांनी ईश्वराकडे व्यक्तीचा जो कल आहे त्यामध्ये ढवळाढवळ करता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 294-295)

श्रीमाताजी : हे जग म्हणजे संघर्ष, दुःखभोग, अडीअडचणी, ताणतणाव यांचे जग आहे; या सर्व गोष्टींनीच ते बनलेले आहे. ते अजूनपर्यंत बदललेले नाही; त्याला बदलायला अजून काही काळ जावा लागेल. आणि त्यामधून बाहेर पडण्याची एक शक्यता प्रत्येकापाशी असते. तुम्ही ‘परमेश्वरी कृपे’च्या उपस्थितीचा आश्रय घेतलात तर बाहेर पडण्याचा तोच एकमेव मार्ग आहे.

प्रश्न : मग, आता आम्ही काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे काम करत आहात. पण मानवी प्रशंसेची अपेक्षा बाळगू नका, कारण एखाद्या गोष्टीची प्रशंसा कशाच्या आधारावर करायची हेच माणसांना माहीत नसते आणि त्यातही, जेव्हा त्यांना त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असे काही आढळते, तेव्हा त्यांना ते आवडत नाही.

प्रश्न : पण मग यासाठी ताकद कुठून मिळवायची?

श्रीमाताजी : तुमच्याच अंतरंगामधून! तुमच्यामध्ये ‘ईश्वराची उपस्थिती’ आहे, ती तुमच्यामध्येच असते. मात्र तुम्ही तिचा शोध बाहेर घेता, आत पाहा. ती तुमच्यामध्येच आहे. त्याची उपस्थिती तेथे आहेच. तुम्हाला सामर्थ्य मिळावे, ताकद मिळावी म्हणून इतरांनी तुमची प्रशंसा करावी, अशी तुमची अपेक्षा असते; पण तशी प्रशंसा तुम्हाला कधीही लाभणार नाही. ती ताकद तुमच्या स्वतःच्या अंतरंगातच आहे. तुमची जर इच्छा असेलच तर, तुम्हाला परमोच्च ध्येय, परमोच्च प्रकाश, परमश्रेष्ठ ज्ञान, परमप्रेम असे जे जे काही भासते त्याची तुम्ही आस बाळगू शकता – अन्यथा तुम्ही त्यांच्याशी कधीच संपर्क साधू शकणार नाही. तुम्ही जर तुमच्या अंतरंगात पुरेसे खोलवर गेलात तर तुम्हाला त्या गोष्टी तेथे आढळतील; तेथे सरळ वर जाणारी एक ज्योत तेवत असलेली तुम्हाला आढळेल.

आणि ही गोष्ट करणे फार अवघड आहे असे समजू नका. ती तशी अवघड वाटते याचे कारण दृष्टी ही कायमच बहिर्मुख असते आणि म्हणून तुम्हाला ईश्वराची उपस्थिती जाणवत नाही. पण, आधार शोधण्यासाठी कोठेतरी बाहेर पाहण्यापेक्षा, तुम्ही जर एकाग्र झालात आणि प्रार्थना केलीत – त्या परमश्रेष्ठ ज्ञानाप्रत आतून प्रार्थना केलीत – प्रत्येक क्षणी काय केले पाहिजे हे जाणण्यासाठी, ते करण्याचा मार्ग शोधण्यासाठी प्रार्थना केलीत आणि पूर्णत्व प्राप्त करून घेण्याच्या हेतुने तुम्ही जे जे काही करता त्या साऱ्या गोष्टी आणि तुमचे सर्वस्व प्रदान केलेत तर, तुम्हाला तो आधार तुमच्या अंतरंगामध्येच असल्याचे, तो सदासर्वदा तुम्हाला मार्गदर्शन करत असल्याचे जाणवेल. आणि जर का काही अडचण उद्भवली तर, झगडा करत बसण्याची इच्छा बाळगण्यापेक्षा, त्या परमश्रेष्ठ प्रज्ञेनेच ती अडचण सोडवावी म्हणून तुम्ही ती अडचण त्या प्रज्ञेकडे सोपवा. जर तुम्ही पूर्णपणे समर्पित झालात तर, मग तो तुमच्या काळजीचा विषय राहत नाही. तर तो ‘परमेश्वरा’चा विषय बनतो, त्याने ती अडचण स्वतःकडे घेतलेली असते आणि त्या अडचणीबाबतीत काय केले पाहिजे हे कोणाहीपेक्षा अधिक चांगल्या रीतीने त्याला कळत असते. हा एकमेव मार्ग आहे, हाच एकमेव मार्ग आहे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 399-400)

आंतरिक एकाकीपण हे केवळ ईश्वराशी एकरूप होण्याच्या आंतरिक अनुभूतीतूनच दूर होऊ शकते. कोणतेही मानवी संबंध ती पोकळी भरून काढू शकत नाहीत. त्याच प्रकारे, आध्यात्मिक जीवनासाठी, इतरांशी असलेला सुसंवाद हा मानसिक आणि प्राणिक संबंधांवर आधारित असता कामा नये तर, दिव्य चेतना आणि ईश्वराशी ऐक्य यांच्यावर आधारित असला पाहिजे. जेव्हा व्यक्तीला ईश्वर गवसतो आणि व्यक्ती ईश्वरामध्ये इतरांना पाहू लागते तेव्हा, खरा सुसंवाद घडून येतो. दरम्यानच्या काळात, ईश्वरी ध्येयाबाबतच्या समान भावनेच्या पायावर आणि आपण सारी एकाच मातेची लेकरे आहोत, या भावनेच्या पायावर सदिच्छा आणि एकोपा साधता येणे शक्य आहे. आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक पायावरच खराखुरा सुसंवाद निर्माण होणे शक्य असते.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 310-311)

साधक एकमेकांपासून पूर्णतः अलिप्त असले पाहिजेत आणि त्यांच्यात विळ्याभोपळ्याचे नाते असले पाहिजे, ही जी पूर्वापार चालत आलेली कल्पना आहे, तिचा त्याग केलाच पाहिजे. ‘निर्वाण’ हे ध्येय मानणाऱ्या परंपरागत समजुतीमधून ही कल्पना उदयाला आली असावी; परंतु ‘निर्वाण’ हे येथील उद्दिष्ट नाही. संघर्ष नव्हे, तर सुसंवाद हा योगमय जीवनाचा धर्म असतो. जीवनामध्ये ‘ईश्वरा’ची परिपूर्ती हे येथील ध्येय आहे आणि त्यासाठी एकता व ऐक्य या गोष्टी अनिवार्य आहेत…

…सारे काही ‘ईश्वरा’मध्ये आणि ‘ईश्वरा’भोवती केंद्रित झालेले असले पाहिजे आणि साधकांचे जीवन हे त्याच दृढ पायावर आधारलेले असले पाहिजे, साधकांच्या वैयक्तिक नातेसंबंधांच्या केंद्रस्थानीदेखील ‘ईश्वर’च असला पाहिजे. इतकेच नव्हे तर, सारी नाती ही प्राणिक पाया ओलांडून, आध्यात्मिक पायावर उभारली गेली पाहिजेत, ज्यामध्ये प्राण हा आध्यात्मिकतेचे केवळ एक रूप आणि साधन असेल. – याचा अर्थ असा की, परस्परांचे परस्परांशी कोणतेही नातेसंबंध असले तरी त्या नात्यांमधून मत्सर, संघर्ष, तिरस्कार, तिटकारा, द्वेष आणि इतर साऱ्या वाईट प्राणिक भावनांचा त्याग केला पाहिजे कारण त्या भावना आध्यात्मिक जीवनाचा भाग असू शकत नाहीत. त्याचप्रमाणे, जे प्रेम केवळ अहंकारासाठीच प्रेम करते आणि ज्या क्षणी अहंकार दुखावला जातो व असमाधानी होतो तेव्हा, जे प्रेम नाहीसे होते किंवा जे प्रेम द्वेष आणि तिरस्कारांचा परिपोष करते, अशा प्रकारचे अहंकारात्मक प्रेम आणि आसक्ती या साऱ्या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत. प्रेमामागे एक खरेखुरे जिवंतपण आणि टिकाऊ एकत्व असलेच पाहिजे. अर्थात हे गृहीतच आहे की, लैंगिक अशुद्धीसारख्या गोष्टीसुद्धा नाहीशा झाल्याच पाहिजेत.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 288-289)

(आश्रमात वास्तव्यास येऊ पाहणाऱ्या एका साधकास उद्देशून श्रीअरविंदांनी लिहिलेले पत्र…)

तुम्हाला या योगाचे (पूर्णयोगाचे) तत्त्व समजलेले दिसत नाही. पूर्वीचा योग सर्वस्व त्यागाची अपेक्षा करत असे; त्यामध्ये या भौतिक जीवनाच्या त्यागाचादेखील समावेश असे. हा योग (पूर्णयोग) मात्र त्या ऐवजी एका नवीन आणि रूपांतरित जीवनाला आपले लक्ष्य मानतो. हा योग मन, प्राण आणि शरीर यांमधील इच्छा आणि आसक्ती यांचा अत्यंत कठोरपणे संपूर्ण त्याग करण्यावर भर देतो. चैतन्याच्या सत्यामध्ये जीवनाची पुनर्स्थापना करणे आणि या हेतुसाठी, आपण जे काही आहोत आणि आपण मन, प्राण, शरीर यांद्वारे जे काही करतो त्या साऱ्याची रुजलेली पाळेमुळे, मनाच्याही वर असणाऱ्या महत्तर चेतनेमध्ये रुपांतरित करणे, हे या योगाचे उद्दिष्ट आहे. याचा अर्थ असा की, या नवीन जीवनामध्ये सारे संबंध हे आध्यात्मिक आत्मीयतेवर आणि आपल्या सद्यकालीन संबंधांना आधार पुरविणाऱ्या सत्यापेक्षा एका निराळ्या सत्यावर स्थापित केले पाहिजेत. उच्चतर हाक येताच, ज्यास स्वाभाविक संग (affections) असे संबोधण्यात येते त्या सर्व संगाचा त्याग करण्याची व्यक्तीची तयारी असली पाहिजे. आणि जरी ते तसेच ठेवण्यात आले तर ते त्यांच्यातील बदलांनिशीच ठेवले जाऊ शकतील; की जे बदल त्यांच्यात आमूलाग्र रुपांतर घडवून आणतील. पण त्या संबंधांचा परित्याग करायचा की ते कायम ठेवायचे व परिवर्तित करायचे या गोष्टी व्यक्तिगत इच्छांनुसार ठरविता कामा नयेत, तर ऊर्ध्वस्थित असणाऱ्या सत्याद्वारेच त्या निर्धारित केल्या गेल्या पाहिजेत. सारे काही या ‘योगाच्या परमश्रेष्ठ स्वामी’वर सोपविले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 369)