समर्पण – ३८
मांजराचे पिलू हे त्याच्या आईला घट्ट धरून ठेवत नाही, तर त्याच्या आईनेच त्याला घट्ट धरून ठेवलेले असते; त्यामुळे त्याला कोणतीच भीती नसते किंवा त्याच्यावर कोणतीच जबाबदारी नसते; त्याला काहीच करावे लागत नाही. कारण आईने त्याला घट्ट धरावे म्हणून त्याने फक्त ‘मा मा’ असा आकांत केलेला असतो. जर तुम्ही हा समर्पणाचा मार्ग पूर्णत: आणि प्रामाणिकपणाने आचरणात आणलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या निर्माण होणार नाही.
*
‘मांजराच्या पिल्लाच्या वृत्तीचे अनुकरण करा,’ हे सांगणे खूप सोपे आहे परंतु ते प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हे तितकेसे सोपे नाही, हे लक्षात घ्या. एकदा का मांजराच्या पिल्लाची वृत्ती धारण केली की मग कोणतेही व्यक्तिगत प्रयत्न करायला नकोत, असे तुम्ही समजता कामा नये. कारण मनुष्य हा काही मांजरीचे पिल्लू असू शकत नाही.
…मानवी मनाचे अद्भुत कार्य नेहमीच चालू असते; या मनाला निरीक्षण करणे, टिका करणे, विश्लेषण करणे, शंका उपस्थित करणे, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी खूप आवडत असतात. …परंतु मांजराचे पिल्लू मात्र विचार करत बसत नाही. ते विचारादी गोष्टींपासून मुक्त असते आणि त्यामुळे त्याला तसे वागणे खूप सोपे असते.
तुम्ही कोणताही मार्ग अनुसरा, परंतु जोपर्यंत ईश्वराशी तादात्म्य होत नाही तोपर्यंत व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता असतेच असते. त्या तादात्म्याच्या क्षणी मात्र, जीर्ण वस्त्रं गळून पडावीत त्याप्रमाणे सारे प्रयास गळून पडतात, तुम्ही जणू काही एक वेगळीच व्यक्ती बनता : एकेकाळी जे तुम्हाला अशक्यप्राय वाटत असे, ते आता तुम्हाला शक्य होते आणि ते केवळ शक्यच होते असे नाही, तर ते तुमच्यासाठी अपरिहार्य बनते, कारण तुम्ही त्याविना इतर काही करूच शकत नाही.
तुम्ही सतर्क, शांत राहिले पाहिजे, आणि आंतरिक प्रेरणेची प्रतीक्षा केली पाहिजे; बाह्य प्रतिक्रियांमधून तुम्ही कोणतीही कृती करता कामा नये; सातत्याने, नियमितपणे, वरून येणाऱ्या प्रकाशाद्वारेच तुमचे संचालन झाले पाहिजे. त्याच प्रकाशाच्या प्रेरणेने प्रेरित होऊन तुम्ही कृती केली पाहिजे, इतर कोणत्याही प्रेरणेने नाही.
…कोणताही प्रतिप्रश्न न करता, कोणतीही शंका उपस्थित न करता, तुम्ही आंतरिक निश्चिततेने कृती केली पाहिजे कारण आता तो निर्णय हा तुमच्याकडून आलेला नसतो, तर तो वरून आलेला असतो. ही गोष्ट एखाद्याच्या बाबतीत लवकर घडेल किंवा दुसऱ्या एखाद्याला मात्र यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागेल – ते त्या त्या व्यक्तीच्या पूर्वतयारीवर, तसेच इतर बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. तुम्ही आस बाळगली पाहिजे आणि ती आस चिकाटीने बाळगली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही धीर सोडता कामा नये किंवा धैर्य खचू देता कामा नये.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 05) (CWM 04 : 94-95)
साधना, योग आणि रूपांतरण – २२७ सर्वसाधारणपणे आपण अज्ञानामध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला ‘ईश्वर’…
साधना, योग आणि रूपांतरण – २२६ व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन…
साधना, योग आणि रूपांतरण – २२५ साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२४ अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२३ (‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला…
साधना, योग आणि रूपांतरण – २२२ आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व…