ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

श्रीमाताजी : तुम्ही तुमचे सर्व नातेसंबंध हे तुमच्या आंतरिक निवडीच्या स्वातंत्र्यानुसार नव्याने निर्माण केले पाहिजेत. तुम्ही ज्या परंपरेमध्ये जन्माला आला आहात किंवा मोठे झाला आहात ती परिस्थिती तुमच्यावर वातवारणाच्या दबावाने किंवा सामान्य मनाद्वारे वा इतरांच्या निवडीद्वारे लादण्यात आलेली आहे. तुमच्या मौनसंमतीमध्ये देखील सक्तीचा एक भाग असतो. धर्म हा देखील माणसांवर लादण्यात येतो, त्याला धार्मिक भीतीच्या सूचनेचा, वा कोणत्यातरी आध्यात्मिक किंवा इतर संकटाच्या धमकीचा आधार असतो.

ईश्वराशी तुमचे जे नाते असते त्याबाबतीत मात्र अशा प्रकारची कोणतीही बळजबरी चालत नाही. ते नाते स्वेच्छेचे असावे, ती तुमच्या मनाची आणि हृदयाची निवड असली पाहिजे. आणि ती निवड उत्साहाने आणि आनंदाने केलेली असली पाहिजे. ते कसले आले आहे ऐक्य की, ज्यामध्ये व्यक्ती भयकंपित होते आणि म्हणते, ”माझ्यावर सक्ती करण्यात आली आहे, मी काहीच करू शकत नाही !” सत्य हे स्वत:सिद्ध असते आणि ते जगावर लादता कामा नये. लोकांनी आपला स्वीकार करावा, अशी कोणतीही गरज सत्याला भासत नाही. ते स्वयंभू असल्यामुळे लोक त्याविषयी काय बोलतात किंवा लोकांची त्यावर निष्ठा आहे की नाही, यावर त्याचे अस्तित्व अवलंबून असत नाही.

पण ज्याला धर्माची स्थापना करावयाची असते त्याला मात्र अनेक अनुयायी असावे लागतात. एखाद्या धर्मामध्ये जरी खरीखुरी महानता नसली तरी, कितीजण त्या धर्माचे अनुयायी आहेत त्या संख्येवर लोक त्या धर्माची ताकद आणि महानता ठरवितात. मात्र आध्यात्मिक सत्याची महानता ही संख्येवर अवलंबून नसते.

मला एका नवीन धर्माचा प्रमुख माहीत आहे, जो त्या धर्माच्या संस्थापकाचा मुलगा आहे. तो एकदा म्हणाला की, “अमुक धर्माची जडणघडण होण्यासाठी इतकी शतकं लागली आणि तमुक धर्माला अमुक इतकी शतकं लागली, पण आमच्या धर्मात मात्र गेल्या पन्नास वर्षातच चाळीस लाखांपेक्षा अधिक अनुयायी आहेत, तेव्हा बघा आमचा धर्म केवढा श्रेष्ठ आहे !”

एखाद्या धर्माच्या महानतेचे मोजमाप हे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या संख्येवर अवलंबून असू शकते, पण जरी अगदी एकही अनुयायी लाभला नाही तरीही सत्य मात्र सत्यच असते. जेथे मोठमोठा गाजावाजा चाललेला असतो तेथे माणसं खेचली जातात; पण जिथे सत्य शांतपणे आविष्कृत होत असते, तेथे कोणीही फिरकत नाहीत. जे स्वत:च्या मोठेपणाचा दावा करतात, त्यांना जोरजोरात सांगावे लागते, जाहिरात करावी लागते, अन्यथा त्यांच्याकडे लोक मोठ्या संख्येने आकर्षित होणार नाहीत. पण लोक त्याविषयी काय म्हणतात याची पर्वा न करता काम केले असेल, तर ते फारसे विख्यात नसते आणि साहजिकच, लोक त्याकडे मोठ्या संख्येने वळत नाहीत. पण सत्याला मात्र जाहिरातबाजीची गरज नसते, ते स्वत:ला दडवून ठेवत नाही पण स्वत:ची प्रसिद्धीदेखील करत नाही. परिणामांची चिंता न करता, आविष्कृत होण्यातच त्याची धन्यता सामावलेली असते, ते प्रशंसा मिळावी म्हणून धडपडत नाही किंवा अप्रशंसा टाळत नाही, जगाने त्याचा स्वीकार केला काय किंवा त्याच्या कडे पाठ फिरवली काय, सत्याला त्याने काहीच फरक पडत नाही.

– श्रीमाताजी

(CWM 03 : 82-84)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

श्रीमाताजी आणि समीपता – २६

श्रीमाताजी आणि समीपता – २६ साधक : आज सकाळी ‘क्ष’च्या मार्फत मी श्रीमाताजींना पत्र पाठविले.…

3 days ago

श्रीमाताजी आणि समीपता – २५

श्रीमाताजी आणि समीपता – २५ साधक : माझ्या मनामध्ये श्रीमाताजींविषयी शुद्ध भक्तीचा उदय कसा होईल?…

4 days ago

श्रीमाताजी आणि समीपता – २४

श्रीमाताजी आणि समीपता – २४ साधक : आज ‘बाल्कनी दर्शना’च्या वेळी संध्याकाळी जेव्हा मी श्रीमाताजींचे…

5 days ago

श्रीमाताजी आणि समीपता – २३

श्रीमाताजी आणि समीपता – २३ साधक : गेली चार वर्षे माझा अंतरात्मा नेहमीच सक्रिय आणि…

6 days ago

श्रीमाताजी आणि समीपता – २२

श्रीमाताजी आणि समीपता – २२ साधक : माझी चेतना ही फक्त श्रीमाताजींच्या हृदयावर स्थिरावलेली आहे,…

1 week ago

श्रीमाताजी आणि समीपता – २०

श्रीमाताजी आणि समीपता – २० साधक : सकाळपासून मला असे जाणवते आहे की, मी श्रीमाताजींच्या…

1 week ago