श्रद्धेच्या जोडीला एक प्रकारचे स्पंदनही असावयास हवे. एक अशी कृतज्ञतेची भावना हवी की, ईश्वर अस्तित्वात आहे. ईश्वर अस्तित्वात आहे, ही एक प्रकारची अद्भुत कृतज्ञतेची भावना तुम्हाला एक प्रकारच्या उत्कट आनंदाने भरून टाकते. ह्या विश्वामध्ये दिसणारा भयानकपणाच फक्त अस्तित्वात आहे असे नाही तर, या विश्वामध्ये ईश्वर म्हणूनही काहीतरी अस्तित्वात आहे, हो, तेथे ईश्वर आहे, ईश्वरी अस्तित्व आहे. जेव्हा कधी, अगदी एखादी छोटीशीही गोष्ट, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे तुमचा ईश्वरीय अस्तित्वाच्या त्या उदात्त वास्तवाशी संपर्क घडविते तेव्हा तेव्हा, त्या प्रत्येक वेळी, तुमचे हृदय अगदी उत्कट, अगदी अद्भुत आनंदाने, कृतज्ञतेने भरून जाते. बाकी सर्व गोष्टींच्या तुलनेत अशी कृतज्ञता म्हणजे सर्वाधिक आनंददायी गोष्ट असते.
दुसरी कोणतीच गोष्ट तुम्हाला कृतज्ञतेइतका आनंद देऊ शकत नाही. व्यक्ती एखाद्या पक्षाचे गाणे ऐकते, एखादे सुंदरसे फूल पाहते, एखाद्या लहानग्या बालकाकडे पाहते, उदारतेची एखादी कृती पाहते, एखादे चांगलेसे वाक्य वाचते, मावळत्या सूर्याकडे पाहते, असे काहीही असू शकते, अवचितपणे ते तुमच्या समोर येते आणि मग, हे विश्व ईश्वराची अभिव्यक्ती करत आहे, या विश्वापाठीमागे असे काहीतरी आहे, की जे ईश्वरी आहे ह्यासारखी उत्कट, गाढ, तीव्र अशी भावना मनात दाटून येते.
तेव्हा कृतज्ञतेविना भक्ती ही अपूर्ण आहे; भक्तीसोबत कृतज्ञताही असावयास हवी.
(CWM 08 : 40)
खऱ्याखुऱ्या धार्मिक भावनेने चर्चमध्ये किंवा देवळामध्ये जाणाऱ्या माणसांचे प्रमाण अगदीच कमी असते. म्हणजे असे की, देवाकडून काहीतरी मागण्यासाठी, काहीतरी याचना करण्यासाठी नाही तर, स्वत:ला समर्पित करण्यासाठी, त्याचे आभार मानण्यासाठी, त्याच्याविषयी अभीप्सा बाळगून, आत्मदान करण्यासाठी जाणारी माणसं अगदीच अल्प असतात. असे करणारी व्यक्ती लाखामध्ये अगदी एखादीच असते.
(CWM 06 : 194-195)
परमेश्वराची ही अद्भुत कृपा होय की, तो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या ईश्वरी ध्येयाप्रत अगदी सर्वात जवळच्या मार्गाने घेऊन जात असतो. ती व्यक्ती कशी का असेना, तिच्यामध्ये कितीही अज्ञान, कितीही गैरसमजुती का असेनात, अहंकार, विरोधाची, बंडाची भावना का असेना तरीही, परमेश्वर त्या व्यक्तीला ईश्वरी ध्येयाप्रत घेऊन जात असतो, ही गोष्ट कधीही विसरता कामा नये, ह्या गोष्टीविषयी नेहमीच कृतज्ञ असले पाहिजे.
कृतज्ञतेची विशुद्ध ज्योती तुमच्या हृदयामध्ये कायम तेवत असली पाहिजे. ती अशी उबदार, मधुर, तेजस्वी, ज्योत असेल की, जिच्यामध्ये सर्व अहंकाराचा, सर्व अंधकाराचा विलय होऊन जाईल. साधकाला त्याच्या ध्येयाप्रत घेऊन जाणाऱ्या ईश्वरी कृपेविषयीच्या कृतज्ञतेची ज्योत तुमच्या हृदयामध्ये तेवत असली पाहिजे आणि व्यक्ती जितकी अधिक कृतज्ञ असेल, ही ईश्वरी कृपेची कृती व्यक्तीला जितकी अधिक उमगेल आणि त्याविषयी ती व्यक्ती जेवढी अधिक कृतज्ञता बाळगेल, तेवढा तो मार्ग अधिकच जवळचा असेल.
(Bulletine 1964-08 : 100)
साधना, योग आणि रूपांतरण – २२६ व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन…
साधना, योग आणि रूपांतरण – २२५ साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२४ अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२३ (‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला…
साधना, योग आणि रूपांतरण – २२२ आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व…
साधना, योग आणि रूपांतरण – २२१ उत्तरार्ध चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला…