सर्वात महत्त्वाचा एक गुण म्हणजे दीर्घोद्योग, प्रयत्न-सातत्य, चिकाटी. एक प्रकारची आंतरिक खिलाडूवृत्ती, जी तुम्हाला नाऊमेद होऊ देत नाही, दुःखी होऊ देत नाही आणि हसतहसत साऱ्या अडीअडचणींना सामोरे जाण्यास मदत करते. इंग्लिशमध्ये ह्याला एक छान शब्द आहे – Cheerfulness. जर तुम्ही अशा प्रकारची आनंदी वृत्ती किंवा खेळकरपणा तुमच्यामध्ये बाळगलात तर तुम्ही, तुम्हाला प्रगत होण्यापासून रोखणाऱ्या वाईट प्रभावांशी चांगल्या रीतीने दोन हात करता, तुम्ही त्यांचा चांगल्या रीतीने प्रतिकार करता.
*
(CWM 08 : 23)
गरज पडली तर, एखादी गोष्ट हजार वेळा सुरु करण्याची जरी वेळ आली तरी, ती करण्याचा निश्चय करावयास हवा. माणसं अगदी निराश होऊन माझ्याकडे येतात आणि म्हणतात, ”मला वाटलं होते की, आता सगळं काही झालं आहे; पण आता मला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार. ”परंतु जर त्यांना असे सांगितले की, ”हे तर काहीच नाही. तुम्हाला कदाचित तीच गोष्ट शंभर नाही, दोनशे वेळा, कदाचित हजार वेळासुद्धा करावी लागेल. तुम्ही कुठे एक पाऊल पुढे टाकता आणि असे समजायला लागता की, तुम्ही सुरक्षित आहात, परंतु नेहमीच असे काहीतरी असते की, तुम्ही थोडेसे पुढे गेल्यावर तीच अडचण फिरुन परत येते.”
तुम्हाला असे वाटते की, तुम्ही प्रश्न सोडवला आहे, समस्या सोडविली आहे. पण तुम्हाला पुन्हा एकदा तोच प्रश्न, तीच समस्या सोडवायला लागते. ती दिसायला कदाचित काहीशी भिन्न दिसते पण समस्या तीच असते. अशावेळी “ती समस्या अगदी लाखो वेळा जरी आली तरी मी ती लाख वेळा सोडवेन, परंतु मी त्यातून पार पडेनच,” असा निश्चय जर तुम्ही केलेला नसेल, तर तुम्ही योग करूच शकणार नाही. ही अगदी अनिवार्य अशी गोष्ट आहे.
(CWM 08 : 41-42)
*
व्यक्तीला स्वत:मध्येच एक प्रकारची आश्वासकता वाटली पाहिजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये, काहीही करावे लागले तरीही ती आश्वासकता व्यक्तीने शेवटपर्यंत कायम राखली पाहिजे. जे चिकाटीने प्रयत्नशील राहतात, त्यांना विजय प्राप्त होतो.
सर्व प्रकारच्या विरोधांमध्येसुद्धा ही चिकाटी टिकवून ठेवण्यासाठी एक अविचल असा आधार आवश्यक असतो आणि असा एकमेव अविचल आधार म्हणजे ती सद्वस्तु, ते परम सत्य होय. दुसरीकडे कोठेही असा आधार शोधणे हे व्यर्थ आहे. ज्याबाबत कधीही निराश व्हावे लागणार नाही असा हा एकमेव आधार आहे.
(CWM 09 : 255)
*
प्रयत्नसातत्याद्वारेच व्यक्ती अडचणींवर मात करू शकते, त्यांच्यापासून पळ काढून नव्हे. जो चिकाटी राखतो, प्रयत्नशील राहतो त्याचा विजय निश्चित असतो. जो प्रयत्नसातत्य राखतो त्याचा जय होतो. नेहमीच सर्वोत्तम करत राहा, त्याच्या फलांची काळजी परमेश्वर करेल.
(CWM 14 : 163)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…