चैत्य लक्षणाचे दर्शन
(श्रीमाताजींनी शारीरिक, प्राणिक आणि मानसिक निरीक्षणाविषयी विवेचन केले आहे. त्यानंतर एकाने पुढील प्रश्न विचारला आहे.)
प्रश्न : चैत्यामध्ये निरीक्षण शक्ती असते का?
श्रीमाताजी : त्यामध्ये निरीक्षण क्षमतेपेक्षाही अधिक काही असते. वस्तुंबाबतची थेट दृष्टी तेथे असते. ज्यामध्ये वस्तु प्रतिबिंबित होतात अशा आरशासारखी ती असते, मग त्या वस्तु कोणत्याही का असेनात. आणि सर्वसाधारणत: जी मुले, जी अजूनही निष्पाप असतात, त्यांच्यामध्ये एक प्रकारची संवेदनशीलता स्पष्टपणे आढळून येते.
उदाहरणार्थ, त्यांच्याजवळ जी माणसं येतात त्यांच्या वातावरणाबद्दल अशी मुलं खूप संवेदनशील असतात. काही मुलं कोणतेही कारण नसताना देखील एखाद्या व्यक्तीकडे झेपावतात आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीपासून दूर पळतात. तुमच्या दृष्टीने ती दोन्ही माणसं सारखीच चांगली किंवा सारखीच वाईट असतात, तुम्हाला त्यात कोणताही फरक जाणवत नाही.
पण ही मुलं मात्र त्यातल्या एखाद्या व्यक्तीकडे ताबडतोब आकर्षित होतात आणि दुसऱ्या व्यक्तीबाबत मात्र, तुम्ही कितीही प्रयत्न करा, ती भोकाड पसरतील, रडतील, किंवा त्या व्यक्तीपासून पळून जातील, पण ती मुलं त्या व्यक्तीकडे जाणार नाहीत. हे आकर्षण किंवा प्रतिकर्षण म्हणजे अज्ञानाच्या जाणिवेमध्ये, चैत्य लक्षणाचा झालेला एक प्रकारचा अनुवाद असतो. त्या व्यक्तींच्या चैत्य लक्षणाचे थेट दर्शन त्या बालकाला झालेले असते.
– श्रीमाताजी
(CWM 06 : 08-09)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७ - January 29, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६ - January 28, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४ - January 26, 2026







