ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

आचाराची विचारपूर्वक निवड

संक्रमणकाळात विचारांची अधिकच आवश्यकता असते. क्रांतिकारी कालखंड दोन प्रकारच्या अविचारी, कोणतेही आकलन नसलेल्या, कोणताही विचारविमर्श न केलेल्या मनांना जन्म देतो; एक असे मन की जे जुन्या गोष्टींना, केवळ ते जुने आहे म्हणून चिकटून राहते आणि दुसरे मन अमुक एक गोष्ट केवळ नवीन आहे म्हणून त्याच्या पाठीमागे वेड्यासारखे धावत सुटते. या दोहोंमध्ये स्वयंघोषित मध्यममार्गी माणूस उभा राहतो. तो म्हणतो, जुन्यामधले काहीतरी आणि नवीन मधलेही काहीतरी असे दोन्ही असू दे. या दोन टोकांच्या माणसांपेक्षा हा मध्यममार्गी माणूस काही कमी अविचारी नसतो. तो मध्यममार्गाच्या सूत्राच्या आणाभाका घेतो आणि अशक्य असा ताळमेळ घालू पाहतो. ‘जुन्या बाटल्यांमध्ये नवीन वाईन भरता येत नाही’ असे जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतात तेव्हा त्याच्या म्हणण्याचा हाच आशय असतो.

विचार केव्हाही एखादे सूत्र ठरवीत नाही, आधीच अंदाज बांधत नाही, तर तो प्रत्येक गोष्टीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, प्रत्येक गोष्टीचे मोजमाप करतो. जर एखादा माणूस म्हणेल की, प्रबुद्ध युरोपाच्या मार्गानुसार तुमच्या सर्व सवयी, संकल्पना बदला तर विचार उत्तर देईल, ”मला आधी विचार करू दे. युरोप हा प्रबुद्ध आहे आणि भारत अडाणी आहे असे मी का गृहीत धरू? कदाचित असेही असू शकेल की, युरोपियन लोक हेच खरे अडाणी असू शकतील आणि भारतीय ज्ञानामध्ये खरेखुरे तथ्य असेल. मला शोधले पाहिजे.” आणि दुसऱ्या बाजूने जर एखादा माणूस म्हणेल, ”भारतीय बन आणि भारतीयांप्रमाणे वाग,” तर विचार म्हणेल, ”भारतीय बनण्यासाठी मला भारतीयांप्रमाणेच वागावे लागेल का याविषयी माझ्या मनात संभ्रम आहे. कदाचित असेही असू शकेल की, भारतीयांना जे अपेक्षित नव्हते तेच आत्ताच्या काळातील या देशातील माणसे बनली असतील. भारतीय संस्कृतीच्या वेगवेगळ्या कालखंडांमध्ये भारतीय कसे होते हे मला शोधलेच पाहिजे आणि संस्कृतीमधील शाश्वत काय आणि तात्पुरते काय ह्याचा शोध मला घेतलाच पाहिजे. असेही शक्य आहे की, आम्ही गमावलेल्या काही खऱ्याखुऱ्या भारतीय गोष्टी युरोपयिनांकडे असू शकतील.” भारतीय असणे चांगलेच आहे, पण भारतीय असणे म्हणजे ज्ञानाने भारतीय असणे होय, केवळ पूर्वग्रहाने नव्हे.

मानवी समाजाच्या रक्षणासाठी, तसेच व्यक्तीच्या आणि मानवी समूहाच्या परिपूर्णतेसाठी नेमका कोणता आचार उत्तम आहे हे विचार, विवेक आणि ज्ञान यांच्या साहाय्याने ठरविणे ह्यावरच हिंदुधर्माची उभारणी करण्यात आलेली आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 499-500)

Latest posts by अभीप्सा मराठी मासिक (see all)
अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

प्रकृतीचे शुद्धीकरण

(एका साधकाला स्वप्नामध्ये जे दिसले आहे त्यावरून दिव्य प्रकाश स्वीकारण्यासाठी तो सक्षम आहे असे दिसते,…

23 hours ago

अडचणींना कसे हाताळावे?

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुमच्या अडचणींना हाताळण्यात आणि तुमच्यावर अपप्रवृत्तींचा जो हल्ला होत आहे…

2 days ago

उच्चतर शक्तीचे अवतरण

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) ‘शक्तीला प्रवेश करू द्या,’ असे मी जेव्हा तुम्हाला लिहिले तेव्हा त्याचा अर्थ…

3 days ago

केवळ ईश्वरी शक्तीप्रतच खुले व्हावे

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून...) ‘क्ष’ हा अवाजवी तामसिक, अक्रिय झाला आहे. तो प्रत्येक गोष्टीलाच खुला…

4 days ago

दिव्य शक्तीस आवाहन का?

  आपल्यामधील अहंपुरुष (ego person) हा स्वतःच्या ताकदीने किंवा इच्छाशक्तीने किंवा ज्ञानाने स्वतःचे रूपांतरण करू…

5 days ago

दिव्य शक्तीचे अवतरण कशासाठी?

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) व्यक्तीमध्ये दिव्य शक्तीचे अवतरण हे सहसा, त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर कार्य करण्यासाठी आणि…

6 days ago