ज्ञानयोगाचे साध्य ईश्वरप्राप्ती हे आहे. आपण ईश्वराला प्राप्त करून घ्यावे आणि आपण आपल्या जाणिवेच्या द्वारे, आपल्या ऐक्याच्या द्वारे, आपल्या मधील दिव्य सत्याच्या प्रतिबिंबाद्वारे आपला ताबा ईश्वराला घेऊ द्यावा.
अर्थात ही गोष्ट, आपल्या सद्य अस्तित्वापासून दूर कोठेतरी, केवळ अमूर्त पातळीवर साध्य करायची असे नाही तर ती अगदी इथेसुद्धा घडवून आणली पाहिजे. त्यासाठी, स्वत:मधील ईश्वर, विश्वातील ईश्वर; अंतरंगातील ईश्वर आणि सर्व वस्तू व सर्व जीवमात्रांतील ईश्वर हा आपण आत्मसात केला पाहिजे. म्हणजे, ईश्वराशी एकत्व प्राप्त करून घेऊन, त्याच्या माध्यमातून ह्या जगतातील एकत्वाची, विश्वात्मक एकत्वाची आणि सर्वांमधील एकत्वाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. त्या एकत्वामध्ये अनंत विविधतेचा लाभ घेतला पाहिजे. आणि हे करावयाचे ते एकत्वाच्याच आधारावर, विविधतेच्या वा विभक्ततेच्या आधारावर नव्हे.
…ईश्वर, त्याच्या व्यक्तित्वांत आणि त्याच्या निर्व्यक्तित्वांत आपलासा करणे, त्याच्या निर्गुण शुद्धतेत आणि त्याच्या अनंत गुणांमध्ये, सगुण रुपामध्ये आपलासा करणे, कालात्मक आणि कालातीत स्वरूपात आपलासा करणे, त्याच्या क्रियाशीलतेत आणि त्याच्या निःशब्दतेतही आपलासा करणे, त्याच्या सान्त स्वरूपात व त्याच्या अनंत स्वरूपात आपलासा करणे हे ज्ञानयोगाचे साध्य आहे.
केवळ त्याच्या शुद्ध आत्मस्वरूपात नव्हे, तर सर्वांच्या आत्मरूपात तो आपलासा करणे; केवळ आत्मरूपात नव्हे, तर प्रकृतीतही तो आपलासा करणे; केवळ आत्म्यात नव्हे, तर अतिमानसात, मनात, प्राणात व शरीरात तो आपलासा करणे; आत्म्याने, मनाने, प्राणाने व शारीर जाणिवेने तो आपलासा करणे, हे ज्ञानयोगाचे साध्य आहे.
ईश्वराने (आत्मा, मन, प्राण, शरीर) वरील सर्व गोष्टी त्याच्या कराव्या, हे सारे कशासाठी? तर, असे झाले असता, आपले अस्तित्व ईश्वराशी एकरूप होईल, त्याने भरून जाईल, त्याच्या नियंत्रणाखाली काम करील व त्याच्या प्रेरणेने काम करील.
ईश्वर एकत्वस्वरूप असल्याने, ज्ञानयोगाचे हेही साध्य आहे की, आपल्या शारीर जाणिवेने भौतिक विश्वाच्या आत्म्याशी व प्रकृतीशी एकरूप व्हावे; आपल्या प्राणाने सर्वात्मक प्राणांशी एकरूप व्हावे; आपल्या मनाने विश्वमनाशी एकरूप व्हावे; आपल्या आत्म्याने विश्वात्म्याशी एकरूप व्हावे; आपण त्याच्या कैवल्यामध्ये विलीन होऊन जावे आणि सर्व संबंधांत त्याचाच शोध घ्यावा.
यानंतर ज्ञानयोगाचे आणखी साध्य आहे ते असे की, दिव्य (ईश्वरी) अस्तित्व आणि दिव्य ईश्वरी प्रकृती आपण आपलीशी करणे.
ईश्वर सच्चिदानंद आहे, म्हणून आपण आपले अस्तित्व उन्नत करून, ते दिव्य ईश्वरी अस्तित्व करावे, आपली जाणीव उन्नत करून ती ईश्वरी जाणीव करावी, आपली शक्ती ईश्वरी शक्ती करावी, आपला अस्तित्वमूलक आनंद ईश्वरी अस्तित्वमूलक आनंद बनवावा, हे ज्ञानयोगाचे साध्य आहे.
आपले अस्तित्व उच्चतर जाणिवेमध्ये उन्नत करणे एवढेच केवळ आपले साध्य नाही तर ती उच्चतर जाणीव आपल्या समग्र अस्तित्वामध्ये व्यापक करणे हेही आहे; कारण आपण आपल्या अस्तित्वाच्या सर्व पातळ्यांवर, आपल्या सर्व घटकांमध्ये, ईश्वराचा शोध घ्यावयाचा आहे; जेणेकरून आपले मानसिक, प्राणिक, शारीरिक अस्तित्व हे दिव्य प्रकृतीने भरून जाईल.
आपल्या बुद्धियुक्त मानसिकतेला ईश्वरी ज्ञानयुक्त इच्छेचे रूप यावे, आपल्या मानसिक आत्मजीवनाला ईश्वरी प्रेमाच्या व आनंदाच्या क्रीडेचे रूप यावे, आपली प्राणक्रिया ही ईश्वरीय जीवनाची क्रीडा व्हावी, आपले शारीरिक अस्तित्व हे ईश्वरी द्रव्याचा जणू साचा व्हावे, हे ज्ञानयोगाचे साध्य आहे.
दिव्य ज्ञान (विज्ञान) आणि दिव्य आनंद यांच्याप्रत स्वत:ला खुले करूनच ही ईश्वरी क्रिया आपल्यामध्ये प्रत्यक्षात यावयास हवी; आणि ही ईश्वरी क्रिया पूर्ण होण्यासाठी, आपण विज्ञानभूमीवर व आनंदभूमीवर चढून गेले पाहिजे, तेथे कायमचे वास्तव्य केले पाहिजे.
– श्रीअरविंद
(CWSA 24 : 511)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…