मानवातून अतिमानवाचा उदय
मर्यादित बहिर्मुख असणाऱ्या अहंकाराला हद्दपार करून, त्या जागी ईश्वराला सिंहासनावर बसवणे आणि प्रकृतीचा हृदयस्थ शासनकर्ता बनविणे हे आमच्या योगाचे प्रयोजन आहे.
वासनेचा पूर्वापार चालत आलेला अधिकार रद्द करणे, (सामान्यतः वासना हीच माणसाच्या जीवनाची शासक असते) वासनातृप्तीला आपल्या जीवनाचे शासन करण्यास येथून पुढे संमती न देणे; असा ह्याचा अर्थ आहे. आध्यात्मिक जीवनाचे पोषण वासनेतून होणार नाही; तर सारभूत जीवनाचा एक नि:स्वार्थी शुद्ध आध्यात्मिक आनंद असतो, त्यातून आध्यात्मिक जीवनाचे पोषण होईल.
केवळ वासनेचा शिक्का असलेली जी आमची प्राणिक प्रकृती आहे तिचाच नवा जन्म, तिचेच नवे रूपांतर होणे आवश्यक आहे असे नाही, तर आमच्या मनोमय अस्तित्वाचाही नवा जन्म, नवे रूपांतर होणे आवश्यक आहे.
आमची भेदमय, अहंप्रधान, मर्यादित, अज्ञानव्याप्त बुद्धी व तसेच असणारे आमचे विचारही नष्ट झाले पाहिजेत. त्यांच्या जागी छायाशून्य दिव्य प्रकाश, सर्वगामी निर्दोष प्रकाश आला पाहिजे, या प्रकाशाची वाढ होऊन शेवटी स्वाभाविक स्वयंभू सत्य-जाणीव आम्हामध्ये प्रस्थापित होईल : चाचपडणारे अर्धसत्य आणि ठेचाळणारा प्रमाद यांची परिसमाप्ती स्वयंभू सत्यजाणिवेत होईल.
आमची गोंधळलेली अहंभावकेंद्रित क्षुद्र हेतूंची इच्छा व कृती थांबली पाहिजे; आणि त्यांची जागा द्रुतगतीच्या समर्थ, ज्ञानमय, स्वयंचलित, ईश्वरप्रेरित, ईश्वरी मार्गदर्शन असलेल्या शक्तीने घेतली पाहिजे. आमची इच्छा ईश्वराच्या इच्छेशी स्वखुशीने संपूर्णपणे एकरूप झाली पाहिजे आणि मग ही आमची श्रेष्ठ, निर्व्यक्तिक, न अडखळणारी, निश्चयात्मक इच्छा आमच्या सर्व कार्यात पायाभूत होऊन सक्रिय झाली पाहिजे.
आमच्या अहंभावप्रधान, पृष्ठवर्ती, दुर्बल भावनांचा खेळ बंद झाला पाहिजे; आणि त्या ऐवजी त्यांच्या मागे दडलेल्या, आणि आपली वेळ येण्याची वाट पाहात बसलेल्या, खोल, विशाल अशा आंतरिक चैत्य-हृदयाचा व्यापार सुरू झाला पाहिजे. ईश्वराचे स्थान असलेल्या या आंतरिक हृदयाच्या प्रेरणेने, आमच्या भावना ह्या दिव्य प्रेम व अनेकविध आनंद यांच्या शांत, जोरकस व्यापारांमध्ये रुपांतरित होतील.
दिव्य मानवता किंवा अतिमानसिक वंश कसा असेल त्याचे हे वर्णन आहे, स्वरूप व लक्षण आहे. मानवी बुद्धीची व कृतीची असामान्य किंवा परिशुद्ध अशी शक्ती ज्याचामध्ये असेल, अशा तऱ्हेचा अतिमानव निर्माण करण्याची नव्हे; तर वरील स्वरूपाचा व लक्षणाचा अतिमानव आम्ही आमच्या योगाच्या द्वारे उदयाला आणावा अशी हाक आम्हाला आली आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 23 : 90-91)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ - December 7, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ - December 6, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ - December 5, 2025







