साधना, योग आणि रूपांतरण – २९८
अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण
अवचेतनामध्ये (subconscient) प्रवेश करणाऱ्या आणि परिवर्तन करणाऱ्या प्रकाशाचे काही पहिलेवहिले परिणाम पुढीलप्रमाणे असतात –
१) अवचेतनामध्ये काय दडलेले आहे ते आता अधिक सहजतेने अवचेतनाकडून दाखविले जाते.
२) अवचेतनामधून पृष्ठभागावर येणाऱ्या गोष्टींचा स्पर्श चेतनेला होण्यापूर्वी किंवा त्यांचा परिणाम चेतनेवर होण्यापूर्वीच त्या गोष्टींची मनाला जाणीव होते.
३) आता अवचेतन हे अज्ञानी व अंधकारमय गतिप्रवृत्तींचे आश्रयस्थान राहत नाही तर, आता उच्चतर चेतनेला जडभौतिकाकडून अधिक आपसूकपणे प्रतिसाद मिळू लागतो.
४) विरोधी शक्तींच्या सूचनांना अवचेतन आता अधिक उघडपणे सामोरे जाते आणि त्या सूचनांना वाव देण्याचे प्रमाणही कमी होते.
५) निद्रेमध्ये सचेत राहणे आता अधिक सहजसोपे होते आणि स्वप्नांमध्ये अधिक उच्च प्रकारचे अनुभव येऊ शकतात. विरोधी स्वप्नं पडली तर, म्हणजे उदाहरणार्थ, स्वप्नांमध्ये कामुक सूचना आल्या तर त्यांचा तिथेच सामना करता येतो आणि अशी स्वप्नं थांबविता येतात आणि स्वप्नदोषासारखा परिणामदेखील थांबविता येतो.
६) झोपण्यापूर्वी स्वप्नावस्थेवर एक जागृत संकल्प केंद्रित करणे अधिकाधिक परिणामकारक ठरते.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 612)






