Tag Archive for: सूर्यप्रकाशित मार्ग

नैराश्यापासून सुटका – ३६

(योगमार्गाचे अनुसरण करणाऱ्या साधकाने हास्य-विनोद करता कामा नयेत; किंवा त्याने नेहमी गंभीरच असले पाहिजे; असा काही नियम नाही. मात्र त्याने योगमार्गाचे आचरण गांभीर्यानेच केले पाहिजे, अशा आशयाचे काही बोलणे आधी झाले असावे असे दिसते. त्या संदर्भातील एका प्रश्नावर श्रीअरविंद यांनी एका साधकाला दिलेले हे उत्तर…)

हसत-खेळत असणे आणि मजेत राहणे यामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या चुकीचे काहीच नाही; उलट, तसे (प्रसन्नचित्त) असणे ही योग्य गोष्ट आहे. संघर्षांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, ते प्रगतीसाठी अपरिहार्य नसतात; पण अशी अनेक माणसं असतात की, ज्यांना भांडण-तंट्याची इतकी सवय झालेली असते की त्यामुळे, ते सदानकदा झगडाच करत राहतात. मात्र ते काही फारसे इष्ट नाही.

जसा एक अंधारलेला, झाकोळलेला मार्ग असतो तसाच एक ‘सूर्यप्रकाशित’ मार्गसुद्धा असतो आणि दोहोंपैकी (अर्थातच) सूर्यप्रकाशित मार्ग हा अधिक चांगला असतो. सूर्यप्रकाशित मार्गावरून व्यक्ती श्रीमाताजींवरील संपूर्ण विश्वासाने वाटचाल करत असते. अशा वेळी व्यक्तीला ना कशाचे भय असते, ना कशाचे दुःख! येथेही तळमळ, आस आवश्यकच असते पण प्रकाश, श्रद्धा, विश्वास व हर्ष यांनी परिपूर्ण अशी एक सूर्यप्रकाशित अभीप्सादेखील (sunlit aspiration) असू शकते; आणि जर समजा अडचणी आल्याच तर, त्यांना (त्या अभीप्सेच्या आधारे) हसतमुखाने सामोरे जाणे शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 173)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०५

अचेतनाचे रूपांतरण

(साधना अचेतनापर्यंत [Inconscient] जाऊन पोहोचल्यामुळे साधकांमध्ये सर्वसाधारणपणे एक निरुत्साहाचे वातावरण दिसून येत आहे, असे निरीक्षण एकाने नोंदविले आहे, त्यावर श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर…)

या साधकांच्या आंतरिक जीवनामध्ये अचेतनातून आलेल्या तामसिकतेमुळे एक प्रकारचा अडसर निर्माण झाला आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना सापडत नाहीये, हेच तर दुखणे आहे. व्यक्तीने जर योग्य परिस्थिती व योग्य दृष्टिकोन बाळगला, आपल्याला नेमून दिलेल्या कामामध्ये आणि साधनेमध्ये जर रस घेतला तर ही अचडण निवळेल.

योग्य वृत्ती ठेवणे आणि हळूहळू किंवा शक्य असेल तर वेगाने, उच्चतर अभीप्सेचा प्रकाश व्यक्तित्वाच्या अचेतन भागामध्येसुद्धा उतरविणे हा यावरील उपाय आहे; म्हणजे परिस्थिती कशीही असली तरी, त्या भागालासुद्धा, योग्य संतुलन कायम ठेवता येईल. आणि मग अशा व्यक्तीला सूर्यप्रकाशित मार्ग (sunlit path) अशक्य वाटणार नाही.

• श्रीअरविंद (CWSA 31 : 618)